पंतप्रधान कार्यालय

मुख्यमंत्र्यांबरोबर आभासी परिषदेत पंतप्रधानांनी सुरुवातीला केलेले निवेदन

Posted On: 17 JUN 2020 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2020

तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे खूप-खूप अभिनंदन !!

अनलॉक-वन नंतर ही आपली पहिलीच भेट आहे. देशातील 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अनलॉक-वनच्या अनुभवांबाबत  काल मी विस्तृत चर्चा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव काही मोठी राज्ये, मोठ्या शहरांमध्ये जास्त आहे हे वास्तव आहे. काही शहरांमध्ये जास्त गर्दी, लहान-लहान घरे, गल्ली-बोळांमध्ये शारीरिक अंतराच्या पालनाचा अभाव , दररोज हजारो लोकांची ये-जा  यामुळे कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आव्हानात्मक बनला आहे.

मात्र तरीही प्रत्येक देशवासियाने दाखवलेला संयम, अनेक ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि आपल्या कोरोना योद्धयांच्या समर्पणामुळे आपण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ दिली नाही. कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध, उपचार आणि नोंद यामुळे आपल्याकडे संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची गरज फारच कमी रुग्णांना भासत आहे ही दिलासादायक बाब आहे.

योग्य वेळी उचलण्यात आलेल्या पावलांमुळे आपण सर्वजण या मोठ्या संकटाचा सामना करू शकलो आहोत. लॉकडाऊन दरम्यान देशातील जनतेने जी शिस्त दाखवली, तिने विषाणूचा गुणाकार रोखला आहे. उपचारांची व्यवस्था असेल, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा असतील, प्रशिक्षित मनुष्यबळ असेल, या सर्वच बाबतीत आज आपण जास्त सुरक्षित स्थितीत आहोत.

तुम्हाला हे माहितच असेल की केवळ तीन महिन्यांपूर्वी पीपीईसाठी , निदान करण्याच्या किट्स साठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये हा:हाकार माजला होता. भारतात देखील अतिशय मर्यदित साठा होता, कारण आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून होतो. आज स्थिति अशी आहे की संपूर्ण देशात  1 कोटींहून अधिक पीपीई आणि तेवढेच  N95 मास्क राज्यांपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. आपल्याकडे निदान करण्याच्या किट्स चा पुरेसा साठा आहे आणि त्याची उत्पादन क्षमता देखील मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.  आता तर पीएम-केयर्स निधी अंतर्गत भारतातच तयार करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे.  

आज संपूर्ण देशात कोरोना चाचणी करणाऱ्या 900 हून अधिक प्रयोगशाळा आहेतलाखों कोविड विशेष खाटा आहेत, हजारो विलगीकरण आणि अलगीकरण केंद्र आहेत आणि रुग्णांच्या सुविधेसाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा देखील आहे.  लॉकडाउन दरम्यान लाखोंच्या संख्येने मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आले. सर्वात मोठी गोष्ट, आज देशाचा प्रत्येक नागरिक या विषाणूच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक सजग झाला आहे, जागरूक झाला आहे. हे सगळे राज्य सरकारांचे सहकार्य, स्थानिक प्रशासनाने दिवसरात्र केलेल्या कामामुळे शक्य झाले आहे 

मित्रांनो ,

कोरोना विरुद्धच्या लढाईत विजयाचा विश्वास देणाऱ्या या गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला आरोग्यविषयक सुविधा, सूचना प्रणाली, मानसिक मदत आणि लोकसहभाग यावर देखील अशाच प्रकारे निरंतर भर द्यावा लागेल.

मित्रांनो ,

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे , प्रत्येकाचा जीव वाचवणे ,याला आपले सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. हे तेव्हाच होईल जेव्हा कोरोना बाधित प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतील. यासाठी आपल्याला चाचण्यांवर आणखी भर द्यायचा आहे , जेणेकरून बाधित व्यक्तीला लवकरात लवकर शोधून त्याचे अलगीकरण करू शकू. आपल्याला या गोष्टींचेही भान बाळगायचे आहे कि आपली सध्याची जी चाचणी करण्याची क्षमता आहे त्याचा पूर्ण वापर होईल आणि सातत्याने त्याचा विस्तार देखील केला जाईल.

