पंतप्रधान कार्यालय

आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 07 DEC 2020 6:28PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चौधरी उदयभान सिंह, डॉक्टर डीएस धर्मेश, संसदेतील माझे सहकारी प्रा. एसपी सिंह बघेलराजकुमार चाहरहरिद्वार दुबे, अऩ्य लोकप्रतिनिधिगण आणि आग्ऱ्याचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! मेट्रोचे काम सुरु झाल्याबद्दल  तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!! आग्र्याची खूप प्राचीन ओळख कायम आहे. आता यात आधुनिकतेचा नवा आयाम जोडला जात आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जपणारे हे शहर आता 21 व्या शतकाबरोबर पावले टाकायला तयार होत आहे.

 

बंधू आणि भगिंनीनो,

आग्र्यात  स्मार्ट सुविधा विकसित करण्यासाठी याआधीच अंदाजे  1 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरु आहे. गेल्या वर्षी ज्या कमांड आणि कंट्रोल केंद्राची पायाभरणी करण्याचे मला सौभाग्य लाभले होते, ते देखील बांधून पूर्ण झाले आहे. मला सांगण्यात आले आहे कि कोरोनाच्या काळात हे केंद्र खूप उपयोगी सिद्ध झाले आहे. आता  8 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा हा मेट्रो प्रकल्प आग्र्यात स्मार्ट सुविधांच्या उभारणीशी निगडित अभियानाला अधिक मजबूत करेल.

 

मित्रांनो,

मागील सहा वर्षात उत्तर प्रदेशाबरोबरच संपूर्ण देशभरात ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात  मेट्रो नेटवर्कचे काम झाले ते  सरकारची ओळख आणि वचनबद्धता दोन्ही दर्शवतात.  2014 पर्यंत देशात सुमारे  215 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यरत होता. वर्ष 2014 नंतरच्या  6 वर्षात देशात  450 किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो मार्ग  देशभरात कार्यरत आहे आणि सुमारे 1000 मेट्रो मार्गावर जलद गतीने  काम देखील सुरु आहे. आज देशातील 27 शहरांमध्ये  मेट्रोचे  काम पूर्ण झाले आहे किंवा ते विविध टप्प्यांमध्ये आहे. उत्तर प्रदेशाच्याच बाबतीत बोलायचे झाले तर आग्रा हे  मेट्रो सुविधेशी जोडले जाणारे उत्तर प्रदेशातील सातवे शहर आहे आणि त्यात आणखी एक खास गोष्ट आहे. देशात केवळ मेट्रो रेल्वे नेटवर्क तयार होत नाही तर आज मेट्रो कोच देखील मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच तयार  होत आहेत.  एवढेच नाही, जी सिग्नल यंत्रणा आहे त्याची देखील पूर्णपणे भारतातच निर्मिती व्हावी यावरही काम सुरु आहे. म्हणजे आता मेट्रो नेटवर्कच्या बाबतीतही भारत आत्मनिर्भर होत आहे.

 

बंधू आणि भगिंनींनो,

आजच्या नवीन भारताची स्वप्ने देखील तेवढीच मोठी आहेत, तेवढीच भव्य आहेत. मात्र केवळ स्वप्ने पाहून काम होत नाही, ही स्वप्ने साहसाच्या मदतीने पूर्ण देखील करावी लागतात. जेव्हा तुम्ही साहस, समर्पण भावनेने पुढे मार्गक्रमण करता तेव्हा कुठलाही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. भारताचा  सामान्य तरुण, भारताची छोटी शहरे  आज हेच  साहस दाखवत आहेत, हेच समर्पण दाखवत आहेत. 20 व्या शतकात जी भूमिका देशाच्या महानगरांनी पार पाडली त्याच भूमिकेला विस्तारण्याचे काम आता आपल्या आग्र्यासारखे छोटे शहर करत आहेत. छोट्या शहरांना आत्मनिर्भर भारताचे चालक बनवण्यासाठी  अनेक विकास कामांवर खूप जास्त भर दिला जात आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील या शहरांमध्ये तर ती प्रत्येक गोष्ट आहे जी आपल्याला  आत्मनिर्भरतेसाठी हवी आहे. इथली जमीन , इथले शेतकरी यांच्यात अमाप  सामर्थ्य आहे. पशुधनाच्या बाबतीतही हे क्षेत्र देशात अग्रेसर आहे. अशा स्थितीत इथे दुग्ध उत्पादन आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित उद्योगांसाठी अनेक संधी आहेत. याशिवाय हे क्षेत्र सेवा आणि निर्मिती क्षेत्रातही पुढे मार्गक्रमण करत आहे.

 

मित्रांनो,

आधुनिक सुविधा मिळाल्यामुळेआधुनिक संपर्क व्यवस्था मिळाल्यामुळे पश्चिमी उत्तर प्रदेशाचे हे सामर्थ्य आणखी वाढत आहे. देशातील पहिली जलद रेल्वे वाहतूक प्रणाली मेरठ ते  दिल्ली दरम्यान बनत आहे. दिल्ली-मेरठ दरम्यान  14 पदरी द्रुतगती मार्ग देखील लवकरच या भागातील लोकांना सेवा पुरवायला लागेल.  पश्चिमी उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या गंगा द्रुतगती मार्गाला देखील योगी सरकारने याआधीच मान्यता दिली आहे. एवढेच नाही, उत्तर प्रदेशात डझनभर विमानतळांना  प्रादेशिक संपर्क सुविधेसाठी तयार केले जात आहे. यापैकी बरेचसे पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत.

ग्रेटर नोएडाच्या ज़ेवर मधील आधुनिक, जागतिक दर्जाच्या  ग्रीनफील्ड एयरपोर्ट मुळे तर या संपूर्ण भागाची ओळख पूर्णपणे बदलणार आहे.

 

मित्रांनो,

देशातील पायाभूत क्षेत्राची नेहमीच ही एक अडचण राहिली आहे कि नवीन प्रकल्पांची घोषणा तर व्हायची मात्र यासाठी पैसा कुठून येणार, याकडे अधिक लक्ष दिले जात नव्हते. या कारणामुळे प्रकल्प अनेक वर्ष रखडलेले असायचे, त्यात कामाचा वेग अतिशय मंद होता.  नाममात्र काम व्हायचे. आमच्या सरकारने नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक निधीच्या व्यवस्थेकडे देखील तेवढेच लक्ष दिले आहे. संपर्क व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर आज देशात जितका खर्च केला जात आहे, तेवढा यापूर्वी कधीही करण्यात आला नव्हता. आता राष्ट्रीय पायाभूत  पाइपलाइन प्रकल्पांतर्गत  100 लाख कोटी रुपयांपेक्षा  अधिक  खर्च करण्याची देखील तयारी आहे. मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी पायाभूत बृहत आराखड्यावर देखील काम केले जात आहे. प्रयत्न हा आहे कि देशातील पायाभूत सुविधा उत्तम बनवण्यासाठी संपूर्ण जगभरातून गुंतवणूक आकर्षित केली जावी. पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्तेच्या प्रकल्पांमधील गुंतवणुकीत परकीय गुंतवणूक सुलभ बनवण्यासाठी देखील आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

 

मित्रांनो,

उत्तम पायाभूत सुविधा , उत्तम संपर्क व्यवस्थेचा सर्वात जास्त लाभ आपल्या पर्यटन क्षेत्राला होत आहे. माझे हे नेहमीच मत राहिले आहे कि पर्यटन हे असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येकासाठी कमवण्याची साधने आहेत. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पन्न पर्यटनाच्या माध्यमातून शक्य आहे. याच विचारासह स्थानिक पर्यटनासाठी व्होकल होण्यासाठी अनेक पातळ्यांवर काम सुरु आहे.

ताजमहालसारख्या वारशाच्या परिसरामध्ये आधुनिक सुविधा विकसित करण्याबरोबरच पर्यटकांना प्रवास अधिक सुलभ होऊ शकणार आहे. सरकारने फक्त ई व्हिसा योजनेमध्ये सहभागी देशांच्या संख्येमध्ये खूप वाढ केली आहे, असे नाही. तर त्याच्याच जोडीला हॉटेलांनाही खोलीभाडे बरेच कमी करणे शक्य व्हावे, अशा सुविधा दिल्या आहेत. स्वदेश दर्शनआणि प्रसाद’  यासारख्या योजनांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता भारत पर्यटन आणि पर्यटन व्यवसायाच्या स्पर्धेच्या निर्देशांकामध्ये 34 व्या स्थानावर आला आहे. 2013मध्ये भारत या निर्देशांकामध्ये 65 व्या स्थानावर येऊन थांबला होता. आज पाहिले तर तिथून इतकी चांगली प्रगती झाल्याचे लक्षात येते.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे, त्यामुळे आता लवकरच पर्यटन क्षेत्रामध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, असा मला विश्वास आहे.

 

मित्रांनो,

नवीन सुविधांसाठी, नवीन व्यवस्थांसाठी सुधारणा करणे अतिशय गरजेचे  असते. आपण गेल्या शतकातल्या कायद्याचा विचार करून पुढच्या शतकासाठी निर्माण कार्य करू शकत नाही. जो कायदा गेल्या शतकामध्ये अतिशय उपयोगी होता, तोच पुढच्या शतकामध्ये कार्यप्रणालीवर ओझे बनू शकतो; आणि म्हणूनच सुधारणेची प्रक्रिया निरंतर सुरू राहिली आहे. लोक नेहमीच विचार असतात की, आधीच्या तुलनेमध्ये आता होत असलेल्या सुधारणांमुळे अधिक चांगल्या पद्धतीने काम कसे काय केले जाते? आधीच्या तुलनेमध्ये आता वेगळे  आणि नेमके काय केले जात आहे? याचे कारण आणि उत्तर खूपच सरळ आहे. आधी सुधारणा तुकड्यांमध्ये होत होत्या. काही क्षेत्रामध्ये, काही विभाग लक्षात घेऊन सुधारणा होत होत्या. आता एकत्रित आणि  संपूर्णतेचा विचार करून सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. आता आपण शहरांच्या विकासांचाच विचार करूया. शहरांच्या विकासासाठी आम्ही चार स्तरांवर काम केले आहे. मागील काळापासून ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यांच्यावर उपाय योजना करण्यात यावी, जीवन जास्तीत जास्त सुगम व्हावे, जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी आणि शहरांच्या व्यवस्था कार्यप्रणालीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जास्त व्हावा.

 

बंधू आणि भगिनींनो,

रियल इस्टेट म्हणजेच स्थावर मालमत्ता क्षेत्राची नेमकी काय स्थिती आहे, याविषयी आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

घर बनविणारे म्हणजे विक्रेते आणि घराची खरेदी करणारे यांच्यातील विश्वासामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली होती.

काही चुकीचा, अयोग्य विचार करणा-या लोकांनी संपूर्ण स्थावर मालमत्ता व्यवसायाला बदनाम करून टाकले होते. आपल्या मध्यम वर्गातल्या समाजाला अगदी त्रस्त करून टाकले होते. हा त्रास दूर करण्यासाठी रेराचा कायदा आणण्यात आला. अलिकडेच काही अहवाल आले आहेत, त्यामध्ये म्हटले आहे की, हा कायदा आल्यानंतर मध्यम वर्गासाठी घरकुले बनविण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. अशा पद्धतीने आपल्या शहरामध्ये आणखी एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे बंद असलेली रिकामी घरे. अशा घरांची संख्या खूप मोठी आहे. बंद घरांमुळे खूप मोठ्या लोकसंख्येला घरे भाड्याने मिळण्यातही अडचणी येतात. ही समस्या दूर करण्यासाठी एक आदर्श कायदा बनवून राज्यांना देण्यात आला आहे.

 

मित्रांनो,

शहरातले जीवन अधिक सुखकर, सुकर बनविण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधांपासून ते घरकुल प्रकल्पापर्यंत चारही दिशांनी काम सुरू आहे. इथे आग्र्यामध्येच प्रधानमंत्री आवास योजनेला प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत शहरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक कोटींपेक्षा जास्त घरकूले बनविण्यास स्वीकृती देण्यात आली आहे. शहरातल्या मध्यम वर्गासाठीही पहिल्यांदाच घरकुल  खरेदीसाठी मदत केली जात आहे. आतापर्यंत साडे 12 लाखांपेक्षा जास्त शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांना घरकुल खरेदीसाठी जवळपास 28 हजार कोटींची मदत दिली आहे. अमृत मोहिमेअंतर्गत देशातल्या शेकडो शहरांमध्ये पेयजल, सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधा अद्यतन करण्यात येत आहेत. शहरांमध्ये सार्वजनिक शौचालयांची चांगली सुविधा तयार करणे असो, कचरा व्यवस्थापनाची आधुनिक व्यवस्था असो, कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची पद्धत असो, या सगळ्या गोष्टींसाठी स्थानिक प्रशासनाला मदत केली जात आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज शहरी गरीबाला मोफत औषधोपचार मिळत आहेत आणि मध्यम वर्गाला स्वस्त औषधे मिळत आहेत. स्वस्त दरामध्ये, कमी खर्चामध्‍ये शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. सरकारच्या प्रयत्नातून वीज पुरवठ्यापासून ते मोबाइल फोनपर्यंत जनतेचा खर्च खूपच कमी झाला आहे. शिक्षण कर्जापासून ते गृहकर्जापर्यंत व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आहे. रस्त्यावरचे विक्रेते, हातगाडी चालक, फेरीवाले, पथविक्रेते यांच्यासारख्या लहान -लहान उद्योग, वस्तूंच्या विक्रेत्यांना बँकांकडून स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. याआधी पथविक्रेत्यांना कधीच बँकामार्फत कर्ज दिले गेले नव्हते. हेच तर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासआहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या काही काळापासून अशा पद्धतीने सुधारणा करण्यात येत आहे, त्यामुळे देशामध्ये नव्याने आत्मविश्वास जागृत झाला आहे. विशेषतः देशातल्या भगिनी, कन्या यांच्यापर्यंत, ज्याप्रकारे सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे, त्याची अगदी बारकाईने, तपशीलवार माहिती तुम्ही जाणून घेतली, तर तुम्हाला खूप आनंद मिळेल. आधीच्या तुलनेमध्ये तुमच्या मनामध्येही एक नवीन विश्वास निर्माण होईल. दररोज दुर्गम- अतिदुर्गम भागातून मला अनेक पत्रे येत आहेत. प्रसार माध्यमांव्दारे अनेक भगिनी- कन्या आपल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. माता- भगिनींचे अशा प्रकारे आशीर्वाद मिळतात, हे पाहून मी खरोखरीच भावविभोर होतो. देशाच्या भगिनी- कन्या, देशाचा युवक, देशाचा शेतकरी बंधू, देशाचे श्रमिक, कर्मचारी, व्यापारी अशा सर्वांचा विश्वास प्रत्येक निवडणुकीच्यावेळी दिसून येतो आहे. उत्तर प्रदेशासहित देशाच्या कानाकोप-यात होत असलेल्या निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर सरकारवर असलेल्या विश्वासाची झलक दिसून येते. 2-3 दिवस आधी तेलंगणा आणि हैद्राबादमध्ये गरीब आणि मध्यमवर्गाने सरकारच्या या प्रयत्नांना अभूतपूर्व आशीर्वाद दिला आहे. आपण देत असलेला पाठिंबा, मिळणारे समर्थनकरीत असलेले सहकार्य हीच माझी प्रेरणाशक्ती आहे. देशवासियांच्या लहानात लहान आनंदामुळे मला नवनवीन कामे करण्यासाठी आणखी धैर्य मिळते. नव्या संकल्पना साकार करण्यासाठी शक्ती मिळते. आपल्याला सुखावह ठरेल असे आणखी जास्त काम,   मी यामुळेच करू शकतो. आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास असाच निरंतर मजबूत होत रहावा. विकासाची कामे अशाच प्रकारे वाढत जावीत, अशी भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मेट्रो प्रकल्पाबद्दल अभिनंदन करतो.

परंतु एका गोष्टीचे स्मरण मी जरूर करून देणार आहे. कोरोना लस येण्याची आपण सर्वजण वाट पाहतोय; आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच मी लस निर्मिती प्रक्रियेतल्या संशोधकांची भेट घेतली, त्यावरून आता लस येण्यासाठी अवधी लागेल, असे वाटत नाही. लवकरच येईलही, मात्र कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी सावधगिरी बाळगण्यात कोणतीही कमतरता ठेवू नये. मास्क आणि दोन गज म्हणजेच सहा फूट शारीरिक अंतर राखणे अतिशय गरजेचे आहे. आपण सर्वजण या नियमांचे काळजीपूर्वक पालन कराल, असा विश्वास बाळगून आपल्या सर्वांचे खूप-खूप आभार.

धन्यवाद !!

----

M.Chopade/S.Kane/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1678866) Visitor Counter : 275