पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये प्रमुख प्रकल्पांचे केले उद्घाटन


बदलत्या काळाशी जुळवून घ्यावे लागेल आणि जागतिक सर्वोत्तम पद्धती स्वीकाराव्या लागतील : पंतप्रधान

आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त करत राहू आणि त्यांच्या चिंतांचे निराकरण करू : पंतप्रधान

कच्छने नवीन युगातील तंत्रज्ञान आणि नवीन युगाची अर्थव्यवस्था या दोन्हीमध्ये मोठी झेप घेतली आहे : पंतप्रधान

Posted On: 15 DEC 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील विविध विकास प्रकल्पांचे उदघाटन  केले. या प्रकल्पांमध्ये क्षार वेगळे करणारा (डिसलायनेशन ) प्रकल्प,  एक हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा पार्क आणि संपूर्ण स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि  पॅकिंग प्रकल्पाचा समावेश आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बदलत्या काळाशी जुळवून घ्यावे लागेल आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करावा लागेल. या संदर्भात त्यांनी कच्छमधील शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण ते आता परदेशात फळांची निर्यात करत आहेत. ते म्हणाले की यातून आपल्या शेतकर्‍यांच्या नाविन्यपूर्ण उत्साहाचे दर्शन घडते.  ते म्हणाले की, सरकारच्या किमान हस्तक्षेपामुळे गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांत कृषी, दुग्ध व मत्स्यव्यवसाय क्षेत्रात भरभराट झाली आहे. गुजरातने  शेतकरी व सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याचे काम केले.

पंतप्रधान म्हणाले की, कृषी सुधारणांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. ज्या शेतीविषयक सुधारणा करण्यात आल्या त्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून  शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांकडून मागणी होत होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध  आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना  खात्री देत राहू, त्यांच्या समस्या सोडवू याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान म्हणाले, आज, कच्छने नवीन युगाचे तंत्रज्ञान आणि नवीन युगातील अर्थव्यवस्था या दोन्ही बाबतीत मोठी झेप घेतली आहे. खरेरा येथील नवीकरणीय  ऊर्जा पार्क, मांडवीतील डिसलायनेशन प्रकल्प  आणि अंजारमधील सरहद डेहरी येथील नवीन ऑटोमॅटिक प्लांटची पायाभरणी करण्यात आली असून  कच्छच्या विकास यात्रेमध्ये नवीन मैलाचे दगड तयार होणार आहेत. या प्रकल्पांचा फायदा आदिवासी, शेतकरी, पशुपालक आणि तेथील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ते म्हणाले की, आज कच्छ हा देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा प्रदेश आहे. इथली संपर्क व्यवस्था  दिवसेंदिवस उत्तम होत आहे.

रात्री जेवणाच्या वेळी वीज मिळावी अशी गुजरातमधील जनतेची अगदी  ‘साधी’ मागणी होती ,  त्या क्षणाची पंतप्रधानांनी  आठवण सांगितली.  ते म्हणाले, गुजरातमध्ये अनेक गोष्टीमध्ये बरेच बदल झाले आहेत. ते म्हणाले, गुजरातमधील आजच्या तरूणांना  पूर्वीच्या बिकट दिवसांची माहितीही नसेल.  पंतप्रधानांची आठवण सांगितली की कच्छतील लोकसंख्या कमी झाली होती.  आता लोकांनी बाहेर जाणे बंद केले आहे आणि लोक परत येत असल्यामुळे लोकसंख्या वाढत आहे. भीषण भूकंपानंतर कच्छच्या सर्वांगीण  विकासावर संशोधक  आणि विद्यापीठांनी अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या वीस वर्षांत अनेक शेतकरी-स्नेही  योजना सुरू केल्याबद्दल त्यांनी गुजरात सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, सौर ऊर्जेची क्षमता बळकट करण्यात गुजरात अग्रेसर आहे.

एकविसाव्या शतकात ऊर्जा सुरक्षा आणि पाणी सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे, असे  पंतप्रधानांनी नमूद केले.  ते म्हणाले की, पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी नर्मदेचे पाणी कच्छला देण्याविषयी बोलले जात होते तेव्हा सुरुवातीला  चेष्टा केली गेली. आता नर्मदा नदीचे पाणी कच्छमध्ये  पोहोचले असून कच्छ प्रगती करत आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680828) Visitor Counter : 132