अर्थ मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आत्मनिर्भर भारताचे महत्त्व अधोरेखित केले


कोविड-19 च्या दुष्परिणामांमधून देशाला बाहेर काढण्यात राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार : पंतप्रधान

“मेक इन इंडिया” सह “मेक फॉर वर्ल्ड” हा मंत्र असावा : पंतप्रधान

Posted On: 15 AUG 2020 6:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 74 व्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. लाल किल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी कोविड -19 साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनातील विविध मुद्यांपासून ते आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उपययोजना आणि मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी उचललेली पावले यासगळ्याविषयी बोलले.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचे महत्व पुन्हा अधोरेखित करत ही काळाची गरज असल्याने भारतीय नागरिकांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले. कोरोना विषाणू साथीचा आजरा देशभर पसरला असताना देखील 130 कोटी भारतीयांनी आत्मनिर्भरहोण्याचा निर्णय केला आहे. आत्मनिर्भर (स्वावलंबी) होणे हे अनिवार्य आहे.भारत हे स्वप्न नक्की साकार करेल असा मला आत्मविश्वास आहे. मला माझ्या नागरिकांच्या क्षमता, आत्मविश्वास यावर विश्वास आहे. एकदा आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण ते साध्य करेपर्यंत विश्रांती घेत नाही,” असे ते म्हणाले.

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठी चालना देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन (एनआयपी) योजनेच्या मदतीने जलद विकासासाठी एकूणच पायाभूत सुविधा सुधारण्यावर सरकार प्राधान्य देत आहे आणि एनआयपीमध्ये 110 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासाठी विविध क्षेत्रात 7,000 हून अधिक प्रकल्पांची ओळख पटवण्यात आली आहे असे पंतप्रधान म्हणाले. कोविड-19 च्या दुष्परिणामांमधून देशाला बाहेर काढण्यात राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल. एनआयपी हा भारताच्या पायाभूत विकास निर्मिती प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडवून आणेल. अनेक नवीन रोजगार निर्माण होतील आणि आपले शेतकरी, तरुण आणि उद्योजकांना याचा फायदा होईल.

आता आपल्याला मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड या मंत्रा सोबत पुढे जावे लागेल यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, भारतात ज्या सुधारणा होत आहेत त्याकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष आहे. परिणामी, एफडीआयने सर्व विक्रम मोडले आहेत. कोविड साथीच्या आजाराच्या काळात देखील देखील भारताच्या एफडीआयमध्ये 18% वाढ झाली.

देशातील गरिबांच्या जनधन खात्यात कोट्यावधी रुपये थेट हस्तांतरित होतील याची कोणी कल्पना केली होती का? शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी कायद्यात इतका मोठा बदल घडून येईल असा कोणी विचार केला होता का? एक देश-एक शिधापत्रिका, एक देश एक करप्रणाली, नादारी आणि दिवाळखोरी कायदा आणि बँकांचे विलीनीकरण हे आज देशाचे वास्तव आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की 7 कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले, 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका असो किंवा नसो अशा लोकांना मोफत अन्नधान्य वितरीत केले, सुमारे 90 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आले. गावातील गरीबांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान  सुरू करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच तुमच्या गृह कर्जाचे हफ्ते  भरण्याच्या कालावधीत 6 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. हजारो अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षी 25 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की देशात सुरू झालेल्या 40 कोटी जन धन खात्यांपैकी सुमारे 22 कोटी खाती महिलांची आहेत. कोरोनाच्या काळात, एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांत सुमारे तीस हजार कोटी रुपये या महिलांच्या खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत. आपण पहिले की कोरोनाच्या काळात डिजिटल इंडिया मोहिमेनी महत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या महिन्यात फक्त भीम यूपीआयकडून सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, असे ते म्हणाले.

****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646143) Visitor Counter : 184