पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया गेट परिसरात नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 23 JAN 2022 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जानेवारी 2022

 

या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी अमित शाह, हरदीप पुरीजी, मंत्रिमंडळातील इतर सदस्य, भारतीय राष्ट्रीय सेनेचे सर्व विश्वस्त, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व सदस्य, ज्युरी सदस्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, तटरक्षक दल आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक, आपत्ती व्यवस्थापन विषयक पुरस्कारांचे विजेते सहकारी, इतर सर्व उपस्थित माननीय,

बंधू आणि भगिनींनो!

भारतमातेचे शूर सुपुत्र, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण देशातर्फे त्यांना कोटी-कोटी प्रणाम करतो. हा दिवस ऐतिहासिक आहे, हा कालखंड देखील ऐतिहासिक आहे आणि आपण आता जेथे एकत्र जमलो आहोत ते स्थान देखील ऐतिहासिक आहे. भारतीय लोकशाहीचे प्रतीक असलेले आपले संसद भवन येथून जवळच आहे, आपली क्रियाशीलता आणि जनतेच्या प्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक असणारी अनेक भवने देखील आपल्या जवळपास उभी आहेत आणि आपल्या शहीद वीरांप्रती समर्पित राष्ट्रीय युध्द स्मारक देखील जवळच आहे. या सर्वांच्या सान्निध्यात आज आपण इंडिया गेट परिसरात स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ज्यांनी आपल्याला स्वतंत्र आणि सार्वभौम भारताच्या निर्मितीची खात्री दिली होती त्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि मोठ्या धैर्याने इंग्रजी सत्तेला सांगितले होते – “मी स्वातंत्र्य भीक म्हणून स्वीकारणार नाही तर मी स्वतः स्वातंत्र्य मिळवीन.” भारताच्या भूमीवर पहिले स्वतंत्र सरकार स्थापन करणाऱ्या आपल्या नेताजींचा भव्य पुतळा आज डिजिटल स्वरुपात इंडिया गेट जवळ स्थापन होत आहे. लवकरच या होलोग्राम पुतळ्याच्या जागी ग्रॅनाईटमध्ये कोरलेला भव्य पुतळा देखील उभारण्यात येईल. हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्याच्या या महानायकाप्रती आपल्या कृतज्ञ देशाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नेताजी सुभाष यांचा हा पुतळा आपल्या लोकशाही संस्थांना, आपल्या पिढ्यापिढ्यांना राष्ट्रीय कर्तव्याचे स्मरण देत राहील, येणाऱ्या पिढ्यांना, वर्तमानातील पिढीला सदैव प्रेरणा देत राहील.

मित्रांनो,

गेल्या वर्षीपासून आपल्या देशाने नेताजींची जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली आहे. आज, पराक्रम दिनानिमित्त, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहेत. नेताजींच्या जीवन कहाणीपासून प्रेरणा घेऊनच हे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. आज ज्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळाली. त्या वर्ष 2019 ते वर्ष 2022 या कालावधीतील सर्व तत्कालीन पुरस्कार विजेत्यांचे, सर्व व्यक्तींचे आणि सर्व संस्थांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपल्या देशात पूर्वीपासून आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत जी वृत्ती दिसून येत होती त्यासाठी एक म्हण अगदी चपखल बसते ती म्हणजे - तहान लागल्यावर विहीर खणणे. आणि मी मूळचा ज्या काशी परिसरातला आहे तिथे यासाठी आणखी एक म्हण प्रचलित आहे. तेथे असे म्हणतात – भोज घडी कोह्डा रोपे. म्हणजे जेवणाची वेळ झाल्यावर कोहोळ्याच्या भाजीचे रोप लावणे. म्हणजेच, जेव्हा संकट समोर येऊन ठाकते तेव्हा त्यापासून वाचण्याचे उपाय शोधायला सुरुवात व्हायची. एवढेच नव्हे तर, त्यावेळेस फारशी कोणाला माहित नसलेली आणखी एक आश्चर्यकारक पद्धत प्रचलित होती. आपल्या देशात अनेक वर्षे आपत्ती व्यवस्थापन हा विषय कृषी विभागाच्या अखत्यारीत ठेवण्यात आला होता. पूर, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटांतून सावरण्याची जबाबदारी कृषी मंत्रालयाला सांभाळावी लागत होती. आपल्या देशात तेव्हा आपत्ती व्यवस्थापन अशाच प्रकारे केले जात होते. मात्र, 2001 साली गुजरातमध्ये आलेल्या भूकंपानंतर जे काही घडले त्यामुळे देशाला आपत्ती व्यवस्थापनाबाबत नव्याने विचार करण्यास भाग पाडले. आणि त्या संकटाने आता आपत्ती व्यवस्थापनाचा अर्थच बदलून टाकला. आम्ही सगळे सरकारी विभाग आणि मंत्रालयांना मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी करून घेतले. त्यावेळी मिळालेल्या अनुभवांतून शिकवण घेऊन 2003 मध्ये गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार करण्यात आला. संकटग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी अशा प्रकारचा कायदा तयार करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले. नंतरच्या काळात, गुजरातच्या या कायद्याकडून धडे घेत केंद्र सरकारने 2005 मध्ये संपूर्ण देशासाठी अशाच प्रकारचा आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला. हा कायदा झाल्यानंतरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या कायद्याने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देखील देशाला खूप मदत केली.

मित्रांनो,

आपत्ती व्यवस्थापनाला अधिक प्रभावी करण्यासाठी वर्ष 2014 नंतर आमच्या सरकारने चौफेर काम केले आहे. आम्ही मदत, बचाव आणि पुनर्वसन यांच्यावर भर देतानाच सुधारणांकडे देखील लक्ष दिले आहे. आम्ही राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला सशक्त केले, दलाचे आधुनिकीकरण केले आणि देशभरात त्याचा विस्तार केला. या दलाच्या कार्यात अवकाश तंत्रज्ञानासह नियोजन आणि व्यवस्थापन या सर्व पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट पद्धती स्वीकारल्या. आपले राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातील सहकारी तसेच राज्य आपत्ती निवारण दलातील कर्मचारी आणि सुरक्षा दलांचे जवान त्यांचे प्राण पणाला लावून एक-एक जीव वाचवितात. म्हणूनच आजचा हा क्षण, अशा प्रकारे प्राण पणाला लावणाऱ्या त्या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करण्याचा, त्यांना सलाम करण्याचा क्षण आहे.

मित्रांनो,

जर आपण आपल्या सर्व प्रणाली सशक्त करत गेलो तर आपत्ती निवारणाची क्षमता दिवसेंदिवस वाढतच जाईल. मी ह्या कोरोना काळातील एक दोन वर्षांतील परिस्थिती तुमच्या लक्षात आणून दिली तरी असे दिसते की या महामारीच्या काळात देखील देशासमोर अनेक नवी संकटे येऊन उभी ठाकली होती. एकीकडे आपण कोरोनाशी लढा देतच होतो. त्यासोबतच देशात अनेक ठिकाणी भूकंप आले, कितीतरी भागांमध्ये पूर आले. ओदिशा, पश्चिम बंगालसह देशाच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळे धडकली, गोवा, महाराष्ट्र, गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळे आली. पूर्वी एकेका चक्रीवादळात शेकडो लोक मृत्युमुखी पडत असत मात्र, यावेळी असे काही घडले नाही. देशाने प्रत्येक आव्हानाला नव्या ताकदीने चोख उत्तर दिले. यामुळेच, या सर्व संकटांच्या वेळी आपण जास्तीतजास्त जीव वाचवू शकलो. आज, मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था भारताच्या या सामर्थ्याची, भारतात घडून आलेल्या या परिवर्तनाची प्रशंसा करीत आहेत. आज देशात एक अशी परिपूर्ण चक्रीवादळ प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन आणि सर्व संबंधित संस्था एकत्रितपणे काम करतात. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ अशा सर्व संकटांची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेत सुधारणा करण्यात आली आहे. आपत्तीमधील धोक्याचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक साधने तयार करण्यात आली आहेत. राज्य सरकारांच्या मदतीने विविध क्षेत्रांसाठी आपत्तीविषयक धोका दर्शविणारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. सर्व राज्यांना आणि सर्व हितधारकांना याचा लाभ होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हा आज देशात लोकसहभागाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विषय झाला आहे. मला सांगण्यात आले आहे की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुरु केलेल्या ‘संकट मित्र’ सारख्या योजनेद्वारे अनेक युवक या विषयात रस घेण्यासाठी पुढे येत आहेत. ‘संकट मित्रा’च्या रुपात जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत. याचाच अर्थ, या विषयात लोक सहभाग वाढतो आहे. आता कितीही संकट आले तर लोक त्याला बळी पडत नाहीत तर स्वयंसेवक बनून ते त्या संकटाचा मुकाबला करतात. म्हणजेच आता आपत्ती व्यवस्थापन हे केवळ सरकारी काम राहिलेले नाही तर ते ‘सबका प्रयास’ म्हणजेच सर्वांच्या प्रयत्नांचे एक मॉडेल झाले आहे.

आणि मित्रांनो,

मी जेव्हा ‘सबका प्रयास’ या संकल्पनेबद्दल बोलतो तेव्हा यात प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या प्रयत्नांचा मिळून असा एक समग्र दृष्टीकोन देखील समाविष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापनाला प्राधान्य देत आम्ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील अनेक बदल केले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी, वास्तूविशारद यांच्याशी निगडीत अभ्यासक्रमांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधांची रचना कशी असावी यासंदर्भातील या अभ्यासक्रमांमध्ये विषय अंतर्भूत करणे, अशी कामे सुरु आहेत. सरकारने धरण निष्फळ होण्याच्या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धरण सुरक्षा कायदा देखील तयार करण्यात आला आहे.

मित्रांनो,

जगात जेव्हा कधीही एखादे संकट येते तेव्हा त्यात झालेल्या लोकांच्या दुःखद मृत्यूंची चर्चा होत असते, इतक्या लोकांनी जीव गमावला, इतक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, खूप आर्थिक नुकसान झाले, अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. मात्र या आपत्तींमध्ये पायाभूत सुविधांचे जे नुकसान होत असते त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणूनच आजच्या काळात, सर्व आपत्तींमध्ये टिकून राहू शकेल अशा पायाभूत सुविधांची निर्मिती होणे आवश्यक आहे. भारत आज या दिशेने देखील वेगाने काम करीत आहे. ज्या भागांमध्ये भूकंप, पूर अथवा चक्रीवादळाचा धोका जास्त प्रमाणात आहे अशा भागांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधल्या जात असलेल्या घरांच्या निर्मितीदरम्यान देखील या गोष्टींकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. उत्तराखंडात ज्या चार-धाम महा-योजनेचे काम सुरु आहे त्यामध्ये देखील आपत्ती व्यवस्थापनाची तजवीज करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात निर्माण होत असलेल्या नव्या द्रुतगती महामार्गांच्या उभारणीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन काळात विमाने उतरविता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हीच नव्या भारताची संकल्पना आहे, नव्या भारताची विचार करण्याची पद्धत आहे.

मित्रांनो,

आपत्तीला लवचिकतेने प्रतिसाद देणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या याच दृष्टीकोनासह भारताने विश्वाला एका मोठ्या संस्थेची संकल्पना दिली आहे, भेट दिली आहे. ही संस्था आहे –सीडीआरआय अर्थात आपत्तीप्रती लवचिकतेने काम करणाऱ्या पायाभूत सुविधांसाठीची संयुक्त आघाडी. भारताच्या या उपक्रमात ब्रिटन हा आपला प्रमुख भागीदार झाला आहे आणि जगातील 35 देश आता या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. जगातील विविध देशांदरम्यान, त्यांच्या सैन्यांदरम्यान आपण खुपदा संयुक्त लष्करी सराव झाल्याचे पाहतो. ही एक जुनी परंपरा असून त्याची चर्चा देखील होत असते. मात्र, भारताने प्रथमच आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त सरावाची परंपरा सुरु केली आहे. अनेक देशांमध्ये कठीण परिस्थितीच्या काळात आपल्या देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित संस्थांनी मदतीचा हात दिला आहे आणि मानवतेप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांचे पालन केले आहे. जेव्हा नेपाळमध्ये भूकंप झाला, मोठ्या प्रमाणावर विनाश झाला त्यावेळी भारताने एक मित्रराष्ट्र म्हणून त्यांच्या दुःखात सहभागी होण्यात जरादेखील उशीर केला नाही. आपले राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान लगेचच तेथे धावून गेले होते आणि मदतकार्याला सुरुवात केली होती. आपत्ती व्यवस्थापनाचा भारताचा अनुभव केवळ देशासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी उपयुक्त ठरतो आहे. तुम्हांला आठवत असेल की 2017 मध्ये भारताने दक्षिण आशियाई भू-स्थिर दळणवळण उपग्रह सोडला होता. आता हवामान आणि दळणवळण क्षेत्रासाठी या उपग्रहाच्या सेवांचा लाभ दक्षिण आशियातील आपल्या सर्व मित्र देशांना मिळतो आहे.

मित्रांनो,

परिस्थिती कशीही असो, जर आपल्या ठायी धैर्य असेल तर आपण संकटाचे देखील संधीमध्ये रुपांतर करू शकतो. हाच संदेश नेताजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान आपल्याला दिला होता. ते म्हणत असत की “स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार होणार आहे यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. भारताला त्याच्या लक्ष्यापासून विचलित करू शकेल अशी जगात कोणतीही शक्ती नाही.” आज आपल्यासमोर स्वतंत्र भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. आपल्या समोर भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 100 वर्षे पूर्ण होण्याआधी म्हणजे 2047 च्या पूर्वी नव्या भारताची उभारणी करण्याचे लक्ष्य आहे. नेताजींना आपल्या देशावर जो विश्वास होता, ज्या भावना त्यांच्या मनात उचंबळत होत्या त्याच भावनांमुळे मी असे म्हणू शकतो की जगातील कोणतीही शक्ती भारताला हे लक्ष्य प्राप्त करण्यापासून थांबवू शकत नाही. आपल्याला मिळालेले यश आपल्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे. मात्र, अजून खूप लांबवरचा प्रवास करायचा आहे. आपल्याला अजून कित्येक शिखरे सर करायची आहेत. यासाठी आपल्याला देशाच्या इतिहासाची, हजारो वर्षांच्या प्रवासात या देशाला घडविणारी तपश्चर्या, त्याग आणि बलिदानांची जाण ठेवणे आवश्यक आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारताने स्वतःची ओळख आणि प्रेरणास्थानांना पुनर्जीवित करणे हाच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा निश्चय आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची संस्कृती आणि संस्कारांसह अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे योगदान देखील पुसून टाकण्याचे कृत्य करण्यात आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्ये लाखो देशवासीयांची तपस्या देखील पणाला लागली होती, मात्र त्यांच्या या इतिहासाला देखील मर्यादित करण्याचे प्रयत्न झाले.  मात्र, आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक दशके होऊन गेल्यावर, देश अत्यंत धाडसाने त्या चुका सुधारत आहे. तुम्हीच हे लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास त्यांच्या गौरवाला अनुरूप ठरेल अशा पद्धतीने केला जात आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी आज संपूर्ण जगामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या यशोगाथेचे तीर्थस्थळ झाले आहे. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यास आपण सर्वांनी सुरुवात केली आहे. आदिवासी समाजाचे योगदान आणि इतिहास यांची सर्वांना माहिती करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये आदिवासी वस्तूसंग्रहालये उभारण्यात येत आहेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक वारसा देखील देश आज संपूर्ण सन्मानाने जपत आहे. नेताजींनी अंदमान येथे तिरंगा झेंडा फड्कविल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ अंदमानातील एका बेटाला नेताजींचे नाव देण्यात आले आहे. नुकतेच डिसेंबर महिन्यात, अंदमान येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित केलेले विशेष ‘संकल्प स्मारक’ उभारण्यात आले आहे. हे स्मारक नेताजींच्या बरोबरच, स्वातंत्र्यासाठी सर्वस्व उधळून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सेनेच्या सर्व जवानांसाठी देखील एक श्रद्धांजली आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी मला नेताजींच्या कोलकाता येथील वडिलोपार्जित घराला भेट देण्याचे देखील भाग्य लाभले. ज्या प्रकारे ते कोलकाता येथे त्यांनी स्वतःला घडविले, ज्या खोलीत बसून ते वाचन करत असत ती खोली, त्यांच्या घराच्या पायऱ्या, भिंती यांचे दर्शन घेणे हा अनुभव शब्दातीत आहे.

मित्रांनो,

आझाद हिंद सरकारला 75 वर्षे ज्या दिवशी पूर्ण झाली तो 21 ऑक्टोबर 2018 चा दिवस मी कधीही विसरणार नाही. लाल किल्ल्यात झालेल्या एक विशेष समारंभात मी आझाद हिंद सेनेची टोपी परिधान करून तिरंगा फडकाविला होता. तो क्षण अद्भुत होता, अविस्मरणीय होता. लाल किल्ल्यातच आझाद हिंद सेनेशी संबंधित एका स्मारकाचे देखील काम सुरु आहे याचा मला अत्यंत आनंद वाटतो आहे. वर्ष 2019 मध्ये 26 जानेवारीच्या संचलनात आझाद हिंद सेनेच्या माजी सैनिकांना पाहून मन ज्या प्रकारे उत्साहित झाले ती आठवण माझ्यासाठी अत्यंत अनमोल आहे. आमच्या सरकारला नेताजींशी संबंधित कागदपत्रे जनतेसाठी सार्वजनिक करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.  

मित्रांनो,

नेताजी सुभाष जेव्हा एखादी गोष्ट करण्याचा निर्धार करत असत तेव्हा त्यांना कोणतीही शक्ती थांबवू शकत नव्हती. आपल्याला नेताजींच्या ‘कॅन डू, विल डू’ म्हणजेच ‘आपण करू शकतो आणि आपण करणारच आहोत’ या तत्वापासून प्रेरणा घेऊन पुढे जायचे आहे. त्यांना हे माहित होते आणि म्हणूनच ते नेहमीच असे म्हणायचे की भारतात देशभक्तीमुळे अशा सृजनात्मक शक्तीचा संचार होत आहे जी गेल्या अनेक शतकांपासून लोकांच्या मनात सुप्त होती. आपल्याला राष्ट्रवाद देखील जागृत ठेवायचा आहे आणि सर्जनशीलता देखील जिवंत ठेवायची आहे. आणि देशभक्तीचे चैतन्य देखील जागृत ठेवायचे आहे. आपण सगळे मिळून नेताजी सुभाष यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास मला वाटतो. मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आजच्या पराक्रम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांतील कर्मचाऱ्यांचे विशेष करून अभिनंदन करतो कारण अगदी कमी कालावधीत या सर्वांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज कुठेही एखादी आपत्ती येवो अथवा चक्रीवादळासारखे संकट येण्याची शक्यता निर्माण होवो त्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे गणवेशातील जवान दिसू लागतात. आणि मग तेथील सामान्य जनतेला एक विश्वास निर्माण होतो की आपल्याला मदत करणारी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. इतक्या कमी वेळात एखादी संस्था अथवा एखाद्या गणवेशाची विशिष्ट ओळख निर्माण होणे उल्लेखनीय आहे. हे असे आहे की, आपल्या देशावर एखादे संकट आले आणि आपल्या सेनेचे जवान कार्यरत झाले तर सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे एक समाधान वाटते की चला, आता सेनेचे जवान आले आहेत, आता संकटातून आपल्याला बाहेर काढतील. त्याच प्रकारे आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांतील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पराक्रमाने सामान्य लोकांच्या मनात असाच विश्वास निर्माण केला आहे. मी पराक्रम दिनानिमित्त नेताजींचे स्मरण करून सामान्य लोकांना संकटातून तारून नेण्यासाठी करुणा आणि संवेदनशीलता बाळगून ही जबाबदारी पूर्ण करत असलेल्या आपल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला माहित आहे की आपत्ती निवारणाचे कार्य पार पाडत असताना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांनी त्यांच्या जीवाचे बलिदान दिले आहे. दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावणाऱ्या त्या सर्व जवानांना मी आज श्रद्धांजली अर्पण करतो. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करत आहे. तुम्हां सर्वांना आजच्या पराक्रम दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवितो. खूप खूप धन्यवाद!  

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1792305) Visitor Counter : 106