पंतप्रधान कार्यालय
आयसीसीआर आणि यूपीआयडीच्यावतीने आयोजित भारतीय वस्त्रोद्योग परंपरेविषयी वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी दिलेला संदेश
Posted On:
03 OCT 2020 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
नमस्ते! वस्त्रोद्योगावरील या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होताना आनंद झाला आहे. विविध देशांचे प्रतिनिधी या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचे पाहूनही मला आनंद झाला आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि उत्तर प्रदेश डिझाइन संस्थेच्यावतीने सर्वांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ‘‘ संबंधाचे विणकाम: वस्त्रोद्योग परंपरा ’’ अशा एका उत्कृष्ट संकल्पनेची निवड आपण चर्चासत्रासाठी केली आहे. मित्रांनो, वस्त्रोद्योग क्षेत्राबरोबर आपले ऋणानुबंध शतकांपूर्वीपासून आहेत. वस्त्रोद्योगामध्ये आमच्या कार्याचा इतिहास, आमच्याकडे असलेले वैविध्य आणि या क्षेत्रातल्या अपार संधी, याकडे तुम्ही जरूर लक्ष देवू शकता.
मित्रांनो, भारताला वस्त्रोद्योगाची फार जुनी परंपरा लाभली आहे. सर्वात आधी सूत कताई करून आणि सूत रंगवून वस्त्र तयार करणा-यांमध्ये आम्ही आहोत. त्यामुळेच नैसर्गिक रंगीत सूत व्यवसायाचा भारतामध्ये एक मोठा, दीर्घकालीन आणि गौरवशाली इतिहास आहे. अगदी याचप्रमाणे रेशमी वस्त्राविषयीही म्हणता येईल. मित्रांनो, आपल्या वस्त्रोद्योगामध्ये असलेली विविधता आपल्या समृद्ध संस्कृतीची झलक दर्शवते. कोणत्याही राज्यांमध्ये जा, प्रत्येक गावांमध्ये गेलात तरी तिथल्या वेगवेगळ्या समूहांमध्ये वस्त्रांच्या परंपरेतील काही ना काही असलेली विविधता आणि वैशिष्ट्य दिसून येते. जर आंध्र प्रदेशात गेलात तर कलमकारी, आसामचा अभिमान असलेले मुगा रेशीम, काश्मिर हे पश्मिनाचे गृहराज्य आहे. तर फुलकारी पंजाबच्या संस्कृतीचा अभिमान बाळगते. गुजरातचे पटोला प्रसिद्ध आहे. तस बनारसच्या साड्यांनी आपला एक ठसा उमटवून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर मध्य प्रदेशातले चंदेरी वस्त्रे प्रसिद्ध आहे. ओडिशातल्या संबलपुरी कापडाचे वेगळेच चैतन्य निर्माण केले आहे. ही तर मी अगदीच थोडी नमुनादाखल नावे दिली आहेत. असे अनेक प्रकारे वस्त्रनिर्मिती केली जाते आमच्या आदिवासींमध्ये समृद्ध वस्त्रोद्योग परंपरा आहे. त्याकडेही मी लक्ष वेधू इच्छितो. भारतातल्या या वस्त्र परंपरेमध्ये असंख्य रंग आहेत, चैतन्य आहे, याचा तपशील सर्वांनी जाणून घेतला पाहिजे.
मित्रांनो, वस्त्रोद्योग क्षेत्र नेहमीच अपार संधी घेवून येत असते. वास्तविक भारतामध्ये सर्वात जास्त रोजगाराचा पुरवठा या क्षेत्रातून होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्त्रोद्योगामुळे व्यापार आणि सांस्कृतिक संबंध दृढ होण्यासाठी मदत मिळते. एकूणच भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर मोठे मूल्य आहे. तसेच सांस्कृतिक परंपरा, हस्तकला उत्पादने आणि तंत्र यांनी ते मूल्य अधिक समृद्ध झाले आहे.
मित्रांनो, हा कार्यक्रम गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून होत आहे. महात्मा गांधींनी वस्त्रोद्योग आणि समाजिक सशक्तिकरण यांच्यामध्ये असलेला जवळचा संबंध पाहिला होता. त्यांनी साध्या चरख्याचे रूपांतर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक म्हणून केले. या चरख्यानेच आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकसंध जोडले आहे.
मित्रांनो, आज आपण वस्त्रोद्योगाकडे एक प्रमुख क्षेत्र म्हणून पाहतो. हे क्षेत्रच आपल्याला स्वावलंबी भारत बनविण्यासाठी मदत कसे करेल, याकडे आमचे सरकार लक्ष केंद्रित करीत आहे. या क्षेत्रातल्या कलाकारांचे कौशल्य विकास, उन्नतीकरण, त्यांना वित्तीय मदत, आधुनिक तंत्रज्ञान देणे, यामुळे आमचे विणकर जागतिक दर्जाची वस्त्रोत्पादन करू शकणार आहेत. जगाने आपल्याकडचे जे काही चांगले आहे, त्या पद्धती शिकल्या पाहिजेत, अशीही आमची इच्छा आहे. म्हणूनच या वेबिनारमध्ये वेगवेगळे अकरा देश सहभागी झाले आहेत. चांगल्या कल्पनांची देवाणघेवाण करून सर्वोत्तम पद्धतीचे सामायिकीकरण शक्य आहे, या सहयोगातून नवीन मार्ग निर्माण होतील.
मित्रांनो, जगभरामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक महिला कार्यरत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र महिलांच्या सबलीकरणाच्या प्रयत्नाला मदत करते. मित्रांनो, आपण आपल्या भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्याचीही सिद्धता केली पाहिजे. आमच्या वस्त्र परंपरेने अनेक कल्पना आणि तत्वांचा पुरस्कार केला आहे. त्यामध्ये वैविध्य आहे. प्रासंगिकता आहे. मला अपेक्षा आहे की, या वेबिनारसारख्या कार्यक्रमांमुळे संकल्पना अधिक स्पष्ट होवून या क्षेत्रामध्ये चांगले योगदान देता येईल. या कार्यक्रमासाठी मी आयसीसीआर आणि यूपीआयडी यांनी तसेच सर्व सहभागितांनी केलेल्या प्रयत्नासाठी शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद !!
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661458)
Visitor Counter : 215
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam