पंतप्रधान कार्यालय

डेन्मार्कचे पंतप्रधान महामहिम मेट्टे फ्रेड्रीकसन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे अभिभाषण

Posted On: 09 OCT 2021 4:55PM by PIB Mumbai

 

महामहिम,

डेन्मार्कचे पंतप्रधान,

डेन्मार्कहून आलेले सर्व प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सर्व सहकारी,

नमस्कार!

कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी, हैदराबाद हाऊसमध्ये नियमितपणे सरकारचे प्रमुख आणि राज्यांच्या प्रमुखांचे स्वागत होत असे. गेल्या 18-20 महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली होती. मला आनंद आहे की आज एका नवीन मालिकेची सुरुवात डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीने होत आहे.

 

महामहिम,

हा एक आनंदी योगायोग आहे की ही तुमची पहिली भारत भेट आहे. मी तुमच्याबरोबर आलेल्या सर्व डॅनिश प्रतिनिधी आणि व्यावसायिक नेतृत्वाचेही स्वागत करतो.

आजची भेट कदाचित आपली पहिली प्रत्यक्ष भेट असेल, परंतु कोरोनाच्या काळातही भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संपर्क आणि सहकार्याची गती कायम होती.  खरं तर, आज एका वर्षापूर्वी, आपल्या आभासी  परिषदेत भारत आणि डेन्मार्क यांच्यात ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. हे आपल्या दोन्ही देशांच्या दूरगामी विचारांचे आणि पर्यावरणाबद्दलच्या आदराचे प्रतीक आहे. ही भागीदारी सामूहिक प्रयत्नांद्वारे, तंत्रज्ञानाद्वारे, पर्यावरणाचे रक्षण करत, हरित वाढीसाठी कसे कार्य करू शकते याचे उदाहरण आहे. आज आम्ही या भागीदारी अंतर्गत केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आगामी काळात हवामान बदलावर सहकार्य वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यासंदर्भात, आणखी एक आनंदाची बाब म्हणजे डेन्मार्क आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य बनला आहे. आपल्या सहकार्यात हा एक नवीन आयाम जोडला गेला आहे.

 

मित्रांनो,

भारत डॅनिश कंपन्यांसाठी नवीन नाही. ऊर्जा, अन्न प्रक्रिया, मालवाहतुक, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर इत्यादी अनेक क्षेत्रात डॅनिश कंपन्या दीर्घकाळ भारतात काम करत आहेत.  त्यांनी केवळ 'मेक इन इंडिया' नव्हे तर 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीसाठी आपली जी दृष्टी आहे, ज्या व्यापकता आणि ज्या वेगाने आपल्याला पुढे जायचे आहे त्यासाठी डॅनिश तज्ञ, कौशल्य आणि तंत्रज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा, विशेषत: उत्पादन क्षेत्रात उचललेली पावले, अशा कंपन्यांसाठी प्रचंड संधी उपलब्ध करत आहेत. आजच्या बैठकीत आम्ही अशा काही संधींबद्दल चर्चा केली.

 

मित्रांनो,

आम्ही आज आणखी एक निर्णय घेतला, आम्ही आमच्या सहकार्याची व्याप्ती सतत वाढवत राहू, त्यात नवीन आयाम जोडत राहू. आम्ही आरोग्य क्षेत्रात नवीन भागीदारी सुरू केली आहे. भारतातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही शेतीशी संबंधित तंत्रज्ञानात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.  या अंतर्गत अन्न सुरक्षा, शीत साखळी, अन्न प्रक्रिया, खते, मत्स्यपालन इत्यादी अनेक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर काम केले जाईल. आम्ही स्मार्ट वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, 'वेस्ट टू बेस्ट' आणि कार्यक्षम पुरवठा साखळी यासारख्या क्षेत्रातही सहकार्य करणार आहोत.

 

मित्रांनो,

आजच्या चर्चेत, आम्ही अनेक प्रादेशिक, जागतिक समस्यांवर विस्तृत, तपशीलवार आणि अतिशय उपयुक्त चर्चा केली. डेन्मार्ककडून विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आम्हाला मिळालेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल मी डेन्मार्कबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. भविष्यात देखील, कायदा आधारित व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे, लोकशाही मूल्ये असलेले आम्ही दोन्ही देश, एकमेकांसोबत समान मजबूत सहकार्याने आणि समन्वयाने काम करत राहू.

 

महामहिम,

पुढील भारत-नॉर्डिक शिखर परिषद आयोजित करण्यासाठी आणि मला डेन्मार्कला भेट देण्याचे आमंत्रण दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या आपल्या अत्यंत फलदायी चर्चेसाठी आणि आपल्या द्विपक्षीय सहकार्याचा नवा अध्याय लिहिणाराऱ्या सर्व निर्णयांवर तुमच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.

खूप खूप धन्यवाद।

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762449) Visitor Counter : 205