पंतप्रधान कार्यालय

फिक्कीच्या 93 व्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 DEC 2020 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2020

 

नमस्कार !

फिक्कीच्या अध्यक्षा, संगीता रेड्डी जी, सरचिटणीस दिलीप चिनॉय जी, भारतीय उद्योगजगतातील माझे सहकारी, बंधू आणि भगिनींनो,

क्रिकेटच्या 20-20 सामन्यात खेळाचे स्वरुप झपाट्याने बदलतांना आपण पहिले आहे. मात्र 2020 वर्षाने तर त्या वेगावरही मात केली आहे. भारतच काय, संपूर्ण जगात इतके चढउतार, उलथापालथ झाली, की कदाचित काही वर्षांनी जेव्हा आपण कोरोना काळाची आठवण करु, तेव्हा आपलाच विश्वास बसणार नाही. मात्र, या सगळ्यात एक खूप चांगली गोष्ट म्हणजे, जितक्या वेगानं परिस्थिती बिघडली, तितक्याच वेगानं त्यात सुधारणाही होत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात जेव्हा कोरोना महामारीची सुरुवात झाली, तेव्हा आपण एका अज्ञात शत्रूशी झुंज देत होतो. खूप अनिश्चितता होती. उत्पादन असेल, लॉजिस्टिक विषयक गोष्टी असतील, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे असो, कितीतरी आव्हाने समोर होती. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, की किती दिवस हे असे चालणार? हे सगळं केव्हा ठीक होईल? हेच प्रश्न, आव्हाने, चिंता या सगळ्याने जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रासले होते. मात्र आज, डिसेंबर सुरु होईपर्यंत, परिस्थिती बदलली आहे. आज आपल्याजवळ उत्तरही आहे आणि आराखडाही ! आज आपल्या अर्थव्यवस्थेचे आकडे जे सांगताहेत, ती स्थिती उत्साह वाढवणारी आहे, उमेद वाढवणारी आहे. संकटाच्या काळात देशाने जो धडा घेतला आहे, त्या धड्याने भविष्यातील आपले संकल्प अधिकच दृढ केले आहेत. आणि याचे खूप मोठे श्रेय भारताच्या उद्यमशीलतेला जाते, भारताच्या युवा पिढीला जाते, भारताच्या शेतकऱ्यांना, तुम्हा सर्व उद्योजकांना आणि अर्थातच सर्व देशबांधवांना जाते, यात शंका नाही.

मित्रांनो,

जागतिक महामारीच्या काळासोबत कायमच एक इतिहास, एक शिकवण जोडली गेली आहे. जे देश अशा साथीच्या आजाराच्या काळात जास्तीत जास्तीत नागरिकांना वाचवण्यात यशस्वी ठरतात, त्या देशांच्या व्यवस्थेत पुन्हा नव्याने उभारी घेण्याची ताकद असते. या महामारीच्या काळात, भारताने आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले,आणि आज त्याचे परिणाम देशही बघतो आहे आणि जगही बघते आहे. भारताने ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यात एकजूट होऊन काम केले आहे, धोरणे आखली आहेत, निर्णय घेतले आहेत, परिस्थिती हाताळली आणि सांभाळी आहे, ते बघून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.

गेल्या सहा वर्षात जगाचा जो विश्वास भारताने संपादन केला होता, तो गेल्या काही महिन्यात अधिकच दृढ झाला आहे. थेट परदेशी गुंतवणूक असो किंवा मग परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात केलेली आणि करत असलेली विक्रमी गुंतवणूक असो, यातून हेच सिद्ध होते.

मित्रांनो,

आज देशातला प्रत्येक नागरिक, आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे, लोकलसाठी व्होकल होत स्थानिक उत्पादनांची खरेदी करत आहे. हे जिवंत उदाहरण आहे की देशाला आपल्या खाजगी क्षेत्रांवर किती विश्वास आहे. भारताचे खाजगी क्षेत्र आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण तर करु शकतेच पण जागतिक स्तरावरही आपला ठसा उमटवू शकते, आपली ओळख निर्माण करू शकते. 

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारत अभियान, भारतात उत्तम दर्जाची उत्पादने निर्माण करण्याचे आणि भारतीय उद्योगक्षेत्राला अधिकाधिक स्पर्धात्मक बनवण्याचे मध्यम आहे. 2014 साली जेव्हा लाल किल्ल्यावरून बोलण्याची मला पहिल्यांदा संधी मिळाली होती, तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती, की आपले उद्दिष्ट असले पाहिजे, 'झिरो डीफेक्‍ट, झिरो इफेक्ट' !

मित्रांनो,

अनुभव असे सांगतो की आधीच्या अनेक धोरणात, अनेक क्षेत्रातल्या अकार्यक्षमतेला संरक्षण दिले होते, नवे प्रयोग करण्यापासून वंचित ठेवले होते. मात्र आत्मनिर्भर भारत अभियान प्रत्येक क्षेत्रातल्या कार्यक्षमतेला चालना आणि प्रोत्साहन देणारे आहे. अशी अनेक क्षेत्रे, ज्यात भारताकडे दीर्घकालीन स्पर्धात्मक फायदे आहेत, अशा ठिकाणी, उदयोन्मुख कंपन्या आणि  तंत्रज्ञान आधारित उद्योगांना नवी उर्जा देण्यावर जोर दिला जात आहे. आमची अशी इच्छा आहे की आमचे हे शिशु उद्योग देखील भविष्यात अधिक मजबूत आणि स्वायत्त बनावेत. यासाठीच, आपण पाहिले  असेल की आम्ही आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. देशात उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजना सुरु केली गेली आहे. ही योजना अशा उद्योगांसाठी आहे ज्यांच्यात, भारताला जागतिक स्तरावर अजिंक्यस्थानी नेण्याची क्षमता आहे. जे उत्तम काम करतील, आपल्या क्षेत्राला आत्मनिर्भर बनवतील त्यांचा या प्रोत्साहन निधीवर हक्क राहील.

मित्रांनो, आयुष्य असो किंवा मग प्रशासन, आपण एक विरोधाभास नेहमी बघत असतो. ज्यांचा स्वतःवर, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो, तो इतरांना संधी देण्यास कचरत नाही. मात्र, जो कच्च्या मनाचा असतो, ज्याला असुरक्षित वाटत असते, तो आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही संधी देण्यास तयार नसतो.अनेकदा सरकारांच्या बाबतही असेच घडते. सर्वसामान्य जनतेच्या पूर्ण पाठींब्याने आणि विश्वासाच्या जोरावर सत्तेत असलेल्या सरकारला आत्मविश्वास असतो आणि त्यामुळे ते पूर्ण समर्पण भावनेने काम करतात. आणि म्हणून तर, “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” हा मंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी हे सरकार संपूर्ण जीव लावून परिश्रम करत असते. सरकार जितके निर्णयक्षम असेल, तेवढ्या इतरांच्या अडचणी कमी होऊ शकतात. एका निर्णायक सरकारचा नेहमी असा प्रयत्न असतो की त्यानी समाजासाठी, राष्ट्रासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे. एका  निर्णायक आणि आत्मविश्वास असलेल्या सरकारला असे कधीही वाटणार नाही, की सगळे नियंत्रण स्वतःकडे ठेवावे, इतरांना काहीही करूच देवू नये. आधीच्या काळातल्या सरकारांच्या या विचारसरणीचेही आपण साक्षीदार आहात आणि देशाला त्याचा त्रासही सहन करावा लागला आहे. काय विचारसरणी होती ही? सगळे काही सरकारच करेल. घड्याळ बनवायचे असेल- सरकार बनवत असे, स्कूटर बनवायची असेल तर सरकारच बनवत असे, टीव्ही बनवायचा असेल- तरी सरकारच बनवत असे. इतकेच नाही, तर ब्रेड आणि केक पण सरकारच बनवत असे या दृष्टीकोनाने देशाची काय दुर्दशा झाली आहे, हे आपण पहिले आहे. एक दूरदर्शी आणि निर्णायक सरकार प्रत्येक सबंधित घटकाला प्रोत्साहन देते की त्यांनी आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करावा.

मित्रांनो,

गेल्या सहा वर्षात भारतानेही असे सरकार पाहिले आहे, जे केवळ आणि केवळ 130 कोटी भारतीयांना समर्पित आहे. जे प्रत्येक पातळीवर देशवासियांना पुढे नेण्यासाठी काम करत आहे. भारतात आज प्रत्येक क्षेत्रात सर्व हितसंबंधी गटांची भागीदारी वाढवण्यासाठी काम केले जात आहे. याच विचाराने, उत्पादनापासून ते एमएसएमई पर्यंत, कृषी पासून पायाभूत सुविधांपर्यंत, तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रापासून ते कररचनेपर्यंत, बांधकाम उद्योगांपासून ते नियमनात शिथिलता आणण्यापर्यंत चहूबाजूंनी सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट कर जगात सर्वाधिक स्पर्धात्मक आहे. आज भारत जगातल्या अशा काही देशांमध्ये समाविष्ट होतो जिथे 'फेसलेस मुल्यांकन आणि फेसलेस अपिला'ची सुविधा आहे. ‘इन्स्पेक्टर राज’ आणि कर दहशतवादासारख्या युगाला मागे टाकत, आज भारत आपल्या उद्योजकांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करतो आहे.खाणकाम असो, संरक्षण असो , अवकाश असो, बहुतांश देशांना, गुंतवणुकीसाठी, भारतीय कौशल्यासाठी स्पर्धेच्या आजच्या युगात मोठी संधी यामुळे आपल्याला मिळाली आहे. देशात लॉजिस्टिक क्षेत्रात स्पर्धात्मकता आणण्यासाठी बहु-आयामी वाहतूक व्यवस्थेवर भर दिला  जात आहे

भारतासारख्या एका गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा एका क्षेत्राची प्रगती होते, तेव्हा त्याचा सरळ सरळ प्रभाव दुसऱ्या क्षेत्रांवरही होतो. मात्र आपण कल्पना करु शकता की जर एका उद्योगामुळे विनाकारण दुसऱ्या उद्योगक्षेत्राच्या कामात आडकाठी घातली गेली तर काय होऊ शकते. अशा वेळी कोणतेही उद्योगक्षेत्र, त्याच्यात  क्षमता असूनही, वेगाने पुढे जाऊ शकणार नाही. एखादे उद्योग क्षेत्र विकसित झाले तरी त्याचा प्रभाव दुसऱ्या क्षेत्रांवर पडत नाही. विविध क्षेत्रांमध्ये निर्माण झालेल्या या भिंतीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.त्याने  सर्वसामान्य माणसांचे नुकसान केले आहे. आता देशात ज्या आर्थिक सुधारणा होत आहेत, त्या अशा भिंती हटवण्याचे काम करत आहेत. आता अलीकडेच या कृषीविषयक सुधारणा झाल्या, त्याही अशाच मालिकेतल्या आहेत. कृषी क्षेत्र असो किंवा त्याच्या सबंधित इतर अन्न प्रकिया किवा साठवणूक उद्योग, शीतगृह साखळी असो, या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत अशाच भिंती उभ्या केलेल्या आपण अनुभवल्या आहेत.  आता या सगळया भिंती हटवल्या जात आहेत, नव्या अडचणी हटवल्या जात आहेत. या भिंती हटल्यावर, या सुधारणा झाल्यावर शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवे पर्याय उपलब्ध होतील. त्याना तंत्रज्ञानाचा अधिक लाभ मिळेल. देशातील शीतगृहांसारख्या  पायाभूत सुविधा आधुनिक होतील. यामुळे कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक होईल. या सगळ्याचा थेट लाभ जर कोणाला होणार असेल तर तो माझ्या देशातल्या अशा शेतकऱ्याला होणार आहे, जो जमिनीच्या लहान लहान तुकड्यांवर आयुष्ये संभाळत असतो. त्या शेतकऱ्याचे यामुळे कल्याण होणार आहे. आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये भिंती नकोत, तर असे अधिकाधिक पूल असावेत, ज्यांचा एकमेकांना आधार वाटेल.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षात या भिंती तोडण्यासाठी कशाप्रकारे एक सुनियोजित आणि एकात्मिक दृष्टीकोन घेऊन सुधारणा केल्या गेल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे- देशातल्या कोट्यवधी लोकांचे वित्तीय सामावेशन. आता आपण बँकिंग अपवर्जनातून सर्वसमावेशक देशांमध्ये समाविष्ट झालो आहोत. आपणही या गोष्टीचे साक्षीदार आहात की सर्व अडचणी दूर करुन  भारतात कशाप्रकारे ‘आधार’ ला कायदेशीर संरक्षण देण्यात आले. बँकिंग क्षेत्रांपासून वंचित असलेल्यांना आम्ही बँकांशी जोडले. स्वस्त मोबाईल डेटा, स्वस्त फोन उपलब्ध करत, गरीबातल्या गरिबाला त्याच्याशी जोडले. तेव्हा जनधन खाते, आधार आणि मोबाईल अशी JAM त्रिसूत्री भारताला मिळाली.

