पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांच्या आभासी गोलमेज परिषदेमध्ये केलेले भाषण

Posted On: 05 NOV 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्‍हेंबर 2020

 

नमस्ते, सण-उत्सवानिमित्त शुभेच्छा!

आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. आमच्याबरोबर कार्यविस्तार करण्यासाठी तुम्ही केलेली सिद्धता आणि तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला आहे. आपण एकमेकांचे नेमके दृष्टिकोन समजून घेत असल्यामुळेच भविष्यात त्याचा लाभ आपल्याला मिळू शकेल अशी मला आशा आहे.

मित्रांनो,

या वर्षामध्ये जागतिक महामारीचा भारताने बहादुरीने सामना केला, अशा संकटाच्या काळामध्ये संपूर्ण जगाने भारताचे ‘राष्ट्रीयत्व’ नेमके कसे आहे, हे पाहिले. त्याचबरोबर भारताची खरी ताकद किती आहे, याचेही सा-या जगाला दर्शन झाले. अशा कठीण परिस्थितीतच आमच्यामधील खरी गुणवैशिष्ट्ये बाहेर आल्यामुळे भारतीय यशस्वी ठरले. आता भारतीयांचा परिचय जबाबदारीच्या भावनेने काम करणारे. सर्वांविषयी त्यांना असलेली करूणा. नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली वृत्ती यांच्यामुळे होत आहे. या महामारीच्या काळामध्ये भारताने दाखवलेली लवचिकता कौतुकास्पद आहे. मग ही लढाई विषाणूबरोबरची असो अथवा आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतानाची असो, भारतीय अतिशय मजबुतीने लढले. ही लवचिकता आमच्या कार्यप्रणालीची ताकद आहे. आमच्या लोकांचे मिळणारे समर्थन आणि आमच्या धोरणांमध्ये असलेली स्थिरता यामुळेच हे शक्य झाले आहे. आमच्या यंत्रणेच्या सामर्थ्यामुळेच आम्ही जवळपास 800 दशलक्ष लोकांना अन्न-धान्याचा पुरवठा करू शकलो. 420  दशलक्ष लोकांना मदतीसाठी निधी देऊ  शकलो आणि जवळपास 80 दशलक्ष परिवारांना मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर देऊ  शकलो. आमच्या जनतेने सामाजिक अंतर राखण्याच्या आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करून  कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी जे समर्थन दिले आहे, त्यामुळेच केवळ कोविड विरोधात आम्ही मजबुतीने लढा देऊ  शकत आहे. आमच्या स्थिर धोरणांमुळेच भारत गुंतवणूकदारांच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक पसंती असलेल्या देशांपैकी एक बनला आहे.

मित्रांनो,

आम्ही नवीन भारताची उभारणी करीत आहोत. कामाच्या जुन्या कार्य पद्धतींपासून मुक्त झालेला हा भारत आहे. आज भारतामध्ये चांगल्या गोष्टींसाठी परिवर्तन घडून येत आहे. आर्थिक बेजबाबदारपणापासून ते आर्थिक विवेकापर्यंत, जास्त चलनवाढीपासून ते कमी चलनवाढीपर्यंत, बेपर्वाईने कर्ज घेवून एनपीएमध्ये वाढ करण्यापासून ते गुणवत्तेवर आधारित कर्ज देण्यापर्यंत, पायाभूत सुविधांच्या अभावांपासून ते पायाभूत सुविधांच्या मुबलकतेपर्यंत, चुकीच्या व्यवस्थापनासह केल्या जाणा-या नागरी विकासापासून ते सर्वंकष संतुलित वृद्धी करण्यापर्यंत आणि भौतिक पासून ते डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत, आमच्या देशात परिवर्तन घडून येत आहे.

मित्रांनो,

भारताने आत्मनिर्भर होण्याचा जो ध्यास घेतला आहे, तो केवळ एक ‘व्हिजन-दृरदृष्टी’ नाही तर एक सुनियोजित आर्थिक रणनीती आहे. आमच्या उद्योग व्यवसायातल्या क्षमता आणि आमच्या कामगारांकडे असलेल्या कौशल्यांचा वापर करून भारताला जागतिक उत्पादनाचे शक्तीकेंद्र बनविण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही धोरण निश्चित करून तंत्रज्ञानामध्ये आमची असलेली क्षमता आणि आमच्याकडे असलेल्या नवसंकल्पना यांच्या मदतीने एक रणनीती आखून आम्ही लक्ष्यपूर्ती करीत आहोत. आमच्याकडे मनुष्य बळ आणि साधन सामुग्री मुबलक आहे. त्याचबरोबर आमच्यामधील कौशल्यांचा वापर करून जागतिक विकासाला मदत करण्याचा हेतूही त्यामागे आहे.

