पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधानांनी राज्यसभेत दिलेले उत्तर
Posted On:
08 FEB 2022 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2022
माननीय सभापतीजी,
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर येथे विस्ताराने चर्चा झाली आहे. मी राष्ट्रपतींचे आभार मानण्याकरता उभा आहे. या चर्चेत भाग घेण्यासाठी तुम्ही वेळ दिला, मी आपला खूप आभारी आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी गेल्या काही दिवसात कोरोनाच्या या कठीण कालखंडातही देशात चहुदिशांना कशाप्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या, देशातील दलित, पीडित, गरीब, शोषित, महिला, युवा यांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जी पावले उचलण्यात आली त्याचा संक्षिप्त लेखाजोखाच देशासमोर मांडला. आणि यात आशाही आहे, विश्वासही आहे, संकल्पही आहे, समर्पणही आहे. अनेक
माननीय सदस्यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. माननीय खडगेजी यांनी काही देशासाठी, काही पक्षासाठी, काही स्वत:साठी.. बरेच काही ते बोलले.
आनंद शर्माजी यांनाही जरा वेळेची अडचण आली, पण तरीही त्यांनी प्रयत्न केला. ते हे ही म्हणाले की देशाने केलेली कामगिरी स्विकारायला हवी. श्रीमान मनोज झाजी यांनी अभिभाषण राजकारणापासून दूर असायला हवे, याबाबत चांगला सल्ला दिला. प्रसुन्न आचार्यजी यांनी वीर बाल दिवस आणि नेताजीं संबंधित कायद्याबाबत विस्ताराने प्रशंसा केली. डॉक्टर फौजिया खानजी यांनी संविधानाच्या प्रतिष्ठेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. प्रत्येक सदस्याने आपल्या अनुभवाच्या आधारावर, अपल्या राजकीय विचारसणीच्या आधारावर आणि राजकिय स्थितीच्या आधारावर आपले म्हणणे आमच्यासमोर मांडले आहे. मी सर्व माननीय सदस्यांचे याकरता मनापासून आभार मानतो.
आदरणीय सभापतीजी,
आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात देशाला दिशा देण्यासाठी, देशाला गती देण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले आहेत. आणि त्या सर्वांचा लेखाजोखा घेऊन, जे चांगले आहे ते पुढे नेणे, उणिवा सुधारणे. आणि जिथे नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे, त्या करणे आणि जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा देशाला कुठे घेऊन जायचे आहे, कसे न्यायचे आहे, कोणत्या योजनांच्या मदतीने आपण हे करू शकतो. यासाठी हा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. आणि आपण सर्व राजकीय नेते, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपले लक्ष आणि देशाचे लक्ष येत्या 25 वर्षात देशाला पुढे कसे न्यायचे याकडे केंद्रीत केले पाहिजे आणि त्यातून जे संकल्प पुढे येतील, त्या संकल्पात सर्वांची सामूहीक भागीदारी असेल असा माझा विश्वास आहे. सर्वांचा एकत्रित सहभाग असेल. प्रत्येकाची मालकी असेल आणि त्यामुळे 75 वर्षांच्या वेगापेक्षा अनेक पटीने आपण देशाला खूप काही देऊ शकतो.
आदरणीय सभापतीजी,
कोरोना ही जागतिक महामारी आहे आणि मानवजातीने गेल्या 100 वर्षांत इतके मोठे संकट पाहिले नाही. आणि संकटाची तीव्रता पहा, आई खोलीत आजारी आहे पण मुलगा त्या खोलीत प्रवेश करू शकत नाही. संपूर्ण मानवजातीसाठी हे किती मोठे संकट होते. आणि आताही हे संकट बहुरूपी आहे, नवे रूप आणि आकार घेत आहे, ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संकटांसह येते. आणि संपूर्ण देश, संपूर्ण जग, संपूर्ण मानवजात त्याच्याशी लढत आहे. प्रत्येकजण मार्ग शोधत आहे. आज जेव्हा जगात 130 कोटींच्या भारतात सुरुवातीला कोरोना सुरू झाला. चर्चा होती की भारताचे काय होणार? आणि भारतामुळे जगाचा किती विध्वंस होईल या दिशेने चर्चा सुरू होती. पण 130 कोटी देशवासीयांच्या संकल्पशक्तीचे सामर्थ्य बघा, जे उपलब्ध होते, त्यातच शिस्तीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. आज भारताच्या प्रयत्नांचे जगभर कौतुक होत आहे आणि त्याचा अभिमान आहे, तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कालखंड नव्हता. हे यश देशाचे आहे. 130 कोटी देशवासीयांचे आहे. तुम्ही लोकांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असता तर बरे झाले असते, तुमच्या खात्यातही काहीतरी जमा झाले असते. पण आता हेही शिकवावे लागेल. बरं, लसीकरणाबाबत, आपल्या आदरणीय मंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सविस्तरपणे सांगितलं की, भारत कशाप्रकारे लसी बनवण्यात, संशोधनात आणि त्याच्या अंमलबजावणीत नवनवीन शोध लावत आहे. आजही जगात लसींच्या विरोधात प्रचंड आंदोलनं होत आहेत. पण मला लसीचा फायदा होवो अथवा न होवो, पण निदान मी लस घेतली तर माझ्यामुळे कुणाचेही नुकसान होणार नाही, या भावनेने 130 कोटी देशवासीयांना लस घेण्याची प्रेरणा दिली. भारताच्या मूलभूत विचारसरणीचे हे प्रतिबिंब आहे, जे जगासमोर मांडणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. फक्त स्वत:चे रक्षण करण्याचा मुद्दा असता तर मग मी लस घ्यावी की नाही हा वाद होता. पण जेव्हा त्यांच्या मनात विचार आला की माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, यासाठी मलाही लसमात्रा घ्यायची असेल तर मी घ्यावी आणि त्यांनी ती घेतली. हे भारताच्या मनाचे, भारताच्या मानवी मनाचे आहे, भारताच्या मानवतेचे आहे, हे आपण जगासमोर अभिमानाने सांगू शकतो. आज आम्ही 100% लसीकरणाच्या लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आदरणीय सदस्य किंवा सर्व आदरणीय सदस्य, आपले आघाडीचे कार्यकर्ते, आपले आरोग्य कर्मचारी, आपले शास्त्रज्ञ, त्यांच्यासमोर मी त्यांच्या कामाचे कौतुक केल्याने भारताची प्रतिभा निखरेल. पण अशा प्रकारे आपले आयुष्य समर्पित करणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि म्हणूनच सभागृहाने त्यांचे अभिमानाने स्वागत केले, त्यांचे आभार मानले.
आदरणीय सभापतीजी,
या कोरोनाच्या काळात 80 कोटींहून अधिक देशवासीयांना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी मोफत रेशन देण्यात आले, हे काम करून भारताने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. या कोरोनाच्या काळात, अनेक अडचणी आल्या, अडथळे आले, असे असतानाही, प्रगतीत वारंवार अडथळे येत असतानाही, लाखो कुटुंबांना, गरिबांना पक्की घरे देण्याच्या आमच्या वचनाच्या दिशेने आम्ही पुढे गेलो आणि आज गरिबातील गरीबाच्या घराची किंमतही लाखात आहे. ज्या कोट्यवधी कुटुंबांना हे घर मिळाले आहे, आज त्या प्रत्येक गरीब कुटुंबाला लखपती म्हणता येईल.
आदरणीय सभापतीजी,
या कोरोनाच्या काळात पाच कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचे काम करून नवा विक्रम केला आहे. या कोरोनाच्या काळात जेव्हा पहिली टाळेबंदी लावली तेव्हा तीही खूप विचारपूर्वक, अनेकांशी चर्चा करून. थोडं धाडसही हवं होतं. गावागावातल्या शेतकऱ्यांना टाळेबंदीपासून मुक्त ठेवावं हा निर्णय महत्त्वाचा होता पण घेतला. आणि याचा परिणाम असा झाला की कोरोनाच्या या काळातही आमच्या शेतकऱ्यांनी भरघोस पीक घेतले आणि एमएसपी मध्येही विक्रमी खरेदी करून नवीन विक्रम स्थापित केला. या कोरोनाच्या काळात, पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प पूर्ण झाले कारण आपल्याला माहीत आहे की अशा संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवर केलेली गुंतवणूक रोजगाराच्या संधी सुनिश्चित करते. आणि म्हणूनच आम्ही त्यावरही भर दिला जेणेकरून रोजगारही मिळत राहावा आणि सर्व प्रकल्पही पूर्ण करता यावेत. अडचणी आल्या पण करू शकलो. या कोरोनाच्या काळात, जम्मू-काश्मीर असो, ईशान्य असो, प्रत्येक कालखंडात विकासाचा प्रवास विस्ताराने पुढे नेला गेला आणि आम्ही ते केले. या कोरोनाच्या काळात आपल्या देशातील तरुणांनी भारताचा तिरंगा, क्रीडा जगताच्या प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवण्याचे मोठे काम केले, देशाला गौरवान्वित केले. आज आपल्या तरुणांनी क्रीडा विश्वात ज्या प्रकारे कामगिरी केली आहे आणि कोरोनाच्या या सर्व बंधनांमधेही त्यांनी आपली तपश्चर्या ढळू दिली नाही. त्यांनी आपली साधना कमी होऊ दिली नाही आणि देशाचा गौरव वाढवला आहे.
