पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्‌घाटन


17 व्या लोकसभेने याआधीही अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत

Posted On: 23 NOV 2020 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्‌घाटन केले. या सदनिका  दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत. 76 सदनिका बांधण्यासाठी 80 वर्षाहून अधिक जुन्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, खासदारांसाठीच्या या बहुमजली सदनिकांमध्ये हरित इमारतीच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे.  या नवीन सदनिकांमुळे सर्व रहिवासी व खासदार सुरक्षित राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  त्यांनी सांगितले, खासदारांचे निवास स्थान हा दीर्घकालीन प्रश्न होता परंतु आता त्याचे निराकरण झाले आहे. ते म्हणाले की दशकांपासून प्रलंबित असलेल्या  जुन्या अडचणींना टाळून त्या सुटत नाहीत तर त्यांचे निराकरण शोधावे लागते. दिल्लीतील अशा  अनेक प्रकल्पांची त्यांनी यादी वाचली जे बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण होते ज्यांना या सरकारने हाती घेतले आणि नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण केले. ते म्हणाले, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची चर्चा सुरू झाली होती, 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या सरकारने हे स्मारक उभारले आहे. ते म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली केंद्रीय माहिती आयोगाची नवीन इमारत, इंडिया गेटजवळील युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारक या सरकारने उभारले आहे.

सर्व खासदारांनी संसदेच्या उत्पादन आणि प्रक्रिया या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे आणि या दिशेने एक नवीन उंची गाठली पाहिजे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांचे त्यांच्या कार्यक्षम कार्यपद्धतीसाठी कौतुक केले. नवीन नियम आणि अनेक सावधगिरीच्या उपायांसह, साथीच्या रोगाच्या काळातही संसदेचे कामकाज  सुरू राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहांनी संपूर्ण आठवडा काम केले.

ते म्हणाले की, युवकांसाठी 16-18 वर्ष हे वय  अत्यंत महत्वाचे आहे, आम्ही 2019 च्या निवडणुकीबरोबरच 16 व्या लोकसभेची मुदत पूर्ण केली आहे आणि देशाच्या प्रगती व विकासासाठी हा काळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्येच 17 व्या  लोकसभेचा कार्यकाळ सुरु झाला आहे  आणि या काळात या लोकसभेने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.  पुढची (18वी) लोकसभा देखील देशाला नव्या दशकात पुढे घेऊन जाण्यासाठी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675078) Visitor Counter : 192