पंतप्रधान कार्यालय

डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90व्या वाढदिवस सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 27 JUN 2020 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जून 2020

 

आदरणीय डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन, सन्माननीय फादर्स, मार थोमा चर्चचे मान्यवर सदस्य,

या पवित्र सोहळ्याला संबोधणे हा माझा मोठा सन्मान आहे. आदरणीय डॉक्टर जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटनच्या यांच्या 90व्या वाढदिवसाच्या खास प्रसंगाचे औचित्य साधून आपण एकत्र जमलो आहोत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी देखील शुभेच्छा देतो. डॉ. जोसेफ मार थोमा यांनी आपले जीवन आपल्या समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित केले. दारिद्र्य दूर करणे आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांना विशेष आवड होती.

मित्रांनो,

लॉर्ड ख्रिस्ताचे प्रेषित संत थॉमस यांच्या उदात्त आदर्शांशी मार थॉमा चर्चचा अगदी जवळचा संबंध आहे. अनेक स्त्रोतांकडून आध्यात्मिक प्रभावांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे. संत  थॉमस यांचे योगदान आणि त्यांचा अनुयय याचे भारतीय ख्रिश्चन समुदायाच्या दृष्टीने खूप मोल आहे. संत थॉमस म्हणजेच विनम्रता आहेत. ते योग्यच म्हणाले आहेत “नम्रता हा सद्गुण असून तो नेहमीच चांगल्या कामांमध्ये फलदायी असतो.” या नम्रतेच्या भावनेतूनच मार थोमा चर्चने आपल्या भारतीय बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्य केले आहे. त्यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. संत थॉमस अत्यंत हुशार होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मार थोमा चर्चने भूमिका बजावली होती. राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने काम काण्यात चर्च आघाडीवर होते.

या चर्चने आणिबाणीशी लढा दिला. मार थोमा चर्च भारतीय मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. चर्चच्या योगदानाला राष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली आहे. मार थोमा चर्चचे माजी मेट्रोपॉलिटन फिलिपोस मार क्रिसोस्तोम यांना 2018 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते अनेकांना प्रेरणा देतात.

मित्रांनो,

जागतिक महामारीच्या विरोधात जग निकराने लढत आहे. कोविड-19 हा केवळ शारीरिक आजार नाही तर, लोकांच्या जीवाला धोका आहे. यानिमित्ताने आपल्या अनारोग्यदायी जीवनशैलीकडे आपले लक्ष गेले आहे. जागतिक महामारी सूचित करतो की, संपूर्ण मानवतेवर उपचार करण्याची गरज आहे. आपल्या पृथ्वीवर सौहार्द आणि आनंद वृद्धिंगत करण्यासाठी शक्य ते सर्वकाही करू या.

मित्रांनो,

तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, आपल्या कोरोना योद्धयांच्या सहाय्याने भारत कोविड-19शी निकराने लढा देत आहे. या वर्षाच्या सुरूवातीला, काही लोकांचा असा अंदाज होता की, भारतात विषाणूचा परिणाम खूप तीव्र असेल. परंतु, टाळेबंदी आणि सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे तसेच लोकांकडून लढ्याला बळ मिळाल्यामुळे इतर देशांपेक्षा भारत सुस्थितीत आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढत आहे.

कोविडमुळे किंवा अन्य कारणामुळे कोणतीही जीवित हानी दुर्दैवी आहे. मात्र कोविडमुळे भारतातील मृत्युदर प्रति लाख 12च्या खाली आहे. या संदर्भात सांगायचे झाले तर इटलीमधील मृत्यूचे प्रमाण दहा लाखांमागे 574 आहे., ब्रिटन, स्पेन आणि फ्रान्समधील आकडेवारीही भारतापेक्षा खूपच जास्त आहे. लाखो गावे, 85 कोटी लोकांच्या घराना  कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही.

मित्रांनो,

लोकांनी चालवलेल्या लढाईने आतापर्यंत चांगले परिणाम दिले आहेत; परंतु आपण आपले रक्षण करणे थांबवायचे का? नाही बिलकुल नाही. खरं तर, आपण आता आणखी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे, दोन गज की दूरी, गर्दीची ठिकाणे टाळणे, नियमित हात धुणे, हे महत्वाचे आहे.

त्याचबरोबर 130 कोटी भारतीयांचा आर्थिक विकास आणि  समृद्धीवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यापार आणि व्यवसायाची चाके सुरु व्हायला हवीत. शेती बहरली पाहिजे. गेल्या काही आठवड्यात केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेशी संबंधित अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन दोन्ही मुद्द्यांकडे लक्ष दिले आहे. समुद्रापासून अंतराळापर्यंत, शेतापासून कारखान्यांपर्यंत लोकांना अनुकूल आणि विकासाभिमुख  निर्णय घेण्यात आले आहेत.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत या आवाहनामुळे प्रत्येक भारतीयाला आर्थिक सामर्थ्य आणि  समृद्धी सुनिश्चित होईल. एका महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मंजूर केली. ही योजना आपल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे परिवर्तन करणार आहे. वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूकीने ही योजना या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न करेल.  निर्यात उत्पन्न वाढविणे आणि पन्नास लाखाहून अधिक लोकांना आणखी रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. आपल्याला चांगले तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि मूल्य साखळी  मजबूत करायचे  आहेत. मला खात्री आहे की केरळमधील माझ्या मच्छिमार बंधू आणि भगिनी यांना या योजनेतून लाभ होईल.

मित्रांनो,

अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे अंतराळ मालमत्ता आणि उपक्रमांचा अधिकाधिक वापर सुनिश्चित होईल. माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये सुगम्यता येईल. केरळमध्ये आणि विशेषत: दक्षिण भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये अनेक तरुणांना रुची असल्याचे मी पाहिले आहे. त्यांना या सुधारणांचा लाभ होईल.

मित्रांनो,

भारताला वाढीचे इंजिन बनवण्यासाठी आपल्या सरकारला नेहमीच संवेदनशीलता आणि दीर्घकालीन दूरदृष्टीने मार्गदर्शन केले आहे. आम्ही दिल्लीतील आरामदायी सरकारी कार्यालयांतून नव्हे तर, लोकांच्या प्रत्यक्ष प्रतिसादानंतर निर्णय घेतले आहेत. या भावनेनेच प्रत्येक भारतीयाला बँक खात्यात प्रवेश सुनिश्चित झाला. 8 कोटींहून अधिक कुटुंबांना धूरमुक्त स्वयंपाकघराची सुविधा मिळाली. बेघरांना आश्रय देण्यासाठी दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली आहेत.

'आयुष्मान भारत' ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आहे. सुमारे एक कोटी पेक्षा अधिक लोकांना दर्जेदार उपचार मिळाले आहेत. गरीबांसाठी आम्ही ते जिथे आहेत तेथे त्यांची मदत करण्यासाठी 'एक राष्ट्र-एक शिधापत्रिका' योजना आणत आहोत. मध्यम वर्गासाठी, जीवन सुलभतेने जगण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही किमान आधारभूत किंमत वाढविली आहे आणि त्यांना योग्य किंमत मिळेल, याची खात्री केली असून हे क्षेत्र दलालांपासून मुक्त करत आहोत.

महिलांसाठी आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की, त्यांच्या आरोग्याकडे विविध योजनांद्वारे लक्ष दिले जाईल. प्रसूती रजा वाढवून त्यांच्या कारकीर्दीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. केंद्र सरकार श्रद्धा, लिंग, जाती, पंथ किंवा भाषा यात भेदभाव करत नाही. 130 कोटी भारतीयांना सक्षम बनविण्याच्या इच्छेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत; आणि ‘भारतीय राज्यघटना’ आमचा मार्गदर्शक दीप आहे.

मित्रांनो,

पवित्र बायबल एकजूटतेबाबत विस्तृत चर्चा करते. आता आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याची वेळ आली आहे. याचा विचार करा- आपली कृती राष्ट्रीय विकासाला कसा हातभार लावू शकते? आज भारत म्हणत आहे- आम्ही स्थानिक पातळीवर उत्पादन करू आणि स्थानिक उत्पादनेही खरेदी करू. यामुळे अनेकांच्या घरात समृद्धीचा दिवा पेटला जाईल. आपले देश बळकट करण्याचे अनेक मार्ग आहेत. मार थोमा चर्च आपल्या मूल्यांच्या अनुषंगाने या प्रसंगी नक्कीच मदतीला येईल आणि आगामी  काळात भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.

पुन्हा एकदा मी आदरणीय डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांना शुभेच्छा देतो.

तुम्हा सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद.

 

* * *

S.Pophale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634759) Visitor Counter : 469