पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी केले भूमिपूजन


गुजरातच्या लोकांच्या सेवा भावनेची केली प्रशंसा

"आपण सरदार पटेल यांच्या विचारांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले भवितव्य घडवले पाहिजे."

“अमृतकाळ आपल्याला त्या व्यक्तिमत्त्वांची आठवण करण्यास प्रेरित करतो ज्यांनी सार्वजनिक जाणीव जागृत करण्यात मोठी भूमिका बजावली. आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे.”

"देश आता आपल्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक शक्यतांशी जोडत आहे."

'सबका साथ, सबका विकास'ची ताकद काय आहे, हे मी गुजरातपासून शिकलो.

"कोरोनाच्या कठीण काळानंतर अर्थव्यवस्थेने ज्या वेगाने पुनरागमन केले आहे त्यानंतर संपूर्ण जगाला भारताबद्दल आशा आहे."

Posted On: 15 OCT 2021 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्टोबर 2021


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी गुजराती लोकांच्या भावनेची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की, त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सामाजिक विकासाच्या कार्यात गुजरातने नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यांनी याप्रसंगी सरदार पटेल यांचे स्मरण करून राष्ट्रीय विकासाच्या कामात जात-पंथ अडसर ठरू नयेत हे पटवून देताना या महान नेत्याचा हवाला दिला. ते म्हणाले “आम्ही सर्व भारताची लेकरे आहोत. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले नशीब घडवले पाहिजे."

पंतप्रधान म्हणाले की, भारत सध्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरा करत आहे. नवीन संकल्पांसह, हा अमृतकाळ आपल्याला त्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो ज्यांनी सार्वजनिक जाणीव जागृत करण्यात मोठी भूमिका बजावली. आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

वल्लभ विद्यानगरविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली. शिक्षणाचा प्रसार व्हावा, गाव विकास कामांना गती मिळावी यासाठी हे ठिकाण विकसित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून गुजरातची सेवा करण्याचा अनुभव कथन करताना ते म्हणाले की, त्यांच्यासारख्या राजकारणात कोणताही जाती-आधार नसलेल्या व्यक्तीला 2001 मध्ये राज्याची सेवा करण्याचा जन आशीर्वाद प्राप्त झाला. लोकांच्या आशीर्वादाच्या बळावरच वीस वर्षांहून अधिक काळ अव्याहतपणे आधी राज्य आणि नंतर संपूर्ण देशाची सेवा सुरू ठेवता आली असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. 'सबका साथ, सबका विकास'ची ताकद काय आहे, ते मी गुजरातपासूनच शिकलो' हे सांगताना त्यांनी आठवण करून दिली की पूर्वी गुजरातमध्ये चांगल्या शाळांचा अभाव होता, चांगल्या शिक्षणासाठी शिक्षकांची कमतरता होती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकांना कसे जोडले याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 

पंतप्रधान म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेत व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. आता अभ्यास हा केवळ पदवीपुरता मर्यादित नाही, तर अभ्यासाचा संबंध कौशल्याशी जोडला जात आहे. देश आता आपल्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक शक्यतांशी जोडत आहे.

महामारीच्या पार्श्वभूमीवर मजबूत पुनर्प्राप्तीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या कठीण काळानंतर अर्थव्यवस्थेने ज्या वेगाने पुनरागमन केले आहे त्यासह संपूर्ण जगाला भारताबद्दल आशा आहे. भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार असल्याच्या जागतिक संस्थेच्या भाकीताचा संदर्भही त्यांनी दिला.

पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आणि त्यांनी तंत्रज्ञानाचा वस्तुस्थितीशी घातलेला मेळ उद्धृत केला. विविध स्तरांवर काम करण्याचा त्यांचा अनुभव गुजरातच्या विकासासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

* * *

S.Thakur/V.Joshi/D.Rane


(Release ID: 1764159) Visitor Counter : 265