पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि लोकार्पण


केवळ कॉन्क्रीटच्या इमारती उभारणे इतकेच नव्हे तर स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या पायाभूत संरचना निर्माण करणे हे आज आमचे उद्दिष्ट आहे- पंतप्रधान

21 व्या शतकातल्या भारताच्या गरजांची पूर्तता 20 व्या शतकातल्या मार्गाने केली जाऊ शकत नाही : पंतप्रधान

सायन्स सिटीमध्ये मनोरंजनाबरोबरच मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या बाबी : पंतप्रधान

रेल्वेचा केवळ सेवा म्हणून विकास न करता एक मालमत्ता या रूपानेही विकास केला : पंतप्रधान

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमधली रेल्वे स्थानकेही आधुनिक सुविधांनी युक्त : पंतप्रधान

Posted On: 16 JUL 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

केवळ कॉन्क्रीटच्या इमारती उभारणे इतकेच उद्दिष्ट नसून स्वतःचे वैशिष्ट्य असणाऱ्या पायाभूत संरचना निर्माण करणे हे आज देशाचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी संबोधित करताना सांगितले. मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्या शिक्षण आणि सर्जनशीलतेलही वाव मिळायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. सायन्स सिटी हा असा प्रकल्प आहे जिथे मनोरंजनाच्या गोष्टींमधून मुलांमधल्या कल्पकतेलाही प्रोत्साहन मिळते.

सायन्स सिटीमध्ये उभारलेली ॲक्वेटिक्स  गॅलरी आणखी आनंददायी  ठरणार आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.  केवळ देशातलेच नाही तर आशियामध्ये देखील अव्वल मत्स्यालयांपैकी हे एक आहे.  जगभरातील सागरी जैवविविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळणे हा  एक अद्भुत अनुभव आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, रोबोटिक्स गॅलरीत रोबोटशी संवाद साधणे हे आकर्षणाचे केंद्र आहेच , मात्र त्याचबरोबर आपल्या तरुणांना रोबोटिक्सच्या क्षेत्रात काम  करण्यास  प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनात कुतूहल  निर्माण करेल.

20 व्या शतकाच्या चालीरीती वापरून 21 व्या शतकातील भारताच्या गरजा भागवल्या जाऊ शकत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच रेल्वेमध्ये नव्याने सुधारणा करण्याची गरज होती. ते म्हणाले की आज रेल्वे ही केवळ सेवा म्हणून नव्हे तर मालमत्ता म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत. ते म्हणाले की, आज देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रेल्वे स्थानके  देखील आता वाय-फाय सुविधांनी सुसज्ज आहेत. लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी ब्रॉडगेजवरील मानव रहित रेल्वे क्रॉसिंग्स पूर्णपणे  काढून टाकण्यात आले आहेत.

भारतासारख्या विशाल देशात रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यावर   पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की रेल्वे देखील विकासाचे नवीन आयाम , सुविधांचे नवे परिमाण आणते. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांमुळे आज रेल्वेगाड्या प्रथमच ईशान्येकडच्या राजधानीत पोहचल्या आहेत. आज वडनगर देखील या विस्ताराचा एक भाग झाला आहे. वडनगर स्टेशनशी माझ्या बर्‍याच आठवणी जोडल्या आहेत. नवीन स्थानक खरोखरच आकर्षक दिसत आहे. या नवीन ब्रॉडगेज मार्गाच्या निर्मितीमुळे वडनगर-मोधेरा -पाटण हेरिटेज सर्किट आता चांगल्या रेल्वे सेवानिशी जोडले गेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

नवीन भारताच्या विकासाचे वाहन एकाच वेळी दोन मार्गावरून  पुढे जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. यातील  एक मार्ग आधुनिकतेचा आहे, तर दुसरा मार्ग  गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणाचा  आहे.

MC/NC/SK/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736234) Visitor Counter : 284