पंतप्रधान कार्यालय

वाराणसीमध्ये देव दीपावली महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग


माता अन्नपूर्णेची चोरीला गेलेली मूर्ती परत मिळाल्याबद्दल काशीचे अभिनंदन

गुरु नानक देव जी हे सुधारणांचे महत्तम प्रतीक- पंतप्रधान

Posted On: 30 NOV 2020 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 नोव्‍हेंबर 2020

 

वाराणसीमध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज देवदीपावली महोत्सवात भाग घेतला.

"हा काशीसाठी आणखी एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण शंभराहून अधिक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती आता आपल्याकडे परत येत आहे. ही काशीसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे." असे या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. "आपल्या देव-देवी-देवतांच्या या प्राचीन मूर्ती म्हणजे आपल्या श्रद्धेचे प्रतीक तर आहेतच शिवाय तो आपला एक अमूल्य असा ठेवाही आहे" अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

"असे प्रयत्न याआधी केले गेले असते, तर देशाला अशी अनेक शिल्पे परत मिळाली असती" असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. "आपल्यासाठी वारसा म्हणजे देशाचा अनमोल ठेवा आहे. काही जणांना मात्र त्यांचा परिवार आणि परिवाराचे नाव हाच वारसा वाटतो. आपली संस्कृती, आपल्या श्रद्धा आणि विश्वास, आपली मूल्ये हाच आपला ठेवा होय ! इतरांना कदाचित त्यांच्या मूर्ती आणि कुटुंबीयांची छायाचित्रे हाच ठेवा वाटत असावा." असेही ते म्हणाले.

"समाजातील आणि व्यवस्थेतील सुधारणांचे महत्तम प्रतीक म्हणजे आदरणीय गुरु नानक देव!" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "जेव्हा जेव्हा राष्ट्रहितासाठी समाजात परिवर्तन घडत असते, कसे कोण जाणे परंतु बरोबर तेव्हाच कोणीही न बोलावताच विरोध करणारे आवाज उठतात. मात्र, जेव्हा त्या सुधारणांचे औचित्य आणि महत्त्व स्पष्ट होते, तेव्हा सारे काही सुरळीत आणि ठीकठाक होते. आदरणीय गुरु नानक देव यांच्या चरित्रातून आपल्याला हाच संदेश शिकावयास मिळतो." असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

"जेव्हा काशीसाठी विकासकामे सुरु झाली, तेव्हा आंदोलकांनी केवळ करायचा म्हणून निषेध केला. 'बाबा दरबार'पर्यंत विश्वनाथ मार्गिका बांधून झाली पाहिजे, असे जेव्हा काशीने ठरविले तेव्हाही विरोधकांनी त्यावरही टीका केलीच. परंतु आज मात्र, बाबांच्या कृपेने काशीला गतवैभव पुन्हा प्राप्त होत आहे" असेही पंतप्रधान म्हणाले. "बाबांचा दरबार आणि गंगामातेचे शेकडो वर्षांपूर्वीपासूनचे जिव्हाळ्याचे नाते आज पुन्हा जोडले जात आहे", अशा शब्दात पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

भगवान काशी विश्वनाथाच्या कृपाशीर्वादाने काशीमधील दीपोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या प्राचीन नगरीच्या वैभवसंपन्नतेला उजाळा देत, काशीने दीर्घकाळ जगाला मार्गदर्शन केले आहे असेही त्यांनी सांगितले. "काशी हा आपला मतदारसंघ असूनही कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे तेथे नित्यनेमाने येता येत नाही" असे सांगून, 'यामुळे आलेली पोकळी निश्चितपणे जाणवत राहते' असेही त्यांनी नमूद केले. साथरोगाच्या या काळात आपल्या माणसांपासून कदापि न दुरावता त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व व्यवस्थांवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचेही पंतप्रधान आपुलकीने म्हणाले. या काळात काशीवासियांनी जनसेवेप्रती दाखवलेल्या वचनबद्धतेचं आणि उत्साहाचं त्यांनी कौतुक केलं.

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677260) Visitor Counter : 242