पंतप्रधान कार्यालय
सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण
Posted On:
04 DEC 2020 7:05PM by PIB Mumbai
आपणा सर्व जेष्ठ साथीदारांचे खूप खूप आभार.
या चर्चेत आपण जे विचार मांडले, ज्या सूचना केल्या आहेत, मला वाटते, त्या खूप महत्वाच्या आहेत. व्हॅक्सिन संबंधी जो विश्वास या चर्चेत दिसून आला, तो कोरोनाविरुद्ध देशाच्या लढाईला जास्त बळकट करेल, इथे जे प्रेझेंटेशन झाले त्यातही सविस्तर हे सांगितले गेले की किती दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत, काय काय सुरू आहे, आता ते कुठपर्यंत पोहोचले आहेत आणि किती ठामपणे आपण पुढे जात आहोत.
मित्रहो,
या बाबत गेल्या काही दिवसात माझी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही भरपूर चर्चा झाली होती. लसीकरणाबाबत राज्यसरकारांकडून अनेक सूचना मिळाल्या होत्या. काही काळापूर्वी Made In India वॅक्सिन तयार करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्या शास्त्रज्ञांच्या ज्या अनेक टीम आहेत त्यांच्याशी बराच काळ व्यवस्थित चर्चा झाली. शास्त्रज्ञांना भेटण्याचा योग आला. आणि भारताचे शास्त्रज्ञ आपल्या यशाबद्दल खूपच समाधानी आहेत. त्यांची कॉन्फिडन्स लेव्हलही खूप मजबूत आहे. आता इतर देशांच्या कितीतरी व्हॅक्सिन्सची नावे आपण बाजारात ऐकत आहोत. पण जगाचे लक्ष किफायतशीर, सर्वात सुरक्षित व्हॅक्सिन वर आहे आणि यामुळेच साहजिकच संपूर्ण जगाचे लक्ष भारतावरही केंद्रीत आहे. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद इथे जाऊन मी हेसुद्धा बघितले की व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबत, देशाची तयारी किती आहे.
आपले भारतीय मॅन्युफॅक्चरर्स ICMR, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि ग्लोबल इंडस्ट्रीच्या अन्य दिग्गजांशी खूप संपर्कात राहून, एकत्रितपणे काम करत आहेत. असे मानून चाला की सर्वजण कंबर कसून तयार आहेत. जवळ जवळ 8 अशी संभाव्य वॅक्सिन्स आहेत जी ट्रायलच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत आणि ज्यांचे मॅन्युफॅक्चरिंग भारतातच होणार आहे. इथल्या चर्चेतही जो मुद्दा आला होता त्यानुसार भारताच्या स्वतःच्या 3 वेगवेगळ्या व्हॅक्सिन्सच्या ट्रायल वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. तज्ञ हे धरून चालले आहेत की आता कोरोनाच्या व्हॅक्सिनसाठी जास्त वाट बघावी लागणार नाही. येत्या काही आठवड्यातच कोरोनाची व्हॅक्सिन तयार होईल. शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदील दाखवला गेला की भारतात लसीकरण मोहिम सुरू केली जाईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किती व्हॅक्सिन लागेल त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे काम करत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत असलेले हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि आधीपासून गंभीर आजांरांशी झुंजत असलेल्या वयोवृद्ध यांना प्राथमिकता दिली जाईल.
मित्रहो,
वॅक्सिन डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीतही केंद्र आणि राज्य सरकारांच्या टीम्स मिळून काम करत आहेत. भारताजवळ व्हॅक्सिन डिस्ट्रीब्युशन Expertise आणि Capacity सुद्धा आहे. जगातील इतर देशांशी तुलना करता या क्षेत्रात आपण उत्तम तयारीचे आहोत. आपल्याकडे लसीकरणासाठी जगातील खूप विस्तारीत आणि अनुभवी नेटवर्क उपलब्ध आहे. याचा पूर्ण उपयोग करून घेतला जाईल.
ज्या कोणत्या अतिरिक्त कोल्ड चेन इक्विपमेंट्स, अन्य वाहतुकीची आवश्यकता भासेल ते राज्य सरकारांच्या मदतीने समजून घेतले जात आहे. कोल्ड चेन मजबूत करण्यासाठी बरोबरीने अनेक प्रकल्प सुरू आहेत. कितीतरी नवे प्रयत्न केले जात आहेत. भारताने एक खास सॉफ्टवेअरसुद्धा तयार केले आहे, Co-WiN ज्यात कोरोना वॅक्सिनचे लाभार्थी, उपलब्ध स्टॉक आणि स्टोरेज यासंबंधी रिअल टाईम इन्फॉर्मेशन असेल. भारतात कोरोना व्हॅक्सिनच्या रिसर्चशी संबधित अभियानाची जबाबदारी सोपवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती केली होती. आणि वॅक्सिनशी संबधित मोहिमेची जबाबदारी National Expert Group ला दिली गेली आहे. यामध्ये टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत, केंद्र सरकारच्या संबधित मंत्रालयांचे आणि विभागांचे अधिकारी आहेत, प्रत्येक झोनच्या हिशेबाने राज्यसरकारांचेही प्रतिनिधी आहेत. हा National Expert Group राज्य सरकारांच्या सहकार्यांने काम करत आहे. राष्ट्रीय, स्थानिक प्रत्येक आवश्यकतेनुसारचा निर्णय हे, या National Expert Group कडून घेतले जातील.
मित्रहो,
वॅक्सिनची किंमत किती असेल त्याविषयीही प्रश्न येणे साहजिक आहे. केंद्र सरकार या बाबतीत राज्यसरकारांशी संवाद साधत आहे. व्हॅक्सिनच्या किंमतीबाबतचा निर्णय हा जनस्वास्थ्याला सर्वोच्च प्राथमिकता देऊनच घेतला जाईल, आणि राज्य सरकारांच्या सहभागानेच घेतला जाईल.
मित्रहो,
एक राष्ट्र म्हणून भारताने जे निर्णय घेतले, ज्याप्रकारे भारताने वैज्ञानिक पद्धती आपल्याश्या केल्या, त्याचे परिणाम आज दिसत आहेत. भारत आज अशा देशांपैकी एक आहे ज्या देशांमध्ये प्रतिदिन टेस्टिंग खूप जास्त होत आहे. भारत आज अशा देशांपैकी एक आहे जिथे रिकवरी रेटही खूप जास्त आहे. भारत आज अशा अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी आहे. भारताने ज्याप्रकारे कोरोनाविरूद्ध झुंज दिली आहे, ते प्रत्येक देशवासीची अदम्य इच्छाशक्ती दाखवून देते. विकसित देश, उत्तम मेडिकल इंन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या देशांच्या तुलनेत भारतानेही ही झुंज कितीतरी उत्तम पद्धतीने दिली आहे, आणि आपल्या जास्तीत जास्त नागरिकांचे जीव वाचवले आहेत. आपणा भारतीयांचा संयम, आपणा भारतीयांचे साहस, आपणा भारतीयांचे सामर्थ्य, या संपूर्ण लढाईत अजोड, अभूतपूर्व म्हणावे असेच होते. आपण केवळ आपल्याच नागरिकांची चिंता वाहिली नाही तर इतर देशांच्या नागरिकांना वाचवण्याचेही शक्य तेवढे प्रयत्न केले.
मित्रहो,
फेब्रुवारी-मार्चच्या शंकाकुशंका, भिती यांनी व्यापलेल्या वातावरणातून या डिसेंबरच्या विश्वास आणि उमेदीच्या वातावरणापर्यंत भारताने खूप मोठी मजल मारली आहे. आता आपण व्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्यात उभे असताना तोच जनसहभाग, तोच सायंटिफिक अप्रोच, तीच साथ पुढेही आवश्यक आहे. आपणा सर्व अनुभवी साथीदारांच्या सुचनाही यामध्ये वेळोवेळी मुख्य भूमिका बजावतील. आपण सर्व जाणताच की जेव्हा जेव्हा एवढे व्यापक लसीकरण मोहिम चालवली जाते तेव्हा अनेक प्रकारच्या अफवा समाजात पसरवल्या जातात. या अफवा लोकहित आणि देशहित दोन्हींच्या विरुद्ध असतात. म्हणूनच आपल्या सर्व राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की देशातील नागरिकांना जास्तीत जास्त जागृत करा, त्यांचे कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून रक्षण करा. या बरोबरच आपल्याला माहित आहेच की जगात ज्या प्रकारे आलेख बदलत आहे आणि चित्र कुठून कुठे जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि अशा परिस्थितीत आपले जे proven मार्ग आहेत, proven शस्त्र आहेत त्यांचा आपण कधीही त्याग करता कामा नये, आणि यासाठीच दो गज की दूरी आणि मास्क या बाबतीत आपल्याला सतत लोकांना सतर्क करत रहावे लागेलच. देशाने आतापर्यंत जे कमावलं आहे त्याचे कोणत्याही प्रकारच्या बेजबाबदारीने नुकसान होऊ शकते. मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की प्रत्येकाला आज बोलण्याची संधी काही मिळालेली नाही पण माझी विनंती आहे की आपण लेखी पाठवा, आपल्या सूचना कामाला येतील. आपल्या सूचनांवर गंभीरतेने विचार केला जाईल आणि योजना आखतानाही त्यांचा उपयोग होईल.
या आग्रही विनंतीसोबतच मी आज आपले खूप खूप आभार मानतो. आपण वेळ काढलात, खूप खूप धन्यवाद!
M.Chopade/V.Sahajrao /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678385)
Visitor Counter : 286
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam