पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये कोविड-19 संदर्भात क्षेत्रीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत साधला संवाद


प्रशासनाने संपूर्ण संवेदनशीलतेने वाराणसीच्या नागरिकांना सर्वोतोपरी मदत करावी - पंतप्रधान

‘‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी‘‘ याचे पालन आणि 45 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण प्रशासनाने सुनिश्चित करावे - पंतप्रधान

ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग वर पंतप्रधांनी दिला पुन्हा जोर, पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेविरोधात लढा महत्वाचा

कोविड संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि समाज या दोघांचेही सहकार्य आवश्यक - पंतप्रधान

Posted On: 18 APR 2021 5:30PM by PIB Mumbai

  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाराणसीतील कोविड 19 स्थितीचा आढावा घेतला.  या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि कोरोना बाधित रूग्णांच्या योग्य उपचारांसाठी चाचणी, खाटा औषधे, लस आणि मनुष्यबळ इत्यादींची माहिती घेतली. जनतेला सर्व प्रकारची मदत त्वरित  उपलब्ध करून देण्याचे निर्देश पंतप्रधांनी अधिकाऱ्यांना दिले.

या चर्चेदरम्यान, ‘‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी‘‘ याचे पालन सगळ्यांकडून व्हायला हवेयावर  पंतप्रधानांनी विशेष जोर दिला. लसीकरण मोहिमेचे महत्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की, प्रशासनाने  45  वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्याबाबत जागरूक करावे. प्रशासनाने संपूर्ण संवेदनशीलतेने वाराणसीच्या नागरिकांना सर्वोतोपरी मदत करावी असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील सर्व डॉक्टर आणि सगळ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती आभार व्यक्त करीत, पंतप्रधान म्हणाले की, संकटाच्या या काळात ते आपल्या कर्तव्याचे पालन निष्ठेने करीत आहेत.  आपल्याला गतवर्षीच्या अनुभवातून शिकण्यासोबतच दक्षतेने मार्गक्रमण करायला हवे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की वाराणसीच्या प्रतिनिधीच्या रूपात ते सामान्य जनतेकडून निरंतर अभिप्राय घेत आहेत. वाराणसीमध्ये गेल्या 5-6  वर्षात झालेला वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरण यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत मिळाली. यासोबतच वाराणसीमध्ये खाटा, अतिदक्षता विभाग आणि प्राणवायूची उपलब्धता वाढवली जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.  रुग्णांची संख्या वाढल्यामुळे निर्माण झालेला तणाव  बघता प्रत्येक

स्तरांवर प्रयत्न वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी विशेष जोर  दिला. ते म्हणाले की, ज्यावेगाने  वाराणसी प्रशासनाने  'काशी कोविड प्रतिसाद केंद्र' स्थापन केले, त्याच गतीने प्रत्येक कार्य करायला हवे. चाचणी, मागोवा आणि उपचार यावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की, विषाणूवर विजय मिळविण्यासाठी पहिल्या लाटेप्रमाणेच रणनीती अवलंबली पाहिजे. 

संक्रमित  व्यक्तींचे संपर्क शोध आणि चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी जोर दिला. गृह अलगीकरणात असलेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचे संवेदनशीलनेते पालन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्याबद्दल स्वयंसेवी संस्थांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले कीस्वयंसेवी संस्थानी सरकारसोबत केलेल्या कामाला आणखी प्रोत्साहित करायला हवे. परिस्थिती पाहता अधिकाधिक दक्षता आणि खबरदारी घेण्यावर त्यांनी पुन्हा जोर दिला.

कोविड  संक्रमणापासून बचाव आणि उपचारासाठी वाराणसी क्षेत्रात केलेल्या तयारीबाबतची माहिती, वाराणसी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांना दिली. संपर्क शोधासाठी स्थापन केलेला नियंत्रण कक्ष, गृह अलगीकरणासाठी तयार करण्यात आलेले सूचना आणि नियंत्रण केंद्र, समर्पित दूरध्वनी रुग्णवाहिका, नियंत्रण कक्षातून टेलीमेडिसीनची व्यवस्था, शहरी भागात अतिरिक्त जलद प्रतिसाद पथक आदी विषयांसंबंधी पंतप्रधांना माहिती देण्यात आली. कोविडपासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत 1,98,383 व्यक्तींना  लसीची पहिली मात्रा तर 35,014 व्यक्तींना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत, ही माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला, विधानपरिषद सदस्य आणि वाराणसीचे कोविड प्रभारी श्री. ए. के.  शर्मा, विभागीय प्रमुख श्री. दीपक अग्रवाल, पोलीस आयुक्त श्री. ए. सतीश गणेश, जिल्हाधिकारी श्री. कौशल राज शर्मा, महानगरपालिका आयुक्त श्री. गौरांग राठी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. सिंह, बनारस हिंदू विद्यापीठाच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक  प्राध्यापक बी. आर मित्तल, राज्यमंत्री श्री. निलकंठ  तिवारी आणि श्री. रवींद्र जयस्वाल, रोहनियाचे विधानसभा सदस्य  श्री. सुरेंद्र नारायण सिंह, विधानपरिषद सदस्य श्री. अशोक धवन आणि श्री. लक्ष्मण आचार्य  उपस्थित होते.

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712559) Visitor Counter : 185