युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं भव्य स्वागत, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार


टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक गोष्टी भारतासाठी प्रथमच घडल्या: अनुराग ठाकूर

टीम इंडियाचे यश हे जगावर वर्चस्व गाजवण्याच्या नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे: अनुराग ठाकूर

Posted On: 09 AUG 2021 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2021

 

राष्ट्रीय राजधानीतली आजची संध्याकाळ आगळीवेगळी आणि अविस्मरणीय आहे, टोक्योत पराक्रम गाजवून आपले ऑलिम्पिक खेळाडू मायदेशी परतले आहेत.

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एका दिमाखदार सत्कार समारंभात नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहैन आणि पुरुष राष्ट्रीय हॉकी संघ या सात पदक विजेत्यांचा सत्कार केला. या समारंभात त्यांचा सत्कार करण्यासाठी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, क्रीडा-सचिव रवि मित्तल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान हे देखील उपस्थित होते.

 

सुवर्णपदक विजेता नीरज, रौप्यपदक विजेता रवी, कांस्यपदक विजेते बजरंग, लवलिना आणि मनप्रीत काल रात्री टोकियो 2020 चा समारोप समारंभ आटोपून  मोठा प्रवास करून आज भारतात परतले. या भव्य सत्काराच्या वेळी त्यांच्यासोबत  मीराबाई आणि सिंधू या अन्य  पदक विजेत्या खेळाडू देखील उपस्थित  होत्या.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “टोकियो 2020  ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक गोष्टी  भारतासाठी प्रथमच घडत होत्या. ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे यश हे नवीन भारताची  जगावर  अगदी खेळांमध्येही वर्चस्व गाजवण्याची इच्छा आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे.   ऑलिम्पिक स्पर्धेने दाखवून दिले की स्वयंशिस्त आणि समर्पणाने आपण जगज्जेते  बनू शकतो. टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रेरणा दिली, तर सर्वत्र  भारतीयांनी उत्साह आणि आनंद साजरा केला. खरेच  खेळ हा सर्वाना एकत्र आणतो.  कारण आपले खेळाडू गावे आणि शहरांमधून ,  उत्तर आणि दक्षिण, पूर्व ते पश्चिमेकडच्या भागातून आलेले आहेत,. त्यांचा प्रवास दृढनिश्चय  आणि उत्कृष्ट क्रीडा नैपुण्याची असाधारण  गाथा आहे. ”

क्रीडा मंत्री पुढे म्हणाले की, अनेक बाबी प्रथमच घडल्या ,  128 सदस्यीय भारतीय पथक,  7 ऑलिम्पिक पदके, अॅथलेटिक्स प्रकारात आपले पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक, पीव्ही सिंधूने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळवलेली पदके आणि  41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने जिंकलेले कांस्य पदक  आणि महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत ऐतिहासिक प्रवेश . ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी नेत्रा कुमानन ही भारतातील पहिली महिला नाविक , ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणारी तलवारबाजी करणारी भारताची पहिली खेळाडू  भवानी देवी, अश्वारोहण स्पर्धेत फौआद मिर्झा या भारतीयाने मिळवलेले सर्वोत्तम स्थान,  इंडियन रोवर्सची उत्तम कामगिरी , अदितीने गोल्फमध्ये भारताच्या वतीने गाठलेले सर्वोच्च स्थान  आणि अविनाश साबळे यांनी स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. आणि मला आणखी उल्लेख करायचा आहे की भारतातील खेळांचा पाया भक्कम आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टॉप्स (TOPs ) आणि खेळों इंडिया  सारख्या विविध योजनांनी पोडियम फिनिश सुनिश्चित करणारे परिणाम दाखवून दिले  आहेत. आम्ही आपल्या  क्रीडापटूंना पाठिंबा देत राहू आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

किरेन रिजिजू यांनी सर्व खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आणि 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये जगाला भारताची दखल घ्यावी लागेल अशी कामगिरी होईल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. “आज आपल्या चॅम्पियन खेळाडूंबरोबर इथे सहभागी होताना माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली असून ही एक ऐतिहासिक घटना आहे. आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी आहे. आपण  41 वर्षांनंतर हॉकी पदक आणि अॅथलेटिक्समध्ये प्रथमच सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आणि केवळ  आपल्या पदक विजेत्यांनी नाही तर  प्रत्येक खेळाडूने टोकियोमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो. ही फक्त सुरुवात आहे कारण खेळात भारताचा पुन्हा उदय होत असल्याचे  दिसून येत आहे आणि मला विश्वास आहे की 2028 च्या  ऑलिम्पिक पर्यंत भारत खेळांमध्ये सर्वोच्च कामगिरी करून दाखवेल असे रिजिजू यांनी नमूद केले.

निसिथ प्रामाणिक यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आणि म्हणाले, तुम्ही भारताला अभिमानास्पद कामगिरी केली आहे.  सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करताना प्रामाणिक पुढे म्हणाले की, भारतीय पथकाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत, जी आतापर्यंत कोणत्याही ऑलिंपिकमधील सर्वाधिक पदकसंख्या आहे.  ही एक ऐतिहासिक आणि संस्मरणीय घटना आहे जी आगामी पिढीला स्पर्धात्मक खेळ खेळण्यासाठी आणि भारताची मान अभिमानाने उंचावण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

टोक्यो  2020  मध्ये भारतासाठी अनेक विक्रम नोंदले गेले.  नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात अंतिम फेरीत  87.58 मीटर लांब भाला फेक करत ऍथलेटिक्समह्ये  भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक  जिंकले. ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समधले हे स्वतंत्र भारताचे पहिले सुवर्णपदक  नाही तर ऍथलेटिक्समध्ये  भारतीयाने मिळवलेले एकमेव पदक आहे.

पीव्ही सिंधू भारताची  एकमेव महिला खेळाडू बनली, जिने सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकली - रिओ 2016 मध्ये रौप्य आणि टोकियो 2020 मध्ये कांस्य पदक जिंकले.महान खेळाडू कर्णम मल्लेश्वरीनंतर भारोत्तोलन प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मीराबाई चानू ही देशातील दुसरी खेळाडू  आणि रौप्य पदक पटकावणारी पहिली भारोत्तोलक ठरली आहे.

दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघाने मॉस्को ऑलिम्पिक 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर यंदा ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये पहिले पदक जिंकले, तर भारतीय महिला हॉकी संघाने प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. टोक्यो स्पर्धेत भारतातील 128 खेळाडूंचे विक्रमी प्रतिनिधित्व होते आणि  त्यांनी 7 पदके जिंकत आजवरच्या  ऑलिम्पिकमधील सर्वोच्च कामगिरी नोंदवली.

रवी दहिया  ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा दुसरा भारतीय पैलवान ठरला, तर महान खेळाडू मेरी कोम नंतर मुष्टियोद्धा लोव्हलिना बोर्गोहेन ही दुसरी  ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी  तिसरी भारतीय मुष्टियोद्धा ठरली. भवानी देवी, नेत्रा कुमानन आणि अदिती अशोक यांचा खेळ हे देखील ऑलिम्पिक स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. भवानी देवी ही तलवारबाजीचा समावेश झाल्यापासून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी  भारताची पहिली खेळाडू  बनली, तर नेथ्रा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची  पहिली महिला नाविक बनली. अदिती अशोकने गोल्फमध्ये चौथे स्थान मिळवले आणि ऑलिम्पिकमध्ये भारताकडून आतापर्यन्तची सर्वोच्च कामगिरी नोंदवली.
 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1744214) Visitor Counter : 1664