आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
गेल्या 35 दिवसांपासून नव्या रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होण्याचा कल, गेले 5 आठवडे कायम
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2020 6:16AM by PIB Mumbai
देशात कोविडच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असण्याचे सातत्य आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ कायम राखले गेले आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 50,356 नवे रुग्ण आढळले तर याच काळात,53,920 रुग्ण बरे झाले आहेत. गेले पाच आठवडे हा शिरस्ता कायम असल्याचे आढळले आहे. यामुळे, देशातल्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होण्यात मोठी मदत झाली असून सध्या ही संख्या 5.16 लाख इतकी आहे.

गेल्या पाच आठवड्यात, रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दररोज सरासरी 73,000 पेक्षा अधिक रुग्ण आढळत असत. मात्र आता ही संख्या 46,000 पेक्षा कमी झाली आहे.
यामुळेच सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज देशात उपचार घेत असलेल्या एकूण कोविड रुग्णांची संख्या 5,16,632 इतकी आहे. आतापर्यंतच्या एकूण कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या प्रमाणात ही संख्या केवळ 6.11% आहे.
आजपर्यंत कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 78,19,886 इतकी झाली असून, त्यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचा दर आता 92.41% इतका झाला आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येत, 73,03,254 इतका फरक आहे.
बरे झालेल्या रूग्णांपैकी 79% रुग्ण देशातली 10 आज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 11,060 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आजवर एकूण 15,62,342 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

कोविडच्या राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारीशी सुसंगत अशी आकडेवारी 18 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांत दिसत असून, त्यांचा रुग्ण बरे होण्याचा दर, राष्ट्रीय दरापेक्षा अधिक आहे.

77% टक्के नवे रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत सर्वाधिक म्हणजे 7,178 रुग्ण आढळले असून पहिल्यांदाच दिल्लीची रुग्णसंख्या महराष्ट्र आणि केरळपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 7,002 तर महाराष्ट्रात 6,870 रुग्ण आढळले. तसेच या आजारामुळे, गेल्या 24 तासांत 577 जणां चा मृत्यू झाला आहे.

यापैकी, 83% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. 27.9 टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू (161) महाराष्ट्रात झाले आहेत. दिल्लीत 64 तर पश्चिम बंगालमध्ये 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

****
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671019)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam