पंतप्रधान कार्यालय

‘आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या उपक्रमाच्या उद्या, 20 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय उद्‌घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांचे बीजभाषण


पंतप्रधान ब्रह्माकुमारींच्या सात उपक्रमांची सुरुवातही करणार

Posted On: 19 JAN 2022 4:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2022

‘आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ या उपक्रमाच्या उद्या 20 जानेवारी 2022 रोजी  सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या राष्ट्रीय उद्‌घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत ब्रम्हाकुमारींतर्फे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित असलेले 30 अभियान आणि 15,000 हून अधिक विविध कार्यक्रम आणि उत्सव होणार आहेत.

या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान ब्रम्हा कुमारींच्या सात उपक्रमांची सुरुवात करणार आहेत. या उपक्रमांमध्ये माझा भारत,निरोगी भारत; आत्मनिर्भर भारत:स्वावलंबी शेतकरी; महिला:भारताच्या ध्वजवाहक; शांती बस अभियानाचे सामर्थ्य; न पाहिलेला भारत- सायकल रॅली; एकीकृत भारत-मोटारसायकल अभियान आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हरित उपक्रम यांचा समावेश आहे.

माझा भारत,निरोगी भारत उपक्रमामध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये  अध्यात्म, आरोग्य आणि पोषण यांच्यावर आधारलेले विविध कार्यक्रम आणि उत्सव होणार आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिरे, कर्करोग निदान शिबिरे, डॉक्टरांच्या आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या परिषदा यांसह इतर कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. आत्मनिर्भर भारत:स्वावलंबी शेतकरी उपक्रमात 75 शेतकरी सक्षमीकरण मोहिमा, 75 शेतकरी परिषदा, 75 शाश्वत योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि शेतकरी कल्याणासंबंधी इतर कार्यक्रम होणार आहेत.  महिला:भारताच्या ध्वजवाहिन्या या उपक्रमाअंतर्गत महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.

‘शांती बस अभियानाचे सामर्थ्य’ या उपक्रमाअंतर्गत 75 शहरे आणि तालुक्यांमध्ये आजच्या युवकांच्या सकारात्मक बदलावर आधारित प्रदर्शने भरविण्यात येतील. विविध ऐतिहासिक वारसा स्थळांवर ‘न पाहिलेला भारत सायकल रॅली’ आयोजित करून वारसा आणि पर्यावरण यांच्यातील संबंध अधोरेखित करण्यात येतील. माउंट अबू पासून दिल्लीपर्यंत एकीकृत भारत मोटारसायकल अभियान चालविले जाईल आणि त्यामध्ये विविध शहरांना सामावून घेतले जाईल. स्वच्छ भारत अभियानातील उपक्रमांमध्ये दर महिन्याला स्वच्छता अभियानाचे आयोजन, सामुदायिक स्वच्छता कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा यांचा समावेश असेल.

या कार्यक्रमात ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी तयार केलेले आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला समर्पित गीत देखील जारी केले जाईल.

ब्रह्मा कुमारी ही जगाच्या पुनरुत्थानासाठी आणि व्यक्तिगत परिवर्तनासाठी समर्पित जगव्यापी अध्यात्मिक चळवळ आहे. भारतात 1937 साली स्थापन झालेली ब्रह्माकुमारी चळवळ जगभरात 130 देशांमध्ये पसरलेली आहे. वर उल्लेख केलेला कार्यक्रम ब्रह्माकुमारीचे संस्थापक पिताश्री प्रजापिता यांच्या 53 व्या स्वर्गारोहण दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

 

 

 

 

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1790963) Visitor Counter : 232