पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून जामनगर आणि जयपूर येथील दोन आयुर्वेद संस्था राष्ट्राला अर्पण केल्या. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून जामनगर आणि जयपूर येथील दोन आयुर्वेद संस्था राष्ट्राला अर्पण केल्या. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 NOV 2020 6:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2020

नमस्कार !

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीपाद नाईक जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, राजस्थानचे राज्यपाल कलराज जी, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी आणि इतर सर्व मंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, आयुर्वेदाशी संबंधित असलेले सर्व विव्दान, भगिनी आणि सज्जन!!

आपणा सर्वांना धनत्रयोदशी, भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा! धन्वंतरी आरोग्याची देवता मानली जाते आणि आयुर्वेदाची रचनाही त्यांच्या आशीर्वादाने झाली आहे. आजच्या या पवित्र दिनी, आयुर्वेद दिवसानिमित्त, भगवान धन्वंतरीकडे संपूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना आहे की, या देवतेने भारतासह संपूर्ण दुनियेला उत्तम आरोग्याचे आशीष द्यावेत.

मित्रांनो,

यंदाचा आयुर्वेद दिवस गुजरात आणि राजस्थान यांच्यासाठी खास आहे. आमच्या युवा सहकारी मंडळींसाठीही विशेष आहे. आज गुजरातमधल्या जामनगर इथल्या आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थेला राष्ट्रीय महत्वपूर्ण संस्था’  म्हणून मान्यता मिळाली आहे. याचप्रमाणे जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळत असून आज ही संस्था लोकार्पण करण्यात आली आहे. आयुर्वेदामध्ये उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास यांच्याशी संबंधित असलेल्या या उत्कृष्ट संस्थांसाठी राजस्थान आणि गुजरात यांच्यासह संपूर्ण देशाचे खूप-खूप अभिनंदन !!

मित्रांनो,

आयुर्वेद, भारताचा एक वारसा आहे. या वारशाचा विस्तार पाहिला तर, त्यामध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे. हे पाहून कोणा भारतीयाला आनंद होणार नाही? आपले पारंपरिक ज्ञान आता अन्य देशांनाही समृद्ध करीत आहे. आज ब्राझीलच्या राष्ट्रीय धोरणामध्ये आयुर्वेदाचा समावेश करण्यात आला आहे. भारत-अमेरिका संबंध असो, भारत-जर्मनी यांच्यातील नाते असो, आयुष आणि भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धतीशी संबंधित सहकार्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.  प्रत्येक भारतीयासाठी आणखी एक अतिशय गर्वाची- अभिमानाची गोष्ट अशी आहे की, डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने, डब्ल्यूएचओचे प्रमुख आणि माझे स्नेही यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओने ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनम्हणजेच पारंपरिक वैद्यकशास्त्र जागतिक  केंद्रासाठी संपूर्ण दुनियेतून भारताची निवड केली आहे ; आणि आता भारतामधून संपूर्ण जगासाठी या दिशेने काम करण्यात येईल. भारतावर ही मोठी जबाबदारी सोपविल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे, विशेषतः डब्ल्यूएचओचे  महा संचालक असलेले माझे स्नेही डॉक्टर टॅड्रोस यांचेही मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. मला विश्वास आहे की, ज्या प्रकारे भारत औषध निर्माणाच्या जगतामध्ये उदयास आला आहे, त्याच प्रकारे पारंपरिक चिकित्सेचे हे केंद्रही जागतिक स्तरावरील कल्याणाचे केंद्र बनेल. हे केंद्र संपूर्ण दुनियेतल्या पारंपरिक वैद्यकशास्त्राचा विकास आणि त्यासंबंधित संशोधनाला नवीन उंची प्राप्त करून देणारे सिद्ध होईल.

मित्रांनो,

बदलत्या काळाबरोबर आज प्रत्येक गोष्ट एकात्मिक होत आहे. आरोग्य क्षेत्रही यापेक्षा वेगळे नाही. या विचाराबरोबरच देश आज औषधोपचारासाठी वेगवेगळ्या पद्धतींचे एकत्रीकरण करीत आहे, सर्वांना महत्व देण्यासाठी एका पाठोपाठ एक पावले उचलण्यात येत आहेत. या विचाराने आयुषला, आयुर्वेदाला देशाच्या आरोग्य धोरणाचा प्रमुख भाग बनविण्यात आला आहे. आज आपण चांगल्या आरोग्यासाठी आपल्याकडील पारंपरिक खजिन्याला फक्त एक पर्याय म्हणून नाही तर देशाच्या आरोग्याचा एक मोठा आधार बनवत आहोत.

मित्रांनो,

भारताकडे आरोग्याशी संबंधित खूप मोठा वारसा आहे, ही गोष्ट म्हणजे एक स्थापित सत्य आहे, असे नेहमीच मानले गेले आहे. परंतु आपल्याकडे असलेले बहुतांश ज्ञान हे पुस्तकांमध्ये आहे, शास्त्रांमध्ये आहे; हेही तितकेच सत्य आहे. त्याचबरोबर आपल्या आजीमंडळींनी सांगितलेले घरगुती उपाय म्हणजे हे ज्ञान आहे. या ज्ञानाला आधुनिक काळाच्या गरजेनुसार विकसित करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच, देशामध्ये आत पहिल्यांदाच आमच्या पुरातन वैद्यकशास्त्राचे ज्ञान आहे, त्या ज्ञान-विज्ञानाला 21 व्या शतकामध्ये आधुनिक विज्ञानातून मिळणा-या माहितीबरोबर जोडले जात आहे. त्यांचे एकत्रिकरण केले जात आहे. नवीन संशोधन करण्यात येत आहे. तीनच वर्षांपूर्वी आपल्याकडे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेची स्थापना करण्यात आली होती. लेहमध्ये सोवा-रिग्पा यांच्यासंबंधित संशोधन आणि इतर अध्ययनासाठी राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था विकसित करण्याचे काम सुरू आहे. आज गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधल्या ज्या दोन संस्थांच्या श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे काम  केले आहे, ते सुद्धा या कार्याचा विस्तार आहे.

बंधु आणि भगिनींनो,

असे म्हणतात की, ज्यावेळी विस्तार होतोआपण मोठे होतोत्यावेळी जबाबदारीही वाढत असते. आज ज्यावेळी या दोन महत्वपूर्ण संस्थांचा विस्तार झाला आहे, तर माझा एक आग्रहही आहे. देशातल्या या दोही उत्तम आयुर्वेदिक संस्था असल्या कारणाने आता आपणा सर्वांवर असा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी आली आहे, की तो अभ्यासक्रम  इंटरनॅशनल प्रॅक्टिससाठी अनुकूल आणि वैज्ञानिक मानकांच्या दृष्टीने अनुरूप असेल. शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला माझा असा आग्रह आहे की, आयुर्भौतिकी आणि आयुर्रसायन शास्त्र यासारख्या विषयांच्या अभ्यासासाठी नवीन शक्यतांचा विचार करून त्यावर काम करण्यात यावे. यामध्ये संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी इंटिग्रेटेड डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यासक्रम बनविण्यासाठी काम करणे शक्य आहे. आज देशातल्या खाजगी क्षेत्राला, आमच्या स्टार्ट अप्सनांही मी एक विशेष आग्रह करणार आहे. देशातल्या खाजगी क्षेत्राने , नवीन स्टार्ट अप्सनी आयुर्वेदाला असलेल्या जागतिक  मागणीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि या क्षेत्रामध्ये होत असलेल्या वृद्धीमध्ये आपली भागीदारी सुनिश्चित केली पाहिजे. आयुर्वेदाच्या लोकलशक्तीसाठी आपल्याला जगभरामध्ये व्होकलझाले पाहिजे. मला विश्वास आहे की, आपल्या अशा संयुक्त प्रयत्नांमुळे आयुषच नाही तर संपूर्ण आरोग्याविषयक कार्यप्रणालीच एका मोठ्या परिवर्तनाची साक्षीदार बनेल.

मित्रांनो,

आपण सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने जाणता की, यावर्षी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन ऐतिहासिक आयोगांची निर्मिती करण्यात आली. यापैकी एक आयोग आहे- नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन आणि दुसरा आहे - नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी. इतकेच नाही तर, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाविषयी एकात्मिक दृष्टीकोन  स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. असे सर्वंकष धोरण निश्चित करताना अशी भावना आहे की, अलोपॅथी शिक्षणामध्ये आयुर्वेदाविषयीची प्राथमिक, मूलभूत माहिती देणेही जरूरी आहे आणि आयुर्वेदाच्या शिक्षणामध्ये अलोपॅथीच्या प्रॅक्टिसविषयी मूळ माहिती असणे गरजेचे आहे. हे पाऊल आयुष आणि भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धती संबंधित शिक्षण आणि संशोधनाला अधिक बळकटी आणणारे आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकाला भारत आता तुकड्या तुकड्यांचा नाही तर समग्रतेने-सर्वंकष दृष्टीने विचार करतो. आरोग्याशी संबंधित आव्हाने-समस्या आता समग्र दृष्टीकोनासह तितक्याच सर्वंकषतेने सोडविण्यात येत आहेत. आज देशामध्ये स्वस्त आणि परिणामकारक औषधोपचारासह प्रतिबंधात्मक आरोग्यसुविधेवर, आरोग्य कल्याणावर जास्त लक्ष केंद्रीत केले जात आहे. आचार्य चरक यांनीही असे म्हटले आहे की, स्वस्थस्य स्वास्थ रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च! याचा अर्थ असा आहे की, स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचे -आरोग्याचे  रक्षण करणे आणि रोगीला रोगमुक्त करणे, हा आयुर्वेदाचा उद्देश्य आहे. स्वस्थ व्यक्ती, स्वस्थच रहावी आणि कुणालाही आजारी पडण्याची वेळच येवू नये; या विचाराने तशीच पावले उचलण्यात येत आहेत. एकीकडे साफ-सफाई, स्वच्छता, शौचालय, स्वच्छ पाणी, धूरमुक्त स्वयंपाक, पोषण अशा सर्व गोष्टींवर लक्ष देण्यात येत आहे. त्याचबरोबर दीड लाख आरोग्य आणि आरोग्य कल्याण केंद्रे हिंदुस्तानच्या कानाकोप-यामध्ये तयार करण्यात येत आहेत. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे साडे बारा हजारांपेक्षा जास्त आयुष कल्याण केंद्र संपूर्णपणे आयुर्वेदाला समर्पित आहेत, आयुर्वेदाशी जोडलेले असणार आहेत.

मित्रांनो,

आरोग्य कल्याणाचे हे भारतीय दर्शन आज संपूर्ण जगाला आकर्षित करीत आहे. कोरोनाच्या या अवघड काळामध्ये आरोग्य आणि वेलनेस  यांच्याशी संबंधित भारताकडे असलेली विद्या किती उपयुक्त आहे. हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ज्यावेळी कोरोनाशी सामना करण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नव्हता, त्यावेळी भारतामध्ये घरा-घरामध्ये हळद, दूध आणि काढा यासारखे अनेक इम्युनिटी बूस्टरम्हणून कामाचे ठरले. इतकी मोठी लोकसंख्या, दाट लोकवस्ती असलेल्या आपल्या देशातली परिस्थिती आज आटोक्यात आहे, यामागे आपल्या परंपरेची खूप मोठी, महत्वपूर्ण भूमिका आहे.

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये संपूर्ण जगात आयुर्वेदिक उत्पादनांना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या सप्टेंबरमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीमध्ये जवळपास दीडपट, जवळजवळ 45 टक्के वाढ झाली आहे. इतकेच नाही तर मसाल्यांच्या पदार्थांच्या निर्यातीमध्येही खूप वाढ नोंदवली गेली आहे. हळद, आले यासारख्या गोष्टी इम्युनिटी बूस्टर मानल्या जातात. त्यांच्या निर्यातीमध्ये अचानकपणे वाढ दिसून येत आहे. दुनियेमध्ये आयुर्वेदिक उपाय आणि भारतीय मसाले यांच्याविषयीची  विश्वासार्हता  वाढतेय, हे यावरून लक्षात येते. आता तर अनेक देशांमध्ये हळद वापरून तयार केलेल्या पेय पदार्थांचे सेवन करण्याची पद्धत अधिक रूढ होत आहे. आज दुनियेतल्या प्रतिष्ठित, मान्यवर वैद्यकीय नियतकालिकांमध्येही आयुर्वेदामध्ये नवीन आशा, नवीन अपेक्षा असल्याचे नमूद केले जात आहे.

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये आमचे लक्ष फक्त आयुर्वेदाच्या उपयोगापर्यंतच मर्यादित राहिले  नाही. मात्र या अवघड काळाचा उपयोग आयुषसंबंधित संशोधनाला देशात आणि जगात  पुढे नेण्यासाठी करण्यात येत आहे. आज भारत एकीकडे लशीची चाचणी करीत आहे तर  दुसरीकडे कोविड विरोधात लढण्यासाठी आयुर्वेदिक संशोधनावरही आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. अगदी अलिकडेच, आमचे सहकारी श्रीपाद जी यांनी सांगितले की, सध्या शंभरपेक्षा जास्त संस्थांमध्ये संशोधन सुरू आहे. इथे दिल्लीमध्ये अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने अलिकडेच आपल्या कार्याविषयी विस्ताराने माहिती दिली. दिल्ली पोलिस दलातल्या 80 हजार जवानांवर- रोगप्रतिकारकशक्ती-  इम्युनिटीसंबंधित संशोधन केले आहे. हा जगातला सर्वात मोठा समूह अभ्यासहोऊ शकतो. याचेही उत्साहजनक परिणाम पहायला मिळाले आहेत. आगामी काही दिवसांमध्ये आणखी काही आंतरराष्ट्रीय परीक्षण कार्यही सुरू करण्यात येणार आहे.

मित्रांनो,

आज आम्ही आयुर्वेदिक औषधे, जडी-बुटी यांच्या बरोबरच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक घटक असलेल्या अन्नपदार्थांवरही विशेष लक्ष देत आहोत. मिलेटस्  म्हणजे बाजरी, नाचणीसारख्या भरड  धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी बांधवांना प्रोत्साहन दिले जात आहे. इतकेच नाही तर गंगा नदीच्या किनारी  आणि हिमालयीन क्षेत्रामध्ये सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्व असलेल्या रोपांची  लागवड करण्यावर भर दिला जात आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणामध्ये भारताचा जास्तीत जास्त सहभाग असावा, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याचबरोबर आपल्या निर्यातीमध्ये वाढ व्हावी आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. आयुष मंत्रालय, यासाठी एका व्यापक योजनेवर काम करीत आहे. आपण पाहिले असेल की, कोविड महामारी सुरू झाल्यानंतर, आयुर्वेदिक जडी-बुटी- अश्वगंधा, गिलोय, तुळस यांच्या किंमती वाढल्या. याचे कारण म्हणजे यांची वाढलेली मागणी. लोकांचा विश्वासही आता वाढला आहे. मला सांगण्यात आले आहे की, यावेळी अश्वगंधाची किंमत गेल्यावर्षीपेक्षा दुपटीपेक्षाही जास्त वाढली आहे. याचा थेट लाभ या रोपांची, या जडी-बुटींची शेती करणा-या आमच्या शेतकरी परिवारांना मिळाला आहे. वास्तविक अशा अनेक जडी-बुटी आहेत, त्यांच्या उपयोगितेविषयी अद्याप आपल्याकडे जागरूकता आणखी वाढविण्याची गरज आहे. अशी जवळपास 50 औषधी रोपे आहेत, त्यांचा भोजनामध्ये  भाजी म्हणून आणि सॅलड म्हणून खूप चांगला उपयोग होतो. अशावेळी कृषी मंत्रालय असो, आयुष मंत्रालय असो अथवा इतर दुसरे कोणतेही विभाग असो, सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी या क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे.

मित्रांनो,

आयुर्वेदाशी संबंधित या संपूर्ण परिसंस्थेच्या विकासामध्ये देशात आरोग्य आणि वेलनेसशी जोडलेल्या पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये तर या क्षेत्रात अमर्याद शक्यता आहेत. मला विश्वास आहे की, जामनगर आणि जयपूर इथल्या या दोन्ही संस्था या बाबतीतही ही लाभदायक  सिद्ध होतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! आज छोटी दिवाळी आहे. उद्या मोठी दिवाळी  आहे. आपल्याला, आपल्या कुटुंबियांनाही माझ्यावतीने या दीपावलीच्या पवित्र पर्वाच्या अनेक अनेक शुभेच्छा आहेत.

खूप-खूप धन्यवाद!!

 

Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1672686) Visitor Counter : 261