PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
24 JUL 2020 8:01PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 24 जुलै 2020
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा एका दिवसातील दर गेले सलग तीन दिवस वाढतो आहे. सलग तिसऱ्या दिवशी, म्हणजे गेल्या 24 तासांत कोविडचे 34,602 उपचारानंतर बरे झाले आहेत.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या आठ लाखांच्या वर गेली असून सध्या ती 8,17,208 एवढी आहे. परिणामी कोविड रुग्ण बरे होण्याचा दर, 63.45%पर्यंत पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येपेक्षा आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,77,073 ने अधिक आहे.तसेच ही तफावत सातत्याने वाढते आहे. आज देशात 4,40,135 सक्रीय रुग्ण आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या प्रयत्नांना केंद्रातील तज्ञांच्या पथकांची मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे. ज्या ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक होती, त्या भागातल्या राज्य आणि जिल्हास्तरातील अधिकाऱ्यांशी केंद्र सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या चर्चेची आणि त्यानुसार सबंधित भागात पथके पाठवण्याच्या धोरणाचीही कोविड व्यवस्थापनात मदत झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून रुग्ण मृत्यूदर सातत्याने कमी होत आहे. सध्या हा मृत्यूदर 2.38%.इतका आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी देशभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा (1,54,28,170) जास्त नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत अशा 3,52,801 नमून्यांचे परीक्षण करण्यात आले. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात आजवर प्रती दशलक्ष 11,179 चाचण्या केल्या गेल्या असून परीक्षणाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. परीक्षणासाठी प्रयोगशाळांच्या संख्येत करण्यात येणारी वाढ (आतापर्यंत 1290) तसेच विविध पर्यायांच्या माध्यमातून परीक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे भारतात प्रति दशलक्ष चाचण्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरटी-पीसीआर प्रयोगशाळा, या आयसीएमआरने अलिकडेच निर्धारित केलेल्या परिक्षण धोरणाचा कणा आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ दिसून येते आहे. सध्या 897 सरकारी तर 393 खाजगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याचे तपशील पुढीलप्रमाणे:
• रिअल टाईम आरटी-पीसीआर आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 653 (सरकारी: 399 + खाजगी: 254)
• TrueNat आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 530 (सरकारी: 466 + खाजगी: 64)
• CBNAAT आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 107 (सरकारी: 32 + खाजगी: 75)

इतर अपडेट्स:
- जैव तंत्रज्ञान विभाग-BIRAC तर्फे भारतात पहिल्यांदाच एमआरएनए आधारित लस उत्पादन निर्मितीला सुरूवात झाली आहे. कोवीड–19 च्या उपचारार्थ जिनोवाच्या नोवेल स्व-प्रवर्धित एमआरएनए आधारित लसीच्या विकसनासाठी जैवतंत्रज्ञान विभागाने बीज-भांडवल पुरवठा केला आहे.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज इस्त्रायलचे संरक्षणमंत्री लेफ्टनंत जनरल बेन्जामिन गॅन्त्ज यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी यावेळी दोन्ही देशांमधील सामरिक आणि राजनैतिक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. संरक्षण क्षेत्रातील दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे करता येतील, याबद्दलच्या शक्यतांवर चर्चा केली. तसेच, कोविड-19 विरुद्धच्या लढाईदरम्यान, संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात, सुरु असलेल्या सहकार्याबाबत देखील दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. या संशोधनाचा लाभ केवळ दोन देशांनाच नाही, तर संपूर्ण मानवजातीला होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
- राष्ट्रकूल परिषदेच्या सदस्य राष्ट्रांच्या मंत्रीस्तरीय आभासी बैठकीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू सहभागी झाले होते. कोविड-19 नंतरच्या काळात, क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्याबाबत भारताची भूमिका आणि कोविडनंतर एक एकत्रित धोरण निर्माण करण्यात भारताचे योगदान, याविषयी त्यांनी या बैठकीत माहिती दिली.
- भारत ज्या देशांबरोबर सीमारेषा सामायिक करतो, म्हणजेच भारताच्या सीमारेषेवरच्या देशांमधल्या बोलीकर्त्यांवर काही प्रतिबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारने ‘सर्वसाधारण वित्तीय नियम 2017’ मध्ये सुधारणा केल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वित्तीय नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. आता या नवीन नियमांनुसार विशिष्ट देशांकडून सार्वजनिक खरेदी करताना बोलीकर्त्यांसाठी सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र कोविड-19 महामारीचा प्रसार लक्षात घेवून डिसेंबर 2020 पर्यंत वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेवून अशा साधन-सामुग्रीच्या खरेदीवर तूर्त नवीन आदेशाच्या मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत. तसेच भारत सरकार ज्या देशांना मदत पुरवत आहे, त्याविषयी स्वतंत्र आदेश देण्यात आले आहेत.
- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हवाई वाहतूक, पोलाद मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, यांच्यासह या मंत्रालयांशी संबंधित सात सार्वजनिक उद्यमांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाबाबत बैठक घेतली. कोविड-19 संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भातील विविध भागधारकांशी बैठकांचे सत्र सुरु आहे, त्यातील ही दुसरी बैठक होती.
महाराष्ट्र अपडेट्स :
महामारीला आळा घालण्यासाठी मुंबईत विविध अभिनव कल्पना राबवल्या जात आहेत. यापैकीच एक म्हणजे मध्य रेल्वेच्या वतीने संपर्करहित तिकीट तपासणी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई विभागाच्या वतीने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी चेकइन मास्टर हे ॲप सुरु करण्यात आले आहे. ॲप मधील ओसीआर आणि क्यूआर कोड स्कॅनिंगच्या वैशिष्टयामुळे रेल्वे कर्मचाऱ्याला सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांचे तिकीट तपासण्यास मदत होते. यापुढील टप्प्यात तिकीट तपासणी आधारित क्यूआर कोडसह, प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणी फ्लॅप दरवाजे बसवण्याचा विचार करत असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. मुंबईत आतापर्यंत 1.05 लाख रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 22,800 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 1.40 लाख सक्रिय रुग्ण आहेत.
FACTCHECK


* * *
ST/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641005)
Visitor Counter : 195