पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत सद्यस्थितीवर आणि साथीच्या आजारावर उपाययोजना आखण्यासाठी चर्चा केली
आपल्याला नवीन मंत्राचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे - जे लोक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत त्यांच्या 72 तासांच्या आता शोध आणि चाचणी केली पाहिजे : पंतप्रधान
80% सक्रीय रुग्ण 10 राज्यांमध्ये आहेत, जर येथे विषाणूचा पराभव झाला तर संपूर्ण देश विजयी होईल: पंतप्रधान
मृत्यू दर 1% च्या खाली आणण्याचे उद्दिष्ट लवकरच प्राप्त केले जाईल : पंतप्रधान
बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्याची गरज असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले : पंतप्रधान
प्रतिबंध, संपर्क शोध आणि लक्ष ठेवणे ही या लढाईतील प्रभावी शस्त्रे आहेत : पंतप्रधान
दिल्ली आणि जवळपासच्या राज्यांत साथीच्या आजाराचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी पथदर्शक तयार करण्याच्या गृहमंत्र्याच्या अनुभवाचा पंतप्रधानांनी पुन्हा उल्लेख केला
मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवरील स्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि चाचणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली
Posted On:
11 AUG 2020 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींशी सद्य परिस्थिती आणि कोविड-19 साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
टीम इंडियाचे टीम वर्क
प्रत्येकाने अफाट सहकार्य केले आहे आणि टीम इंडियाने दाखविलेले टीमवर्क उल्लेखनीय आहे असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी रुग्णालये आणि आरोग्य सेवा कामगारांना भेडसावणारी आव्हाने व दबाव याबद्दल चर्चा केली. जवळपास 80% सक्रिय रुग्ण हे सहभागी झालेल्या 10 राज्यांमधील आहेत आणि जर या दहा राज्यात विषाणूचा पराभव झाला तर कोविड-19 च्या विरोधातील लढाईत संपूर्ण देश विजयी होईल.
चाचणी वाढविणे, मृत्यूचे प्रमाण कमी करणे
दैनंदिन चाचण्यांची संख्या जवळपास 7 लाखांवर पोहोचली असून त्यांत सतत वाढत होत आहे, ज्यामुळे रुग्णांची लवकर ओळख पटवण्यात आणि नियंत्रण करण्यास मदत झाली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशातील सरासरी मृत्यु दर हा इतर देशाच्या देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि सतत खाली जात आहे. सक्रीय रुग्णांची टक्केवारी कमी होत आहे तर रुग्ण बरे होण्याचा वृद्धिंगत होत आहे असे ते म्हणाले. या टप्प्यांमुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे नमूद करताना ते म्हणाले की, मृत्यू दर 1% च्या खाली आणण्याचे लक्ष्य लवकरच गाठले जाऊ शकते.
बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा येथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्याची गरज असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे हे पंतप्रधान यावेळी अधोरेखित केले. प्रतिबंध, संपर्क शोध आणि लक्ष ठेवणे ही या लढाईतील प्रभावी शस्त्रे आहेत असे ते म्हणाले. लोकं जागरूक झाले आहेत आणि सरकारच्या या प्रयत्नांना पूर्णपणे सहाय्य करीत आहेत, याचाच परिणाम म्हणून गृह-विलगीकरण इतक्या प्रभावीपणे यशस्वी झाले आहे. त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या उपयुक्ततेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेताना सांगितले की तज्ञांच्या मते जर सुरुवातीच्या 72 तासांत रुग्णाची ओळखू पटली तर विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. 72 तासात संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्याची व चाचणी घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. हात धुणे, 6 फुट अंतर ठेवणे, मास्क घालणे इत्यादी प्रमाणेच याचे देखील एका मंत्राप्रमाणे पालन केले पाहिजे.
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमधील धोरण
दिल्ली आणि जवळपासच्या राज्यांत साथीच्या आजाराचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी पथदर्शक तयार करण्याच्या गृहमंत्र्याच्या अनुभवाचा पंतप्रधानांनी पुन्हा उल्लेख केला. प्रतिबंधित क्षेत्राचे विभाजन करणे आणि विशेषत: उच्च जोखमीच्या श्रेणीतील तपासणीवर भर देणे हे या धोरणाचे मुख्य स्तंभ आहेत असे त्यांनी सांगितले. या उपाययोजनांचे परिणाम सर्वांनी पहिले आहेत असे नमूद करत ते म्हणाले रूग्णालयात अधिक चांगले व्यवस्थापन आणि आयसीयू खाटा वाढविणे यासारखी पावले देखील खूप उपयुक्त ठरली.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील परिस्थितीबद्दल अभिप्राय दिला. त्यांनी साथीच्या आजाराच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि सतत मार्गदर्शन व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेण्यात आलेल्या चाचण्या, चाचणी वाढविण्यासाठी उचललेली पावले, टेली-मेडिसिन आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सरो-सर्विलंस बाबत अधिक मार्गदर्शन करण्याची विनंती केली, तसेच देशात एकात्मिक वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याची सूचना केली.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
विषाणूविरूद्धच्या या लढाईत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, ज्यांचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले आहे असे संरक्षणमंत्र्यांनी जोर देऊन सांगितले.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी देशातील कोविड रुग्णांचा आढावा सादर केला आणि काही राज्यांमध्ये रुग्ण संख्येत सरासरी पेक्षा अधिक वृद्धी होत असल्याचे लक्षात घेऊन चाचणी करण्याच्या क्षमतेच्या चांगल्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती राज्यांना केली. त्यांनी मृत्यु दरातील अचूक आकडेवारी नोंदविण्यावर भर दिला आणि स्थानिक समुदायाच्या मदतीने प्रतीबंधीत परीघ परीक्षण करण्याबाबतही सांगितले.
या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री, आरोग्य मंत्री आणि गृह राज्यमंत्री देखील उपस्थित होते.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645095)
Visitor Counter : 254
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam