पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाच्या उद्घाटन समारंभात केलेले भाषण

Posted On: 26 JUN 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

 

मित्रांनो,

नमस्कार, तुमच्या सोबत बोलण्याची संधी मला मिळाली आहे, आपण सर्वांनीच आपल्या वैयक्तिक जीवनात चढउतार पाहिले आहेत. आपल्या सामाजिक जीवनात देखील, आपल्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. काल पाहिले ना  तुम्ही वीज कोसळली ते. बिहार आणि उत्तर प्रदेशात अनेक लोकांनी जीव गमावले. पण अशा प्रकारची मोठी आपत्ती जगभरातील मानवजातीवर कोसळेल याची कोणीही कल्पना केली नव्हती, एक अशी आपत्ती ज्या आपत्तीमध्ये लोक इच्छा असूनही एकमेकांची मदत करू शकत नाहीत. अशा वेळी असे कोणीही नसेल ज्याला काही ना काही अडचणींना तोंड द्यावे लागले नसेल.

मग ती लहान बालके असोत, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, पुरुष असतील, जगातील एखादा देश असेल, या प्रत्येकालाच समस्या भेडसावत आहेत आणि आपल्याला अजूनही हे समजलेले नाही की भविष्यात या आजारापासून आपल्याला कधी दिलासा मिळेल. हो, पण आपल्याला एक उपाय माहीत आहे आणि तो उपाय म्हणजे "दो गज दुरी" अर्थात एकमेकांपासून सुरक्षित अंतर आणि आपल्या चेहऱ्याला एखाद्या कपड्याने किंवा मास्कने झाकून घेणे. जोपर्यंत कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोना विषाणूच्या विरोधात या उपायांनीच संघर्ष करता येणार आहे.

मित्रांनो,

आज जेव्हा तुम्ही सर्व जण माझ्याशी बोलत होता, तेव्हा मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता आणि तुमच्या डोळ्यातील भावना आणि तुमचे प्रेम दिसत होते. उत्तर प्रदेशचे अतिशय लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात उपस्थित आहेत. सरकारमधील मंत्री आहेत, प्रशासनाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत आणि उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यातील आपले मित्र देखील उपस्थित आहेत.

आपल्याला सर्वांनाच कष्टकऱ्यांच्या सामर्थ्याची कल्पना आहे. श्रमिकांची हीच ताकद भारत सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानाचा आधार बनला आहे. याच ताकदीने आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाला प्रेरणा दिली आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या योजनेचा योगीजींच्या सरकारने गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार केला आहे. 

या अभियानामध्ये उत्तर प्रदेश सरकारने अनेक नव्या योजनांचाच केवळ समावेश केलेला नाही आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ केलेली नाही तर आत्म निर्भर भारताच्या उद्दिष्टांशी या योजनांचे एकात्मिकरण केले आहे. आत्म निर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान हे मी नेहमी ज्याचा उल्लेख करतो त्या दुहेरी इंजिनाचे एक चांगले उदाहरण आहे. योगीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संघाने ज्या प्रकारे अगदी मनापासून काम करत या आपत्तीचे रुपांतर एका संधीमध्ये केले आहे, त्यापासून देशातील इतर राज्ये देखील खूप काही शिकतील. प्रत्येकालाच त्यापासून प्रेरणा मिळेल.  

इतर राज्ये देखील अशाच प्रकारच्या योजना सुरू करतील, अशी मला आशा आहे आणि मी उत्तर प्रदेशमधला संसद सदस्य आहे. ज्यावेळी उत्तर प्रदेश अशा प्रकारचे चांगले काम करते तेव्हा मला अतिशय आनंद होतो आणि समाधान वाटते कारण माझ्यावर देखील येथील लोकांची जबाबदारी आहे.

मित्रांनो,

आपत्तीच्या काळात जो कोणी धाडस आणि चातुर्य दाखवतो तोच यशस्वी होतो. आज जेव्हा जग कोरोना विषाणूमुळे जेव्हा इतक्या मोठ्या संकटात सापडले आहे त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारने दाखवलेले धाडस आणि चातुर्य आणि ज्या प्रकारे त्यांनी या परिस्थितीची हाताळणी केली आहे, ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि प्रशंसेला पात्र आहे.

यासाठी मी उत्तर प्रदेशच्या 24 कोटी नागरिकांचे अभिनंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. उत्तर प्रदेशची आकडेवारी जगातील महान तज्ञांना चकित करू शकते. मग ते उत्तर प्रदेशातील डॉक्टर असू दे, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बँक आणि टपाल कर्मचारी, वाहतूक विभाग किंवा माझे कामगार मित्र असू देत, या सर्वांनीच पूर्ण समर्पित वृत्तीने योगदान दिले आहे.

योगी जी आणि त्यांचा संपूर्ण संघ, मग ते लोकप्रतिनिधी असू देत किंवा अधिकारी असू देत, प्रत्येकानेच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तुम्ही सर्वांनी उत्तर प्रदेशात अतिशय कठीण कालखंडात ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे, त्याची अतिशय अभिमानाने उत्तर प्रदेशातील प्रत्येक बालक आणि प्रत्येक कुटुंब पुढील कित्येक वर्षे आठवण ठेवेल.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशाचे प्रयत्न आणि कामगिरी खूपच महाकाय आहे, कारण हे एक मोठे राज्य आहे म्हणून नव्हे तर हे राज्य जगातील कित्येक देशांपेक्षा मोठे आहे. उत्तर प्रदेशातील लोकांनाच आता या कामगिरीची जाणीव होऊ लागली आहे, पण ज्यावेळी तुम्हाला आकडेवारी समजेल तेव्हा तुम्हाला आणखी जास्त आश्चर्य वाटेल

मित्रांनो,

जर आपण युरोपमधील चार मोठ्या देशांचा विचार केला म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन. तर हे देश सुमारे 200-250 वर्षे जगातील महासत्ता होते. अजूनही त्यांचे जगावरील वर्चस्व कायम आहे. आज जर आपण या चार देशांच्या लोकसंख्येची बेरीज केली तर ती आहे सुमारे 24 कोटी. एकट्या उत्तर प्रदेश राज्याचीच लोकसंख्या 24 कोटी आहे. म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या चार देशांमध्ये जितके लोक राहातात तितके लोक उत्तर प्रदेशात राहातात. पण या चार देशांमध्ये कोरोना विषाणूने एक लाख 30 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. तर उत्तर प्रदेशात आतापर्यंत केवळ 600 लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. एका माणसाचा मृत्यू होणे ही बाब देखील दुर्दैवी असल्याचे मी मानतो.

पण या चार देशांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नानंतरही कोरोना विषाणूने दगावलेल्या लोकांची संख्या उत्तर प्रदेशशी तुलना करता अनेक पटींनी जास्त आहे. हे देश जास्त विकसित आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात संसाधने आहेत आणि त्यांची सरकारे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पण तरीही त्यांना उत्तर प्रदेशला आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्यात जितके यश मिळाले त्या तुलनेत यश मिळालेले नाही,

मित्रांनो,

तुमच्यापैकी अनेकांना अमेरिकेतील परिस्थितीची माहिती असेल. अमेरिकेत संसाधने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कोणतीही कमतरता नाही. तरी देखील आज अमेरिकेला कोरोनाची अतिशय जास्त झळ पोहोचली आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की अमरिकेची लोकसंख्या सुमारे 33 कोटी आहे तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे. पण अमेरिकेत आतापर्यंत एक लाख 25 हजार लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे तर उत्तर प्रदेशात सुमारे 600 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जर योगीजींच्या उत्तर प्रदेशात योग्य प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या नसत्या, तर तिथे देखील अमेरिकेप्रमाणेच हाहा:कार उडाला असता, मग उत्तर प्रदेशातील मृत्यूंची संख्या 600 ऐवजी 85,000 वर पोहोचली असती. पण उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या खडतर प्रयत्नांमुळे एका प्रकारे या सरकारने किमान 85,000 लोकांचे जीव वाचवले आहेत. आज जर आपण आपल्या नागरिकांचे जीव वाचवण्यात यशस्वी होत असू तर ही खरोखरच अतिशय समाधानाची बाब आहे. यामुळे देशाचा आत्मविश्वास उंचावला आहे. नाहीतर एक काळ असा होता जेव्हा प्रयागराजचे म्हणजे तेव्हा अलाहाबाद म्हणून ओळखले जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार देशाचे पंतप्रधान होते आणि कुंभ मेळ्यामध्ये शेकडो- हजारो लोक चेंगराचेंगरीत मरण पावले. त्या काळी जे लोक सरकारमध्ये त्यांनी आपला सर्व वेळ आणि प्रयत्न मृतांचे आकडे लपवण्यात खर्च केले. तर आता उत्तर प्रदेशातील लोक सुरक्षित आहेत ही अतिशय दिलासादायक बाब आहे

मित्रांनो,

आपण नेहमीच आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे सर्व त्या वेळी करण्यात आले ज्यावेळी देशभरातून 30-35 लाख स्थलांतरित मजूर आणि कामगार बंधू उत्तर प्रदेशातील आपापल्या गावांमध्ये गेल्या काही आठवड्यात परतत होते. पण उत्तर प्रदेश सरकारने अतिशय संवेदनशील पद्धतीने ज्या प्रकारे परिस्थितीची हाताळणी केली आहे, त्यामुळे संपूर्ण राज्य एका संकटातून बाहेर पडले आहे.

मित्रांनो,

2017 पूर्वी ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात सरकार चालवले जात होते, त्या परिस्थितीत अशा प्रकारचे परिणाम दिसू शकले असते अशी आपण कल्पना देखील करू शकणार नाही. पूर्वीच्या सरकारांनी रुग्णालयांच्या आणि रुग्णालयातील खाटांच्या मर्यादित संख्येचे कारण देऊन हे आव्हान टाळण्याचा प्रयत्न केला असता. जगातील मोठमोठ्या देशांमध्ये काय घडत आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सरकारने युद्धपातळीवर काम केले.

मग ती विलगीकरण केंद्रे असोत किंवा अलगीकरणाच्या सुविधा असोत, त्यांच्या उभारणीवर सर्व प्रयत्न केंद्रित करण्यात आले. आपल्या वडिलांचा मृत्यू होऊन देखील, त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी योगीजी उत्तर प्रदेशच्या लोकांचा कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांच्यासोबत राहिले. जे कामगार बाहेरून येत होते, त्यांच्यासाठी अतिशय अल्प कालावधीत 60 हजार गाव देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या. या समित्यांनी गावांमध्ये विलगीकरण प्रणाली विकसित करण्यात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. केवळ अडीच महिन्यात उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांसाठी एक लाख खाटांची व्यवस्था करण्यात आली.

मित्रांनो,

लॉकडाऊनच्या काळात योगी सरकारने गरिबांना कोणत्याही प्रकारे अन्नाची समस्या उद्भवणार नाही याची खातरजमा करण्यासाठी काम केले हे देखील अभूतपूर्व आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशने गरिबांना आणि परतलेल्या स्थलांतरितांना अतिशय कमी कालावधीत मोफत रेशन उपलब्ध करून दिले. याचाच अर्थ अशा व्यवस्था करण्यात आल्या ज्यामुळे 15 कोटी गरिबांना अन्नाची समस्या निर्माण झाली नाही आणि कोणावरही उपाशी पोटी झोपायची वेळ आली नाही.

या काळात उत्तर प्रदेशात 42 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी देखील उत्तर प्रदेश सरकारने रेशन दुकानांचे दरवाजे खुले ठेवले. त्याचबरोबर सुमारे 5000 कोटी रुपये उत्तर प्रदेशातील 3.25 कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यामध्ये थेट जमा करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत बहुधा कोणत्याही सरकारने गरिबांना इतक्या मोठ्या प्रमाणावर मदत केलेली नाही.

मित्रांनो,

भारताला आत्म निर्भरतेच्या मार्गावर अतिशय जलद गतीने नेण्याची मोहीम असो किंवा गरीब कल्याण रोजगार अभियान असो उत्तर प्रदेशाने नेहमीच या मापदंडांवरही अतिशय जलद गतीने वाटचाल केली आहे. गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत कामगारांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी पक्क्या घरांची निर्मिती, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, पंचायतीच्या इमारतींची उभारणी, विहिरी आणि लहान तलावांचे बांधकाम, रस्त्यांचे बांधकाम, इंटरनेट लाईन्स इत्यादी प्रकारच्या 25 कामांची यादी तयार केली आहे.

आज आत्मनिर्भर भारत अभियानासह ही सर्व कामे पुढे सुरु ठेवताना उत्तर प्रदेशने सुमारे 1.25 कोटी मजूर आणि कामगारांना थेट रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी 60 लाख कामगारांना गावाच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे तर सुमारे 40 लाख कामगारांना एमएसएमई सारख्या लघुउद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध केला जात आहे. याशिवाय स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेंतर्गत हजारो उद्योजकांना 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. त्याशिवाय आज हजारो कारागिरांना आधुनिक यंत्रे आणि साधनांचे संच देण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्या कामांना मदत होईल आणि त्यात विस्तार होईल. मी पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांचे आणि ज्यांना रोजगार मिळाला आहे त्यांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

मी उत्तर प्रदेशातून निवडून गेलेला खासदार असल्याने योगीजींच्या सातत्याने संपर्कात असतो. कर्मचाऱ्यांची निवड, 30 लाखांपेक्षा जास्त कामगारांचे कौशल्य लक्षात घेणे, त्यांच्या कौशल्यानुसार आणि अनुभवानुसार त्यांच्या सविस्तर माहितीची आकडेवारी तयार करणे आणि त्यांच्यासाठी योग्य प्रकारच्या रोजगारांची व्यवस्था करणे यातून  उत्तर प्रदेश सरकारने किती बारकाईने आणि प्रयत्नपूर्वक तयारी केली आहे ते दिसून येते. उत्तर प्रदेशाची वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट ही योजना आधीपासूनच स्थानिक उत्पादनांचा प्रसार करत आहे आणि त्यांना मोठी बाजारपेठ मिळवून देत आहे.

आता आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत तयार करण्यात येत असलेल्या उद्योगांच्या समूहांसोबत अशा स्थानिक उत्पादनांचा संपूर्ण देशभर प्रसार करण्यात येणार आहे. याचा उत्तर प्रदेशाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कपडे, रेशीम, चामडे, तांबे इत्यादी अनेक उद्योग समूहांना चालना मिळणार आहे. या उत्पादनांना एक नवी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर फायदे मिळणार आहेत. अनेक दशकांपासून शेतकरी आणि लहान उद्योगांसाठी तीन महत्त्वाच्या सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत आहे. आता केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांमुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मंडयांच्या बाहेर विकायला परवानगी दिली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना जिथे चांगला भाव मिळेल तिथे आपला माल विकता येणार आहे. दुसरी बाब म्हणजे जर शेतकऱ्याची इच्छा असेल तर तो आपल्या मालाची किंमत पेरणीच्या वेळीच ठरवू शकतो.

आता बटाटे उत्पादक शेतकरी बटाट्यांच्या चिप्स बनवणाऱ्या कंपनीशी एक करार करू शकतो, आंबा पिकवणारा शेतकरी आमरस बनवणाऱ्या कंपनीशी, टोमॅटो पिकवणारा शेतकरी सॉस बनवणाऱ्या कंपनीशी आपल्या शेतीउत्पादनाची पेरणी करतानाच करार करू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या कोसळणाऱ्या भावांच्या समस्येपासून दिलासा मिळेल.

मित्रांनो,

आपल्या गुरांढोरांचे पालन करणाऱ्यांसाठी अनेक नवे उपक्रम सुरू केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पशुधन आणि दुग्धउत्पादन क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपयांचा विशेष पायाभूत निधी निर्माण करण्यात आला. यामुळे सुमारे एक कोटी आणखी नवे शेतकरी आणि पशुपालक दुग्धव्यवसाय क्षेत्रासोबत आणि या क्षेत्राशी संबंधित नव्या सुविधांसोबत जोडले जाणार आहेत. यामुळे आगामी काळात गावांमध्ये 35 लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. केंद्र सरकारने परवा उत्तर प्रदेशातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुद्धिस्ट सर्किटमध्ये महत्त्वाचा असलेल्या कुशीनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पूर्वांचलमधील हवाई संपर्क व्यवस्था बळकट होणार आहे आणि भगवान बुद्धांना मानणाऱ्या देशातील आणि परदेशातील कोट्यवधी भाविकांना उत्तर प्रदेशात सहजतेने येता येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. आणि तुम्हाला पर्यटन क्षेत्राच्या आणखी एका वैशिष्ट्याची माहिती आहे, या क्षेत्रामुळे किमान उपलब्ध भांडवलात कमाल मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध होत असतो.

मित्रांनो,

उत्तर प्रदेश नेहमीच भारताच्या वृद्धीच्या आलेखातील एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. गावांचे, गरिबांचे आणि देशाचे सक्षमीकरण करण्याच्या मोहीमांमध्ये उत्तर प्रदेशाचे योगदान या राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या साडेतीन वर्षात उत्तर प्रदेशने प्रत्येक महत्त्वाच्या योजनेत झपाट्याने काम केले आहे. केवळ तीन वर्षात उत्तर प्रदेशातील गरिबांसाठी 30 लाखांपेक्षा जास्त पक्की घरे बांधण्यात आली आहेत. केवळ तीन वर्षांच्या मेहनतीमधून उत्तर प्रदेशने स्वतःला हागणदारीमुक्त राज्य म्हणून जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशाने तीन युवकांना पारदर्शक पद्धतीने सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. केवळ तीन वर्षांच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात गर्भवती मातांच्या मृत्यूदरात 30 टक्क्यांनी घट झाली आहे.

मित्रांनो,

पूर्वांचलच्या पूर्वेकडील भागात एन्सेफेलायटीस अर्थात जपानी मेंदूज्वराचा अनेक वर्षांपासून प्रकोप होत असायचा.या आजारामुळे अनेक अर्भकांचे दुर्दैवी मृत्यू होत होते. आता उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांमुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदर देखील 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशाने वैद्यकीय महाविद्यालये किंवा आयुष्मान भारत अभियानांतर्गत इतर सुविधा उभारण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. उत्तर प्रदेश नवीन रस्ते आणि द्रुतगती मार्गांच्या बांधणीमध्ये अग्रेसर होऊ लागले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊ लागले असून शांतता नांदू लागली आहे. यामुळेच जगभरातील अनेक गुंतवणूकदार आता उत्तर प्रदेशकडे आकर्षित होत आहेत. स्थानिक आणि परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार जे काही प्रयत्न करत आहे त्या सर्व प्रयत्नांचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सक्रिय आहे. आणि अगदी आज सुद्धा इतर राज्ये कोरोना विषाणू विरोधात जोरदार संघर्ष करत असताना उत्तर प्रदेशाने आपल्या विकासाच्या एका महत्त्वाच्या योजनेचा प्रारंभ केला आहे. एका प्रकारे उत्तर प्रदेश या आपत्तीमधून निर्माण झालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर वापर करून घेत आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या रोजगारांच्या संधींबद्दल अभिनंदन.

कोरोना विरोधातील आपली लढाई अजून सुरूच आहे हे लक्षात ठेवा. कामासाठी बाहेर जरूर जा पण दो गज की दूरी कायम ठेवा, तुमचे तोंड आणि नाक फेस मास्कने झाका आणि स्वच्छता राखा. जीवन आणि चरितार्थाच्या या संघर्षात उत्तर प्रदेशचा विजय होईल आणि भारताचा देखील विजय होईल.

खूप खूप धन्यवाद.

 

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634771) Visitor Counter : 234