पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


रायपूर इथल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण

कृषी विद्यापीठांना पंतप्रधानांच्या हस्ते हरित पुरस्कार प्रदान

"ज्या ज्या वेळी शेतकरी आणि कृषीक्षेत्राला सुरक्षित आधार मिळतो, त्या त्या वेळी त्यांची वेगाने प्रगती होते"

"जेव्हा विज्ञान, सरकार आणि समाज एकत्र काम करतात, त्यावेळी परिणाम अधिक उत्तम असतात. शेतकरी आणि वैज्ञानिकांची ही युती नवीन आव्हानांचा सामना करण्यास देशाला अधिक मजबूत बनवेल."

"शेतकऱ्यांना केवळ पीक-आधारित उत्पन्न व्यवस्थेतून बाहेर काढत मूल्यवर्धन आणि पर्यायी शेतीसंलग्न इतर उद्योगांकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु"

"पारंपरिक प्राचीन शेतीसोबतच भविष्याच्या दिशेने वाटचालही तेवढीच महत्वाची"

Posted On: 28 SEP 2021 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28  सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते कृषी विद्यापीठांना हरित परिसर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेतीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी काही अभिनव प्रयोग केले आहेत, अशा शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आणि त्यानंतर उपस्थितांना संबोधितही केले.

जम्मू काश्मीरच्या गांदरबल इथल्या श्रीमती जैतून बेगम यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी त्यांच्या अभिनव कृषीपद्धतींचा अवलंब करण्याच्या प्रवासाविषयीही जाणून घेतले. तसेच त्यांनी इतर शेतकऱ्यांना कसे याचे प्रशिक्षण दिले याविषयी आणि खोऱ्यातल्या मुलींच्या शिक्षणासाठी त्या करत असलेली धडपडही पंतप्रधानांनी समजून घेतली.

क्रीडाक्षेत्रातही जम्मू काश्मीरच्या मुली उत्तम कामगिरी करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याला सरकारचे प्राधान्य असून त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांचे लाभ थेट पोहोचवले जात आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर इथले शेतकरी आणि बियाणे उत्पादक, कुलवंत सिंह यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी त्यांना विचारले की ते विविध प्रकारची वाणे कशी तयार करतात? पुसा इथल्या कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांशी चर्चा करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता, आणि त्याचे काय लाभ झाले, हे ही त्यांनी विचारले. अशा संस्थाकडून मार्गदर्शन घेण्याबाबत शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, हे ही त्यांनी जाणून घेतले. आपल्या पिकांवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करत असल्याबद्दल त्यांनी कुलवन्त सिंह यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची उत्तम किंमत मिळावी, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगत, त्यादृष्टीने बाजारपेठेची उपलब्धता, उत्तम दर्जाची बियाणे, मृदा आरोग्य कार्ड अशा उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

गोव्यातील बर्डेझ येथील श्रीमती दर्शना पेडणेकर या विविध पिकं घेण्यासोबतच विविध पशुधन कसे सांभाळतात याविषयी पंतप्रधानांनी चौकशी केली. त्यांनी शेतकऱ्यांनी नारळ पिकात केलेल्या मूल्यवर्धनाची देखील चौकशी केली. महिला शेतकरी उद्योजक म्हणून त्यांच्या भरभराटीविषयी  त्यांनी समाधान व्यक्त केले.

माणिपूरच्या थोबिया सिंग यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, सैन्य दलातील नोकरीनंतर शेती करायला सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शेतीसोबतच सुरू केलेल्या मत्स्योत्पादनासारख्या विविध कामांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले. हे जय जवान - जय किसानचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांची स्तुती केली.

पंतप्रधानांनी उत्तराखंड येथील उधम सिंग नागर आणि सुरेश राणा यांच्याकडून त्यांनी मका उत्पादन कसे सुरू केले याविषयी माहिती घेतली. उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी शेती उत्पादक संघटनांची योग्य मदत घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जेव्हा शेतकरी एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्यांना होणारा फायदा देखील मोठा असतो. सरकार शेतकऱ्यांना सर्व साधने आणि पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले  की गेल्या 6-7 वर्षात शेतीशी निगडित समस्या सोडविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्राधान्याने वापर झाला आहे. "बदलत्या हवामानाशी, नव्या परिस्थितीशी जुळवून घेणारे उच्च पोषण बियाणे विकसित करण्यावर आमचा भर आहे,"असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी गेल्या वर्षी विविध राज्यांमध्ये कोरोना महामारी दरम्यान झालेल्या टोळधाडीच्या हल्ल्याची आठवण करुन दिली.  भारताने बरेच प्रयत्न करून या हल्ल्याचा सामना केला, मोठ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना वाचवले, असे ते म्हणाले.

शेतकरी आणि शेतीला सुरक्षा कवच मिळते, तेव्हा त्यांची वाढ जलद होते यावर पंतप्रधानांनी यावर जोर दिला.  जमिनीच्या संरक्षणासाठी 11 कोटी मृदा आरोग्य कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.  पंतप्रधानांनी सरकारच्या शेतकरीस्नेही उपक्रमांची यादीच सांगितली. शेतकर्‍यांना पाण्याची सुरक्षा देण्यासाठी सुमारे 100 प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियान, शेतकऱ्यांना पिकांवरील रोगांपासून संरक्षण देण्यासाठी तसेच अधिक उत्पन्न मिळावे यासाठी नवीन प्रकारची बियाणे उपलब्ध करून देणे याचा यात समावेश आहे.  ते म्हणाले की, एमएसपी वाढवण्याबरोबरच खरेदी प्रक्रिया देखील सुधारली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल.  रब्बी हंगामात 430 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गहू खरेदी करण्यात आला आहे . त्यापोटी शेतकऱ्यांना 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे अदा केले आहेत.  महामारीच्या काळात गहू खरेदी केंद्रांमध्ये तिपटीने  वाढ करण्यात आली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून, ​​आम्ही त्यांना बँकांकडून मदत मिळवणे सोपे केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  शेतकऱ्यांना आज हवामानाची माहिती चांगल्या प्रकारे मिळत आहे.  नुकतेच, 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत.

हवामान बदलामुळे नवीन प्रकारचे कीटक, नवीन रोग, साथीचे रोग उदयास येत आहेत, यामुळे मनुष्य आणि पशुधनांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे आणि पिकांवरही परिणाम होत असल्याची टिप्पणी पंतप्रधानांनी केली.  या पैलूंवर सखोल निरंतर संशोधन आवश्यक आहे.  विज्ञान, सरकार आणि समाज एकत्र काम करतील तेव्हा त्याचे फळ  अधिक चांगले असेल असे ते म्हणाले.

शेतकरी आणि शास्त्रज्ञांची अशी युती नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशाला बळकट करेल असेही त्यांनी सांगितले.

पीक आधारित उत्पन्न व्यवस्थेतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना मूल्यवर्धन आणि इतर शेती पर्यायांसाठी प्रोत्साहित करण्याकरता प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  विज्ञान आणि संशोधनातील उपायांसह बाजरी आणि इतर धान्ये विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक गरजांनुसार देशाच्या विविध भागांमध्ये ते पिकवता येतात हे त्यामागचे कारण असल्याचे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राने आगामी  वर्षबाजरी वर्ष, म्हणून घोषित करून  प्रदान केलेल्या संधींचा उपयोग करण्यासाठी लोकांनी तयार राहावे असे त्यांनी सांगितले.

आपल्या प्राचीन शेती परंपरेबरोबरच भविष्याकडे वाटचाल करणेही तितकेच महत्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.   आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन शेती साधने भविष्यातील शेतीचा गाभा आहेत असे पंतप्रधान म्हणाले.  "आधुनिक कृषी यंत्रे आणि उपकरणांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे आज परिणाम दिसून येत आहेत," असे ते पुढे म्हणाले.

 

S.Tupe/S.Thakur/RA/VG/PM

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758909) Visitor Counter : 343