मित्रांनो ,

गेल्या दोन -तीन महिन्यांत मोठ्या संख्येने विलगीकरण आणि अलगीकरण केंद्रांची निर्मिती झाली. याचा वेग आपल्याला आणखी वाढवावा लागेल जेणेकरून कुठेही रुग्णांना खाटांची कमतरता भासणार नाही. कोरोनाच्या या संकटकाळात टेलिमेडिसिनचे महत्व देखील खूप वाढले आहे.  घरी विलगीकरणात किंवा अलगीकरणात राहणाऱ्या व्यक्ती असतील किंवा अन्य आजार असलेले रुग्ण असतील, सर्वांना टेलिमेडिसिनचा लाभ मिळावा यासाठी आपल्याला आपले प्रयत्न वाढवावे लागतील.

मित्रांनो ,

तुम्हाला माहितच आहे कि कुठल्याही महामारीचा सामना करण्यात योग्य वेळी योग्य माहिती मिळण्याचे महत्व अधिक आहे. म्हणूनच आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवे कि आपल्या हेल्पलाईन्स हेल्पफुल असतील, हेल्पलेस नाही. जसे आपले वैद्यकीय आणि निम- वैद्यकीय कर्मचारी  रुग्णालयांमध्ये कोरोना शी लढाई लढत आहेत, तसेच आपल्याला अनुभवी डॉक्टरांची मोठी पथके तयार करावी लागतील, जी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आजारी व्यक्तींना मार्गदर्शन करू शकतील, त्यांना योग्य माहिती देऊ शकतील. याशिवाय, आपल्याला युवा स्वयंसेवकांची फौज देखील तयार करावी लागेल जी जनतेसाठी प्रभावीपणे हेल्पलाइन चालवू शकतील.

ज्या राज्यांमध्ये आरोग्य सेतु App अधिक प्रमाणात डाउनलोड झाले आहे तिथे खूपच सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. आरोग्य सेतु App जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे, जास्तीत जास्त लोकांनी ते डाऊनलोड करावे यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहेत.  आपल्याला हे देखील लक्षात घ्यायचे आहे कि आता देशात हळूहळू मान्सून सक्रिय होत आहे. या काळात आरोग्याशी संबंधित समस्या उद्बभवतात, त्यांचा सामना करणे देखील खूप आवश्यक आहे, नाहीतर त्या खूप मोठे आव्हान ठरू शकतात.

मित्रांनो ,

कोरोना विरुद्ध या लढाईचा एक भावनिक पैलू देखील आहे. संसर्गाच्या भीतीमुळे , यामुळे निर्माण झालेल्या कलंकातून आपल्या नागरिकाना कसे बाहेर काढायचे यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला आपल्या लोकांना हा विश्वास द्यायचा आहे  कि कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि ती वेगाने वाढत देखील आहे. म्हणूनच कुणाला कोरोना जरी झाला तरी त्याने घाबरून जाऊ नये.

जे आपले कोरोना योद्धे आहेत, आपले डॉक्टर्स आहेत, अन्य आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी देखील आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्याला आपले प्राधान्य असायला हवे. त्यांची प्रत्येक स्तरावर  देखरेख करणे ही आपली सर्वांची, संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे.

मित्रांनो ,

कोरोना विरुद्ध लढाईत समाजातील अनेक घटकांनी, प्रत्येक क्षेत्रातील संबंधित लोकांनी, नागरी संस्थांच्या लोकांनी कायम आपल्याला प्रोत्साहित करत राहायला हवे. या संपूर्ण लढ्यात त्यांची प्रशंसनीय भूमिका राहिली आहे. आपल्या सार्वजनिक ठिकाणी , आपल्या कार्यालयांमध्ये  मास्क किंवा चेहरा झाकणारा रुमाल, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेबाबत लोकांना वारंवार आठवण करून द्यायची आहे, यात कुणालाही बेफिकिरीने वागू द्यायचे नाही.

मित्रांनो ,

अनेक राज्य कोरोना विरुद्ध लढाईत खूपच प्रशंसनीय  काम करत आहेत. या राज्यांच्या सर्वोत्तम पद्धती आहेत ज्या सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे कि प्रत्येक  राज्य आपले  अनुभव आणि आपल्या सूचना इथे मोकळेपणाने मांडतील. ज्यामुळे आगामी काळात एक उत्तम रणनीति आखण्यात आम्हा सर्वांना मदत मिळेल. आता मी गृहमंत्र्यांना विनंती करतो कि त्यांनी ही चर्चा पुढे न्यावी. 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632130) Visitor Counter : 229