Posted On:
06 JAN 2021 1:39PM by PIB Mumbai
देशभरात कोविड रुग्णांच्या प्रतिदिन मृत्यूंच्या संख्येत सातत्याने घसरण नोंदली जात आहे. गेले 12 दिवस रोज मृत्यू पावलेल्यांची संख्या सतत 300 पेक्षा कमी असलेली दिसून येत आहे.
संशयित रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे, मोठ्या प्रमाणात आणि अधिक जोशाने केलेल्या चाचण्या यांच्यासह प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन नियमांचे पालन यांसारख्या परिणामकारक, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे मृत्यूंची संख्या कमी राखण्यात यश आले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या उपाययोजना परिणामकारकरीत्या राबविल्यामुळे रुग्णांचा लवकर शोध, त्यांचे तत्पर विलगीकरण आणि रुग्णालयातील कोविड बाधितांचे योग्य वेळी वैद्यकीय व्यवस्थापन शक्य झाले.
गेल्या सात दिवसांत दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे एका मृत्यूची नोंद झाली आहे. हे नवे यश म्हणजे कोविडशी संबंधित गोष्टींचे परिणामकारक व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या प्रतिसादात्मक धोरण यांचा सबळ पुरावाच आहे.
आणखी एका स्तरावर सफलता नोंदवत भारताच्या सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल कायम आहे. देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सध्या 2,27,546 आहे, आतापर्यंतच्या एकूण कोविड ग्रस्तांची संख्या लक्षात घेता आता देशात 2.2.% हूनही कमी म्हणजे फक्त 2.19% रुग्ण कोविड सक्रीय आहेत.
प्रतिदिन कोविडमधून बरे होणाऱ्यांची संख्या रोज बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा सातत्याने जास्त असल्यामुळे एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत खात्रीशीर घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 21,314 कोविड ग्रस्त रुग्ण बरे झाले. या काळात एकूण कोविड ग्रस्तांची संख्या 3,490 ने कमी झाली.
गेल्या काही दिवसांत, भारतातील दैनंदिन कोविड बाधितांची संख्या सतत 20,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. गेल्या 24 तासांत 18,088 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.
गेल्या 7 दिवसांत भारतातील एक दशलक्ष लोकसंख्येमागे 96 नव्या रुग्णांची नोंद झाली. ब्राझील,रशिया,फ्रांस,इटली, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये हे प्रमाण कितीतरी जास्त आहे.
भारतातील एकूण कोविड मुक्तांची संख्या 1 कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. एकूण कोविड मुक्तांची संख्या आज 99,97,272 इतकी आहे. प्रतिदिन कोविडमधून बरे होणाऱ्यांची संख्या रोज बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा सातत्याने जास्त असल्यामुळे रोगमुक्तीचा दर 96.36% वर पोहोचला आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.48% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.
देशभराचा विचार करता, एका दिवसात कोविडमुक्त झालेल्या 4,922 रुग्णांसह केरळमध्ये सर्वाधिक व्यक्ती बऱ्या झाल्या. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2,828 तर छत्तीसगडमध्ये 1,651 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
नव्याने नोंद झालेल्या एकूण कोविड बाधितांपैकी 79.05% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 5,615 व्यक्ती नव्याने कोविडग्रस्त झाल्या. काल महाराष्ट्रात 3,160 तर छत्तीसगडमध्ये 1,021 नव्या कोविडग्रस्तांची नोंद झाली.
कोविडमुळे देशात गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या 264 रुग्णांपैकी 73.48% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 24.24% म्हणजे 64 रुग्ण महाराष्ट्रातील होते. छत्तीसगड राज्यात 25 तर केरळमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाला.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या, कोविड विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित जातीने बाधित झालेले 71 रुग्ण आता देशात नोंदले गेले आहेत.
U.Ujgare/S.Chitnis/P.Kor