आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 विषयक मंत्रीगटाची 23 वी बैठक संपन्न
“भारत आपला कोविड रुग्णसंख्येचा आलेख सपाट करण्यात यशस्वी- 146 जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत, 18 जिल्ह्यांत 14 दिवसांत तर 6 जिल्ह्यांत 21 दिवसांत आणि 21 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोविडचा एकही नवा रुग्ण नाही”
भारतात उत्पादित झालेल्या लसींचा पुरवठा करुन भारताने जागतिक समुदायाचा विश्वास संपादन केला- डॉ हर्षवर्धन
Posted On:
28 JAN 2021 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, कोविड-19 विषयक मंत्रीगटाची 23 वी बैठक झाली. या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासह अश्विनी चौबे, नित्यानंद राज आणि मनसुख मांडवीय असे केंद्रीय राज्यमंत्री उपस्थित होते.
त्याशिवाय, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य)डॉ विनोद के पॉल देखील सहभागी झाले होते.

कोविडचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी स्थापन करण्यात आलेला हा मंत्रीगट गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे, असे हर्षवर्धन यांनी सुरुवातीला सांगितले.
“कोविडचा पहिला रुग्ण भारतात 30 जानेवारी 2020 रोजी आढळला होता, आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी कोविडविषयक मंत्रीगटाची पहिली बैठक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ असा दृष्टीकोन ठेवून भारताने या महामारीला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले. गेल्या 24 तासांत देशभरात, 12,000 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत आणि सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 1.73 लाखांपर्यंत कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या कोविड लढ्यातील उपलब्धींविषयी बोलतांना ते पुढे म्हणाले की, ‘देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या 7 दिवसांपासून कोविडचा एकही रुग्ण नाही. 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून, 6 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून, तर 21 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोविडचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. देशात आजवर 19.5 कोटींपेक्षा जास्त कोविड चाचण्या करण्यात आल्या, यामुळेच कोविडवर मात करण्यात आपल्याला यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. सध्या देशात दररोज 12 लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे.

मुंबई, तीरुअनंतपूरम, एर्नाकुलम. कोट्टयाम आणि कोझीकोडे या पाच जिल्ह्यांमध्ये सध्या सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येपैकी 70% रुग्ण आहेत. पुढच्या काही दिवसात ऋतुबदल होण्याची शक्यता असल्यामुळे तसेच, ब्रिटनमधून आलेल्या नव्या स्वरूपातल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर,कोविडविषयक नियम आणि प्रतिबंध काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलतांना डॉ पॉल यांनी सांगितले की लसीकरण मोहिमेच्या व्याप्तीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे आणि येत्या काही दिवसांतच तिसऱ्या स्थानी पोचू शकेल. आतापर्यंत झालेल्या 23 लाख लोकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर काही दुष्परिणाम झाल्यास तत्काळ उपचार करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या 16 AEFI रुग्णालयांमध्ये, असे दुष्परिणाम झालेल्या व्यक्तींचे प्रमाण 0.0007% इतके असून एकही रुग्ण गंभीर स्वरूपाचा नाही. तसेच लस घेतल्यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्याची एकही घटना नोंदली गेलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. इतर देशांच्या तुलनेत भारतात रुग्णसंख्येचा आलेख कसा नियंत्रणात आहे, हे ही त्यांनी मंत्रिगटासमोर स्पष्ट केले.
U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692905)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam