पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित


तुम्ही देशाचे दूत आहात,आणि जागतिक स्तरावर तुम्ही देशाची मान आभिमानाने उंचावली आहे : पंतप्रधान

संपूर्ण चमूची दुर्दम्य भावना आणि इच्छाशक्तीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

क्रीडा क्षेत्राव्यतिरिक्त बाहेरील क्षेत्रात काम करून लोकांना प्रेरित करा आणि बदल घडवून आणण्यासाठी सहाय्य करा, पंतप्रधानांचे पॅरालिम्पिक खेळाडूंना आवाहन

सततचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल खेळाडूंनी पंतप्रधानांप्रति व्यक्त केले आभार

Posted On: 09 SEP 2021 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.

या संपूर्ण दलासह पंतप्रधानांनी स्पष्ट आणि अनौपचारिक संवाद साधला. क्रीडास्पर्धांमध्ये त्यांनी ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, संपूर्ण देशभरातील क्रीडा क्षेत्राला त्यांच्या  कामगिरीमुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे आणि नवोदित खेळाडूंना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ते पुढे म्हणाले की त्यांच्या कामगिरीमुळे खेळांविषयी सामान्यांच्या कल्पनांच्या पलिकडे जाऊन जागरूकता वाढली आहे.

पंतप्रधानांनी विशेषत्वाने या दलाचे दुर्दम्य धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रथम कौतुक केले आणि म्हणाले की, पॅरा-क्रीडापटूंनी त्यांच्या जीवनात ज्या अगम्य अडचणींवर मात केली आहे, त्यांच्या तुलनेत ही कामगिरी कौतुकास्पद आहे. जे अंतिम यश साध्य करू शकले नाहीत, अशांचे मनोबल वाढविताना, पंतप्रधान म्हणाले की, खरा क्रीडापटू हा कधीच पराभव किंवा विजय यामध्ये अडकून रहात नाही आणि तो कायम पुढे जात राहतो. ते म्हणाले की, ते देशाचे खरे दूत आहेत आणि त्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीद्वारे जागतिकस्तरावर राष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, त्यांची `तपस्या, पुरुषार्थ आणि पराक्रम`यामुळे त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला आहे. ते म्हणाले की, आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या काळात, त्यांनी क्रीडा विश्वाबाहेरील काही क्षेत्रांची ओळख करून घ्यावी आणि ते लोकांना कसे प्रेरित करू शकतील आणि बदल अघडवून आणण्यास कसे सहाय्य करू शकतील, ते पहावे.

पंतप्रधनांनी सर्व पॅरा–क्रीडापटूंना आमंत्रित केल्याबद्दल खेळाडूंनी त्यांचे आभार मानले आणि त्या सर्वांशी एकाच टेबलवर बसून संवाद साधला, हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे, अशी भावना व्यक्त केली. सततचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठिंबा पंतप्रधानांनी दिल्याबद्दल खेळाडूंनी त्यांचे विशेष आभार मानले आणि सांगितले की, जेव्हा इतर भारतीय सहकाऱ्यांना पंतप्रधानांचा अभिनंदन करणारा करणारा दूरध्वनी आला, हे समजल्यावर इतर देशांचे खेळाडू आश्चर्यचकित झाले. त्यांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण उत्तम व्हावे, यासाठी सरकारने कशा प्रकारे कोणतीही कसर ठेवली नाही, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

अनेक खेळाडूंनी त्यांची स्वाक्षरी केलेले क्रीडा साहित्य, आपली जिंकलेली पदके पंतप्रधानांना दिली. सर्व पदक विजेत्यांची स्वाक्षरी असलेले एक उपरणे देखील पंतप्रधानांना भेट देण्यात आले. पंतप्रधान म्हणाले की स्वाक्षरी केलेल्या या क्रीडा साहित्याचा लिलाव केला जाणार आहे आणि क्रीडापटूंनी याचे स्वागतही केले. केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय कायदा मंत्री देखील या समारंभास उपस्थित होते.

U.Ujgare/S.Shaikh/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753514) Visitor Counter : 248