पंतप्रधान कार्यालय
आयआयएसएफ 2020 मध्ये पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
जागतिक दर्जाचे वैज्ञानिक उपाय साध्य करण्यासाठी भारताकडे माहिती, लोकसंख्या, मागणी आणि लोकशाही आहेः पंतप्रधान
देशाच्या विकासासाठी विज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर दिला भर
भारतीय कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतात नाविन्यपूर्ण संशोधन करण्याचे जागतिक समुदायाला केले आवाहन
Posted On:
22 DEC 2020 7:41PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2020 मध्ये उद्घाटनपर भाषण केले. केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन देखील या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताकडे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाचा समृद्ध वारसा आहे. आपल्या वैज्ञानिकांनी चाकोरीबाहेरचे संशोधन केले आहे. आपले तंत्रज्ञान उद्योग जागतिक समस्यांच्या निराकरणात आघाडीवर आहेत. मात्र भारताला अजून बरेच काही करायचे आहे. आम्ही भूतकाळाकडे अभिमानाने पाहतो परंतु आम्हाला त्याहूनही उत्तम भविष्य हवे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, वैज्ञानिक शिक्षणासाठी भारताला सर्वात विश्वासार्ह केंद्र बनवणे हे आमच्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आमच्या वैज्ञानिक समुदायाने सर्वोत्कृष्ट जागतिक प्रतिभेसह स्वतःचा विकास करावा अशी आमची इच्छा आहे. हे साध्य करण्यासाठी उचललेल्या पावलांपैकी एक म्हणजे भारतीय वैज्ञानिकांना त्यांची गुणवत्ता सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हॅकेथॉन्सचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे हे आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लहान वयातच वैज्ञानिक रुची वृद्धिंगत करण्यात मदत करेल असे पंतप्रधान म्हणाले. आता शिक्षणाचा भर पाठ्यपुस्तकांकडून संशोधन आणि वापराकडे तसेच निष्कर्षांकडे वळला आहे असे ते म्हणाले. हे धोरण मोठ्या प्रमाणावर उच्च दर्जाचे शिक्षक घडवण्याला प्रोत्साहित करेल. हा दृष्टीकोन नवोदित वैज्ञानिकांना मदत करेल. अटल इनोव्हेशन मिशन आणि अटल टिंकरिंग लॅबचीही यासाठी मदत होईल असे मोदी म्हणाले.
गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी, गुणवत्ता व रुचीनुसार संशोधन हाती घेण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पंतप्रधान संशोधन पाठयवृत्ती योजना चालवत आहे. ही योजना सर्वोच्च संस्थांमधील वैज्ञानिकांना मदत करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांना मिळवून देण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अभाव आणि प्रभाव यांच्यातील दरी भरून काढत आहेत. हे गरीबांमधील गरीबांना सरकारबरोबर जोडत आहेत. डिजिटल प्रगतीमुळे भारत जागतिक उच्च तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे केंद्र बनत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
हे जागतिक दर्जाचे शिक्षण, आरोग्य, संपर्क आणि ग्रामीण उपाययोजना साध्य करण्यासाठी, आजच्या भारताकडे माहिती, लोकसंख्या आणि मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये संतुलन साधण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी भारताकडे लोकशाही आहे. म्हणूनच जगाचा भारतावर विश्वास आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधान म्हणाले की आपल्या देशात पाण्याची टंचाई , प्रदूषण, मातीची गुणवत्ता, अन्न सुरक्षा यासारखी अनेक आव्हाने आहेत, ज्यासाठी आधुनिक विज्ञानाकडे उपाय आहेत. आपल्या समुद्रामधील पाणी, उर्जा आणि अन्नधान्य संसाधनांचा वेगवान शोध घेण्यातही विज्ञानाची मोठी भूमिका आहे. ते म्हणाले की, भारत यासाठी खोल समुद्रात मोहीम राबवत असून त्यात यश मिळविले आहे. ते म्हणाले की विज्ञानातील नवीन शोधांचा फायदा वाणिज्य आणि व्यवसायालाही मिळत आहे.
पंतप्रधान म्हणाले, आता आपल्या युवकांना आणि खासगी क्षेत्राला केवळ आकाशाला स्पर्श करण्यासाठी नव्हे तर अंतराळात उंचावरही जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अंतराळ क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की नवीन उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित करत आहे. अशा उपाययोजनांमुळे वैज्ञानिक समुदायाला प्रोत्साहन मिळेल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित परिसंस्था सुदृढ होईल आणि नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अधिक संसाधने निर्माण करेल आणि विज्ञान आणि उद्योग यांच्यातील भागीदारीची नवीन संस्कृती निर्माण होईल. या महोत्सवामुळे विज्ञान आणि उद्योग यांच्यातील समन्वय आणि सहकार्याच्या भावनेला नवा आयाम मिळेल आणि नवीन सहकार्यातून नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
विज्ञानासमोर सध्या असलेले सर्वात मोठे आव्हान कोविड महामारीवर लस हे असू शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला. मात्र विज्ञानासमोरील सर्वात मोठे दीर्घकालीन आव्हान म्हणजे उच्च प्रतिभावान तरुणांना आकर्षित करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे हे आहे. देशाच्या विकासासाठी विज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आज ज्याला विज्ञान म्हटले जाते ते उद्याचे तंत्रज्ञान बनते आणि नंतर एक अभियांत्रिकी उपाय बनते. ते म्हणाले की आमच्या विज्ञान क्षेत्रात चांगली प्रतिभा आकर्षित करण्यासाठी सरकारने विविध स्तरांवर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. परंतु यासाठी विज्ञान समाजातही मोठ्या प्रमाणात जागृती आवश्यक आहे. ते म्हणाले की, चांद्रयान मोहिमेप्रति उत्साह ही तरुणांमध्ये आवड निर्माण करण्याची एक उत्तम सुरुवात होती असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला भारतीय गुणवत्तेत गुंतवणूक करण्याचे आणि भारतात नवसंशोधन करण्याचे आवाहन केले. त्यांनी उपस्थितांना सांगितले की भारतात प्रतिभावान तरुण आहेत आणि मोकळेपणा आणि पारदर्शकतेची संस्कृती आहे. भारत सरकार कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि इथल्या संशोधनासाठी आवश्यक वातावरण सुधारण्यासाठी सज्ज आहे असे ते म्हणाले. विज्ञान, व्यक्तीमधील सर्वात चांगल्या गोष्टी समोर आणते आणि भिन्नतेची शक्ती वापरते. त्यांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताला अग्रेसर आणि चांगल्या स्थितीत ठेवल्याबद्दल वैज्ञानिकांचे कौतुक केले.
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682762)
Visitor Counter : 256
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam