पंतप्रधान कार्यालय

आचार्य महाप्रज्ञ यांच्या जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 19 JUN 2020 4:54PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

आचार्य श्री महाश्रमण जी, तेरापंथी महासभा के अध्यक्ष सुरेश चंद्र गोयल जी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व महानुभाव आणि सहकारी!

आपल्या सर्वांसाठी ही सौभाग्याची बाब आहे की संतप्रवर आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण सर्व इथे एकत्र जमलो आहोत, त्यांची कृपा, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव आहेत.

संत प्रवर आचार्य श्री महाप्रज्ञ याना वंदन करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी आचार्य श्री महाश्रमण जी यांचाही विशेष आभारी आहे. कोरोनाच्या या कठीण काळातही, त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत प्रभावी स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.  

 

मित्रांनो

आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, ज्यांना आचार्य श्री महाप्रज्ञ जी यांचा सत्संग आणि प्रत्यक्ष भेटीचे सौभाग्य मिळाले आहे. त्यांच्या संपर्कात आल्यावर आपण त्यांच्या आध्यात्मिक उर्जेचा अनुभव घेतला असेल.

मी यासाठी हे म्हणतो आहे कारण माझ्या आयुष्यात मला अनेकदा आचार्य श्री यांचा स्नेह आणि आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले होते.

मला आठवते, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, त्यावेळी ते ही गुजरातला आले होते. मला त्यांच्या अहिंसा यात्रेत, मानवतेच्या सेवा अभियानात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

मी तेव्हा आचार्य प्रवर यांच्या समोर म्हटले होते, की “माझी इच्छा आहे की हा तेरा पंथ, माझाही पंथ बनावा. आचार्य जी यांच्या स्नेहामुळे, हा तेरा पंथ माझाही पंथ झाला आणि मी आचार्य श्री यांचा होऊन गेलो.

 

मित्रांनो,

मी नेहमीच त्यांच्या सान्निध्यात असतांना हा अनुभव घेतला आहे की त्यांच्यासारख्या युगऋषींच्या आयुष्यात स्वतःसाठी काहीही नसते. त्यांचे आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचे चिंतन सगळेकाही समाजासाठी, मानवतेसाठी असते.

त्यांचा हा मंत्र आणि त्याचे दर्शन, त्यांच्या जीवनात सतत स्पष्टपणे दिसत असे.

आपण सर्वांनी पहिले असेल, त्यांच्या आयुष्यात त्यांचे स्वतःचे असे काही नव्हते, मात्र प्रत्येकजण त्यांच्या जवळचा होता.

त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीही कोणत्याही वस्तूचा परिग्रह केला नाही, मात्र त्यांच्या मनात सर्वांविषयी प्रेम होते.

 

मित्रांनो,

या जगात आयुष्य कसे जगावे हे तर अनेकांना कळते, मात्र अशाप्रकारचे आयुष्य प्रत्यक्षात जगणारा सहजच मिळत नाहीआयुष्याला या स्थितीपर्यंत पोहचवण्यासाठी मोठे तप करावे लागते, समाज आणि सेवेसाठी कष्ट करावे लागतात मात्र, असे असाधारण काम कोणती असाधारण व्यक्तीच करू शकते.                     

म्हणूनच, राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर म्हणत असत—आचार्य प्रज्ञासिंह जी आधुनिकयुगातील विवेकानंद होते.

त्याचप्रमाणे, दिंगबर परंपरेचे मोठे संत, आचार्य विद्यानंद महाप्रज्ञ यांची तुलना,डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याशी करत असत.आचार्य महाप्रज्ञ यांनी जे साहित्य रचले ते उस्फूर्त होते, अद्भुत साहित्य होते.

आमचे श्रद्धेय अटलजी, स्वतः ही ज्ञान आणि साहित्याची जाण असणारे होते. ते म्हणत असत- “मी आचार्य महाप्रज्ञ जी यांच्या साहित्याचा, त्यांच्या साहित्यातील गूढतेचा आणि त्यांचे ज्ञान व शब्दांचा अत्यंत चाहता आहे”. वाणी तील सौम्यता, मंत्रमुग्ध करणारा आवाज, शब्दांची निवड करण्यातला समतोल, ही सगळी दैवी शक्तीच त्यांच्याकडे होती.

 

मित्रांनो,

आपणही आचार्य श्री यांचे साहित्य वाचाल, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे स्मरण कराल, तर आपल्यालाही अनुभव येईल की किती महापुरुषांची सावली त्यांच्या अंतरंगात होती, त्यांचे ज्ञान किती व्यापक होते.

त्यांनी ज्या सखोल अध्ययानातून अध्यात्मावर लिहिले आहे, तेवढाच व्यापक दृष्टीकोन त्यांनी तत्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा विषयांवरही मांडला आहे.

या विषयांवर महाप्रज्ञ जी यांनी संस्कृत, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा भाषांत 300 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. आणि आपल्याला त्यांचे ते पुस्तक स्मरत असेल- The Family and The Nation. हे पुस्तक महाप्रज्ञ जी यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत एकत्र लिहिले होते.

एक कुटुंब, सुखी कुटुंब कसे बनवावे, एक सुखी कुटुंब एक समृद्ध राष्ट्राची निर्मिती कशी करु शकेल, याविषयीचा दृष्टीकोन या दोन महापुरुषांनी पुस्तकात मांडला आहे. 

मला आठवते, मी गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यावर जेव्हा डॉ कलाम एकदा गुजरातला आले होते, तेव्हा मीही त्यांच्यासोबत आचार्य प्रवर यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी मला, एकाच वेळी दोन महापुरुषांच्या सहवासात राहण्याचे सद्भाग्य मिळाले होते.

दोघांच्याही एकत्र उपस्थितीमध्ये मी स्वतः घेतलेला अनुभव होता, कि आपल्याकडे एक ऋषी कशाप्रकारे वैज्ञानिक दृष्टी ठेवू शकतो आणि एक वैज्ञानिक कशाप्रकारे ऋषींचा भक्त होऊ  शकतो.

महाप्रज्ञ जी यांच्याबद्दल. डॉ कलाम म्हणत असत- त्यांच्या आयुष्याचे एकच उद्दिष्ट होते-- Walk, Acquire and Give. म्हणजेच, सतत यात्रा करा, ज्ञानार्जन करा आणि आपल्या आयुष्यात जे काही संचित आहे, ते समाजाला देत रहा. 

 

मित्रांनो

महाप्रज्ञ जी यांनी आपल्या आयुष्यात हजारो किलोमीटर्सची यात्रा आणि पदयात्रा केली. आपल्या अखेरच्या काळातही ते अहिंसा यात्रेतच होते.

ते म्हणत असत- “ आत्मा माझा ईश्वर आहे, त्याग माझी प्रार्थना आहे, मैत्री माझी भक्ती आहे, संयम माझी शक्ती आहे आणि अहिंसा माझा धर्म आहे.”

या शैलीनुसार, ते स्वतःही आयुष्य जगले आणि त्यांनी कोट्यवधी लोकांना त्याची शिकवण देखील दिली. योगाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना ‘नैराश्य मुक्त जीवनाची’ कला देखील शिकवली होती. आजपासून एकाच दिवसाच्या अंतराने आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, हा ही एक सुखद योगायोगच आहे. 

यानिमित्ताने, माहाप्रज्ञ जी यांचे ‘सुखी कुटुंब आणि समृद्ध राष्ट्र” हे स्वप्न साकार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे.

 

मित्रांनो,

आचार्य महाप्रज्ञ जी  यांनी आपल्या सर्वांना आणखी एक मंत्र दिला होता. त्यांचा हा मंत्र होता- “सुदृढ व्यक्ती, सुदृढ समाज, सुदृढ अर्थव्यवस्था” आजच्या या परिस्थितीत त्यांचा हा मंत्र आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.

आज देश या मंत्रासोबतच, आत्मनिर्भर होण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढे वाटचाल करतो आहे.

मला विश्वास आहे, ज्या समाज आणि राष्ट्राचा आदर्श आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी आपल्यासमोर ठेवला होता, तो समाज निर्माण करण्याचा संकल्प आपला देश नक्कीच पूर्ण करेल. आपण सगळे ते स्वप्न साकार करू. आपण सर्व जन निरोगी रहा, उत्तम रहा, संत प्रवर आचार्य श्री महाप्रज्ञ जी यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहचवत रहा, याच शुभेच्छांसह खूप खूप धन्यवाद!

****

B.Gokhale/ R. Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632617) अभ्यागत कक्ष : 253