राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून राष्ट्रपतींचे संबोधन

Posted On: 25 JAN 2022 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

 

प्रिय देशवासियांनो, नमस्कार!

  1. 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, देश आणि परदेशात राहणाऱ्या आपण सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांना एका समान सूत्रात बांधणाऱ्या भारतीयत्वाच्या गौरवाचा, हा उत्सव आहे. सन 1950 मध्ये आजच्याच दिवशी आपल्या सर्वांच्या गौरवशाली अस्तित्वाला औपचारिक स्वरूप प्राप्त झालं होतं. त्या दिवशी भारत जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रजासत्ताकाच्या रुपात स्थापन झाला आणि आपण भारतीयांनी एक असं संविधान लागू केलं जे आपल्या सामुहिक चैतन्याचा जिवंत अभिलेख आहे. आपल्या वैविध्यपूर्ण आणि यशस्वी लोकशाहीचं कौतुक संपूर्ण जगात होत असतं. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी आपण आपली गतीमान लोकशाही, तसंच राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा उत्सव साजरा करतो. महासाथी मुळे यावर्षीच्या उत्सवात धामधूम कदाचित कमी असली तरी आपली भावना नेहमीप्रमाणेच दृढ आहे.
  2. प्रजासत्ताक दिन हा, स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अतुलनीय साहस दाखवलेल्या तसच त्यासाठी देशवासियांमध्ये संघर्षासाठी उत्साह निर्माण केलेल्या महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं निमित्त सुद्धा आहे. दोन दिवसांपूर्वी 23 जानेवारीला आपण सर्व देशवासीयांनी, जय हिन्द चा नारा देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती दिनी, त्यांचं पुण्यस्मरण केलं. स्वातंत्र्यप्राप्तीचा त्यांचा ध्यास आणि भारताला गौरवशाली बनवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा, आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे.
  3. आपण खूप भाग्यवान आहोत की आपलं संविधान निर्माण करणाऱ्या समितीत त्या काळातले सर्वश्रेष्ठ महान लोक प्रतिनिधित्व करत होते. ते लोक आपल्या महान स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेले अग्रणी स्वातंत्र्यसैनिक होते. दीर्घ कालावधीनंतर भारताची राष्ट्रीय चेतना पुनर्जागृत होत होती. अशाप्रकारे ते असामान्य स्त्री-पुरुष एका नवजागृतीच्या अग्रदूताची भूमिका निभावत होते. त्यांनी संविधानाच्या मसुद्यातला प्रत्येक परिच्छेद, वाक्य आणि शब्दात, सामान्य जनतेच्या हिताबाबत विस्तृत चर्चा केली. ते विचारमंथन जवळपास तीन वर्ष चाललं. सरतेशेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं, संविधानाला अधिकृत स्वरूप प्रदान केलं आणि हे संविधान आपला मूलभूत ग्रंथ बनला.
  4. खरं तर, आपल्या संविधानाची चौकट व्यापक आहे, कारण त्यात राज्याच्या कामकाजाच्या व्यवस्थेचंही विवरण आहे. तर दुसरीकडे, संविधानाच्या संक्षिप्त उद्देशिकेतही, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मार्गदर्शक तत्त्वांचा, अर्थपूर्ण उल्लेख आहे. या आदर्शांनी जो ठोस पाया रचला आहे, त्यावर आपलं भव्य प्रजासत्ताक भक्कमपणे उभं आहे. याच जीवनमूल्यांमध्ये आपला सामूहिक वारसाही प्रतिबिंबित होत असतो.
  5. या जीवनमूल्यांना, मूलभूत अधिकार तसंच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या रूपात आमच्या संविधाना कडून, मूलभूत महत्त्व प्रदान केलं गेलं आहे. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानात उल्लेख केलेल्या मूलभूत कर्तव्यांचं नागरिकांनी पालन केल्यामुळे मुलभूत अधिकारांसाठी यथायोग्य वातावरण निर्मिती होत असते. आवाहन करताच, राष्ट्रसेवेच्या मूलभूत कर्तव्याचं पालन करत आपल्या कोट्यवधी देशवासीयांनी, स्वच्छता मोहीमेसह कोविड लसीकरण मोहीमेला जनआंदोलनाचं रूप दिलं आहे. अशा मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीचं श्रेय आपल्या कर्तव्यनिष्ठ नागरिकांना जातं. मला विश्वास आहे की आपले देशबांधव याच कर्तव्यनिष्ठे सह, राष्ट्रहिताच्या सर्व मोहिमांना आपल्या सक्रिय सहभागातून मजबूत करत राहतील.
  6. प्रिय देशवासियांनो, भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीद्वारे अंगीकृत, अधिकृत आणि आत्मार्पित केलं गेलं. तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून पाळतो. त्यानंतर दोन महिन्यांनी, 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान पूर्णपणे रुजू झालं. असं सन 1930 च्या त्या दिवसाला अविस्मरणीय ठरवण्यासाठी केलं गेलं ज्या दिवशी भारतवासीयांनी संपूर्ण स्वातंत्र्यप्राप्तीचा संकल्प केला होता‌. 1930 पासून 1947 पर्यंत प्रत्येक वर्षी 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण स्वराज्य दिवस म्हणून पाळला जात होता. म्हणूनच असं ठरलं की या दिवसापासूनच संविधानाची पूर्ण अंमलबजावणी सुरू व्हावी.
  7. 1930 साली महात्मा गांधीजींनी देशवासीयांना संपूर्ण स्वराज्य दिवस कसा पाळायचा ते शिकवलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, " आपल्याला आपलं ध्येय अहिंसक आणि सत्याच्या मार्गानच गाठायचं आहे आणि हे काम आपण फक्त आत्मशुद्धीच्या मार्गानच करू शकतो, त्यामुळे आपण या दिवशी आपला सर्व वेळ, यथाशक्ती, कुठलं न कुठलं विधायक काम करुनच व्यतित करु या."
  8. यथाशक्ती विधायक काम करण्याचा गांधीजींचा हा उपदेश सदैव प्रासंगिक म्हणजेच प्रत्येक काळात लागू राहील. त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करते वेळी आणि त्यानंतरही, आपल्या प्रत्येकाच्या आचार विचारात विधायक दृष्टिकोन असायला हवा. गांधीजींची इच्छा होती की आपण स्वतःमध्ये डोकावून पाहायला हवं, आत्मनिरीक्षण करायला हवं आणि चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करायला हवा. तसच त्यानंतर सभोवताली पहावं, लोकांना मदत करावी आणि एक चांगला भारत, तसच चांगल्या जगाच्या निर्मितीत आपलं योगदान द्यावं.
  9. प्रिय देशवासीयांनो, मानव जातीला एकमेकांच्या सहकार्याची आजच्या एवढी गरज, आजवर कधीच निर्माण झाली नव्हती. आज दोन वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे परंतु मानवतेचा कोरोनाविषाणू विरुद्धचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. या महासाथीमुळे लाखोंनी लोकांना प्राणास मुकावं लागलं आहे. संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. जागतिक समुदायाला अभूतपूर्व अशा संकटाचा सामना करावा लागला आहे. नित्य नव्या रूपात हा विषाणू नवनवीन संकटं निर्माण करत आहे. अशी परिस्थिती संपूर्ण मानवजातीसाठी एक असाधारण असं आव्हान बनून राहिली आहे.
  10. या महासाथीचा सामना करणं, भारतात अपेक्षेप्रमाणे जास्त कठीण होणारच होतं. आपल्या देशात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे आणि एक विकसनशील अर्थव्यवस्था या नात्यानं आपल्यापाशी, या अदृश्य शत्रूशी लढण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा पायाभूत सुविधा आणि आवश्यक साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती. मात्र अशा कठीण परिस्थितीतच कुठल्याही देशाची संघर्ष करण्याची क्षमता तावून-सुलाखून निघते. मला हे सांगताना अभिमान वाटतो की आपण कोरोना विषाणू च्या विरोधात, असामान्य दृढ संकल्प आणि कार्यक्षमतेचं प्रदर्शन केलं आहे. पहिल्या वर्षातच आपण आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा, विस्तृत तसंच भरभक्कम केल्या आणि इतर देशांच्या मदतीसाठीही पुढे सरसावलो. दुसऱ्या वर्षांपर्यंत आपण स्वदेशी लसी विकसित केल्या आणि जागतिक इतिहासात सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. ही मोहीम अतिशय वेगानं पुढे वाटचाल करत आहे. आपण अनेक देशांना लसी तसंच वैद्यकीय उपचारा संबंधी इतर सुविधा प्रदान केल्या आहेत. भारताच्या या योगदानाची जागतिक संघटनांनी प्रशंसा केली आहे.
  11. दुर्दैवानं संकटं येतच गेली, कारण हा विषाणू आपल्या बदलत्या स्वरूपात परत परत येतच राहिला. अगणित कुटुंबं, भयानक आपत्तीं मधून गेली आहेत. आपली ही सामूहिक वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मात्र एकमेव दिलासादायक बाब ही आहे की अनेक लोकांचे प्राण वाचवणं शक्य झालं आहे. या महासाथीचा प्रभाव अजूनही व्यापक प्रमाणात कायम आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क रहायला हवं आणि आपल्या बचावात थोडीसुद्धा कसर सोडता कामा नये. आपण आतापर्यंत जी सावधगिरी बाळगली आहे ती यापुढेही कायम ठेवायची आहे. मास्क घालणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर कायम राखणं, कोविड प्रतिबंधक व्यवहाराचे अविभाज्य घटक राहिले आहेत. कोविड महासाथी विरुद्धच्या लढाईत, वैज्ञानिक आणि तज्ञांनी सांगितलेल्या सावधगिरीच्या उपायांचं पालन करणं आज प्रत्येक देशवासीयाचा राष्ट्र धर्म बनला आहे. जोपर्यंत हे संकट दूर होत नाही, तोपर्यंत या राष्ट्रधर्माचं पालन आपल्याला करायचच आहे.
  12. या संकट काळात आपण हे पाहिलं आहे की कशा प्रकारे आपण सर्व देशवासीय एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांशी जोडले गेलो आहोत. सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्या या कठीण आव्हानातही एकमेकांसोबत कसं रहायचं याचा अनुभव, आपण सर्वांनी घेतला आहे. आपल्याला याची जाणीव झाली आहे की आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत. कठीण परिस्थितीतही बराच काळ काम करून, तसच रुग्णांच्या देखभालीसाठी आपला जीव धोक्यात घालून, डॉक्टर,परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मानवतेची सेवा केली आहे. बऱ्याच लोकांनी देशात दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी, जीवनावश्यक सुविधा उपलब्ध राहतील, तसच पुरवठा सेवांमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. केंद्र आणि राज्य स्तरावर, समाजसेवक, धोरणकर्ते, प्रशासक आणि इतर लोकांनी समयोचित अशी पावलं उचलली.
  13. या प्रयत्नांच्या जोरावरच आपल्या अर्थव्यवस्थेनं पुन्हा एकदा वेग पकडला आहे. गेल्या वर्षी आर्थिक विकासात आलेल्या घटीनंतरही, या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा दर प्रभावी राहण्याचा अंदाज, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही भारताच्या दृढतेचा पुरावाच आहे. हे, मागील वर्षी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाचही निदर्शक आहे. सर्व आर्थिक क्षेत्रात सुधारणा करण्याच्या आणि आवश्यकतेनुसार सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशानं, सरकार सातत्यानं सक्रिय राहिलं आहे. या प्रभावी आर्थिक कामगिरीच्या मागे कृषी आणि उत्पादन क्षेत्रात होत असलेल्या बदलांचं प्रमुख योगदान आहे. मला हे जाणून खूप बरं वाटतंय की आपले शेतकरी, विशेष करून लघु भूधारक तरुण शेतकरी, नैसर्गिक शेतीचा उत्साहानं अंगीकार करत आहेत.
  14. लोकांना रोजगार मिळवून देण्यात, तसंच अर्थव्यवस्थेला गती मिळवून देण्यात, लघु आणि मध्यम उद्योगांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आपल्या नवोन्मेषी युवा उद्योजकांनी स्टार्ट अप परिसंस्थेचा प्रभावी उपयोग करत यशाचे नवे विक्रम नोंदवले आहेत. आपल्या देशात विकसित, विशाल आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट सुविधेच्या यशाचं एक उदाहरण हे आहे की प्रत्येक महिन्यात कोट्यवधी लोक डिजिटल व्यवहार करत आहेत.
  15. मनुष्यबळाचा लाभ उठवणं म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हीडंट मिळवण्यासाठी, आपली पारंपरिक जीवन मूल्य आणि आधुनिक कौशल्य यांच्या आदर्श संगमानं युक्त अशा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून, सरकारनं समयोचित वातावरण उपलब्ध केलं आहे. मला हे पाहून खूप आनंद होतोय की जगातल्या सर्वोत्तम अशा 50 नवोन्मेषी अर्थव्यवस्थांमध्ये भारतानं आपलं स्थान निर्माण केलं आहे. हे यश अधिकच समाधान कारक अशासाठी आहे की आपण अधिकाधिक लोकांना संधी देण्यावर जोर देण्याबरोबरच योग्यतेला चालना देण्यातही सक्षम आहोत.
  16. बंधू-भगिनींनो, गेल्या वर्षी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे देशवासीयांना खूप आनंद झाला होता. त्या युवा विजेत्यांचा आत्मविश्वास आज लाखो देशवासियांना प्रेरित करत आहे.
  17. अलिकडेच काही महिन्यांमध्ये आपल्या देशवासियांनी विविध क्षेत्रांमध्ये दाखवलेल्या आपल्या बांधिलकी आणि कर्तृत्वामुळे राष्ट्र आणि समाजाला बळकटी आणणारी अनेक उल्लेखनीय उदाहरणं मला पहायला मिळाली आहेत. यापैकी फक्त दोन उदाहरणांचा मी उल्लेख करेन. भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या विशेष पथकांनी, आय ए सी विक्रांत या स्वदेशी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती केली आहे, जी आपल्या नौदलात सामील होणार आहे. अशा आधुनिक लष्करी क्षमतेच्या बळावरच आता भारताची गणना, जगातल्या प्रमुख नौदल शक्तिसंपन्न देशांमध्ये होत आहे. हे, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं अग्रेसर होण्याचं एक प्रभावी उदाहरण आहे. यासारखाच एक विशेष अनुभव मला खूपच हृदयस्पर्शी वाटला. हरयाणातल्या भिवानी जिल्ह्यात, सुई नावाच्या गावातल्या काही सजग नागरिकांनी, संवेदनशीलता आणि कठोर परिश्रमांनी, स्वयंस्फूर्तीनं राबवलेल्या आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून आपल्या गावाचा कायापालट केला आहे. आपलं गाव म्हणजेच आपल्या मातृभूमी प्रती असलेला जिव्हाळा आणि कृतज्ञतेचं हे एक अनुकरणीय उदाहरण आहे. कृतज्ञ लोकांच्या हृदयात आपल्या जन्मभूमी साठी आयुष्यभर प्रेम आणि श्रद्धा वास करत असते. अशा उदाहरणांमुळे माझा हा विश्वास आणखी बळकट होतो की एक नवा भारत उदयाला येत आहे. सशक्त भारत आणि संवेदनशील भारत ! मला असा विश्वास वाटतो की अशा उदाहरणां पासून प्रेरणा घेऊन इतर सक्षम देशवासीय सुद्धा आपापली गावं आणि नगरं यांच्या विकासासाठी योगदान देतील.
  18. यासंदर्भात आपल्या सर्व देशवासियांना, मी एक माझा वैयक्तिक अनुभव सांगू इच्छितो. मला गेल्या वर्षी जून महिन्यात कानपूर ग्रामीण जिल्ह्यात असलेली माझी जन्मभूमी अर्थात माझं गाव परोख इथे जाण्याचं भाग्य लाभलं. तिथे गेल्यावर माझ्या मनात आपोआपच माझ्या गावाची माती कपाळावर लावण्याची भावना उचंबळून आली. कारण माझा असा दृढ समज आहे की आपल्या गावाच्या भूमीच्या आशीर्वादाच्या जोरावरच मी राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचू शकलो आहे. मी जगात जिथे कुठेही जातो, तिथे माझा गाव आणि माझा भारत माझ्या हृदयात कायम असतात. भारतातले जे लोक आपले परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर जीवनाच्या शर्यतीत पुढे निघून गेले आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे की आपली पाळंमूळं, आपला गाव, वाडी, शहर यांना आणि आपल्या मातीला, त्यांनी कधीही विसरू नये. त्याबरोबरीनच आपलं जन्मस्थान आणि देशाची जी काही सेवा आपण करू शकता, ती अवश्य करत रहा. भारतातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं जर आपापल्या जन्मस्थानाच्या विकासासाठी निष्ठेनं कार्य केलं तर स्थानिक विकासाच्या आधारावर संपूर्ण देश विकसित होईल.
  19. प्रिय देशवासीयांनो, आज आपले सैनिक आणि सुरक्षा कर्मी, देशाभिमानाचा वारसा पुढे चालवत आहेत. हिमालयाच्या असह्य थंडीत आणि वाळवंटाच्या भयानक उष्णतेत आपल्या कुटुंबापासून दूर, मातृभूमीच्या रक्षणासाठी, ते सदैव तत्पर असतात. आपली सशस्त्र दलं तसंच पोलीस दलं, देशाच्या सीमांचं रक्षण करण्यात, तसंच देशांतर्गत व्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी रात्रंदिवस सतर्क असतात, जेणेकरून सर्व देशवासीय निर्धास्तपणे झोपू शकतील. जेव्हा कुठल्याही शूर सैनिकाचं निधन होतं तेव्हा संपूर्ण देश शोकसागरात बुडतो. गेल्या महिन्यात एका दुर्घटनेत, देशातल्या सगळ्यात शूर कमांडरांपैकी एक जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, तसच अनेक शूर योद्ध्यांना आपण मुकलो. या दुर्घटनेमुळे सर्व देशवासीयांना खूप दुःख झालं.
  20. बंधू आणि भगिनींनो, देशप्रेमाची भावना देशवासीयांच्या कर्तव्यनिष्ठेला अधिक मजबूत बनवते. आपण डॉक्टर असा किंवा वकील, दुकानदार असा किंवा कार्यालयीन कर्मचारी, सफाई कर्मचारी असा किंवा मजूर, आपल्या कर्तव्याचं पालन, निष्ठा आणि कौशल्यानं करणं, देशासाठी आपलं प्राथमिक आणि सर्वात महत्वपूर्ण योगदान आहे.
  21. सशस्त्र दलांचा सर्वोच्च प्रमुख म्हणून हा उल्लेख करताना मला आनंद होत आहे की हे वर्ष, सशस्त्र दलांमधल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं आहे. आमच्या कन्यांनी पारंपरिक सीमा ओलांडल्या आहेत आणि आता नव्या क्षेत्रांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्थायी कमिशनची सुविधा सुरू झाली आहे. त्याबरोबरच सैनिक शाळा तसंच सुप्रतिष्ठित राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत प्रवेश घेण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे सैन्याची गुणवत्ता समृद्ध होण्यासोबतच आमच्या सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राहण्याचाही लाभ मिळेल.
  22. मला हा विश्वास आहे की भविष्यात या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आज सुस्थितीत आहे. एकविसाव्या शतकाला हवामानबदलाच्या युगाच्या रुपात बघितलं जात आहे आणि भारत, अक्षय्य म्हणजेच अपारंपरिक ऊर्जेसाठी आपल्या साहसी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांबरोबरच, जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे. वैयक्तिक पातळीवर आपल्यातली प्रत्येक व्यक्ती, गांधीजींच्या सल्ल्यानुसार आपल्या आजूबाजूच्या परिसराला सुधारण्यासाठी, आपलं योगदान देऊ शकते. भारतानं नेहमीच संपूर्ण विश्वाला एक कुटुंबच मानलं आहे. मला विश्वास आहे की विश्वबंधुत्वाच्या या भावनेसह आपला देश आणि संपूर्ण जागतिक समुदाय, आणखी अधिक समरस तसच समृद्ध भविष्याच्या दिशेनं पुढे वाटचाल करतील.
  23. प्रिय देशवासीयांनो, यावर्षी जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण होतील, तेव्हा आपण आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार करू. हा क्षण आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. मला हे जाणून आनंद होतोय की मोठ्या प्रमाणात आपले देशवासीय विशेष करून आपला युवा वर्ग, या ऐतिहासिक आयोजनात उत्साहानं भाग घेत आहेत. ही केवळ आपल्या पुढच्या पिढीसाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठी, आपल्या भूतकाळाशी पुन्हा जोडले जाण्याची एक चांगली संधी आहे. आपलं स्वातंत्र्य युद्ध आपल्या गौरवशाली ऐतिहासिक प्रवासाचा एक प्रेरक अध्याय होता. स्वातंत्र्याचं हे पंच्याहत्तरावं वर्ष त्या जीवनमूल्यांना पुन्हा जागृत करण्याची वेळ आहे, ज्यामुळे आपल्या महान राष्ट्रीय आंदोलनाला प्रेरणा मिळाली होती. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक विरांगना आणि सुपुत्रांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे. स्वातंत्र्यदिन तसच प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय उत्सव, न जाणो किती कठोर यातना आणि बलिदानांनंतर लाभले आहेत. चला, प्रजासत्ताक दिनाच्या या प्रसंगी आपण सर्वजण श्रद्धेनं त्या अमर बलिदान्यांचं सुद्धा स्मरण करूया.
  24. प्रिय देशवासीयांनो, आपली संस्कृती प्राचीन आहे परंतु आपलं हे प्रजासत्ताक नवीन आहे. राष्ट्रनिर्माण आपल्यासाठी निरंतर चालणारं एक अभियान आहे. जसं एका कुटुंबात होतं तसंच एका राष्ट्रात सुद्धा होतं की एक पिढी पुढच्या पिढीचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी कठोर मेहनत करते. आपण स्वातंत्र्य मिळवेपर्यंत, वसाहतवादी साम्राज्यानं केलेल्या शोषणानं आपल्याला घोर गरिबीच्या खाईत लोटलं होतं. मात्र त्यानंतरच्या 75 वर्षात आपण प्रभावकारक प्रगती केली आहे. आता युवापिढीच्या स्वागतासाठी, संधींचे नवे दरवाजे उघडत आहेत. आपल्या युवावर्गानं या संधींचा लाभ उठवत यशाची नवी उदाहरणं तयार केली आहेत. मला विश्वास आहे की अशीच ऊर्जा, आत्मविश्वास आणि उद्यमशीलतेसह आपला देश प्रगतिपथावर पुढे वाटचाल करत राहील, तसच आपल्या क्षमतेनुसार जागतिक समुदायात आपलं सर्वोच्च स्थान नक्की प्राप्त करेल.
  25. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद! जय हिंद!!

MC/DDSahyadri/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792628) Visitor Counter : 678