मित्रांनो,

आज आपल्या देशात जगातली सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना -DBT कार्यान्वित आहे. आता आपणही एका आंतरराष्ट्रीय मासिकातला अहवाल वाचला असेल, ज्यात भारताने निर्माण केलेल्या या व्यवस्थेची खूप तारीफ करण्यात आली आहे. कोरोना काळात जेव्हा अनेक देशांना आपल्या नागरिकांपर्यंत थेट पैसे पाठवण्यातही अडचण येत होती, त्यासाठी ते धनादेश किंवा टपाल विभागावर अवलंबून होते, त्यावेळी भारत असा एकमेव देश होता, जिथे एका क्लिकवर, एका क्षणात, हजारो रुपये कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोचवले जात होते. तेही  अशावेळी, जेव्हा बँका बंद होत्या, देशात टाळेबंदी होती. आंतरराष्ट्रीय विश्वातले मोठे तज्ञ आता असे म्हणत आहेत की भारताच्या या मॉडेलचे इतर देशांनीही अनुकरण करायला हवे. हे वाचून, ऐकून कोणाला अभिमान वाटणार नाही?

मित्रांनो,

एक काळ असा होता की, त्यावेळी लोक प्रश्न विचारत होते, अशिक्षितपणा आणि गरीबी असताना या वातावरणामध्ये भारत कशाप्रकारे तंत्रज्ञान आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवू शकेल? परंतु भारताने हे करून दाखवले आहे. इतकेच नाही तर हे काम अतिशय यशस्वीपणे करून दाखवले आणि यापुढेही दाखवत राहील. आज एकट्या यूपीआय प्लॅटफॉर्मवरच दर महिन्याला जवळ-जवळ चार लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. चार लाख कोटी रुपयांचे व्यवहार आणि दर महिन्याला व्यवहारांच्या वाढत्या आकडेवारीचा विक्रम बनत आहे. आज गावे, खेडी यांच्यामध्ये त्याचबरोबर लहान-लहान हातगाडीवाले, पथविक्रेते, ठेले व्यवसायिकांनासुद्धा डिजिटल पेमेंट करणे शक्य होत आहे. भारताच्या उद्योग जगताला देशाची ही ताकद जाणून घेऊन पुढे जायचे आहे.

मित्रांनो,

आपण गाव आणि लहान शहरांचे वातावरण टीव्ही किंवा चित्रपटांमध्ये पाहून लहानाचे मोठे झालो आहोत. त्यामुळे आपल्या मनात गावांविषयी एक वेगळीच धारणा, वेगळे मत तयार होणे स्वाभाविक आहे. शहर आणि गाव यांच्यामध्ये प्रत्यक्ष अंतर मात्र,  आपण समजतो तितके खूप जास्त आहे, असे अजिबात  नाही. काही लोकांच्यासाठी गावाचा अर्थ असे ठिकाण आहे की, तिथे जाणे-येणे अवघड असते, जिथे खूप कमी सुविधा असतात, खूप कमी विकास झालेला असतो, मागसलेपण असते. मात्र जर आज आपण ग्रामीण अथवा निम-ग्रामीण भागामध्ये गेलात तर तुम्हाला अगदीच वेगळे दृश्य पहायला मिळेल. एक नवीन आशा, नवा विश्वास आपल्याला दिसून येईल. आजचा ग्रामीण भारत खूप मोठ्या परिवर्तनाच्या कालखंडातून जात आहे. ग्रामीण भारतामध्ये ‘सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरांपेक्षाही जास्त झाली आहे, याची माहिती आपल्याला आहे? भारतातले अर्ध्‍याहून जास्त स्टार्ट-अप्स आमच्या दुस-या श्रेणीतल्या आणि तिस-या श्रेणीतल्या गावांमध्ये आहेत, हे तुम्हाला माहिती आहे? प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजनेतून देशातल्या जवळपास 98 टक्के वाड्या-वस्त्यांना मुख्य रस्त्यांपर्यंत जोडण्यात आले आहे. सांगण्याचा अर्थ, इतकाच आहे की, गावातले लोक आता बाजारपेठ, शाळा, रूग्णालये आणि इतर सुविधांबरोबर वेगाने जोडले जात आहेत. गावांमध्ये राहण्यास तयार असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना ‘सोशिओ-इकॉनॉमिक मोबिलिटी’ हवी आहे. सरकारच्या आपल्या पद्धतीने त्यांच्या या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी कार्यरत आहे.  अलिकडेच प्रारंभ करण्यात आलेल्या ‘पीएम-वाणी’ (पीएम-डब्ल्यूएएनआय) योजनेविषयी माहिती देतो. या ‘पीएम-वाणी’योजने अंतर्गत संपूर्ण देशभरामध्ये सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. यामुळे गावागावांमध्ये कनेक्टिव्हिटीचा व्यापक विस्तार होईल. माझा सर्व उद्योजकांना आग्रह आहे की, या संधीचा उपयोग करून घेऊन ग्रामीण आणि निम्न-ग्रामीण क्षेत्रांमध्ये कनेक्टिव्हिटीच्या प्रयत्नांचे भागीदार बनावे. एक मात्र निश्चित आहे की, 21 व्या शतकामध्ये भारताची वृद्धी गावे आणि लहान शहरांच्या विकासातही मदतगार ठरणार आहेत. म्हणूनच आपल्यासारख्या उद्योजकांनी गावे आणि लहान शहरांमध्ये गुंतवणुकीच्या आलेल्या संधी अजिबात गमावून चालणार नाही. आपल्याद्वारे करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे आपल्या गावांमध्ये राहणा-या बंधु-भगिनींना, आपल्या कृषी केंद्रांना नवनव्या संधींची दारे उघडतील.

मित्रांनो,

देशाच्या कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये खूप वेगाने काम करण्यात आले आहे. आज भारताचे कृषी क्षेत्र, पूर्वीपेक्षा अधिक चैतन्यमय, सळसळते झाले आहे. आज भारताच्या शेतकरी बांधवांकडे आपल्या शेतात आलेले पीक बाजारपेठेबरोबरच बाहेर कुठेही विकण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. आज भारतामध्ये कृषी बाजारपेठांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहेच, त्याचबरोबर शेतकरी बांधवांना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले पीक बाहेर कुठेही विकण्याचा आणि खरेदीचा पर्यायही दिला आहे. असे सर्व प्रयत्न करण्यामागे लक्ष्य आहे की, देशातल्या शेतक-यांचे उत्पन्न वाढावे, देशाचा बळीराजा समृद्ध व्हावा. ज्यावेळी देशाचा शेतकरी समृद्ध होईल, त्यावेळी देशही समृद्ध होईल. कृषी क्षेत्राचा कारभार आधी कसा चालत होता, याचे आपल्याला मी आणखी एक उदाहरण देतो

मित्रांनो,

आपल्या देशामध्ये आधी इथेनॉललाही प्राधान्य देऊन ते आयात केले जात होते. ज्यावेळी आपला ऊस विकला जात नाही म्हणून ऊस उत्पादक शेतकरी त्रासलेला होता, त्या ऊस उत्पादक शेतक-यांची हजारो कोटी रूपये थकबाकीही वेळेवर दिली जात नव्हती. आम्ही ही स्थिती संपूर्णपणे बदलली. आम्ही देशातच इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले. आधी साखर तयार होत होती, गुळ तयार होत होता. कधी साखरेचे भाव एकदम कमी होत होते. त्यामुळे शेतकरी बांधवांना पैसे मिळत नव्हते. तर कधी साखरेचे भाव एकदम वाढत होते त्यामुळे ग्राहकांना त्रास होत होता. याचा अर्थ कोणालाही त्रास होणार नाही, अशी व्यवस्थाच नव्हती. आणि दुसरीकडे आपण आपली कार-स्कूटर चालविण्यासाठी परदेशातून पेट्रोल आणत होतो. आता हेच काम इथेनॉलही करू शकत होते. आता देशामध्ये, पेट्रोलमध्ये 10 टक्क्यांपर्यंत इथेनॉल ब्लेडिंग करण्याचे काम सुरू केले आहे. विचार करा, यामुळे किती मोठे परिवर्तन घडून येणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन तर वाढेलच त्याचबरोबर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण  होतील.

मित्रांनो,

आज ज्यावेळी मी उद्योग जगतातल्या ज्येष्ठ लोकांमध्ये आहे, तर काही गोष्टी अगदी मोकळेपणाने बोलणार आहे. आापल्या देशामध्ये कृषी व्यवसायामध्ये खासगी क्षेत्रामधून जितकी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हायला पाहिजे होती, दुर्दैवाने तितकी झालेली नाही. या उद्योगाला खासगी क्षेत्राकडून तितके एक्सपोजरच मिळाले नाही. आपल्याकडे शीतगृहांची समस्या आहे. खासगी क्षेत्राच्या पाठिंब्याशिवाय पुरवठा साखळी अतिशय सीमित परिघामध्ये काम करीत आहे. कृषी खतांची टंचाई निर्माण होते, हे आपणही पाहिले आहे. यापैकी भारत किती आणि काय आयात करते, हेही तुम्ही सर्व जाणून आहात. कृषी क्षेत्रापुढे असलेल्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने कार्यरत आहे. परंतु यामध्ये आपला ‘इंटरेस्ट‘  आणि आपली ‘इन्व्हेस्टमेंट‘ दोन्हींची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रामधल्या कंपन्या चांगले काम करीत आहेत, हे मला माहिती आहे, परंतु तेवढेच काम पुरेसे नाही. पिक घेणा-या शेतकरी बांधवाला, फळफळावळ, भाजीपाला पिकवणा-या शेतक-याला जितका आधुनिक तंत्रज्ञानाचा, आधुनिक व्यापाराचा आणि उद्योगाचा पाठिंबा मिळेल, त्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन आपण जेवढी गुंतवणूक करू, तेवढेच आपल्या देशाच्या शेतकरी बांधवांचे, त्याच्या पिकांचे नुकसान कमी होईल. तितकेच त्यांचे उत्पन्नही वाढेल. आज ग्रामीण क्षेत्रामध्ये कृषीआधारित उद्योगासाठी खूप मोठी संधी आहे. आधीची धोरणे काहीही असोत, मात्र आजचे धोरण कृषीआधारित अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी खूप चांगली, अनुकूल आहे. ‘नीती’मुळे आणि ‘नियत’मुळे सरकार शेतकरी बांधवांच्या हितासाठी कटिबद्ध आहे.

