पंतप्रधान कार्यालय

धर्म चक्र दिन कार्यक्रमानिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधन

Posted On: 04 JUL 2020 10:17AM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 4जुलै 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढ पौर्णिमा- धर्म चक्र दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबोधन केले. आजच्या दिवशीच भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पाच तपस्वी शिष्यांना पहिल्यांदा उपदेश दिला होता. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीजवळ सारनाथमध्ये रसिपाटणा येथे, सध्या ज्या स्थानी ‘डीअर  पार्क’ आहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिल्यांदा उपदेश केला होता. हा दिवस जगभरातले बौद्ध अनुयायी ‘धर्म चक्र परिवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. यालाच बौद्ध ‘धर्म चक्राचे परिवर्तन’ असेही म्हणतात.

देशभरात सर्वत्र आषाढ पौर्णिमा ‘गुरू पौर्णिमा’ म्हणूनही साजरी केली जाते, यानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा देवून भगवान बुद्धांना आदरांजली वाहिली. मंगोलिया सरकारला आषाढ पौर्णिमेनिमित्त सादर केलेल्या विशेष संदेशाचे- ‘मंगोलियन कंजूर’च्या प्रतींविषयी पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दाखवलेले आठ मार्ग यांचे स्मरण केले. बुद्धांची शिकवणूक अनेक समाज आणि राष्ट्रांना कल्याणाचा मार्ग दाखवते. बौद्ध धर्म महिला, गरीब, तसेच सर्व लोकांचा आदर करणे, शांतता आणि अहिंसेची शिकवण देतो. ही शिकवण या भूमीवर शाश्वत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

भगवान बुद्धांनी आशा आणि उद्देश यांच्याबद्दलही विचार मांडले आहेत आणि या दोन्हीमध्ये असलेला अतिशय मजबूत धागा आपल्याला दिसून येतो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. एकविसाव्या शतकामध्ये आपण कशा प्रकारे आशावादी आहोत आणि ही आशा युवावर्गाकडून प्रफुल्लित व्हावी, असेही आपल्याला वाटते, असे सांगून पंतप्रधानांनी भारत सर्वात मोठी ‘स्टार्ट-अप’ अर्थव्यवस्था आहे, हे अधोरेखित केले.  आपल्या देशातले प्रतिभावान तरूण, तडफदार युवा नागरिक- वैश्विक समस्यांवर तोडगा शोधून काढू शकतील, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

आज संपूर्ण जग अतिशय विलक्षण आव्हानांचा सामना करीत आहे, त्यावर कायमस्वरूपी तोडगा भगवान बुद्धांच्या आदर्शातून  निघू शकेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. बौद्ध वारसा स्थानांशी अधिकाधिक लोकांनी जोडले जाण्याची गरज आहे, याविषयावरही पंतप्रधान यावेळी बोलले. उत्तर प्रदेशातले कुशीनगर विमानतळ ‘आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे आता भगवान बुद्धांच्या स्थानांना भेट देवू इच्छिणा-या यात्रेकरू आणि पर्यटकांचा प्रवास सुलभ होवू शकणार आहे. तसेच या भागात अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

*****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636388) Visitor Counter : 255