पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबाद, तेलंगणातील इक्रीसॅटच्या 50 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या उद्‌घाटनाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 05 FEB 2022 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2022

तेलंगणचे राज्यपाल डॉक्टर तमिलसाई सौंदरराजन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझेसहकारी नरेंद्र सिंह तोमर जी, जी.कृष्ण रेड्डी जी, ICRISAT चे महासंचालक आणि ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेले देश-विदेशातील, विशेषतः आफ्रिकी देशांमधून सहभागी झालेले मान्यवर, इथे उपस्थित स्त्री आणि पुरुषहो,

आज वसंत पंचमीचे पवित्र पर्व आहे. आज आपण ज्ञान देवता माता सरस्वतीची पूजा करतो. तुम्ही सर्वजण ज्या क्षेत्रात आहात, त्याचा पाया ज्ञान-विज्ञान, शोध-संशोधन हाच आहे आणि म्हणूनच वसंत पंचमीच्या दिवशी या आयोजनाचे एक खास महत्व आहे. तुम्हा सर्वांचे सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त खूप-खूप अभिनंदन !

मित्रांनो,

50 वर्षे हा एक खूप मोठा काळ असतो. आणि या 50 वर्षांच्या प्रवासात जेंव्हा-जेंव्हा ज्यांनी-ज्यांनी जे जे योगदान दिले आहे, ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. हे कार्य पुढे नेण्यासाठी ज्या-ज्या लोकांनी प्रयत्न केले, त्यांचेही मी अभिनंदन करतो. हा देखील अद्भुत योगायोग आहे की, आज जेंव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या  75 व्या वर्षाचे पर्व साजरे करत आहे, तेंव्हा तुमची संस्था 50 वर्षांच्या या महत्वपूर्ण वळणावर आहे. जेंव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची  100 वर्ष साजरी करत असेल, तेंव्हा तुम्ही 75 व्या वर्षात असाल. ज्याप्रमाणे भारताने पुढील  25 वर्षांसाठी नवी उद्दिष्टे ठरवली आहेत, त्यावर काम करायला सुरुवात केली आहे,त्याचप्रमाणे आगामी 25 वर्ष इक्रीसॅटसाठी देखील तेवढीच महत्वाची आहेत.

मित्रांनो,

तुमच्याकडे 5 दशकांचा अनुभव आहे. या  5 दशकांमध्ये तुम्ही भारतासह जगाच्या बहुतांश भागात कृषी क्षेत्राची मदत केली आहे. तुमचे संशोधन, तुमच्या तंत्रज्ञानाने कठीण परिस्थितीत शेतीला सुलभ आणि शाश्वत बनवले आहे. आता मी जी  तंत्रज्ञान पाहिले, त्यात इक्रीसॅटच्या प्रयत्नांचे यश दिसून येते. पाणी आणि मातीचे व्यवस्थापन असेल, पीक वैविध्य आणि उत्पादन पद्धतीत सुधारणा असतील, कृषी वैविध्यातील वाढ असेल, पशुधन एकात्मीकरणअसेल, आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे असेल, हा सर्वांगीण दृष्टिकोन निश्चितपणे कृषी क्षेत्राला शाश्वत बनवण्यात मदत करतो.  तेलंगण आणि  आंध्र प्रदेशा डाळी विशेषतः हरभरा संदर्भात या क्षेत्रात जो विस्तार झाला आहे, त्यात तुमचे महत्वाचे योगदान राहिले आहे. शेतकऱ्यांबरोबर इक्रीसॅटचा हा सहकार्यात्मक दृष्टिकोन शेतीला अधिक सशक्त करेलसमृद्ध करेल.  आज पीक संरक्षणावरील हवामान बदल संशोधन सुविधा आणि जलद निर्माण प्रगती सुविधा या दोन नवीन सुविधांचेउद्घाटन करण्यात आले. या संशोधन सुविधा, हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यात कृषी क्षेत्राची खूप मदत करेल. आणि तुम्हाला माहीतच आहे, बदलत्यावातावरणात आपल्या कृषी पद्धतीत काय बदल घडवून आणायला हवेत, त्याच प्रकारे भारताने एक खूप मोठा उपक्रम हाती घेतला आहे. हवामान बदलामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे , नैसर्गिक आपत्ती उद्भवत  आहेत, त्यात जीवित हानीची चर्चा तर होत असते. मात्र पायाभूत सुविधांचे जे नुकसान होते, त्यामुळे संपूर्ण व्यवस्था डळमळीत होते. आणि म्हणूनच भारत सरकारने बदलत्या हवामानात तग धरतील अशा लवचिक पायाभूत सुविधांबाबत चिंतन-मनन आणि योजना आखण्यासाठी जागतिक स्तरावरील संस्था स्थापन केली आहे. आज तसेच एक काम  या कृषी क्षेत्रासाठी होत आहे. तुम्ही सर्वजण अभिनंदनास पात्र आहात.