मित्रांनो,

कृषीबरोबर सेवा क्षेत्र असो, उत्पादन क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, यामध्ये आम्ही एक दुस-याला पुरक कार्य कसे करू शकतो, यावर आपल्याला संपूर्ण ऊर्जा लावून, अगदी सर्व ताकदीनिशी कार्य करायचे आहे. ‘फिक्की’सारख्या संघटनांनी यामध्ये ‘सेतू’ बनावे आणि ‘प्रेरणास्थान’ ही बनावे. ‘एमएसएमई’ ला सरकारने ताकद दिली आहे. तुम्ही हीच ताकद अनेकपटींनी वाढविण्याचे काम करू शकता. स्थानिक मूल्य आणि पुरवठा साखळी कशा प्रकारे सशक्त करता येईल, जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताची भूमिका अधिक व्यापक व्हावी, असे स्पष्ट लक्ष्य निश्चित करून आपल्याला एकत्रित होऊन, सर्वांनी मिळून काम करायचे आहे. भारताकडे बाजारपेठ आहे, मनुष्यबळही आहे आणि मिशन मोडवर काम करण्याची क्षमताही आहे. कोविड-19 महामारीच्या या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिले आहे की, आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाणा-या भारताचे प्रत्येक पाऊल संपूर्ण दुनियेला लाभदायक ठरत आहे. आपल्या औषध निर्माण क्षेत्राने अतिशय अवघड काळामध्ये जागतिक पुरवठा साखळी खंडित होऊ दिली नाही. आता भारत कोरोनाविरोधी लस उत्पादनाच्या बाबतीत पुढे जात आहे, त्यामुळे भारतातल्या कोट्यवधींच्या जीवनाला तर सुरक्षा कवच मिळू शकणारच आहे. दुनियेतल्या इतर अनेक देशांमध्येही नवीन आशा निर्माण झाल्या आहेत.

मित्रांनो,

आपल्या सर्व लोकांना एक मंत्र चांगलाच परिचित आहे आणि तो मंत्र जीवनासाठी आवश्यकही आहे. आमच्याकडे असे म्हणतात की - ‘‘तन्मे मनः शिवसंकल्प मस्तु’’!! याचा अर्थ असा आहे की, माझ्या मनात उत्तम संकल्प असावेत, याच भावनेने आपल्या सर्वांना पुढे जायचे आहे. देशाचे लक्ष्य, देशाचा संकल्प, देशाची धोरणे अगदी स्पष्ट आहेत. पायाभूत सुविधांविषयी धोरण असो अथवा सुधारणांचा विषय असो, भारताचे इरादे पक्के आहेत. महामारीच्या रूपाने ज्याप्रकारे वेगावर नियंत्रण लागले होते, आता आम्ही त्या अडथळ्यातून बाहेर पडून पुढे येत आहोत. आता नवीन विश्वासाने आपल्या सर्वांना आधीपेक्षाही थोडे अधिक परिश्रम करायचे आहेत. विश्वास आणि आत्मविश्वास यांनी भारलेल्या या वातावरणाबरोबरच आपल्याला आता नवीन दशकामध्ये पुढे जायचे आहे. वर्ष 2022 मध्ये देश आपल्या स्वांतत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून ते आजपर्यंत फिक्कीनेही देशाच्या विकास यात्रेमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. फिक्कीचेही शताब्दी वर्ष काही फार दूर नाही. या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्याला राष्ट्र निर्माणासाठी आपल्या भूमिकेचा आणखी विस्तार करावा लागणार आहे आणि अधिक व्यापक बनावे लागणार आहे. आपले प्रयत्न, आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला आणखी वेग देतील. आपले प्रयत्न लोकलसाठी व्होकलाचा मंत्र संपूर्ण दुनियेपर्यंत पोहोचवतील. अखेरीस मी, डॉक्टर संगीता रेड्डी जी यांचे अध्यक्ष म्हणून एका उत्कष्ट कार्यकाळासाठी खूप-खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर, भाई उदय शंकर जी, यांना भविष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो. आज आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली, मी आपल्या सर्वांचे खूप-खूप आभार व्यवत करतो.

धन्यवाद !!

 

* * *

GC/SRT/RA/SB/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680252) Visitor Counter : 164