आदरणीय सभापतीजी,
या कोरोनाच्या काळात, आज जेव्हा आपल्या देशातील तरुण स्टार्ट अप, भारताची तरुणाई ही एक ओळख बनली आहे, तो एक समानार्थी शब्द बनला आहे. आज आपल्या देशातील तरुण स्टार्ट अप्समुळे भारताला स्टार्ट अप्सच्या जगतात अव्वल 3 मध्ये स्थान मिळाले आहे.
आदरणीय सभापतीजी,
या कोरोनाच्या काळात, कॉप 26 असो, जी 20 गटाचे क्षेत्र असो किंवा समाज जीवनातील अनेक विषयांवर काम करणे असो, जगातील 150 देशांमध्ये औषधे पोहोचवणे असो, भारताने नेतृत्वाची भूमिका घेतली आहे. आज भारताच्या या नेतृत्वाची जगात चर्चा आहे.
आदरणीय सभापतीजी,
जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा आव्हाने खूप मोठी असतात. जगातील प्रत्येक शक्ती स्वतःच्या बचावात गुंतलेली असते. कोणी कोणाला मदत करु शकत नाही. अशा काळात त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अटलबिहारी वाजपेयींच्या कवितेतील ते शब्द मला, आपल्या सर्वांना प्रेरणा देऊ शकतात. अटलजींनी लिहिलं होतं- -व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किन्तु चीर कर तम की छाती, चमका हिन्दुस्तान हमारा। शत-शत आघातों को सहकर, जीवित हिन्दुस्तान हमारा। जग के मस्तक पर रोली सा, शोभित हिन्दुस्तान हमारा।
अटलजींचे हे शब्द आजच्या काळात भारताचे सामर्थ्य दाखवतात.
आदरणीय सभापती,
या कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना अडचणी असूनही पुढे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काही क्षेत्र अशी होती ज्यावर थोडा विशेष भर देखील दिला गेला. कारण तो वो व्यापक जनहित लक्षात घेतले तर आवश्यक होता, युवा पिढीसाठी आवश्यक होता. कोरोना काळात ज्या विशेष क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला, त्यापैकी दोघांची मला नक्कीच चर्चा करायला आवडेल. एक एमएसएमई क्षेत्र, सर्वात जास्त रोजगार देणारे एक क्षेत्र आहे, ते आम्ही निवडले. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्र, यातही कोणतीही अडचण येऊ नये हे सुनिश्चित केले गेले आणि त्यामुळेच ते निवडण्यात आले. विक्रमी पीक झाले, सरकारने विक्रमी खरेदी देखील केली. महामारी असूनही गहू खरेदीचे नवे विक्रम झाले. शेतकऱ्यांना जास्त हमी भाव मिळाला आणि तो देखील थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत मिळाला. पैसे थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले. आणि मी तर पंजाबच्या लोकांचे अनेक व्हिडिओ पाहिले कारण पंजाबमध्ये प्रथमच थेट लाभ हस्तांतरण द्वारे पैसे दिले गेले. ते म्हणाले, साहेब, आमचे शेत देखील तेवढ्याच आकाराचे आहे, आमची मेहनत तेवढीच आहे, मात्र खात्यात एवढे पैसे एकदम जमा होतात, हे आयुष्यात पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांकडे रोख रक्कम उपलब्ध राहिली, अशा उपाययोजनांमुळेच एवढ्या मोठ्या क्षेत्राला आपण महामारीच्या प्रभावापासून आणि अडचणींपासून वाचवू शकलो. तसेच एमएसएमई क्षेत्र, हे त्या क्षेत्रांपैकी होते ज्याला आत्मनिर्भर भारत पॅकेजचा सर्वाधिक लाभ मिळाला.
विविध मंत्रालयाने जी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना सुरु केली, त्यामुळे उत्पादन क्षेत्राला बळ मिळाले. भारत आता आघाडीचा मोबाईल उत्पादक बनला आहे आणि निर्यातीतही त्याचे योगदान वाढत आहे. वाहननिर्मिती आणि बॅटरी, या क्षेत्रातही पीएलआय योजना उत्साहवर्धक परिणाम देत आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या स्तरावर निर्मिती आणि ती देखील बहुतांश एमएसएमई क्षेत्राद्वारे होते, तेव्हा स्वाभाविकपणे जगातील अन्य देशांकडूनही ऑर्डर मिळतात, अधिक संधी देखील मिळतात. आणि सत्य हे आहे की अभियांत्रिकी वस्तू ज्या एमएसएमई मोठ्या प्रमाणावर बनवतात आणि सध्या जी निर्यातीची मोठी आकडेवारी दिसते, त्यात या अभियांत्रिकी वस्तूंचे देखील खूप मोठे योगदान आहे. यातून भारतीयांचे कौशल्य आणि भारताच्या एमएसएमईचे सामर्थ्य दिसून येते. आपला संरक्षण सामुग्री निर्मिती उद्योग जर आपण पाहिला तर उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये संरक्षण विभाग कॉरिडोर बनवत आहे. जे सामंजस्य करार होत आहेत, ज्या प्रकारे लोक या क्षेत्राकडे वळत आहेत, एमएसएमई क्षेत्राचे लोक इथे संरक्षण क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत, ही खरेच उत्साहवर्धक बाब आहे की देशाच्या लोकांमध्ये हे सामर्थ्य आहे आणि देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपले एमएसएमई क्षेत्राचे लोक धाडसी वृत्तीने पुढे येत आहेत.
आदरणीय सभापती,
एमएसएमई, काही GEM, या माध्यमातून सरकारच्या वतीने जी सामानाची खरेदी केली जाते, हे एक खूप मोठे माध्यम बनवले आहे आणि या मंचामुळे आज अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, आम्ही एक खूप मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि निर्णय हा आहे की सरकार मध्ये 200 कोटी रुपयांपासून किंवा 200 कोटी रुपयांपर्यंत ज्या निविदा असतील, त्या जागतिक असणार नाहीत. त्यात भारताच्या लोकांनाच संधी दिली जाईल आणि त्यामुळे आपल्या एमएसएमई क्षेत्राला आणि त्याद्वारे आपल्या रोजगाराला बळ मिळेल.
आदरणीय सभापती,
या सभागृहात आदरणीय सदस्यांनी रोजगार संबंधी काही महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. काही लोकांनी सूचना देखील केल्या. किती रोजगार निर्मिती झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी ईपीएफओ पेरोल, हा ईपीएफओ पेरोल सर्वात विश्वासार्ह माध्यम मानले जाते. वर्ष 2021 मध्ये सुमारे एक कोटी वीस लाख ग्राहक ईपीएफओच्या पेरोलमध्ये जोडले गेले आणि आपण हे विसरता कामा नये की हे सर्व औपचारिक रोजगार आहेत. आणि यातले 60-65 लाख 18-25 वर्षे वयोगटातील आहेत, याचा अर्थ असा झाला की हे वय पहिल्या नोकरीचे आहे म्हणजे प्रथमच रोजगाराच्या बाजारपेठेत त्यांचा प्रवेश झाला आहे.
आदरणीय सभापती,
आदरणीय सभापति जी, अहवाल सांगतो की कोरोनाच्या पूर्वीच्या तुलनेत कोविड निर्बंध उठवल्यानंतर हायरिंग म्हणजेच रोजगारात दुप्पट वाढ झाली आहे. नेस्कॉमच्या अहवालातही यासंबंधी चर्चा आहे. त्यानुसार, वर्ष 2017 नंतर, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेस्कॉम असे म्हणते, 27 लाख रोजगार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत आणि हे केवळ कौशल्याच्या दृष्टिने नाही तर त्याच्या वरच्या हुद्द्याचे जे लोक असतात, त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. निर्मिती वाढल्यामुळे भारताच्या जागतिक निर्यातीत वाढ झाली आहे आणि त्याचा लाभ रोजगाराच्या क्षेत्रावर थेट दिसून येतो.
आदरणीय सभापती,
वर्ष 2021 मध्ये म्हणजेच केवळ एका वर्षात भारतात जितके यूनिकॉर्न्स तयार झाले आहेत, ते त्यापूर्वीच्या वर्षात तयार झालेल्या एकूण यूनिकॉर्नस पेक्षा अधिक आहेत. आणि हे सगळे रोजगाराच्या गणनेत येत नसेल तर, मग रोजगारापेक्षा अधिक राजकारणाची चर्चा मानली जाते.
आदरणीय सभापती,
अनेक माननीय सदस्यांनी महागाईवर चर्चा केली आहे. 100 वर्षात आलेल्या या भयंकर जागतिक कोरोना महामारीचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. जर महागाईबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकेत 40 वर्षातील सर्वाधिक महागाईने सध्या अमेरिका त्रस्त आहे. ब्रिटन, 30 वर्षातील सर्वाधिक महागाईमुळे आज चिंतित आहे. जगातील 19 देशांमध्ये यूरो चलन आहे, तिथे महागाईचा दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहे. अशा वातावरणातही, महामारीचा दबाव असूनही आम्ही महागाईला एका पातळीवर रोखण्याचा खूप प्रयत्न केला आहे, प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. 2014 पासून 2020 पर्यंत हा दर 4-5% टक्क्यांच्या आसपास होता. याची तुलना जर यूपीए कार्यकाळाशी केली तर समजेल कि महागाई काय असते? यूपीएच्या काळात महागाई दर दोन अंकी पातळी गाठत होता. आज आपण एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहोत, जी सर्वोच्च वाढ आणि मध्यम महागाई दर अनुभव त आहे. जगातील उर्वरित अर्थव्यवस्थांकडे पाहिले तर तिथल्या अर्थव्यवस्थेत विकास धीम्या गतीने झाला आहे किंवा मग महागाई अनेक दशकांचे विक्रम तोडत आहे.
आदरणीय सभापती,
या सभागृहात काही सहकाऱ्यांनी भारताचे निराशाजनक चित्र सादर केले आणि ते सादर करताना आनंद होत आहे असे देखील वाटत होते. मी जेव्हा अशा प्रकारची निराशा पाहतो, तेव्हा मला वाटते की सार्वजनिक जीवनात चढ-उतार येतच असतात, जय-पराजय होतच असतात, त्यामुळे वैयक्तिक जीवनात आलेले नैराश्य किमान देशावर तरी लादू नये. मला माहित नाही, मात्र आमच्याकडे गुजरातमध्ये एक म्हण आहे, शरद रावांना माहित असेल, त्याच्याकडे महाराष्ट्रात देखील असेल, असे म्हटले आहे की जेव्हा सर्वत्र हिरवेगार दृश्य असते, शेत डवरलेले असते आणि जर कुणी ती हिरवळ पाहिली असेल आणि त्याचवेळी अपघाताने जर त्याची दृष्टी गेली तर, त्याला आयुष्यभर ते हिरवेगार दृश्य असते तसे भासत राहते. तसेच दुःख वेदना 2013 पर्यंतच्या दुर्दशेत झाल्या आणि 2014 मध्ये अचानक देशाच्या जनतेने जो प्रकाश आणला, त्यात ज्यांची दृष्टी गेली, त्यांना जुनीच दृश्ये दिसतात.
आदरणीय सभापती,
आपल्याकडे शास्त्रांमध्ये म्हटले आहे -महाजनो येन गतः स पन्थाः म्हणजे महाजन लोक, मोठे लोक, ज्या मार्गावरून जातात तोच मार्ग अनुकरणीय असतो.
आदरणीय सभापती,
इतर कुणाकडून नाही तर शरद रावांकडून शिका. मी पाहिले आहे, शरद राव या वयातही अनेक आजारांशी झुंज देत आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतात. आपण निराश होण्याची गरज नाही, कारण जर तुम्ही निराश झालात तर, तुमचे जे क्षेत्र...भले आता कमी झाले असेल, मात्र जे काही आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे, ...खर्गे जी, तुम्हीही अधिरंजन जी यांच्यासारखी चूक करता. तुम्ही थोडे मागे वळून पहा, जयराम यांनी मागे जाऊन दोन तीन लोकांना या कामासाठी तयार केले आहे. तुम्ही प्रतिष्ठेने रहा, जयराम जी बाहेर जाऊन माहिती घेऊन आले आहेत, समजावत होते. आता थोड्याच वेळात सुरु होईल. तुम्ही सन्माननीय नेते आहात.
आदरणीय सभापती,
सत्ता कुणाचीही असो, सत्तेत कुणीही असो, मात्र देशाचे सामर्थ्य कमी लेखता कामा नये. आपण आपल्या देशाच्या सामर्थ्याचे संपूर्ण जगासमोर मोकळेपणाने गुणगान गायला हवे, देशासाठी ते खूप आवश्यक असते.
आदरणीय सभापती,
सभागृहात आपल्या एका सहकाऱ्याने सांगितले, 'लसीकरण ही काही खूप मोठी गोष्ट नाही.' मी हे पाहुन हैराण आहे की काही लोकांना भारताची एवढी मोठी कामगिरी, हे यश आहे हे पटत नाही ! एकाने असेही म्हटले की लसीकरणावर व्यर्थ खर्च होत आहे. हे देश ऐकेल तेव्हा त्यांना अशा लोकांसाठी काय वाटेल ?
आदरणीय सभापती महोदय,
कोरोनाने जेव्हापासून मानवजातीवर संकट आणलं आहे, तेव्हापासून सरकारनं देश आणि जगात उपलब्ध असलेली सर्व संसाधने उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आमचे जेवढे सामर्थ्य होते, जेवढे ज्ञान होते, शक्ती होती ती सगळी वापरून आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि जोपर्यंत ही महामारी असेल, तोपर्यंत सरकार गरीबातल्या गरीब कुटुंबाचे आयुष्य वाचवण्यासाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतील, तेवढे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र काही पक्षांचे मोठे नेते, ज्यांनी गेल्या दोन वर्षात जी अपरिपक्वता दाखवली, त्यामुळे देशाची मोठी निराशा झाली आहे. आपण पाहिलं आहे की कसे राजकीय स्वार्थासाठी डाव खेळले गेले. भारतीय लसींच्या विरोधात मोहीम चालवली गेली होती. थोडा विचार करा, आधी तुम्ही जे म्हटले होते आणि आज काय होत आहे, याचा जरा पडताळा घेऊन बघा. बघा जरा, काही सुधारणा करणे शक्य असेल तर काही कामी येईल.
आदरणीय सभापती महोदय,
देशातली जनता जागरूक आहे. आणि मी देशातल्या जनतेचं अभिनंदन करेन की त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या नेत्यांनी अशा चुका केल्या असल्या तरी त्यांनी त्या मनावर घेतल्या नाही आणि लस घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. जर असं झालं नसतं, तर खूप मोठा धोका निर्माण झाला असता.मात्र हे बरं झालं की अशा नेत्यांच्या मागे न लागता जनता त्यांच्या पुढे निघून गेली.हेच देशासाठी उत्तम होते.
आदरणीय सभापती महोदय,
हा संपूर्ण कोरोना कालखंड एकप्रकारे देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या अंमलबजावणीचं एक उत्तम उदाहरण ठरलं आहे. 23 वेळा, कदाचित कोणत्याही पंतप्रधानाला एकाच कार्यकाळात मुख्यमंत्र्यासोबत इतक्या बैठका घेण्याची संधी मिळाली नसेल. मुख्यमंत्र्यासोबत 23 बैठका घेतल्या गेल्या आणि विस्तृत चर्चा केली गेली. आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि भारत सरकार जवळ जी माहिती होती, तिचे आदान प्रदान करुन.... कारण या सभागृहात राज्यांशी संबंधित अनेक वरिष्ठ नेते बसले आहे. आणि म्हणूनच मला हे सांगायला आवडेल की ही एक खूप मोठी घटना आहे. या कालखंडात 23 बैठका घेणे आणि विस्तृत चर्चा करुन त्यानुसार नियोजन करणं आणि सर्वांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणं आणि मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले आहेत. आम्ही कोणाचेही योगदान कमी लेखत नाही, नाकारत नाही. आम्ही तर ही देशाची ताकद आहे असं मानतो.
मात्र,
आदरणीय सभापती महोदय,
असं असलं तरी काही लोकांना आत्मचिंतन करण्याचीही गरज आहे. जेव्हा कोरोनाबद्दल चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली, त्यात सरकारकडून एक विस्तृत सादरीकरण केले जाणार होते. मात्र एका बाजूने असे प्रयत्न केले गेले की काही पक्षांनी या बैठकीला जाऊ नये. त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्वतः देखील आले नाहीत.सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. आणि यावेळी मी शरद पवार यांचे आभार मानू इच्छितो.शरदराव जी यांनी अशी भूमिका घेतली की हाच युपीएचा निर्णय नाही, मी ज्यांना ज्यांना सांगू इच्छितो, त्यांना सांगेन आणि शरदराव जी बैठकीला आले देखील. त्याशिवाय तृणमूल काँग्रेस सह सर्वच पक्षांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी तिथे आपले बहुमूल्य सल्ले, सूचना देखील दिल्या.हे संकट देशावर होते, मानवजातीवर
होते. त्या बैठकीवरही तुम्ही बहिष्कार टाकला.काय माहीत,तुम्हाला सल्ला देणारे लोक कोण आहेत? कसे काय असे सल्ले देतात तुम्हाला? ते तुमचेच नुकसान करत आहेत. देश तर थांबला नाही, देश आपलं काम करतोच आहे, मात्र तुम्ही तिथेच अडकून पडले आहात. आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटलं, सर्वानाच ! आपण दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्रं काढून बघा, तुमच्यावर किती टीका झाली. का असं केलं तुम्ही? इतकं मोठं काम, पण तरीही...
