पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


हिमाचल प्रदेशच्या लोकांनी आव्हानांचे संधीत रूपांतर केले आहे.

"डबल इंजिन सरकारने ग्रामीण रस्ते, महामार्ग रुंदीकरण, रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत"

“प्रामाणिक नेतृत्व, शांतताप्रिय वातावरण, देवी-देवतांचे आशीर्वाद आणि कठोर परिश्रम करणारे हिमाचलचे लोक, हे सर्व अतुलनीय आहेत.हिमाचलमध्ये गतीमान विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत.

प्रविष्टि तिथि: 15 APR 2022 2:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात हिमाचल प्रदेशातील जनतेचे राज्याच्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन केले आहे आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात त्यांचा 75 वा स्थापना दिवस येत असल्याच्या आनंददायी योगायोगाचा उल्लेख केला. स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव काळात  विकासाचे अमृत राज्यातील प्रत्येक रहिवाशांपर्यंत पोहोचवण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

एक वैयक्तिक उल्लेख  करत, पंतप्रधानांनी श्री अटलबिहारी वाजपेयी यांची कविता उद्धृत केली; आणि मेहनती, दृढनिश्चयी अशा  लोकांच्या या सुंदर राज्याशी असलेल्या त्यांच्या दीर्घकालीन ऋणानुबंधाचे स्मरण केले.

1948 मध्ये या डोंगराळ राज्याच्या निर्मितीच्या वेळच्या  आव्हानांचे स्मरण करून पंतप्रधानांनी या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर केल्याबद्दल हिमाचल प्रदेशातील लोकांची  प्रशंसा केली.फलोत्पादन, वीज अधिशेष, साक्षरता दर, ग्रामीण रस्ते जोडणी, नळाचे पाणी आणि प्रत्येक घरात वीज या क्षेत्रातील राज्याच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.गेल्या 7-8 वर्षांतील या कामगिरीसाठी केलेल्या प्रयत्नांकडे त्यांनी लक्ष  वेधले."जयराम जी यांच्या तरुण नेतृत्वाखालील  'डबल इंजिन सरकारने' ग्रामीण रस्ते, महामार्ग रुंदीकरण, रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. दळणवळण अधिक सुकर होत असल्याने, हिमाचलचे पर्यटन नवीन क्षेत्रांमध्ये,नवीन विभागांत ,प्रवेश करत आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी, पर्यटनातील नवीन संधींचे  नवे आयाम आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी यांचे महत्त्व अधोरेखित केले.  विशेष करून महामारीच्या काळात कार्यक्षम आणि जलद लसीकरण करत आरोग्य क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा  पंतप्रधानांनी यावेळी विशेष उल्लेख केला.

हिमाचल प्रदेशच्या पूर्ण क्षमतांचा  उपयोग करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.'अमृत काल' दरम्यान पर्यटन, उच्च शिक्षण, संशोधन, माहिती तंत्रज्ञान , जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती या क्षेत्रात कार्य पुढे नेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या व्हायब्रंट व्हिलेज योजनेचा हिमाचल प्रदेशला मोठा लाभ होईल, असे ते म्हणाले. त्यांनी दळणवळण विस्तार योजना, वन समृद्धता, स्वच्छता आणि लोकसहभाग या विषयांवरही विचार मांडले.

विशेषतः  सामाजिक सुरक्षेच्या क्षेत्रात,मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी केलेल्या केंद्रीय कल्याणकारी योजनांच्या विस्तारावर पंतप्रधानांनी भाष्य केले.  "प्रामाणिक नेतृत्व, शांतता प्रिय वातावरण, देवी-देवतांचे आशीर्वाद आणि कठोर परिश्रम करणारे हिमाचलचे लोक, हे सर्व अतुलनीय आहेत. हिमाचलमध्ये जलद विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत", असे  मोदी यांनी सांगितले.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1817039) आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam