पंतप्रधान कार्यालय

भारत – जपान संवाद परिषदेत पंतप्रधानांचा संदेश

Posted On: 21 DEC 2020 2:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020

 

प्रिय मित्रांनो,

सहाव्या भारत-जपान संवाद परिषदेला संबोधित करणे हा माझा मोठाच सन्मान आहे.

पाच वर्षांपूर्वी, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या सहकार्याने आपण परिषदांची ही मालिका सुरु केली. तेव्हापासून, नवी दिल्ली ते टोकियो, यांगोन ते ऊलानबातर असा प्रवास या संवाद उपक्रमाने केला. या प्रवासात, हा उपक्रम नेहमीच, संवाद आणि चर्चांना प्रोत्साहन देणे, दोन्ही देशांतील मानवतावाद, अहिंसा, स्वातंत्र्य आणि सहिष्णुता या दोन्ही देशांतील समान लोकशाहीविषयक मूल्यांना अधोरेखित करणे आणि अध्यात्मिक आणि वैचारिक देवाणघेवाणीच्या प्राचीन परंपरेला पुढे नेणे या त्याच्या पायाभूत उद्दिष्टांप्रती प्रामाणिक राहिला. संवाद उपक्रमाला दिलेल्या निरंतर पाठींब्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो.

मित्रांनो,

ह्या मंचाने, भगवान बुद्धांनी शिकविलेल्या संकल्पना आणि आदर्शांना प्रोत्साहन देणे, विशेषतः युवा वर्गामध्ये त्यांच्या महत्त्वाचा प्रसार होईल हे सुनिश्चित करणे याबाबतीत अत्यंत महान कार्य केले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर, बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार भारतातून जगाच्या अनेक भागांमध्ये पसरला. मात्र, तिथे ह्या शिकवणीचे तेज निष्क्रिय राहिले नाही. जिथे जिथे ही शिकवण पोहोचली तिथे येणाऱ्या कित्येक शतकांमध्ये बुद्धांचे विचार विविध प्रकारे विकसित होत राहिले. या कारणामुळे, आज कित्येक, जगातील अनेक देशांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या बौद्ध मठांमध्ये आणि विविध भाषांमध्ये,  बुद्धाशी संबंधित साहित्य आणि तत्वज्ञानाचा मोठा खजिना सापडतो.

हे लिखाण म्हणजे मानवतेचा एक संपूर्ण खजिनाच आहे. अशा सर्व पारंपरिक बौद्ध साहित्य आणि शास्त्रवचनांचे एक ग्रंथालय स्थापन केले जावे असा प्रस्ताव मी आज मांडू इच्छितो. अशा प्रकारची सुविधा भारतात निर्माण करायची संधी मिळाली तर आम्हांला खूप आनंद होईल आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व योग्य साधनांची सोय आम्ही करू. या ग्रंथालयात, विविध देशांमधील सर्व प्रकारच्या बौद्ध साहित्याच्या डिजिटल प्रतींचा संग्रह जतन करून ठेवला जाईल. या साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याच्या उद्देशाने हे ग्रंथालय प्रयत्न करेल आणि सर्व बौद्ध भिक्षु आणि बौद्धवादी विचारवंत यांना हे साहित्य नि:शुल्क उपलब्ध करून दिले जाईल.

हे ग्रंथालय म्हणजे फक्त साहित्याचे संकलन नसेल. तर संशोधन आणि मनुष्यांमधील, समाजांमधील तसेच माणूस आणि निसर्ग यांच्यातील खरा परस्पर संवाद सुरु होण्यासाठीचा तो एक उत्तम मंच देखील असेल. आजच्या आधुनिक जगात बुद्धांची शिकवण आपल्या सध्याच्या जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कशा प्रकारे मार्गदर्शक ठरेल याचा शोध घेणे हे देखील या संशोधन कार्यात अंतर्भूत असेल. सद्यस्थितीतील  गरिबी, वंशवाद, अतिरेकी वृत्ती, लिंगभेद, हवामान बदल आणि यासारख्या इतर आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकेल.

मित्रांनो,

सुमारे, तीन आठवड्यांपूर्वी, मी सारनाथला गेलो होतो. भगवान बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन सारनाथ इथेच दिले होते. सारनाथ इथे उगम पावलेल्या ह्या ज्योतीचा प्रकाश संपूर्ण जगभरात पसरला आणि त्याने दया, उदात्त विचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मानव जातीचे कल्याण या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. आणि अत्यंत हळुवारपणे, शांततेने त्याने जगाच्या इतिहासाचा मार्ग बदलून टाकला. सारनाथ ही तीच जागा आहे जिथे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म तत्वाच्या आदर्शाबाबत सविस्तर वर्णन केले. त्यांच्यासाठी धम्म म्हणजे प्रार्थना आणि रितीरीवाजांपेक्षा अधिक काहीतरी होते. मानव आणि त्याची इतर मानवांशी असलेली नाती ही धम्म तत्वाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणून, इतरांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवाद उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या विश्वात सकारात्मकता, एकता आणि दयाभावाची ही ऊर्जा पसरली जाईल आणि ती देखील अशा वेळी, जेव्हा आपल्याला तिची सर्वात जास्त गरज आहे. 

मित्रांनो,

हा नव्या शतकातील पहिला संवाद आहे. मानवी इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाच्या घडीला तो होतो आहे. आपण आज करीत असलेल्या कार्यामुळे येत्या काळात आपल्या संभाषणाचे स्वरूप निश्चित होणार आहे. हे शतक आणि त्यापुढील काळ, एकत्रितपणे शिक्षण घेऊन अभिनव संशोधन करण्याला प्राधान्य देणाऱ्या समाजांचा असणार आहे. आगामी काळात, मानवतेचे मूल्यवर्धन करणाऱ्या अत्यंत हुशार, युवा मनांना खतपाणी घालून प्रोत्साहन देण्याचा हा काळ असेल. शिक्षण अशा स्वरूपाचे असेल जे अभिनव कल्पनांना जन्माला घालू शकेल. तात्पर्य काय, तर मनुष्यांच्या सशक्तीकरणासाठी अभिनव कल्पना राबविणे हीच अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

खुल्या विचारांचे, लोकशाहीवादी आणि पारदर्शक समाजच अभिनव कल्पनांसाठी पूरक ठरतात. म्हणून, आपण विकास कशाला म्हणतो त्याचे मोजमाप बदलण्याची यापूर्वी कधीही जाणवली नव्हती तितकी गरज आता, निर्माण झाली आहे. जागतिक वृद्धीची चर्चा काही मोजक्या देशांमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे आता ध्येय विस्तारण्याची गरज आहे. विकासाच्या वाटा मनुष्यकेंद्रित व्हायला हव्या. आणि त्यादेखील आपल्या पर्यावरणाशी एकरूप होऊन.

मित्रांनो,

यमक वग्गो धम्मपद:

न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचं।

अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो॥

असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे.

शत्रूभावाने कधीही शांती मिळणार नाही. भूतकाळात, मानवतेने सहकार्याऐवजी, शत्रुत्वाचा मार्ग स्वीकारला. साम्राज्यवादाद्वारे जग विश्वयुद्धाकडे खेचले गेले. हातपायांच्या शर्यतीकडून अवकाशातील चढाओढीपर्यंत मनुष्य पोचला. आपण संवाद साधला पण तो फक्त दुसऱ्यांना खाली ओढण्यासाठी. आता, आपण सर्व मिळून उन्नती करूया. भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला शत्रुत्व सोडून सशक्तीकरण करण्याचा मार्ग स्वीकारण्यातील शक्ती दाखविते. त्यांची शिकवण आपल्या सर्वांना विशाल हृदयी करेल. असे म्हणतात की भूतकाळापासून शिका आणि उत्तम भविष्यकाळासाठी कार्य करा. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण करू शकू असे हे उत्तम सेवाभावी कार्य आहे.

मित्रांनो,

एकत्रित असणे हा संवाद उपक्रमाचा गाभा आहे. चला, संवादच्या माध्यमातून आपल्यातील उत्तम मूल्यांना एकत्र आणूया. आपल्या प्राचीन मूल्यांना अनुसरून उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची वेळ आता आली आहे. आपल्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी मानवतावाद असायलाच हवा. निसर्गाशी सुसंवादी सहअस्तित्व हा आपल्या अस्तित्वाचा मध्यवर्ती स्तंभ असायला हवा. संवाद उपक्रमाद्वारे आपला आपल्याशी, इतर मानवांशी आणि निसर्गाशी असलेला संवाद आपल्याला या मार्गावर प्रकाशदायी ठरेल. या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचे कौतुक करतो आणि त्यांच्या चर्चात्मक उपक्रमांमध्ये सुयश चिंतितो.

धन्यवाद.

 

* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682359) Visitor Counter : 198