मित्रांनो,

आज,  ज्या कंपन्या  पर्यावरणीय, सामाजिक आणि उत्तम प्रशासन कार्य करतात, अशाच व्यवसायांमध्ये गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतात. भारतामध्ये या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्यप्रणाली असलेल्या उच्च दर्जाच्या कंपन्या आधीपासूनच आहेत. ईएसजीवर  तितकेच लक्ष केंद्रीत करून वृद्धी करण्यावर भारताचा विश्वास आहे.

मित्रांनो,

भारत आपल्याला समृद्ध लोकशाही, लोकसंख्या, मागणी आणि त्याचबरोबर विविधता प्रदान करतो. आमच्याकडे असलेली विविधता विपणन क्षेत्रातल्या संधी अनेकपटींनी वाढविण्यासाठी मदतगार ठरतात. त्यामुळे लोकांच्या खिशाच्या आकारात असलेली भिन्नता, अर्थात खर्चाच्या क्षमतेमध्ये असलेली विविधता बाजारपेठ वाढविण्यास उपयोगी ठरते. त्याचबरोबर अनेक प्राधान्यक्रमही देता येतात. आमच्याकडे असलेले वेगवेगळे ऋतू, हवामान, विकासांचे असलेले अनेक स्तर बाजारपेठ वृद्धीला अधिक मदत करतात. अशा वैविध्यांमुळेच लोकशाहीच्या चौकटीमध्ये कायदा प्रणालीचे पालन करणारी मुक्त विचारांची, खुली बाजारपेठ भारत देऊ  शकतो.

मित्रांनो,

आर्थिकदृष्टीने अतिशय बुद्धिमान, उत्कृष्ट कार्य करणा-या लोकांसमोर मी बोलतो आहे, याची मला जाणीव आहे. तुमच्यासारखे लोकच नवसंकल्पना आणि नव्याने वाढू शकणा-या  व्यवसायांच्या प्रस्तावांचे रूपांतर,  शाश्वत उद्योगांमध्ये करू शकणार आहेत. त्याच बरोबर तुम्ही ज्यावेळी आपला पैसा गुंतवणार आहात, त्यावेळी तो सर्वात चांगल्या ठिकाणी असेल आणि त्यातून सुरक्षित दीर्घकालीन परतावा मिळेल याचा मला विश्वास आहे आणि याबाबत मी जागरूक आहे.

यासाठीच मित्रांनो,

आमचा दृष्टिकोन कोणत्याही समस्यांवर दीर्घकाळासाठी आणि शाश्वत उपाय शोधण्यावर आहे, यावर मी भर देऊ  इच्छितो. आमचा हा दृष्टिकोन तुमच्या सर्व अपेक्षांची चांगल्या प्रकारे पूर्तता करीत आहे. माझे म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी येथे काही उदाहरणे देतो.

मित्रांनो,

आमची उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आम्ही वस्तू आणि सेवा करप्रणाली स्वीकारून एक राष्ट्र आणि एक करप्रणाली जारी केली आहे. आमचे सर्वात कमी कॉर्पोरेट कर आहेत आणि नवीन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त करसवलतीही दिल्या आहेत. ‘फेस-लेस’ प्राप्तीकर मूल्यांकन आणि दावे प्रणाली लागू केली आहे. कामगारांचे हित आणि उद्योगसुलभता यांच्यामध्ये संतुलन राखणारे नवीन कामगार कायद्यांचे युग भारतामध्ये सुरू झाले आहे. काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये उत्पादनाशी निगडित सवलती देण्यात येत आहेत. गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी काही संस्था सक्षम करण्यात आल्या आहेत.

मित्रांनो,

राष्ट्रीय पायाभूत सुविधा निर्माणासाठी आम्ही 1.5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची महत्वाकांक्षी योजना आमच्या विचाराधीन आहे. बहु-स्तरीय पायाभूत संपर्क योजनेच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. संपूर्ण भारतामध्ये महामार्ग, लोहमार्ग, मेट्रो, जलमार्ग, विमाळतळे यांचे जाळे विणले जात असून संपर्कासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. आम्ही सर्वांना परवडणा-या दरामध्ये लक्षावधी कुटुंबांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी असंख्य इमारती बांधत आहोत. आम्हाला काही फक्त मोठ्या शहरांमध्येच गुंतवणूक हवी आहे, असे नाही ; तर लहान -मध्यम शहरांमध्ये, नगरांमध्येही गुंतवणूक हवी आहे. गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ याचे उत्तम उदाहरण आहे. अशा शहरांमध्ये आम्ही विकासाच्या अनेक योजना ‘मिशन-मोड’वर राबवित आहोत.

मित्रांनो,

आम्ही उत्पादनाचा आधार मजबूत करणारी रणनीती आखली आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक क्षेत्रामध्येही सर्वंकष रणनीती तयार केली आहे. त्याचबरोबर इतर प्रयत्नांमध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक सुधारणा घडवून आणल्या आहेत. आर्थिक बाजारपेठ मजबूत करण्याचे काम केले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी संयुक्त प्राधिकरण तयार केले आहे. पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास ( आयइनव्हेस्ट) आणि स्थावर मालमत्ता गुंतवणूक न्यास (आरईइनव्हेस्ट) म्हणजे सुयोग्य धोरणाचे युग हे एक ‘माध्यम’ बनले आहे. दिवाळखोरी आणि नादारी संहितेची अंमलबजावणी केली आहे. थेट लाभ हस्तांतर आणि फिन-टेक आधारित रू-पे कार्ड आणि भिम-यूपीआय यांच्या व्दारे आर्थिक सशक्तीकरण केले आहे.

मित्रांनो,

नवसंकल्पना आणि डिजिटल यांच्याविषयी उपक्रम राबविण्याचे धोरण आणि सुधारणा करणे आमच्या सरकारच्या केंद्रस्थानी आहे. जगामध्ये सर्वात जास्त संख्येने आमच्याकडे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्न आहेत. तसेच आम्ही अजूनही वेगाने प्रगती करती आहोत. सन 2019 मध्ये आमच्याकडे प्रतिदिवसाला 2ते 3 स्टार्टअप्स नव्याने सुरू होत होते.

मित्रांनो,

आमच्याकडे खाजगी व्यवसायांची वृद्धी व्हावी, यासाठी आपल्या सरकारने अनेक पावले उचलली आहेत. या उपाय योजनांमध्ये आधी कधीच न केलेली  मालमत्तेचे निर्गुंवणुकीकरण आणि मालमत्तेचे चलनीकरण अशी धोरणात्मक कामे केली. सार्वजनिक क्षेत्रांमधील उपक्रमांमध्ये असलेला 51 टक्क्यांचा हिस्सा कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कोळसा, अंतराळ, रेल्वे, नागरी उड्डाण आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये खाजगी सहभागितांना वाव देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करताना संतुलित धोरण स्वीकारण्यात येत आहे.

मित्रांनो,

आज भारतातील सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. उत्पादन, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कृषी, वित्तीय आणि अगदी सामाजिक क्षेत्रंही याला अपवाद नाही. आम्ही अलिकडेच कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या सुधारणांमुळे भारतीय कृषी विषयक व्यवसायांमध्ये अनेक भागीदार मिळण्याची  शक्यता निर्माण झाल्या आहेत. तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रक्रिया पर्यायांमुळे भारत लवकरच कृषी उत्पादनांचे निर्यात केंद्र बनेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमुळे आता परदेशी विद्यापीठांना आमच्या देशात शिक्षण संस्था सुरू करणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानामुळे वित्तीय तंत्रज्ञानाला वाव मिळणार आहे.

मित्रांनो,

आमचे भविष्य उज्ज्वल आहे, याविषयी विश्वभरातल्या गुंतवणूकदारांच्या समुदायाला आत्मविश्वास आहे, याचा मला आनंद आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये भारताच्या परकीय थेट गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 13 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या गोलमेज परिषदेमध्ये तुमच्या सक्रिय सहभागामुळे आत्मविश्वास अधिक वाढतो आहे.

मित्रांनो,

जर तुम्हाला विश्वासार्ह परतावा हवा असेल तर, त्यासाठी भारत हे स्थान आहे. जर तुम्हाला लोकशाहीसह परतावा हवा असेल तर, त्यासाठी भारत हे स्थान आहे. जर तुम्हाला स्थैर्य आणि शाश्वतता हवी असेल तर, त्यासाठी भारत हे स्थान आहे. जर तुम्हाला हरित दृष्टिकोनातून वृद्धी करायची असेल तर, त्यासाठी भारत हे स्थान आहे.

मित्रांनो,

जागतिक अर्थव्यवस्थेचे पुनरूत्थान करण्यासाठी भारताचा विकास हे उत्प्रेरक आहे. भारताच्या कोणत्याही कामगिरीमुळे जगाचा विकास आणि कल्याण अनेकपटींनी साध्य होणार आहे. एक मजबूत आणि सळसळता भारत जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी मदत करू शकणार आहे. जागतिक विकासाच्या पुनरूत्थानाचे इंजिन बनण्यासाठी आम्ही आवश्यक असणारे सर्व काही करू. आगामी  काळ प्रगतीचा रोमांचक काळ आहे. या काळाचा एक हिस्सा आपणही बनावे, यासाठी मी आपल्या सर्वांना आमंत्रित करीत आहे.

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670613) Visitor Counter : 215