पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मणिपूर मधील इंफाळ येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली


"नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार असा उल्लेख केलेला ईशान्य प्रदेश नवभारताची स्वप्ने पूर्ण करण्याचे प्रवेशद्वार बनत आहे"

"आम्ही ईशान्य प्रदेशातील क्षमता साकारण्यासाठी काम करत आहोत"

“आज देशातील युवक मणिपूरच्या खेळाडूंपासून प्रेरणा घेत आहेत”

“नाकेबंदी असलेले राज्य म्हणून ओळखले जाणारे मणिपूर आता आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणारे राज्य बनले आहे”

“आपल्याला मणिपूरमध्ये स्थैर्य राखायचे आहे आणि मणिपूरला विकासाच्या नवीन उंचीवर देखील न्यायचे आहे. हे काम केवळ दुहेरी इंजिन असलेले सरकारच करू शकते”

Posted On: 04 JAN 2022 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मधील इंफाळ येथे सुमारे  1,850 कोटी रुपयांच्या 13 प्रकल्पांचे उद्‌घाटन केले आणि सुमारे 2,950 कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांची पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते संबंधी पायाभूत सुविधा, पेयजल पुरवठा, आरोग्य, नगर  विकास, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, कला आणि संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित आहेत.

1,700 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. त्यांनी राष्ट्रीय  महामार्ग-  37 वर बराक नदीवर 75 कोटी रुपयांपेक्षा अधिक  खर्च करून बांधलेल्या पोलादी  पुलाचे उद्घाटन केले,. या पुलामुळे सिल्चर आणि इंफाळ दरम्यानची वाहतूक कोंडी दूर होईल. सुमारे 1,100 कोटी रुपये खर्चून बांधलेले 2387 मोबाइल टॉवर्स  त्यांनी मणिपूरच्या जनतेला समर्पित केले.

इम्फाळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी  280  कोटी रुपये खर्चून उभारलेली  ‘थौबल बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जल पारेषण  प्रणाली’,तामेंगलाँग जिल्ह्यातील दहा वस्त्यांमधील रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 65 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पाणीपुरवठा योजना प्रकल्प आणि परिसरातील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 51 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला  ‘सेनापती जिल्हा मुख्यालय पाणीपुरवठा योजनेचा विस्तार ’ प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

पंतप्रधानांनी इंफाळमध्ये सार्वजनिक-खासगी तत्वावरील  सुमारे 160 कोटी रुपयांच्या ‘अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाची पायाभरणीही केली. सुमारे 37 कोटी रुपये खर्चून  'कियामगेई येथे उभारण्यात आलेल्या 200 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे  त्यांनी उद्घाटन केले. डीआरडीओच्या सहकार्याने 37 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय बांधण्यात आले आहे.  इंफाळ स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 170 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेल्या तीन प्रकल्पांचे त्यांनी उद्घाटन केले, ज्यात इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC), 'इंफाळ नदीवरील वेस्टर्न रिव्हरफ्रंटचा विकास (टप्पा  I) आणि ' थंगल बाजार (टप्पा  I) येथील मॉल रोडचा विकास यांचा समावेश आहे .

राज्यात सुमारे 200 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’(CIIIT)ची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. हरियाणातील गुरूग्राम येथे  240 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात येणाऱ्या मणिपूर इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची  पायाभरणीही त्यांनी केली.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, येत्या  काही दिवसांमध्ये  21 जानेवारीला, मणिपूरला राज्याचा दर्जा मिळाल्याला 50 वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवाच्या वर्षातला  हा योगायोग हीच एक मोठी प्रेरणा आहे.

मणिपूरच्या लोकांच्या शौर्याला अभिवादन करत  पंतप्रधान म्हणाले की, देशातील लोकांमध्ये स्वातंत्र्यावरील विश्वासाची सुरुवात मोइरांगच्या भूमीपासून झाली, जिथे नेताजी सुभाष यांच्या सैन्याने प्रथम राष्ट्रध्वज फडकवला. नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार म्हणून उल्लेख केलेला  ईशान्य प्रदेश नवभारताची स्वप्ने पूर्ण करण्याचे प्रवेशद्वार बनत आहे. भारताचा पूर्व आणि ईशान्य भाग हेच भारताच्या प्रगतीचे स्त्रोत असतील आणि आज या प्रदेशाच्या विकासातून  हे ठळकपणे दिसून येते या विश्वासाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आज पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलेल्या योजनांबद्दल पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेचे अभिनंदन केले. पूर्ण बहुमताने आणि पूर्ण ठसा उमटवणारे स्थिर सरकार स्थापन केल्याबद्दल त्यांनी मणिपूरच्या जनतेचे आभार मानले. या स्थैर्यामुळे  आणि मणिपूरच्या लोकांच्या निवडीमुळे 6 लाख शेतकरी कुटुंबांना किसान सन्मान निधी अंतर्गत शेकडो कोटी रुपये मिळाले  आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 6 लाख गरीब कुटुंबांना लाभ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत  80 हजार घरे; आयुष्मान योजनेंतर्गत 4.25 लाख रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार; 1.5  लाख मोफत गॅस जोडण्या ; 1.3 लाख मोफत वीज जोडण्या ; 30 हजार शौचालये; राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मोफत लसीच्या मात्रा  आणि ऑक्सिजन संयंत्रे  प्रत्यक्षात उपलब्ध झाली आहेत.

पंतप्रधान बनण्यापूर्वीही अनेकदा मणिपूरला भेट दिल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. ते म्हणाले की त्यांना तिथल्या लोकांची  वेदना समजते, "म्हणूनच 2014 नंतर मी दिल्ली - भारत सरकार तुमच्या दारी आणले आहे." प्रत्येक अधिकारी आणि मंत्र्याला या प्रदेशात भेट देऊन स्थानिक गरजेनुसार लोकांची सेवा करण्यास सांगितले होते. तुम्ही पाहू शकता की आज केंद्रीय मंत्रिमंडळात ईशान्य प्रदेशातील पाच प्रमुख चेहरे, देशाची महत्वाची खाती सांभाळत आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत केलेले कार्य संपूर्ण ईशान्य भागात, विशेषतः मणिपूरमध्ये दिसून येत आहे याचा ठळक उल्लेख पंतप्रधानांनी केला. आज मणिपूर परिवर्तनीय कार्य संस्कृतीचे प्रतिक म्हणून साकार होत आहे, हे परिवर्तन मणिपूरच्या संस्कृतीसाठी आहे आणि मणिपूर वासियांच्या भल्यासाठी आहे. यामध्ये संपर्क वाढविण्याला प्राधान्य आहेच पण सर्जनशीलतेला देखील तितकेच महत्त्व आहे असे ते म्हणाले. येथील रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्प तसेच मोबाईल सेवेची अधिक उत्तम उपलब्धता यांमुळे या भागाशी संपर्क अधिक बळकट होईल असे त्यांनी स्पष्ट केले. येथील स्थानिक तरुणांच्या सर्जनशीलतेला आणि अभिनव संशोधनाच्या उर्जेला प्रोत्साहन देण्यात सीआयआयटी महत्त्वाचे योगदान देईल. आधुनिक कर्करोग रुग्णालय आरोग्य सुविधेला नवा आयाम देईल आणि मणिपूर कला अविष्कार संस्था तसेच गोविंदजी मंदिराचा जीर्णोद्धार येथील सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या सरकारने ईशान्य भारतासाठी  ‘ ॲक्ट इस्ट; अर्थात पूर्वेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केला आहे. देवाने या भागाला अगदी अमर्याद नैसर्गिक साधनसंपत्ती आणि प्रचंड क्षमता प्रदान केली आहे. या भागात विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या खूप संधी आहेत असे त्यांनी सांगितले. ईशान्य प्रदेशातील या संधींचा प्रत्यक्षात वापर करण्याचे कार्य आता होत आहे असे ते म्हणाले. ईशान्य प्रदेश आता भारताच्या विकासाचे नवे द्वार होत आहे असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

मणिपूर हे देशाला अत्यंत दुर्मिळ रत्ने देणारे राज्य ठरले आहे असे त्यांनी सांगितले. येथील युवक, विशेषतः मणिपूरच्या सुकन्यांनी संपूर्ण जगभरात आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. खासकरून देशभरातील युवावर्ग आज मणिपूरच्या खेळाडूंकडून प्रेरणा घेत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, सरकारच्या दुहेरी इंजिनांच्या अखंडित प्रयत्नांमुळे या भागात आता जहालमतवाद आणि असुरक्षिततेचा वणवा दिसत नाही तर शांती आणि विकासाचा प्रकाश दिसतो आहे. त्यांनी सांगितले की, ईशान्येकडील शेकडो युवकांनी शस्त्रांचा हिंसक मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. सध्याच्या सरकारने अनेक दशके रेंगाळलेले ऐतिहासिक करार हाती घेतले आणि ते मार्गी लावले त्यामुळे मणिपूर राज्य अडथळा स्थितीतून आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मार्ग ठरणारे राज्य झाले आहे असे ते म्हणाले.

मणिपूर राज्यासाठी हे 21 वे शतक अत्यंत महत्त्वाचे आहे. भूतकाळात जो वेळ वाया गेला त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. आता एकही क्षण वाया जाणार नाही असे ते म्हणाले. आपल्याला मणिपुरमध्ये स्थैर्य राखायचे आहे आणि मणिपूरला विकासाची नवी उंची देखील गाठून द्यायची आहे. आणि फक्त दुहेरी इंजिन असलेले सरकारच हे काम करू शकते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

 

 

 

 

JPS/MC/SK/SC/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787458) Visitor Counter : 221