आदरणीय सभापती महोदय,
आम्ही सर्वंकष आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. आधुनिक चिकित्सा परंपरा, भारतीय चिकित्सा पद्धती,दोन्हीचा वापर केला. आयुष मंत्रालयाने देखील या काळात खूप काम केलं. सभागृहात कधी कधी अशा मंत्रालयांची चर्चा देखील होत नाही. मात्र आपल्याला हे ही बघायला हवं की आज जगात, आपले आंध्रप्रदेश, तेलंगणा चे लोक सांगतील, जगात आज आपल्या हळदीची निर्यात वाढली आहे, त्यामागे कारण हेच आहे की कोरोनामुळे लोक भारतीय उपचार पद्धतीकडे आकर्षित झाले, त्याचाच हा परिणाम आहे. आज कोरोना काळात भारताने आपल्या औषधनिर्माण उद्योगांनाही सशक्त केलं आहे. गेल्या सात वर्षात आमची जी आयुष उत्पादने आहेत, त्यांची निर्यात खूप वाढली आहे आणि नवनव्या देशात ही निर्यात होते आहे.याचा अर्थ हा आहे की भारताची जी पारंपरिक औषधं आहेत, त्यांनी जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. माझी अशी इच्छा आहे की, आपण सर्व लोक, जिथे जिथे आपली ओळख असेल, त्यांनी या गोष्टीवर भर द्यावा. कारण आपले हे क्षेत्र आज तेवढे विकसित झालेले नाही,मागे राहिले आहे आणि सध्या असा काळ आहे की त्याला लवकर स्वीकृती मिळेल.. म्हणजे होऊ शकेल की भारताची जी पारंपरिक औषधांची परंपरा आहे, ताकद आहे, ती जगभरात पोचेल आणि आपली औषधे मान्य केली जातील.
आदरणीय सभापती जी,
आयुष्यमान भारत अंतर्गत, 80 हजार पेक्षा अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रे आज कार्यरत आहेत. आणि कोणत्याही प्रकारची आधुनिक, अत्याधुनिक सेवा देण्यासाठी त्यांना सज्ज केले जात आहे. ही केंद्रे गाव आणि घराजवळ देखील मोफत चाचणीसह उत्तम दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा देत आहेत. ही केंद्र कर्करोग, मधुमेह आणि इतर गंभीर आजारांचे अगदी प्राथमिक अवस्थेत निदान करण्यातही उपयुक्त ठरत आहेत. देशात सध्या 80 हजार केंद्रे बनली आहेत आणि
ती आणखी वाढवण्याच्या दिशेने आम्ही जलद गतीने काम करत आहोत. म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आजारांसाठीही, गंभीर आजारांसाठी देखील त्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळू शकेल, अशी शक्यता आहे.
आदरणीय सभापती महोदय,
तशी तर जुनी परंपरा होती की अर्थसंकल्पापूर्वीच काहीतरी कर लावून द्यावा, म्हणजे अर्थसंकल्पात त्याची चर्चा होणार नाही, अर्थसंकल्पात ते दिसणार नाही
आणि त्यादिवशी शेअर मार्केट पडून जाऊ नये. आम्ही असं नाही केलं, आम्ही उलट केलं. आम्ही अर्थसंकल्पाच्या आधी 64 हजार कोटी रुपये पीएम आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत महत्वाच्या आरोग्याविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी राज्यांना वितरित केले. जर आम्ही हे अर्थसंकल्पात मांडले असते तर अर्थसंकल्प एकदम भव्यदिव्य, चांगला दिसला असता, चांगला तर आहेच; आणखी चांगला दिसला असता.मात्र आम्ही त्या मोहात पडलो नाही, तर कोरोना काळात आरोग्य सुविधांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी आम्ही आधी ते काम केले, आणि 64 हजार कोटी रुपये आम्ही या कामासाठी दिले.
आदरणीय सभापती महोदय,
यावेळी खर्गे जी जरा विशेष बोलत होते आणि म्हणत होते, मला म्हणत होते की मी त्यावर बोलावं, इकडच्या तिकडच्या गोष्टी करू नये. मात्र ते काय बोलले, ते देखील एकदा तपासलं पाहिजे. या सभागृहात असं सांगितलं गेलं की काँग्रेस ने भारताचा पाया रचला आणि भाजपाच्या लोकांनी केवळ त्यावर झेंडा रोवला.
आदरणीय सभापती महोदय,
ही सभागृहात अशीच गमतीत म्हटलेली गोष्ट नाही. हा त्या गंभीर विचारांचाच परिणाम आहे आणि तोच देशासाठी घातक आहे. आणि तो म्हणजे, काही लोक असेच मानतात की भारताचा जन्म 1947 साली झाला आहे. आणि त्यातूनच ही समस्या निर्माण होते. आणि याच विचारसरणीचा परिणाम आहे की गेल्या 75 वर्षांपैकी ज्यांना 50 वर्षे काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या धोरणांवरही याच मानसिकतेचा प्रभाव राहिला.आणि त्यामुळेच अनेक विकृती निर्माण झाल्या आहेत.
ही लोकशाही आपल्या कृपेमुळे अस्तित्वात आलेली नाही आणि आपण, 1975 साली लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या लोकांनी लोकशाहीच्या गौरवाविषयी बोलू नये.
आदरणीय सभापती महोदय,
हे छोट्या मनोवृत्तीचे लोक आहेत, ज्यांची अशी विचारसरणी आहे. त्यांनी एक गोष्ट जगापुढे अत्यंत वाजत गाजत, अभिमानाने मांडायला हवी होती, मात्र ती सांगण्याचे त्यांनी टाळले. आपल्याला अत्यंत अभिमानाने हे सांगायला हवं की भारत देश, भारत माता, लोकशाहीचीही जननी आहे.
लोकशाही, वादविवाद हे भारतात कित्येक शतकांपासून सुरु आहेत. पण काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांच्याकडे घराणेशाही पलीकडे इतर काहीही विचार केला जात नाही, ही त्यांची अडचण आहे. आणि त्यांच्या पक्षात जे लोकशाही विषयी चर्चा करतात ना, त्यांनी जरा हे लक्षात घ्यावं की भारताच्या लोकशाहीला सर्वात मोठा धोका या घराणेशाहीच्या वर्चस्वाचा आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. आणि पक्षात जेव्हा कुठलं तरी घराणं सर्वात महत्वाचं ठरतं, त्यावेळी सर्वाधिक त्रास, उत्तम गुणवत्ता किंवा कौशल्य असलेल्या लोकांना होतो. देशाला अशा विचारसरणीमुळे दीर्घकाळ याचं नुकसान सोसावं लागलं आहे. माझी इच्छा आहे की सर्व राजकीय पक्षांनी लोकशाहीचे आदर्श आणि मूल्ये आपल्या पक्षात देखील विकसित करावीत, त्यांना समर्पित करावे आणि भारतातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसनं ही जबाबदारी अधिकच घ्यायला हवी.
आदरणीय सभापती महोदय,
इथे असं सांगितलं गेलं, की काँग्रेस नसती तर काय झालं असतं. इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया. याच विचारसरणीचा हा परिणाम आहे.
आदरणीय सभापती महोदय,
मला इथे आणखी एक सांगण्याची इच्छा आहे, की हे कुठे गेले आहेत- मी विचार करतोय, की काँग्रेस नसती तर काय झालं असतं. कारण महात्मा गांधी यांचीही अशीच इच्छा होती, कारण महात्मा गांधी यांना माहीत होतं की यांच्या असण्यामुळे काय काय होणार आहे. आणि त्यांनी म्हटले होते की आधी ही काँग्रेस संपवा, बरखास्त करा. महात्मा गांधी यांनी म्हटले होते. पण जर नसती, महात्मा गांधी यांच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती, तर काय झालं असतं. लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त झाली असती, भारत परदेशी चष्मा ना घालता स्वदेशी संकल्पांच्या रस्त्यावर चालला असता. जर काँग्रेस नसती तर आणिबाणीचा कलंक लागला नसता. जर काँग्रेस नसती तर कित्येक दशके भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्यात आले नसते. जर काँग्रेस नसती तर जातीयता आणि प्रांतवादाची दरी इतकी खोलवर गेली नसती. जर काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, कित्येक वर्ष पंजाब दहशतवादाच्या आगीत धुमसला नसता. जर काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्याची वेळ आली नसती जर काँग्रेस नसती तर मुलींना तंदूर मध्ये जाळण्यासारख्या घटना घडल्या नसत्या. जर काँग्रेस नसती, तर देशाच्या सर्वसामान्य नागरिकांना घर, रस्ते, वीज,पाणी, शौचालय अशा मूलभूत सुविधांसाठी इतकी वर्षे वाट बघावी लागली नसती.
आदरणीय सभापती महोदय,
मी आता याची मोजणी करतच राहणार आहे.
आदरणीय सभापती महोदय,
काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता तेव्हा त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही आणि आता जेव्हा काँग्रेस विरोधी पक्षात आहे तेव्हा देखील देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत . आता तर काँग्रेस पक्षाला नेशन अर्थात राष्ट्र या संकल्पनेबाबत देखील आक्षेप आहे. नेशन या शब्दाबाबत कोणाला कसा काय आक्षेप असू शकतो. जर नेशन ही संकल्पना असंवैधानिक असेल तर तुमच्या पक्षाचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस का ठेवण्यात आले आहे? आता तुमचे विचार बदलले आहेत तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे देखील नाव बदलून टाका. तुमच्या पक्षाचे नाव फेडरेशन काँग्रेस असे ठेवा, तुमच्या पूर्वसुरींची चूक तुम्ही जरा सुधारून घ्या.
आदरणीय सभापतीजी
या सभागृहात संघराज्य या संकल्पनेविषयी काँग्रेस, टीएमसी तसेच डाव्या पक्षांच्या सदस्यांसह अनेक सहकाऱ्यांनी मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगितल्या. अशी चर्चा होणे गरजेचेच आहे कारण हे राज्यांतील ज्येष्ठ नेत्यांचे सदन आहे.
आदरणीय सभापतीजी
धन्यवाद आदरणीय सभापतीजी. लोकशाहीमध्ये केवळ सल्ले ऐकवणे इतकेच करायचे नसते तर दुसऱ्याचे ऐकून घेणे हा देखील लोकशाहीचा भाग आहे. मात्र, काही लोकांना वर्षानुवर्षे उपदेश देण्याची सवय लागली आहे. त्यामुळे काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागणे हे त्यांच्यासाठी जरा कठीण होत आहे.
आदरणीय सभापतीजी
काँग्रेस, टीएमसी तसेच डाव्या पक्षांच्या सदस्यांसह अनेक सहकाऱ्यांनी संघराज्य या संकल्पनेविषयी त्यांचे विचार मांडले. अर्थात ते अत्यंत स्वाभाविक आहे, आणि या सदनात त्यावर चर्चा होणे देखील स्वाभाविक आहे कारण येथे राज्यांचे नेते उपस्थित असतात, त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असते. मात्र जेव्हा हे नेते काही बोलतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते. आपले सर्वांचे संघराज्याविषयीचे काही विचार असतील. मात्र मी आज तुम्हा सर्वांना आग्रह करू इच्छितो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य नक्की वाचा, त्यांनी मांडलेल्या विचारांचे स्मरण करा. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका संविधान सभेत जे विचार मांडले ते मी येथे उद्धृत करू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,
“हे संघराज्य म्हणजे एक सहकारी संघ आहे कारण हा अभंग आहे. प्रशासकीय सोय म्हणून देश आणि देशवासियांची भिन्नभिन्न राज्यांमध्ये विभागणी करता येऊ शकेल. प्रशासन चालविण्यासाठी विविध राज्यांची रचना करता येऊ शकेल मात्र देश कायम अखंडच राहील.”
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत प्रशासनिक व्यवस्था आणि राष्ट्र या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या आहेत. मला वाटते की, संघराज्यवाद समजून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या सखोल विचारमंथनाहून अधिक कशाची गरज भासणार नाही. मात्र, विशेष गोष्ट अशी आहे की आपल्या देशात नेमके काय घडले आहे हे बघणे आवश्यक आहे. संघराज्यवादावर मोठमोठी भाषणे दिली जातात, कित्येक उपदेश केले जातात. विमानतळावरील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुख्यमंत्री बदलून टाकले जायचे, ते दिवस आपण विसरलो की काय? आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री टी. अंजैय्या यांच्या बाबतीत काय घडले होते ते या सभागृहातील अनेक नेत्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पंतप्रधानांच्या सुपुत्राला विमानतळावरील व्यवस्था आवडली नाही या साध्या कारणावरून त्यांना पदच्युत करण्यात आले होते. या घटनेने आंध्रप्रदेशातील कित्येक कोटी लोकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्याच प्रकारे, कर्नाटकचे लोकप्रिय मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना देखील अपमानित करून मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यात आले, आणि ते देखील पाटीलजी आजारी असताना. आमचे विचार काँग्रेसमधील लोकांप्रमाणे संकुचित नाहीत. आम्ही संकुचित विचारधारेसह काम करणारे लोक नव्हेत. आमचे विचार राष्ट्रीय ध्येये, राष्ट्रीय उद्दिष्ट्ये आणि प्रादेशिक आकांक्षांनी भरलेले आहेत त्यात आम्ही कोणत्याही संघर्षाला थारा देत नाही. प्रादेशिक पातळीवरील आकांक्षांना देखील तितकाच मान देऊन, तितकेच महत्त्व देऊन त्या बाबतीत असलेल्या समस्यांवर तोडगा काढायला हवा. आणि जेव्हा देशाच्या विकासाचा मुद्दा लक्षात ठेवून प्रादेशिक आकांक्षांची पूर्तता केली जाईल तेव्हाच भारताची देखील प्रगती होईल. जेव्हा आपण म्हणतो की देशाला प्रगतीपथावर न्यायचे आहे तेव्हा ही आपली देखील जबाबदारी असते, अर्थात यात अट अशी आहे की जेव्हा देशातील राज्ये प्रगती करतात तेव्हाच देशाची प्रगती होते. राज्यांची प्रगती होत नसेल आणि आपण देशाच्या प्रगतीचा विचार करत असू तर असे होऊ शकत नाही. आणि म्हणूनच पहिली अट ही आहे की, राज्यांची प्रगती होईल तेव्हाच देश प्रगती करेल. आणि जेव्हा देश प्रगती करेल, देश समृद्ध होईल आणि देशात संपन्नता येईल तेव्हा ही संपन्नता, राज्यांमध्ये देखील झिरपत जाईल. आणि या मुळे देश समृद्ध होईल या विचारांसह आम्ही काम करतो. आणि मला माहित आहे ना, मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा दिल्लीतील सरकारने माझ्यावर किती अत्याचार केले याला इतिहास साक्षी आहे. माझ्या बाबत काय काय घडले, गुजरात बाबत काय काय घडले काय सांगावे.. पण त्या काळात देखील माझ्या बाबतीतील प्रत्येक दिवशीच्या घडामोडी पहा. गुजरात राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी नेहमी एकच गोष्ट म्हणत असे की, गुजरातचा मंत्र काय आहे तर देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास. आम्ही कधीच दिल्ली सरकारवर अवलंबून राहू असा विचार केला नाही. देशाचा विकास घडविण्यासाठीच गुजरातचा विकास हेच उद्दिष्ट ठेवले. संघराज्य प्रणालीमध्ये ही सर्वांचीच जबाबदारी आहे की, आपल्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आपण आपल्या राज्याचा विकास करू, जेणेकरून दोन्ही मिळून देशाला एक नवी उंची प्राप्त करून देऊ. हाच योग्य मार्ग आहे आणि या मार्गावरून चालण्याची गरज आहे. ज्या लोकांना कित्येक दशके सरकार चालवण्याची संधी मिळाली त्यांनी राज्यांवर कशा प्रकारे दडपशाही केली, हे पाहून दुःख होते. सर्वच जाणकार आणि लाभार्थी इथे उपस्थित आहेत, दडपशाहीचे प्रकार त्यांना माहित आहेत. जवळजवळ 100 वेळा राष्ट्रपती शासन लागू करून, यांनी जनतेने निवडून दिलेल्या राज्यसरकारांना मुळापासून उखडून फेकून दिले. हे कोणत्या तोंडाने दुसऱ्याला शिकवण देत आहेत? तुम्ही तर लोकशाहीचा देखील सन्मान केला नाही. आणि ते कोण पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वतःच्या कारकीर्दीत 50 सरकारांना उखडून टाकले होते, 50 राज्य सरकारांना??
आदरणीय सभापतीजी
या सर्व गोष्टींची उत्तरे प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला माहित आहेत. आणि याचीच शिक्षा आज या लोकांना भोगावी लागते आहे.
आदरणीय सभापतीजी
काँग्रेस पक्षाचे जे हाय कमांड आहेत त्यांचे काम तीन मार्गांनी चालते. आधी डिस्क्रेडिट करा, मग डिस्ट्रब्लाइज करा आणि मग डिसमिस करा. म्हणजेच आधी अविश्वास निर्माण करा, मग अस्थिरता आणा आणि मग बरखास्त करा. याच पद्धतीने त्यांनी कित्येक दशके कामे केली आहेत.
आदरणीय सभापतीजी, तुम्ही मला जरा सांगा,
मला आज सांगायचेच आहे की फारुख अब्दुल्ला यांच्या सरकारला कोणी अस्थिर केले?चौधरी देवीलालजी यांच्या सरकारला कोणी अस्थिर केले? चौधरी चरणसिंह यांच्या सरकारमध्ये कोणी अस्थिरता आणली? पंजाबात सरदार बादल सिंह यांचे सरकार कोणी बरखास्त केले? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी घाणेरड्या तंत्राचा वापर कोणी केला?कर्नाटकात रामकृष्ण हेगडे आणि एस.आर.बोम्मई यांची सरकारे कोणी पाडली? 50च्या दशकात केरळमध्ये निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार कोणी पाडले? तामिळनाडूमध्ये आणीबाणीच्या काळात करुणानिधी यांचे सरकार कोणी पाडले? 1980 मध्ये एम.जी.आर. यांचे सरकार कोणी बरखास्त केले? आंध्रप्रदेशातील एन.टी.आर. यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न कोणी केला आणि ते देखील एन.टी.आर. आजारी असताना? असा कोणता पक्ष आहे ज्याने मुलायम सिंग यांना ते केंद्र सरकारशी सहमत होत नाहीत म्हणून खूप त्रास दिला? काँग्रेसने तर स्वपक्षीय नेत्यांना देखील सोडले नाही. आंध्रप्रदेशातील काँग्रेस सरकारमध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली त्यांना कशी वागणूक दिली? ज्या काँग्रेसने त्यांना सत्तेत येण्याची संधी दिली त्यांच्याशी कसे वागण्यात आले? त्यांनी अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने आंध्रप्रदेशचे विभाजन केले. माईक बंद करण्यात आले, मिरचीचा स्प्रे वापरण्यात आला, कोणतीही चर्चा होऊ दिली नाही. हा मार्ग कितपत योग्य होता? ती लोकशाही होती की काय? अटलजी यांच्या सरकारने देखील तीन राज्यांची निर्मिती केली. राज्यांच्या निर्मितीला आमचा विरोध नाही. पण त्याचा मार्ग काय आहे हे देखील महत्त्वाचे आहे. अटलजी यांनी तीन राज्ये निर्माण केली, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड. मात्र या प्रक्रियेत कोणतेही वादळ आले नाही. अत्यंत शांततामय पद्धतीने सगळे निर्णय घेण्यात आले. सर्व संबंधितांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. अशाच प्रकारे, आंध्र, तेलंगणा यांचा प्रश्न देखील सुटू शकला असता. आम्ही तेलंगणाविरोधी नाही आहोत. सर्वांनी एकत्रितपणे काम करून हे शक्य करून दाखवले असते. पण तुमचा अहंकार, सत्तेची नशा यांनी देशात ही कटुता निर्माण केली.आणि आजच्या घडीला देखील आंध्र आणि तेलंगणा यांच्यातील कडवटपणाची बीजे तेलंगणाचे नुकसान करत आहेत आणि आंध्राचे देखील नुकसान करत आहेत. आणि यातून तुम्हांला कोणताही राजनैतिक फायदा देखील होत नाहीये आणि आम्हांला समजवायचा प्रयत्न करत आहेत.
आदरणीय सभापतीजी
आम्ही सहकार्यात्मक संघराज्यवादासह एका नव्या बदलाकडे वाटचाल करत आहोत. आणि आम्ही सहकार्यात्मक, स्पर्धात्मक संघराज्यवादाचा मुद्दा मांडला आहे. आपल्या राज्यांच्या दरम्यान विकास करण्याची स्पर्धा व्हावी, निकोप स्पर्धा व्हावी आणि त्यातून आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करु. कोणताही पक्ष राज्य करत असूदे, त्यांना प्रोत्सहन देणे आमचे काम आहे आणि आम्ही हे प्रोत्साहन देण्याचे काम करत आहोत.
आदरणीय सभापतीजी,
आज मी एक उदाहरण देऊ इच्छितो. जीएसटी कौन्सिल अर्थात वस्तू आणि सेवा कर मंडळाची रचना हे भारताच्या सशक्त संघराज्यवादाचे एक उत्तम संरचनात्मक उदाहरण आहे. महसूलविषयक महत्त्वाचे निर्णय जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतले जातात. विविध राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री असे सर्वजण समोरासमोर एकाच पातळीवर येऊन करविषयक निर्णय घेतात. यात लहान-मोठे असे कोणीच नसते, कोणी पुढे कोणी मागे अशी व्यवस्था नसते. सर्वजण मिळून चर्चा करतात. या गोष्टीचा देशाला अभिमान असायला हवा, या सभागृहाला तर अधिकच अभिमान वाटायला हवा की, जीएसटी विषयीचे आतापर्यंत घेण्यात आलेले शेकडो निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री अशा सर्वांनी एकत्रितपणे हे निर्णय घेतले. संघराज्यवादाचे यापेक्षा उत्तम स्वरूप काय असू शकेल? असे कोण असेल जो या गोष्टीचा अभिमान बाळगणार नाही? पण आम्ही याचा देखील अभिमान बाळगत नाही.
आदरणीय सभापती जी,
मी एक उदाहरण देऊ इच्छितो. संघराज्याचे उदाहरण आहे. आपण पाहिले आहे की, ज्याप्रमाणे सामाजिक न्याय या देशामध्ये अनिवार्य आहे, नाहीतर देश पुढे जाऊच शकणार नाही. त्याचप्रमाणे क्षेत्रीय न्यायही तितकाच आवश्यक आहे. जर कोणते क्षेत्र विकास कामामध्ये मागे राहिले तर देश पुढे जावू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही ‘आकांक्षित जिल्हे’ – अशी एक योजना तयार केली आहे. देशामध्ये अशा 100 आकांक्षित जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यासाठी वेगवेगळे मापदंड निश्चित करून त्याआधारे जिल्हे निवडण्यात आले. त्या त्या राज्यांबरोबर विचारविनिमय करून जे 100 पेक्षा जास्त जिल्हे निवडण्यात आले आहेत, ते राज्यांमध्ये जे सरासरी जिल्हे आहेत, किमान त्यांच्या बरोबरीने तरी यावेत, यासाठी काम सुरू केले. यामुळे राज्यांचा बोझा कमी होईल आणि त्यावर आम्ही जे काम केले आहे, त्याचा परिणाम इतका चांगला दिसून येत आहे, आणि हे सांगताना मला आनंद होत आहे. त्यामुळे मोठ्या अभिमानाने, गौरवाने मी सांगतो की, योजनेचा मूळ विचार भले ही भारत सरकारने केला असेल, परंतु देशातले एक राज्य वगळता सर्व राज्यांनी हे काम स्वतःहून केले आहे. शंभरपेक्षा जास्त जिल्ह्यांची स्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन आज एकत्रितपणे काम करीत आहेत. आणि त्यामध्ये सर्व पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांचा समावेश आहे. केवळ भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या राज्यांमध्येच असे काम केले जाते असे नाही. तर सर्व पक्षांच्या राज्यांमध्ये एकत्रित काम केले जात आहे. आणि सर्वांनी मिळून, एकत्रित केलेल्या कामाचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत. अतिशय कमी काळामध्ये ‘आकांक्षित जिल्हे’ अनेक मापदंडाचा विचार केला तर आपल्या राज्याच्या सरासरीपेक्षाही पुढे निघून गेले आहेत. आणि इतकेच नाही तर, या जिल्ह्यांमध्ये उत्तमोत्तम काम झाले आहे. आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, काही आकांक्षित जिल्ह्यांमध्ये जनधन खाते उघडण्याचे काम पहिल्यापेक्षा चौपटीने जास्त झाले आहे. प्रत्येक कुटुंबाला शौचालय मिळावे, वीज मिळावी, यासाठीही अतिशय चांगले काम या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये सर्व राज्यांनी केले आहे. मला वाटते केंद्र-राज्य संरचनेचे हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळेच देशाच्या प्रगतीसाठी संघराज्यीय संरचनेच्या ताकदीचा उपयोग होणे, याविषयीचे हे उदाहरण आहे.
आदरणीय सभापती जी,
आज मी राज्यांना कशा प्रकारे आर्थिक मदत केली जाते आणि कशा पद्धतीने धोरणांमध्ये बदल घडवून आणल्यानंतर संपूर्ण परिवर्तन होते, याचेही उदाहरण देवू इच्छितो. एक काळ असा होता की, नैसर्गिक साधन सामग्री म्हणजे काही लोकांच्या तिजोरी भरण्याच्या कामी येत होती. ही दुर्दशा आपण पाहिली आहे आणि त्याविषयी चर्चाही खूप केली गेली आहे. आता संपदा राष्ट्राचा खजिना भरत आहे. आम्ही कोळसा आणि खनिज क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. पारदर्शी प्रक्रियाबरोबर खनिज स्त्रोतांचा लिलाव करण्यात आला. आम्ही सुधारणा प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली. ज्याप्रमाणे, वैध परवाना असेल तर कोणत्याही शुल्काशिवाय हस्तांतरण 50 टक्के प्रोबिशसची मुक्त बाजारपेठेमध्ये ‘सेल्फ विक्री’, ‘अर्ली ऑपरेशनलायझेशन’ वर 50 टक्के सवलत, गेल्या एक वर्षांमध्ये खनिज -खाण क्षेत्राच्या महसुलामध्ये 14 हजार कोटी रूपयांवरून जवळपास 35 हजार कोटी रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. लिलावांमध्ये जो काही महसूल आला आहे, तो राज्य सरकारांना मिळाला आहे. हा निर्णय घेणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. यामुळे ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्याचा लाभ मिळत असल्यामुळे राज्यांचे भले होत आहे. आणि राज्यांचे भले होणार म्हणजे देशाचेही भलेच होणार आहे.
सहकारी महासंघाविषयी इतका महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सुधारणांना सर्वात प्रथम लागू करण्यामध्ये ओडिशा राज्य आघाडीवर आहे. त्यासाठी मी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या सरकारने सर्व सुधारणा लागू करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
आदरणीय सभापती जी,
इथे चर्चा झाली की, आमच्याकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अनेकवार बोलले जाते. बाहेरही बोलले जाते. इतकेच नाही तर काही लोक, याविषयी लिहितातही. मी पाहतोय की, काँग्रेस एक प्रकारे शहरी नक्षलवादाच्या विळख्यात सापडली आहे. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच शहरी नक्षलवाद्यांनी ताबा मिळवला आहे. आणि म्हणूनच त्यांचे सर्व कार्यक्रम विघातक बनले अहेत. आणि म्हणूनच याविषयी अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांनी अतिशय चलाखी दाखवून काँग्रेसच्या या दुर्दशेचा फायदा उठवून त्यांच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतला आहे. त्यांच्या विचार धारेवर ताबा मिळवला आहे. आणि त्याचमुळे ते वारंवार बोलत आहेत की, आम्ही इतिहास बदलत आहोत.
आदरणीय सभापती जी,
आम्ही फक्त लोकांची स्मरणशक्ती व्यवस्थित करू इच्छितो. त्यांच्या स्मृतीची शक्ती, क्षमता थोडी वाढावी, असे आम्हाला वाटते. आम्ही कोणत्याही प्रकारे, कोणताही इतिहास बदलत नाही. काही लोकांचा इतिहास काही वर्षांपासून सुरू होता, तर आम्ही त्याच्या आधी त्यांना घेऊन जातो आणि बाकी काही करीत नाही.. जर त्यांनी 50 वर्षांतल्या इतिहासामध्ये मौज वाटते तर आम्ही त्यांना 100 वर्षांपर्यंत मागे घेवून जात आहोत. कुणाला 100 वर्षांपर्यंत मौज येते तर आम्ही त्यांना 200 वर्षांच्या इतिहासामध्ये घेवून जातो. जर कोणाला 200 वर्षांपर्यंत मौज वाटत असेल तर आम्ही त्यांना 300 वर्षांपर्यंत घेवून जातो. आता जे 300-350 वर्षांपर्यत मागे जातील तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येणार म्हणजे येणारच आहे. आम्ही तर त्यांची स्मृती सतेज करीत आहोत. आम्ही काही इतिहास बदलत नाही. काही लोकांचा इतिहास फक्त एका परिवारापर्यंत सीमित आहे. मग त्यासाठी काय करता येईल? आणि इतिहास तर खूप आधीपासूनच, खूप मोठा आहे. हा एक मोठा पैलू आहे. भले त्यामध्ये अनेक चढउतार आहेत. आणि आपण इतिहासाच्या दीर्घकालीन कालखंडाचे स्मरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारण गौरवपूर्ण इतिहासाचे विस्मरण होणे हे काही या देशाच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट नाही. ही आमच्यावर असलेली एक जबाबदारी आहे, असे आम्ही समजतो. आणि याच इतिहासापासून धडा घेवून आम्हाला, आगामी 25 वर्षांमध्ये देशाला नवीन उंचीवर घेवून जाण्यासाठी एक विश्वास निर्माण करायचा आहे. आणि मला असे वाटते की, हा अमृत कालखंड याचमुळे पुढे जाणार आहे. या अमृत कालखंडामध्ये आपल्या कन्या, आपले युवक, आपले शेतकरी बांधव, आपली गावे, आपले दलित बांधव, आपले आदिवासी, आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाचे योगदान असले पाहिजे. त्यांची सहभागीता असली पाहिजे. अशा सर्वांना बरोबर घेवून आपण पुढे जायचे आहे. कधी-कधी आपण 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याकडे, त्यातल्या घटनांकडे पहावे. आपल्या आदिवासी क्षेत्राने 1857 च्या स्वांतत्र्य संग्रामामध्ये किती आणि कसे योगदान दिले आहे, याविषयी आपल्याला कधी काही वाचायलाही मिळत नाही. इतक्या महान स्वर्णिम इतिहासाच्या पानांना आपण कसे काय विसरू शकतो? आणि आपण या गोष्टीचे स्मरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. संपूर्ण देश आत्मविश्वासाने भरलेला असावा, आणि त्याने पुढची मार्गक्रमणा करावी, असा आमचा प्रयत्न सुरू आहे.
आदरणीय सभापती जी,
महिलांच्या सशक्तीकरणालाही आमच्यादृष्टीने प्राध्यान्य आहे. भारतासारख्या देशामध्ये 50 टक्के लोकसंख्येचा विकास म्हणजे सर्वांच्या विकासाच्या प्रयत्नाचा विषय आहे. त्या सर्वांच्या प्रयत्नामध्ये सर्वात मोठया भागीदार आमच्या माता-भगिनी आहेत. देशाची 50 टक्के लोकसंख्या आणि म्हणूनच भारताच्या समाजाचे वैशिष्ट्य आहे की, परंपरांमध्ये सुधारणा घडवून येत आहे. यामुळे परिवर्तनही घडून येत आहे. हा जीवंत समाज आहे. प्रत्येक युगामध्ये असे महापुरूष निर्माण होतात, ते आपल्या समाजाला वाईट गोष्टींपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि आज आपण जाणून आहोत, महिलांविषयीही भारतामध्ये आजच चिंतन होत आहे असे नाही, तर खूप आधीपासून आपल्याकडे अशा प्रकारे चिंतन सुरू आहे. त्यांच्या सशक्तीकरणाला आम्ही प्राधान्य देत आहोत. ज्यावेळी आम्ही प्रसुती रजेचा कालावधी वाढवला, त्यावेळी ते एक प्रकारे महिलांच्या सशक्तीकरणाचे कामच केले. यामुळे कुटुंबाचेही सशक्तीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. बेटी बचाओ-बेटी पढाओ, मोहीम सुरू केली, त्याचा परिणाम लिंग गुणोत्तराचे असंतुलन होते, ते कमी झाले. याबाबतीत आता आपण खूप चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचलो आहोत. आणि आता अलिकडे जे अहवाल येत आहेत, त्यामध्ये आज आपल्याकडे काही स्थानी तर पुरूषांपेक्षाही माता-भगिनींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा एक खूप आनंदाचा विषय आहे, गौरवाचा विषय आहे. जे वाईट दिवस आम्ही पाहिले होते, त्यानंतर आता चांगले, बहराचे दिवस आले आहेत. आणि यासाठी आपल्यालाच आणखी प्रयत्न केले पाहिजेत. आज एन.सी.सी. मध्ये आपल्या कन्या आहेत. सेनेमध्ये आपल्या मुली आहेत. वायूसेनेत कन्या आहेत, आपल्या नौसेनेतही युवती आहेत. तीन तलाकची प्रथा ज्यावेळी समाप्त होते, त्यावेळी फक्त एका युवतीला न्याय मिळतो असे नाही, तर ज्यांची मुलगी तीन तलाकच्या कारणामुळे घरी परत येते त्या पित्यालाही न्याय मिळतो. ज्यांची बहीण तीन तलाकच्या कारणामुळे घरी परत येते त्या भावालाही न्याय मिळतो. हे सगळे संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहे. हे काही फक्त कोणा महिलांसाठी आहे आणि पुरूषांच्या विरोधात आहे, असे अजिबात नाही. हे मुसलमान पुरूषांसाठीही तितकेच उपयोगी आहे. कारण तोही कोणा मुलीचा पिता आहे, तोही कोणा मुलीचा भाऊ आहे. आणि म्हणूनच हे त्याच्याही भल्यासाठी आहे. सगळ्याच समाजाला सुरक्षा देणारी सुधारणा आहे. आणि म्हणूनच काही कारणांमुळे लोक बोलू शकत नाहीत, परंतु याविषयी सगळ्या लोकांना आनंद वाटतो, गौरव वाटतो. काश्मीरमध्ये आम्ही 370 वे कलम रद्द केले, त्यामुळेही तिथल्या माता-भगिनींना सक्षम बनवणे शक्य झाले आहे. त्यांचे जे अधिकार दिले जात नव्हते, ते अधिकार आता त्यांना मिळाले आहेत. आणि त्या अधिकारांमुळे आज त्यांची ताकद वाढली आहे. आज त्यांच्या विवाहाचे वय लक्षात घेतले तर विवाहाच्यावेळी स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये किती अंतर असावे, याचा विचार आता केला जात आहे. जर मुलगा आणि मुलगी समान आहे, तर मग प्रत्येक जागी तसेच असले पाहिजे. आणि म्हणूनच मुलगी आणि मुलाच्या विवाहचे वय समान करण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. मला विश्वास आहे की, आज काही वेळातच सभागृहामध्ये याविषयी योग्य निर्णय घेवून आपल्या माता -भगिनींच्या कल्याणासाठी काम केले जाईल.
हे वर्ष गोव्याच्या 60 वर्षातला महत्वपूर्ण कालखंडाचे वर्ष आहे. गोवामुक्तीला साठ वर्षे झाली. मी आज जरा या चित्राबद्दल बोलणार आहे. आमचे काँग्रेसचे मित्र जिथे असतील तिथे नक्की ऐकत असतील. गोव्याचे लोक तर माझे नक्कीच ऐकत असतील. जर सरदार साहेब, ज्याप्रकारे सरदार पटेलांनी हैदराबादसाठी रणनीती आखली, पुढाकार घेतला, सरदार पटेलांनी जुनागडसाठी रणनीती बनवली, पावले उचलली. सरदार साहेबांपासून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी सुद्धा तशीच रणनीती तयार केली असती तर गोव्याला हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतरही पंधरा वर्षांपर्यंत गुलामीत राहावे लागले नसते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंधरा वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला आणि त्यावेळच्या, साठ वर्षांपूर्वीच्या वृत्तपत्रात त्या काळातील मीडिया रिपोर्ट सांगतात की तेंव्हाच्या पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा काय असेल हा त्यांच्या काळजीचा विषय होता. पंडित नेहरूंना वाटे, जगात माझी प्रतिमा वाईट झाली तर आणि म्हणूनच त्यांना वाटत होते गोव्याच्या वसाहतवादी सरकारवर आक्रमण करून त्यांची एक जागतिक पातळीवरचा नेता, शांतीप्रिय नेता, म्हणून त्यांची प्रतिमा आहे ती भंगेल. गोव्याचं जे होत असेल ते होऊ दे, गोव्याला ज्याला तोंड द्यावे लागत असेल ते लागू दे, माझ्या प्रतिमेला तडा जाता कामा नये आणि म्हणूनच तिथे सत्याग्रहींवर गोळ्या झाडल्या गेल्या, परदेशी राज्यकर्ते गोळ्या चालवत होते. हिंदुस्तानचा भाग, हिंदुस्थानातले माझे भाईबंद त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात होत्या आणि तेव्हा आमच्या देशाच्या प्रधानमंत्री म्हणाला, मी सैन्य देणार नाही मी सैन्य पाठवणार नाही. सत्याग्रहींना मदत करण्यास त्यांनी नकार दिला होता. हा गोव्यावर काँग्रेसने केलेला जुलूम आहे आणि गोव्याला पंधरा वर्ष अधिक गुलामीच्या साखळ्यांत जखडून ठेवले होते. गोव्यातील...गोव्याच्या अनेक वीरपुत्रांना बलिदान द्यावे लागले. लाठ्या गोळ्या यात जीवन घालवावे लागले. ही परिस्थिती उद्भवली ते नेहरुंमुळे. 15 ऑगस्ट 1955 ला पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून जे सांगितले होते ते मला ठळकपणे सांगायचे आहे. काँग्रेस मधले मित्र इथे असते तर नेहरूजींचे नाव ऐकून त्यांचा दिवस तरी चांगला गेला असता. म्हणूनच त्यांची तहान भागवण्यासाठी हल्ली मी पुन्हा-पुन्हा नेहरूंची आठवण काढतो. नेहरूजींनी म्हटले होते, लाल किल्ल्यावरून जे काय म्हटले होते ते सांगतो. उगाच भ्रमात राहू नका, भाषा बघा, आम्ही तिथे लष्करी कारवाई करू अशा भ्रमात राहू नका. कोणतीही फौज गोव्याच्या आजूबाजूला नाही. आतल्या लोकांची इच्छा आहे की कोणी दंगा करून अशी परिस्थिती आणेल की आम्हाला निरुपायाने लष्कर पाठवायला लागावे. आम्ही लष्कर पाठवणार नाही. त्याबाबत आपण शांतपणे काय ते ठरवू ही बाब सगळ्यांनी नीट समजून घ्या. हे बोलणे 15 ऑगस्ट ला गोवावासीयांच्या इच्छेविरुद्ध काँग्रेसच्या नेत्यांचे विधान आहे. पंडित नेहरू ज्यांनी पुढे म्हटले आहे जे लोक तिथे जात आहेत लोहियांसह सर्व लोक तेथे सत्याग्रह करत होते, आंदोलने करत होते. देशातून सत्याग्रही जात होते आमचे जगन्नाथ राज जोशी कर्नाटकाचे, त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह होत होता. पंडित नेहरूजी काय म्हणाले, जे लोक तिथे जात आहेत त्यांना तिकडे जाणे लखलाभ असो. बघा मजा बघा आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माझ्याच देशवासियांसाठी कशी भाषा, किती अहंकार आहे. जे लोक तिथे जात आहेत त्यांना तिथे जाणे लखलाभ असो. पण हे सुद्धा लक्षात ठेवा की, आपल्याला सत्याग्रही म्हटले जाते तेंव्हा सत्याग्रहाचे नियम, सिद्धांत आणि मार्ग लक्षात ठेवा. सत्याग्रहींच्यापाठी लष्कर नसते आणि लष्कराचे बिगुलही वाजत नाही. माझ्या देशाच्या नागरिकांना आज असहाय सोडून दिले गेले. हे गोव्याच्या बाबतीतले कृत्य म्हणून गोव्याची जनता काँग्रेसचा हा पवित्रा विसरू शकत नाही.
आदरणीय सभापती महोदय
इथे फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन वर आम्हाला मोठी मोठी भाषणे दिली गेली आणि प्रत्येक वेळी आम्हाला ही गोष्ट सांगितली जाते तर आज मी एक घटना सांगू इच्छितो. ही घटना गोव्याच्या एका सुपुत्राची घटना आहे. एका सन्मान्य गोव्याच्या पुत्राची कहाणी आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत काय असते कसे असते हे उदाहरण देऊ इच्छितो. व्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करणाऱ्या लोकांचा इतिहास मी आज उघडून ठेवत आहे काय केले आहे लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्याचे आहे परंतु त्यांच्या कुटुंबियांना कशी वागणूक केली गेली हे सुद्धा देशातल्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. लता मंगेशकर यांचे धाकटे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, गोव्याचे गौरव, गोव्याच्या धरतीचा सुपुत्र. त्यांना ऑल इंडिया रेडिओतून काढून टाकले गेले. ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते आणि त्यांचा गुन्हा काय होता, काय होता त्यांचा गुन्हा? त्यांचा गुन्हा होता की त्यांनी वीर सावरकरांची एक देशभक्तीपूर्ण कविता ऑल इंडिया रेडिओवरून सादर केली होती. आता बघा हृदयनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांची मुलाखत उपलब्ध आहे. त्यांनी सांगितले की, तेंव्हा ते सावरकरजीना भेटले, म्हणाले मी आपली गीते करू इच्छितो. तेव्हा सावरकरजीनी त्यांना सांगितले की तुम्ही तुरुंगात जाऊ इच्छिता का? माझ्या कविता गाऊन तुरुंगात जाऊ इच्छिता का? तेंव्हा हृदयनाथजींनी त्यांच्या देशभक्तीपूर्ण कविता संगीतबद्ध केल्या. आठ दिवसात त्यांना ऑल इंडिया रेडिओवरुन काढून टाकले गेले. हे आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. हा स्वातंत्र्यबद्दलचा आपला खोटारडेपणा देशासमोर आपण मांडला आहे. काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत अशा प्रकारचे जुलूम झाले. हे फक्त हृदयनाथ मंगेशकर जी गोव्याच्या सुपुत्राबरोबर झाले असे नाही. त्यांची यादी चांगलीच मोठी आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी पंडित नेहरूंवर टीका केली म्हणून त्यांना एक वर्ष तुरुंगात टाकले गेले होते. पंडित नेहरूजींच्या भूमिकेवर टीका करण्याबद्दल प्रोफेसर धर्मपाल यांना तुरुंगात टाकले गेले होते. प्रसिद्ध संगीतकार किशोरकुमारजी यांना आणीबाणीत इंदिराजींच्या पुढे न झुकण्याच्या कारणावरून आणि आणीबाणीच्या बाजूने न बोलण्यावरून आणीबाणीच्या काळात त्यांना ही काढून टाकले गेले होते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एका विशिष्ट कुटुंबांच्या विरोधात जर कोणी थोडातरी आवाज उठवला, डोके वर केले तर काय होते ते. सीताराम केसरी यांना आपण व्यवस्थित ओळखतो. त्यांचे काय झाले हे आम्हाला माहिती आहे.
आदरणीय सभापती महोदय,
माझे सदनातील सदस्यांमधील सर्वांना प्रार्थना आहे की भारताच्या उज्ज्वल भविष्यावर विश्वास ठेवा. 130 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवुया. आम्ही मोठी उद्दिष्ट घेऊन याच सामर्थ्याच्या आधाराने देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी संकल्प घेऊ.
आदरणीय सभापती महोदय,
माझे तुझे आपले परके या परंपरेचा आपण शेवट करायला हवा आणि एकमताने, एकभावाने एक लक्ष्य एक साथ मार्गक्रमणा करणे हीच देशासाठी या वेळेची हाक आहे एकच आहे. पूर्ण विश्व भारताकडे मोठ्या आशेने, मोठ्या अभिमानाने पाहत आहे. अशावेळी आपण हा ही संधी घालवता कामा नये त्यांच्या कल्याणासाठी याहून मोठी संधी मिळणार नाही हा ही संधी आपण साधली तर पंचवीस वर्षांची यात्रा आपल्याला कुठून कुठे नेऊ शकते. आमच्या देशासाठी आमच्या परंपरांसाठी आम्ही गौरव करू आणि सभापतीजी, आम्ही मोठ्या विश्वासाने एकत्र मिळून मार्ग चालू आणि आमच्याकडे शास्त्रात म्हटले गेले आहे सम गच्छध्वं सम वदध्वम् सं वो मनांसि जानताम्। सर्वं मनसी जायते. आम्ही एकत्र चर्चा करून एकत्र मिळून कार्य करू या. बरोबरच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अनुमोदन देतो त्यांचा धन्यवाद म्हणतो आणि सर्व आदरणीय सदस्यांनी आपले विचार पुढे ठेवले त्यांनाही धन्यवाद देतो.
खूप खूप धन्यवाद!
JPS/ST/SRT/VG/SK/RA/SC/SB/VS/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797258)
Visitor Counter : 650
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam