पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली


ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि प्रदेशातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पंतप्रधानांनी ‘बनास डेअरी संकुला’ची केली पायाभरणी

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमधील 20 लाखांहून अधिक रहिवाशांना ग्रामीण निवासी हक्क प्रपत्र 'घरौनी' वितरित केले

पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासात्मक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी देखील केली

किसान दिनानिमित्त चौधरी चरणसिंग यांना वाहिली श्रद्धांजली

“भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी देणे हे आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे”

"गाई-म्हशींची चेष्टा करणारे लोक हे विसरतात की, देशातील 8 कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह अशा पशुधनावर चालतो."

“उत्तर प्रदेश आज देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्यच नाही तर डेअरी क्षेत्राच्या विस्तारातही ते लक्षणीयरित्या अग्रेसर आहे”

"दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि श्वेतक्रांतीची नवी प्रेरणा शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यात मोठी भूमिका बजावते"

“धरणीमातेच्या पुनरुज्जीवनासाठी, आपल्या मातीचे रक्षण करण्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे"

“वाराणसी वेगाने विकासाचे मॉडेल बनत आहे. नवीन प्रकल्प वाराणसीच्या लोकांसाठी अभूतपूर्व सुलभता आणि सुविधा आणत आहेत”

Posted On: 23 DEC 2021 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2021

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारखियां, वाराणसी येथील उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरण खाद्यान्न उद्यान (फूड पार्क) येथे ‘बनास डेअरी संकुला’ ची पायाभरणी केली.  30 एकर जागेवर पसरलेली ही डेअरी सुमारे 475 कोटी रुपये खर्चून बांधली जाणार असून दररोज 5 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची इथे सुविधा असेल. पंतप्रधानांनी बनास डेअरीशी संबंधित 1.7 लाखांहून अधिक दूध उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 35 कोटी रुपयांचा बोनस डिजिटली हस्तांतरित केला.  रामनगर, वाराणसी येथील दूध उत्पादक सहकारी संघ प्रकल्पासाठी बायोगॅस आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) मदतीने भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) विकसित केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या अनुरूप मूल्यांकन योजनेला समर्पित पोर्टल आणि लोगोचे लोकार्पण केले. शेवटच्या स्तरावरील व्यक्तींच्या जमिन मालकीविषयक समस्या कमी करण्याच्या आणखी एका प्रयत्नाचा भाग म्हणून, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील 20 लाखांहून अधिक रहिवाशांना केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामीत्व योजनेअंतर्गत ग्रामीण निवासी हक्क प्रपत्र 'घरौनी' आभासी माध्यमातून वितरित केले.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासात्मक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. यामुळे वाराणसीचा अक्षरशः कायापालट होईल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडेही यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली, जी किसान दिवस म्हणून साजरी केली जाते.

पंतप्रधानांनी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "गायींबद्दल बोलणे हा काही लोकांसाठी गुन्हा असू शकतो, गायींना आपण माता मानतो. गाई-म्हशींची चेष्टा करणारे लोक विसरतात की, देशातील 8 कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह अशाच पशुधनावर चालतो. ते पुढे म्हणाले, भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी देणे हे आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. याच अनुषंगाने आज येथे बनारस काशी संकुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. त्यांनी गुरांमधील लाळ्या आणि खुरकूत रोगावरील देशव्यापी लसीकरण कार्यक्रमाबद्दलही माहिती दिली. देशातील दुग्ध उत्पादनात 6-7 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज भारत जगातील 22 टक्के दुधाचे उत्पादन करतो. मला आनंद आहे की आज उत्तर प्रदेश हे देशातील केवळ सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य नाही तर ते दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या विस्तारातही लक्षणीयरित्या  पुढे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दुग्धव्यवसाय,पशुसंवर्धन आणि शेतकऱ्यांच्या जीवनात श्वेतक्रांतीच्या नव्या वाटचालीच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे पशुपालन हा  आपल्या देशातील 100 दशलक्षांपेक्षा जास्त संख्या असलेल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा मोठा स्रोत बनू शकतो. दुसरे म्हणजे, भारतातील दुग्धजन्य पदार्थांना परदेशात मोठी बाजारपेठ आहे, ज्यामध्ये वाढण्याची भरपूर क्षमता आहे. तिसरे म्हणजे, पंतप्रधान म्हणाले, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांची उद्योजकता वाढवण्यासाठी पशुपालन हा एक उत्तम मार्ग आहे. चौथे म्हणजे बायोगॅस, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीसाठी पशुधन हा देखील मोठा आधार आहे. भारतीय मानक ब्युरोने देशासाठी एक एकीकृत प्रणाली जारी केली आहे. कामधेनू गायी दर्शविणारा एकात्मिक लोगो देखीलप्रमाणीकरणासाठी  प्रसिद्ध  करण्यात आला आहे. हा पुरावा, हा लोगो दिसल्यास शुद्धता ओळखणे सोपे होईल आणि भारतातील दुग्धजन्य पदार्थांची विश्वासार्हताही वाढेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

