पंतप्रधान कार्यालय

ऑलिम्पिक्ससाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक


खेळ भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याच्या केंद्रस्थानी; आपले युवा देशात भक्कम आणि गतिमान क्रीडासंस्कृती निर्माण करत आहेत

ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंसोबत 135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा असतील

आपल्या खेळाडूंच्या लसीकरणापासून ते प्रशिक्षणापर्यंतच्या सर्व गरजा प्राधान्याने पूर्ण कराव्यात- पंतप्रधान

जागतिक पटलावर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूपासून, आणखी हजार युवा क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतील : पंतप्रधान

ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संपूर्ण देश अभिमानाने त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान स्वतः जुलै महिन्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑलिम्पिक चमूशी संवाद साधणार

Posted On: 03 JUN 2021 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2021

टोक्यो ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी केवळ 50 दिवस शिल्लक राहिले असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील ऑलिम्पिक तयारीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या ऑलिम्पिक तयारीविषयी माहिती देणारे सादरीकरण केले. ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणातले सातत्य, महामारीच्या काळातही कायम होते. त्यांच्या प्रशिक्षणात कोणतेही अडथळे आले नाहीत, अशी माहिती, या आढावा बैठकीत, पंतप्रधानांना देण्यात आली. त्याशिवाय, ऑलिम्पिक कोट्यानुसार प्रवेश मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग, खेळाडूंचे लसीकरण आणि वैयक्तिक प्रशिक्षण तसेच मदत त्यांना पुरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सहायक चमूच्या लसीकरणाबाबतही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. टोक्यो ऑलिम्पिकसाठी जाणारा प्रत्येक निवड झालेला खेळाडू,संभाव्य खेळाडू, सहायक चमू आणि अधिकारी सर्वांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

जुलै महिन्यात, पंतप्रधान स्वतः दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑलिम्पिक चमूशी संवाद साधतील. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संपूर्ण भारतीय अभिमानाने त्यांना शुभेच्छा देत आहेत, हे सांगण्यासाठी, पंतप्रधान हा संवाद साधतील.खेळ हा  भारताच्या राष्ट्रीय चारित्र्याचा अविभाज्य  घटक असून, आपले युवा देशात खेळाची एक भक्कम आणि गतिमान संस्कृती विकसित करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 135 कोटी भारतीयांच्या सदिच्छा कायमच आपल्या युवा खेळाडूंसोबत असतील.तसेच, जागतिक पटलावर कीर्ती गाजवणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूपासून, हजारो युवक-युवती क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडुंकडे विशेष लक्ष दिले जाईल तसेच, या स्पर्धेत सहभागी होतांना त्यांचे मनोबल कायम राहावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. यासाठीच स्पर्धाकाळातहीखेळाडू आणि त्यांच्या पालकांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, नियमित संवाद साधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

एकूण 11 क्रीडा प्रकारातील 100 खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यासोबत,आणखी 25 खेळाडू जून 2021 च्या अखेरपर्यंत टोक्यो ऑलीम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. रिओ दि जानेरो इथे 2016 साली झालेल्या पॅरालीम्पिकमध्ये 19 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. मात्र टोक्यो इथे होणाऱ्या पॅरालीम्पिकसाठी 26 खेळाडू याआधीच पात्र ठरले असून, आणखी 16 खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे.

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724156) Visitor Counter : 288