आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एका दिवसात नोंदल्या जाणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम, गेल्या 24 तासांत 16,504 नव्या कोविडग्रस्तांची नोंद


99 लाख 50 हजार कोविड मुक्त व्यक्तींसह जगातील एकूण सर्वात जास्त रोगमुक्त व्यक्ती भारतातील

गेल्या 11 दिवसांत एक कोटी चाचण्या करण्यात आल्या

Posted On: 04 JAN 2021 12:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

 

कोविड मुक्तीसाठी स्वीकारलेल्या सातत्यपूर्ण, समर्थ आणि आखीव दृष्टिकोनामुळे, भारतात रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविडबाधितांच्या संख्येतील घसरण कायम राहिली आहे. गेल्या 24 तासांत,देशपातळीवरील कोविड बाधितांच्या संख्येत 16,504 नव्या बाधितांची वाढ झाली.

प्रतिदिन नोंद होणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे, देशातील सक्रीय कोविड ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंतच्या एकूण कोविड ग्रस्तांची संख्या लक्षात घेता आता देशात फक्त 2.36% सक्रीय रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासांत एकूण कोविड ग्रस्तांची संख्या 3,267 ने कमी झाली.

भारतात आतापर्यंत संख्या साडेसतरा कोटींहून जास्त म्हणजे 17,56,35,761 इतक्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासांत 7,35,978 नमुने तपासण्यात आले.

देशातील कोविड संसर्ग चाचण्यांसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली असून आता देशभरात 2,299 प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या जात आहेत.

देशात गेल्या 11 दिवसांत एक कोटी चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे सक्रीय कोविड ग्रस्तांच्या एकत्रित प्रमाणात 5.89% घट दिसून आली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे तसेच नव्या कोविडग्रस्तांची संख्या सातत्याने कमी होत असल्यामुळे, भारतातील एकूण कोविड मुक्तांची संख्या 1 कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. एकूण कोविड मुक्तांची संख्या आज साडे नव्व्याण्णव लाखांच्या आसपास म्हणजे 99,46,867 इतकी असून त्यामुळे रोगमुक्तीचा दर 96.19% वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांच्या अवधीत 19,557 रुग्ण बरे झाले.

नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 76.76% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.

देशभराचा विचार करता, एका दिवसात कोविडमुक्त झालेल्यांची संख्या केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 4,668 इतकी असून त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,064 तर पश्चिम बंगालमध्ये 1,432 रुग्ण एका दिवसात कोविडमुक्त झाले आहेत.

 नव्याने नोंद झालेल्या एकूण कोविड बाधितांपैकी 83.90% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

केरळमध्ये  गेल्या 24 तासांत सर्वात जास्त म्हणजे 4,600 व्यक्ती नव्याने कोविडग्रस्त झाल्या. काल महाराष्ट्रात 3,282 तर पश्चिम बंगालमध्ये 896 नव्या कोविडग्रस्तांची नोंद झाली.

कोविडमुळे देशात गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या 214 रुग्णांपैकी 77.57% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 16.35% म्हणजे 35 रुग्ण महाराष्ट्रातील होते तर पश्चिम बंगालमध्ये 26 आणि केरळमध्ये 25 रुग्णांचा मृत्यू झाला.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685940) Visitor Counter : 208