नैसर्गिक शेतीवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, कालौघात नैसर्गिक शेतीची व्याप्ती कमी होत गेली आणि रासायनिक शेती प्रबळ झाली. मातृभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी, आपल्या मातीचे रक्षण करण्यासाठी, भावी  पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे, ते म्हणाले. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय पिके घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, यामुळे आपली शेती आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.

केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामीत्व योजनेंतर्गत, उत्तर प्रदेशातील 20 लाखांहून अधिक रहिवाशांना पंतप्रधानांनी ग्रामीण निवासी हक्क अहवाल 'घरौनी' आभासी माध्यमातून वितरित केला. ते म्हणाले की यामुळे ग्रामीण गरिबांसाठी विकास आणि सन्मानाच्या संधी खुल्या  होतील आणि त्यांना विकासाच्या यशोगाथेचा भाग बनवेल.

वाराणसी हे वेगाने विकासाचे प्रतिक म्हणून उभे रहात आहे, असे ते म्हणाले. नवीन प्रकल्पांमुळे वाराणसीच्या जनतेला सहजता आणि सुलभता यांचा अभूतपूर्व लाभ होईल. आज उद्घाटन होऊन सुरु झालेल्या प्रकल्पांमुळे आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील.

जे लोक जात, पंथ, धर्म या माध्यमातून उत्तरप्रदेशचे राजकारण बघतात ते या डबल पॉवरच्या डबल इंजिन सरकारच्या चर्चेमुळे नाराज आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  हे लोक शाळा, महाविद्यालये, रस्ते, पाणी तसेच गरीबांना घरे, गॅसजोडणी व शौचालये यांना विकासकामांचा भाग मानत नाहीत. उत्तर प्रदेशच्या जनतेला आतापर्यंत जे मिळाले आणि आमच्या सरकारकडून त्यांना जे मिळत आहे त्यातील फरक स्पष्ट आहे असे त्यांनी नमूद केले. आम्ही उत्तरप्रदेशाची परंपरा वृद्धींगत करत आहोत आणि उत्तरप्रदेशाचा विकासही करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी शैक्षणिक क्षेत्रातील ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले, त्यामध्ये 107 कोटी खर्च करून बांधलेले शिक्षक प्रशिक्षणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आंतर विद्यापीठ केंद्र आणि 7 कोटीं रुपयांहून खर्च आलेले उच्च तिबेटीयन अभ्यासकेंद्रातील शिक्षक प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे. याशिवाय बनारस हिंदू विद्यापीठ आणि करौंडी भारतीय तंत्रशिक्षण संस्थेतील निवासी जागा व कर्मचारी क्वार्टर्स यांचेही उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

आरोग्यसंबंधी प्रकल्पांमध्ये महामना पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्रात डॉक्टरांसाठी वसतिगृह, परिचारिकांसाठी वसतिगृह आणि आधार केंद्र या 130 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. भद्रसी येथे 50 खाटांच्या एकात्मिक आयुष रुग्णालयाचे उद्घाटन त्यांनी केले तसेच पिंदरा तहसील क्षेत्रात 49 कोटी रुपये खर्चून आयुष योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शासकीय होमिओपथी वैद्यकिय महाविद्यालयाचे भूमीपूजन केले.

प्रयागराज आणि भदोई रस्त्यांसाठी दोन चौपदरी व सहापदरी मार्ग प्रकल्पांच्या कामासाठीची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. यामुळे वाराणसी इतर शहरांना रस्ते मार्गाने अधिक उत्तम प्रकारे जोडले जाईल आणि त्यामुळे शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल.

या पवित्र नगरीला पर्यटनाच्या दृष्टीने अधिक तयार करण्यासाठी असलेल्या पर्यटन विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यामध्ये वाराणसीतील श्री रवीदासजी मंदीर, सीर गोवर्धन यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या इतर उद्‌घाटनांमध्ये आंतरराष्ट्रीय तांदळू संशोधन संस्थेतील वेगवान वाण उत्पादन केंद्र, वाराणसीतील दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र, पयाकपूर या गावातील प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळा आणि तहसील पिंढरा येथील अ‍ॅडवोकेट बिल्डिंग यांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

JPS/SK/SRT/VG/VJ/VS/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1784616) Visitor Counter : 281