पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 16 JUN 2020 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

कोविड-19 या जागतिक साथीच्या आजारामुळे त्यांच्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीची दोन्ही नेत्यांनी एकमेकांना माहिती दिली. तसेच, आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रात आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य स्थापन करण्याच्या शक्यतांचाही त्यांनी आढावा घेतला.

कोविड नंतरच्या परिस्थितीत, भारत-आणि कॅनडाची एकत्रित भागीदारी, जगाच्या कल्याणासाठी एक मोठी शक्ती होऊ शकते, विशेषतः जागतिक परीपेक्ष्यात मानवता मूल्यांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी ते महत्वाचे ठरेल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

जागतिक आरोग्य संघटनेसारख्या बहुराष्ट्रीय संस्था अधिक मजबूत करण्याची गरज आहे, यावर या दोघांनीही भर दिला आणि विविध आंतरराष्ट्रीय व्यासापीठांवर आरोग्य, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय मुद्यांवर एकत्रित काम करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली.

कॅनडामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी गेल्या काही काळात, कॅनडाच्या प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले. तसेच, भारतात अडकलेल्या कॅनडाच्या नागरिकांना परत पाठवण्यासाठी, भारताने केलेल्या मदतीबद्दल ट्रूडो यांनी आभार व्यक्त केले.

आगामी काळातही दोन्ही देशातील परस्पर चर्चा कायम ठेवली जाईल, यावर दोघांनीही सहमती व्यक्त केली. लोकशाही मूल्यांवर विश्वास असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्था या नात्याने, भारत आणि कॅनडा यांच्यात अनेक जागतिक मुद्यांवर नैसर्गिकरित्याच एकमताची भावना आहे, असे मत उभय नेत्यांनी या चर्चेदरम्यान व्यक्त केले. 

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632201) Visitor Counter : 226