PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
15 JUN 2020 7:37PM by PIB Mumbai

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दिल्ली-मुंबई, 15 जून 2020
भारत सरकार दिल्लीमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. राष्ट्रीय राजधानीतील कोविड -19 च्या परिस्थितीबद्दल दिल्लीत आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक झाली. त्यावेळी ते म्हणाले कि या महामारीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण सर्वांनी एकत्रित उभे राहिले पाहिजे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिली आणि या निर्णयांची तळागाळातील लोकांपर्यंत प्रामाणिकपणे अंमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. दिल्लीतील जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पक्षांनी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले. लोकांच्या हिताच्या दृष्टीने राजकीय मतभेद दूर ठेवून पुढे येण्याचे आवाहन अमित शहा यांनी केले. राजकीय ऐक्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि राजधानीतील साथीच्या परिस्थितीत सुधारणा करेल, असे ते म्हणाले. आपल्याला नवीन तंत्रज्ञानासह कोविड -19 चाचणी क्षमतेत सुधारणा करावी लागेल असे गृहमंत्र्यांनी सांगितले. आपण सर्व या महामारीवर विजय मिळवू आणि एकजूट होऊन ही लढाई जिंकू असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
या बैठकीला आम आदमी पक्षाचे संजय सिंह, भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, बसपचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित नेत्यांनी कोविड -19 च्या विरोधातील लढ्यासंदर्भात प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्लीच्या तीन महानगरपालिकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत काल झालेल्या बैठकीत संक्रमणाविरूद्ध दिल्लीच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात दिल्ली सरकारला तातडीने 500 रूपांतरित रेल्वे कोचची तरतूद करणे, कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी 8,000 खाटा वाढविणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रात संक्रमित रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण आणि पुढील दोन दिवसांत कोविड-19 चाचणी दुप्पट करणे आणि सहा दिवसात चाचणी क्षमता तिप्पट करणे यांचा समावेश आहे. खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील कोरोना खाटांपैकी 60% खाटा कमी दराने उपलब्ध करून द्याव्या आणि कोरोना चाचणी व उपचारांचे दर निश्चित करावेत असे या बैठकीत ठरले. खाजगी रुग्णालयांसाठीच्या या मार्गदर्शक सूचनांचे निरीक्षण करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य, व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे ठरले. तसेच दूरध्वनी मार्गदर्शनासाठी दिल्लीतील एम्स अंतर्गत कोविड-19 हेल्पलाईन स्थापित करण्याचा निर्णय झाला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7,419 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,69,797 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 51.08% पर्यंत वाढला आहे; यावरून ही वस्तुस्थिती निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
सध्या 1,53,106 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)ने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 653 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 248 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण 901 प्रयोगशाळा). त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
जलद आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा: 534 (सरकारी: 347 + खाजगी: 187)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 296 (सरकारी: 281 + खाजगी: 15)
सीबीएनएएटी(CBNAAT) आधारित चाचणी प्रयोगशाळा: 71 (सरकारी: 25 + खाजगी: 46)
गेल्या 24 तासांत 1,15,519 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 57,74,133 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
इतर अपडेट्स:
- संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेने आयुर्वेदिक उत्पादनांच्या नॅनोफायबरवर आधारित जैवअपघटनीय फेस मास्क विकसित केला आहे; जो विषाणू निष्प्रभावकारी आणि जीवाणू प्रतिरोधक म्हणून कार्य करेल. संस्थेने या फेस मास्कचे नाव ‘पवित्रपाती’ असे ठेवले आहे. हा मास्क ज्या कपड्यापासून तयार करण्यात आला आहे, त्या कपड्यामध्ये जीवाणू-प्रतिरोधक आणि विषाणू प्रतिरोधक गुणधर्म असणाऱ्या कडुनिंबाचे तेल, हळद, कृष्ण तुळस, ओवा, काळी मिरी, हिरड अरबी, लवंग, चंदन, केशर यासारख्या वनौषधींच्या अर्काचा वापर केला आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘पवित्रपाती’चा वापर स्वयं-दक्षतेसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा घटक म्हणून कार्य करेल. हे उत्पादन हवेच्या माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी मास्क म्हणून नियमितपणे वापरले जाऊ शकेल.
- कोविड-19 संसर्गजन्य आजाराच्या काळात समाजात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेली मदत आणि सहाय्यक साधने त्यांच्यापर्यंत वेळेत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने काही विशेष उपाययोजना केल्या आहेत. सध्या लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन, दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करणारे आभासी ADIP शिबीर पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील तलवांडी भाई तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. सरकारने टाळेबंदी अंशतः शिथिल केल्यानंतर, केंद्रीय समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत, ADIP योजनेच्या अंमलबजावणीसाठी ALIMCO ने आयोजित केलेले अशा प्रकारचे हे पहिलेच आभासी शिबीर होते.
- 13 जून 2020 रोजी कृषीवनीकरण क्षेत्रातील शेतकर्यांना उद्योगाशी जोडण्यासाठी आणि प्रजातींची योग्य निवड करण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अंमलबजावणी करणार्या राज्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. कृषी सहकार्य आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजय अग्रवाल यांनी उद्घाटन करताना कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना अधिक मोबदला मिळावा यासाठी केलेल्या कृषी क्षेत्रातील विविध सुधारणा अधोरेखित केल्या. यामध्ये 1.63 लाख कोटी रुपये खर्च आणि आंतरराज्यीय व्यापारातील अडथळे दूर करून आणि कृषी उत्पादनांची ई-ट्रेडिंग सुविधा पुरवून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय बाजारपेठ स्थापन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जिथे शेतमाल विक्री करायची आहे तेथे बाजारपेठ निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) अध्यादेश 2020 यांचा समावेश आहे. शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न, विशेषत: महिला बचत गटांसाठी रोपवाटिका, हिरवा चारा, शेंगायुक्त प्रजाती लागवडीद्वारे खतांची गरज कमी करणे, हवामान बदलाशी लढा देण्यासाठी कार्बन कमी करणे यांसारखे कृषीवनीकरणाचे बहुविध उपयोग त्यांनी अधोरेखित केले.
- ‘इंडिया टुरिझम मुंबई’ने पोस्टर डिझाईन स्पर्धा आणि भारतीय पारंपरिक आरोग्यदायी खाद्य पदार्थ बनवण्याची स्पर्धा आयोजित करून इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट (आयआयटीटीएम) च्या विद्यार्थ्यांच्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यामुळे नवीन पिढीचा योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष, सक्रिय सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. ‘इंडिया टुरिझम मुंबई’च्या कार्यालयीन झूम रूमची क्षमता ‘500 पॅक्स’ आहे. या माध्यमातून दररोज प्रादेशिक वेबिनारव्दारे,"निरोगी काया आणि योग "यांच्याविषयी तज्ञांची चर्चा आयोजित करून विविध कल्याणकारी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येत आहे. या आयोजनामागे सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे. हे कार्यक्रम दि. 15 ते 22 जून दरम्यान रोज सायंकाळी 5.00 वाजता असतील. या कार्यक्रमामध्ये हरिश शेट्टी, रंजना बाल्यन, गौरव गुरगुटे, डॉ. बाती पांडे यांची निरोगी मन, आरोग्य कल्याण, आयुर्वेद, मनाचे आरोग्य, योग, वेदांत यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा सार, तसेच शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, हे सांगण्यात येणार आहे. याचबरोबर ‘ब्रेथ ड्रीम गो’चे संस्थापक मरिएलन वार्ड हे योग या विषयासाठी खास भारत प्रवास करण्याविषयी बोलणार आहेत.
- दिल्लीतील कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे महापौर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली
- मॉरिशसच्या लुईस बंदरात 23 मे 2020 रोजी उतरवलेल्या भारतीय नौदलाच्या वैद्यकीय पथकाला मायदेशी परत आणण्यासाठी सागर अभियानाचा भाग म्हणून भारतीय नौदलाचे जहाज केसरी 14 जून 2020 रोजी मॉरिशसच्या लुईस बंदरात पुन्हा दाखल झाले. कोविड -19 व्यवस्थापनात मदत करण्यासाठी, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीविताचा धोका कमी करण्यात कौशल्य सामायिक करण्याच्या उद्देशाने तज्ञ डॉक्टर आणि निमवैद्यकीय लोकांचा समावेश असलेले 14-सदस्यांचे वैद्यकीय पथक लुईस बंदरात उतरविण्यात आले होते.
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्रात 3,390 नवीन कोविड-19 केसेस नोंद झाल्या त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 1,07,958 झाली आहे. यांपैकी 53,030 सक्रिय केसेस आहेत. हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये 1,395 नवीन केसेस नोंद झाल्या त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 58,135 झाली आहे धारावी मध्ये रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. 24 तासात केवळ 13 रूग्ण आढळले तर एकही मृत्यू झाला नाही. अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केली ही उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांसाठी उपलब्ध असणार नाही.
FACT CHECK




***
RT/MC/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631743)
Visitor Counter : 346
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam