PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 27 JUL 2020 7:40PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली, मुंबई,  27 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता, मुंबई आणि नोएडामध्ये सुसज्ज अशा कोविड-19 चाचणी सुविधा प्रयोगशाळांचा आज शुभारंभ करण्यात आला. सध्या देशभरात दररोज 5 लाख चाचण्या केल्या जात आहेत, येत्या आठवड्यात यात वाढ करुन चाचण्यांची संख्या 10 लाख करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. देशात सध्या 11,000 कोविड सुविधा आणि 11 लाखांहून अधिक अलगीकरण खाट उपलब्ध आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या कठीण काळातील पंतप्रधानांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. तसेच मुंबईतील ‘चेस दी व्हायरस’ उपक्रमाची आणि कायमस्वरुपी संसर्ग रुग्णालयांची स्थापना करण्याबाबतची माहिती दिली.   

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

  • केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून, मृत्युदर सतत कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, प्रभावी प्रतिबंध धोरण आणि अधिकधिक चाचण्यांमुळे रुग्णांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात घसरत असून तो आता 2.28% आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

प्रतिदिन तीस हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा पायंडा सलग चौथ्या दिवशीही कायम असून गेल्या 24 तासात 31 हजार 991 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,17,567 झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 64 % आहे.

  • कोविड-19 संक्रमण काळात, भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची लवचिकता दिसून आली. विशेषतः ग्रामीण भागात सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र यांच्या माध्यमातून कोविडेतेर आरोग्य सेवांचा अविरत पुरवठा केला तसेच कोविड-19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनातील तातडीच्या निकड पूर्ण केल्या.
  • महामारीच्या काळात (जानेवारी ते जुलै 2020 दरम्यान) जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचता येईल यासाठी अतिरिक्त 13,657 आरोग्य आणि कल्याण केंद्र सुरु होती. 24 जुलै 2020 रोजीपर्यंत देशाच्या विविध भागात एकूण 43,022 आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यरत होती.

 

इतर अपडेट्स

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना 82 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले “मी लाखो भारतीयांसह सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना 82 व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो. सीआरपीएफ म्हणजे शौर्य, धैर्य आणि त्यागाचे प्रतिक आहे. वेळोवेळी सीआरपीएफने देशाभिमानास्पद कामगिरी केली आहे”. अमित शाह पुढे म्हणतात, केंद्रीय राखीव पोलीस दलाने कोविड-19 च्या काळात समाजसेवेसाठी केलेला त्याग अतुलनीय आहे”.

 

महाराष्ट्र अपडेट्स

राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आता कोरोना पॉझिटीव्ह मंत्र्यांची संख्या सहा झाली. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील 10,000 नागरिकांचा सेरोसर्वेचा पहिला टप्पा पूर्ण केला. मुंबईच्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीजची पातळी ओळखण्यासाठी या चाचण्या करण्यात आल्या. शहरातील झोपडपट्टी परिसर आणि इतर परिसरातील नमुने घेण्यात आले. ऑगस्ट महिन्यात आणखी एक सर्वेक्षण केले जाणार आहे. आजपर्यंत, महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या 1.48 लाख आहे. पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक 43,838 सक्रीय रुग्ण आहेत. 37,162 सक्रीय रुग्णांसह ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, मुंबईतील रुग्णसंख्या कमी होऊन ती 22,443 एवढी झाली आहे.    

 

* * *

SRT/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641607) Visitor Counter : 308