युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जागतिक मंत्रीस्तरीय मंचावर राष्ट्रकुल परिषदेच्या सरचिटणीसांकडून भारताच्या “फिट इंडिया’ अभियानाचे कौतुक; आरोग्यविषयक जनजागृतीमुळे कोरोनाच्या काळात भारतीयांची प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत- किरेन रीजीजू
Posted On:
24 JUL 2020 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2020
राष्ट्रकूल परिषदेच्या सदस्य राष्ट्रांच्या मंत्रीस्तरीय आभासी बैठकीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू सहभागी झाले होते. कोविड-19 नंतरच्या काळात, क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्याबाबत भारताची भूमिका आणि कोविडनंतर एक एकत्रित धोरण निर्माण करण्यात भारताचे योगदान, याविषयी त्यांनी या बैठकीत माहिती दिली.
“राष्ट्रकुलचे सदस्य देश म्हणून आपल्या सर्वांना सध्याच्या काळात एकजूट राखणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्व सदस्य देशांसोबत इथे आपले विचार मांडताना मला विशेष आनंद होत आहे. विविध देशांच्या मंत्र्यांनी या मंचावर व्यक्त केलेले मुद्दे, भारताने मांडलेल्या मुद्यांसारखे आहेत. मात्र त्याशिवाय या काळात आम्ही जे शिकलो आणि जे मिळवले अशा काही गोष्टी आपल्यासामोर मांडण्याची माझी इच्छा आहे.”
या साथीच्या आजाराच्या काळात, नागरिक निरोगी राहण्याचे महत्व अधोरेखित करत किरेन रीजीजू म्हणाले की, “ भारताने गेल्या वर्षी राबवलेल्या फिट इंडिया अभियानाचा आम्हाला कोविडच्या संकटात अतिशय उपयोग झाला. कारण या आजारात निरोगी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत असण्याला अत्यंत महत्व आहे. या अभियानामुळे, भारतात सुदृढ आणि निरामय आयुष्याविषयी ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्तम जनजागृती करण्यात आली. तज्ञांनी आरोग्य, पोषक आहार, व्यायाम याविषयी सल्ला आणि मार्गदर्शन केले, ज्याचा सर्व वयातील नागरिकांना खूप लाभ झाला.”
राष्ट्रकुल संघटनेच्या सरचिटणीस पॅट्रीशिया स्कॉटलंड क्यूसी यांनीही या बैठकीत भारताच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
कोविडच्या काळातही भारतात अॅथलिटस साठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांची कौशल्ये विकसित करण्यासाठीचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यात हजारो खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.
मात्र टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात, मैदानावरील प्रशिक्षण आणि क्रीडा उपक्रम सुरु करण्यावर सरकारचा भर असेल, असे रीजीजू म्हणाले. सरकारने कठोर निर्बंध घालून मार्गदर्शक सूचनांसह काही क्रीडा उपक्रमांना परवनागी दिली आहे,असे त्यांनी सांगितले. ऑलिम्पिक आणि इतर काही खेळाडूंचे प्रशिक्षण देखील विशेष शिबिरांमध्ये अलीकडेच सुरु झाले आहे असेही ते म्हणाले. सर्व राज्यात हळूहळू क्रीडा उपक्रम सुरु केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. भारतात येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून क्रीडा कार्यक्रम सुरु होऊ शकतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोविड-19 च्या काळात युवक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध युवा संघटनांच्या युवा स्वयंसेवकानी केलेल्या मदत आणि सेवाकार्याचीही त्यांनी माहिती दिली.
राष्ट्रकुल संघटनेच्या सदस्य देशांनी दाखवलेल्या एकात्मभावनेचे त्यांनी कौतुक केले. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये नेमबाजी आणि तिरंदाजीचे काही प्रकार समाविष्ट करण्याची भारताची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640905)
Visitor Counter : 199