 मित्रांनो ,

हवामान बदलामुळे जगातील प्रत्येक जण प्रभावित होतो, मात्र यामुळे सर्वात जास्तते लोक प्रभावित होतात, जे समाजाच्या शेवटच्या पायरीवर असतात. ज्यांच्याकडे संसाधनांची कमतरता असते, जे विकासाच्या शिडीवर चढण्यासाठी  मेहनत करत आहेत. यामध्ये बहुतांश आपले छोटे शेतकरी आहेत. आणि भारतात 80-85% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी हवामान बदलाचा मुद्दा खूप मोठे संकट ठरते. म्हणूनच भारताने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाला याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. भारताने 2070 पर्यंत नेट  झिरोचे लक्ष्य ठेवले आहे, आम्ही LIFE-Life Mission-Lifestyle for Environment -पर्यावरणस्नेही जीवनशैलीची गरज देखील अधोरेखित केली आहे. त्याच प्रमाणे लोकप्रणित, पर्यावरण स्नेही चळवळ ही एक अशी चळवळ आहे जी हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला हवामान बदलाच्या जबाबदारीशी जोडते. ही चळवळ केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही, तर सरकारच्या अनेक कृतीतून ती प्रतिबिंबित होते, इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना पुढे नेताना यावर्षीच्या अर्थसंकल्पात हवामान बदल विरोधात कृतीला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.  हा अर्थसंकल्प प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात हरित भविष्याप्रति भारताच्या वचनबद्धतेला प्रोत्साहित करणारा आहे.

मित्रांनो ,

हवामान आणि अन्य कारणांमुळे , भारताच्या कृषी क्षेत्रासमोर जी आव्हाने आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी भारताकडून केले जात सलेल्या प्रयत्नांबाबत तुम्ही सर्व तज्ञ, वैज्ञानिक, तंत्रज्ञ उत्तमरित्या परिचित आहात.  तुमच्यापैकी अनेकांना हे देखीलमाहित आहे की भारतात 15 कृषी हवामान क्षेत्र आहेत. आपल्याकडे  वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, हे 6 ऋतू देखील असतात. म्हणजेच आपल्याकडे कृषी संबंधित अनेक वैविध्यांनी  परिपूर्ण प्राचीन अनुभव आहे. या  अनुभवाचा लाभ जगातील अन्य देशांनाही मिळावा यासाठी इक्रिसॅट सारख्या संस्थांना त्यांचे प्रयत्न आणखी वाढवावे लागतील. आज आपण देशातील  170 जिल्ह्यांमध्ये पुरापासून संरक्षणासाठी उपाय देत आहोत. हवामान बदलाच्या समस्येपासून आपल्या शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी   'बॅक टू बेसिक'(मुळाकडे परत) आणि 'मार्च टू फ्युचर'(भविष्याकडे आगेकूच ) यांच्यात मेळ साधण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. देशातल्या  80 टक्क्यांहून अधिक छोया शेतकऱ्यांवर आपला भर आहे, ज्यांना आपली सर्वाधिक गरज आहे. या अर्थसंकल्पातही तुम्ही पाहिले असेल, नैसर्गिक सेंद्रिय शेती आणि डिजिटल शेतीवर अभूतपूर्व भर देण्यात आला आहे. एकीकडे आपण भरड धान्याची व्याप्ती वाढवण्यावर भर देत आहोत, रसायने-मुक्त शेतीवर भर देत आहोत  तर दुसरीकडे सौर पंपापासून  किसान ड्रोन्सपर्यंत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहित करत आहोत.  स्वातंत्र्याचा अमृतकाळ म्हणजेच आगामी  25 वर्षांसाठी कृषी विकासासाठी आपल्या दूरदृष्टीचा हा खूप मोठा महत्वपूर्ण भाग आहे .

मित्रांनो,

बदलत्या भारताचा  एक महत्त्वाचा पैलू म्हणजे-  डिजिटल शेती. हे आपले भविष्य आहे आणि यामध्ये भारतातील प्रतिभावान तरुण आणखी चांगले  काम करू शकतात.डिजिटल तंत्रज्ञानाने आपण शेतकऱ्याला कसे सक्षम बनवू शकतो यासाठी भारतात सातत्याने प्रयत्न होत आहेत.पीक मूल्यांकन असो, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन असो, ड्रोनद्वारे कीटकनाशके आणि पोषक तत्वांची फवारणी असो, अशा अनेक सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वाढवला जात आहे. शेतकऱ्यांना परवडणारी आणि अत्याधुनिक  सेवा देण्यासाठी, कृषी संशोधनाशी निगडित कार्यक्षेत्र आणि खाजगी कृषी तंत्रज्ञान कंपन्या एकत्र काम करत आहेत. सिंचनाची कमतरता असलेल्या भागात शेतकऱ्यांना चांगले बियाणे, अधिक उत्पादन, पाणी व्यवस्थापन प्रदान करण्यात आयसीएआर आणि आयसीआरआयएएटीची भागीदारी यशस्वी ठरली आहे. या यशाचा विस्तार  डिजिटल शेतीपर्यंतही करता येईल. .

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत काळात आम्ही उच्च कृषी विकासावर भर देण्याबरोबरच सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देत आहोत. कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान खूप महत्वाचे आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.त्यांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातूनही प्रयत्न सुरू आहेत.देशातील मोठ्या लोकसंख्येला गरिबीतून बाहेर काढण्याची आणि त्यांना चांगल्या जीवनशैलीकडे नेण्याची  क्षमता कृषी क्षेत्रात आहे. कठीण भौगोलिक परिस्थितीत शेती करताना येणाऱ्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हा अमृत काळ शेतकऱ्यांना नवीन माध्यम उपलब्ध करून देणार आहे. सिंचना अभावी देशाचा मोठा भाग हरितक्रांतीचा भाग होऊ शकला नाही, हे आपण पाहिले आहे.आता आम्ही दुहेरी धोरणावर काम करत आहोत. एकीकडे आपण जलसंधारणाच्या माध्यमातून नद्या जोडून  एका    क्षेत्राला सिंचनाखाली आणत आहोत. आता मी सुरवातीला इथल्या सगळ्या कामगिरी  बघत होतो, तर त्यात बुंदेलखंडमध्ये पाण्याचे व्यवस्थापन  आणि 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' या अभियानाला यशस्वी करण्यासाठी  त्यांनी यश कसे मिळवले , याचे सविस्तर वर्णन हे शास्त्रज्ञ माझ्यासमोर करत होते.दुसरीकडे, कमी सिंचन असलेल्या भागात पाणी वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही सूक्ष्म सिंचनावर भर देत आहोत.ज्या पिकांना कमी पाणी लागते आणि ज्या पिकांना पाणी टंचाईचा फटका बसत नाही अशा पिकांनाही आधुनिक वाणांच्या विकासाच्या माध्यमातून  प्रोत्साहन दिले जात आहे.खाद्यतेलाच्या बाबतीत  आत्मनिर्भरतेसाठी आम्ही सुरू केलेले राष्ट्रीय अभियानही आमचा नवा दृष्टिकोन दाखवते. येत्या 5 वर्षात पाम तेलाचे क्षेत्र साडे  6 लाख हेक्टरपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी भारत सरकार प्रत्येक स्तरावर शेतकऱ्यांना मदत करत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठीही हे अभियान  खूप फायदेशीर ठरणार आहे. मला सांगण्यात आले   की, तेलंगणातील शेतकऱ्यांनी पाम तेल लागवडीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

 मित्रांनो,

गेल्या काही वर्षात भारतातील  पीक उत्पादनानंतरच्या  पायाभूत सुविधाही बळकट करण्यात आल्या आहेत. अलिकडच्या वर्षांत 35 दशलक्ष टन शीतसाखळी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सरकारने तयार केलेल्या 1 लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीमुळे पीक उत्पादनानंतरच्या  पायाभूत सुविधांचा जलद विकास झाला आहे.आज भारतात आम्ही शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषी मूल्य साखळी तयार करण्यावरही मोठ्या प्रमाणावर  लक्ष केंद्रित करत आहोत. देशातील छोट्या शेतकऱ्यांना हजारो  शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये संघटित करून, आम्ही  त्यांना जागरूक आणि मोठी बाजारपेठ बनवू इच्छितो.

मित्रांनो,

आयसीआरआयएसएटीला भारतातील नीम -शुष्क भागात काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे.त्यामुळे नीम -शुष्क क्षेत्रासाठी आपल्याला मिळून, शेतकऱ्यांना जोडून शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उत्पादन यंत्रणा उभारावी लागेल. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील देशांसोबत आपले अनुभव सामायिक करण्यासाठी देवाणघेवाण कार्यक्रम देखील सुरू केले जाऊ शकतात. केवळ अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे  हेच आमचे ध्येय नाही.आज भारताकडे अतिरिक्त अन्नधान्य आहे, ज्याच्या जोरावर आपण जगातला इतका  मोठा अन्न सुरक्षा कार्यक्रम राबवत आहोत.आता आम्ही अन्न सुरक्षेबरोबरच पोषण सुरक्षेवर भर देत आहोत. याच दृष्टीकोनातून आम्ही गेल्या 7 वर्षांत अनेक जैव-पोषक घटकयुक्त वाण विकसित केले आहेत.आता आपल्या शेतीमध्ये विविधता आणण्यासाठी, आपल्या दुष्काळग्रस्त भागात अधिक उत्पादनासाठी ,रोग आणि कीटकांपासून अधिक संरक्षण देणाऱ्या लवचिक वाणांवर आपल्याला अधिकाधिक काम करायचे आहे.

मित्रांनो,

आयसीआरआयएसएटी ही आयसीएआर आणि कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने आणखी एका उपक्रमावर काम करू शकते.हे क्षेत्र आहे जैवइंधनाचे.  तुम्ही गोड ज्वारीवर काम करत आहात.  दुष्काळग्रस्त शेतकरी किंवा अल्पभूधारक  शेतकरी अधिक जैवइंधन तयार करणारी पिके घेऊ शकतील असे  बियाणे तुम्ही तयार करू शकता.  बियाणे प्रभावीपणे कसे वितरित करावे, त्यांच्या प्रति विश्वास कसा निर्माण करता येईल यावर आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

मित्रांनो,

मला विश्वास आहे की, तुमच्यासारख्या कल्पक विचारांच्या मदतीने, लोकसहभागातून आणि सामाजिक  बांधिलकीच्या  जोरावर आपण शेतीशी संबंधित सर्व आव्हानांवर मात करू. तुम्ही भारतातील आणि जगातील शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी  अधिक सक्षम व्हा,अधिकाधिक  तंत्रज्ञानविषयक उपाय देत राहा, या  शुभेच्छांसह पुन्हा एकदा इक्रीसॅटचे  या महत्त्वाच्या टप्प्यावर, त्यांच्या गौरवशाली भूतकाळाचे अभिनंदन  करताना, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतानाच, देशातील शेतकऱ्यांचा सन्मान आणि अभिमानाच्या रूपाने तुमचे प्रयत्न उपयोगी पडावेत, यासाठी  माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन!

धन्यवाद!

 

 

S.Thakur/S.Chavan/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795940) Visitor Counter : 351