• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
संरक्षण मंत्रालय

डीआयएटीने नॅनोफायबरच्या रुपात आयुर्वेद आधारित जैवअपघटनीय वापरून विषाणू निष्प्रभावकारी फेस मास्क विकसित केला

Posted On: 15 JUN 2020 3:45PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 15 जून 2020


संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेने आयुर्वेदिक उत्पादनांच्या नॅनोफायबरवर आधारित जैवअपघटनीय फेस मास्क विकसित केला आहे; जो विषाणू निष्प्रभावकारी आणि जीवाणू प्रतिरोधक म्हणून कार्य करेल. संस्थेने या फेस मास्कचे नाव ‘पवित्रपाती’ असे ठेवले आहे. हा मास्क ज्या कपड्यापासून तयार करण्यात आला आहे, त्या कपड्यामध्ये जीवाणू-प्रतिरोधक आणि विषाणू प्रतिरोधक गुणधर्म असणाऱ्या कडुनिंबाचे तेल, हळद, कृष्ण तुळस, ओवा, काळी मिरी, हिरड अरबी, लवंग, चंदन, केशर यासारख्या वनौषधींच्या अर्काचा वापर केला आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘पवित्रपाती’चा वापर स्वयं-दक्षतेसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा घटक म्हणून कार्य करेल. हे उत्पादन जीवाणूरोधी, बुरशीरोधी, विषाणूरोधी, सच्छिद्र, उत्कृष्ट जलरोधक (बाह्य स्तर), जलस्नेही/पाणी शोषून घेणारे (आतील स्तर) आणि जैवअपघटनीय आहे. या तंत्रज्ञानाने हे सिद्ध केले आहे की विणलेल्या कपड्यांमधील न विणलेला पडदा थेंब, पाण्याचा हपका, फवारा, जीवाणू आणि विषाणूंना प्रतिरोध करण्यास पाठबळ देते. हे उत्पादन हवेच्या माध्यमातून पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी मास्क म्हणून नियमितपणे वापरले जाऊ शकेल.

एएसटीएम डी-737 मानक, नॅनोफायबर पटल सरंध्रता (मॅट पोर्सिटी), जैवविघटन आणि एएसटीएम मानकांनुसार यांत्रिक गुणधर्मांनुसार उत्पादनाची वायु भेद्यता / श्वास क्षमता चाचणी केली आहे .

या तीन स्तरीय मास्क मधील वनौषधींचा अर्क विषाणूंच्या संपर्कात आल्याने विषाणू निष्प्रभावकारी होऊन हा मास्क विषाणूरोधी क्षमता प्रदान करतो. वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) म्हणून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांसाठी आणि कचरा व्यवस्थापन सामग्रीसाठी याचे उत्पादन वाढविले जाईल. यात कपडे, हातमोजे, गाऊन, चेहरा संरक्षक, हेड कव्हर इत्यादींचा समावेश असेल. या उत्पादनाची घडी घालता येईल (फोल्डेबल). एनएमआर द्वारे प्रथिन रेणूंची विप्रकृतीकरण क्षमता समजून घेण्यासाठी बनावट नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीच्या परिणामांनी हे सिद्ध केले की वनौषधींच्या अर्कामुळे अमिनो आम्लाचे विप्रकृतीकरण झाले. डीआयएटीने संभाव्य उत्पादकांना हे तंत्रज्ञान विनामूल्य देण्याचे ठरविले आहे आणि बऱ्याच कंपन्यांना यामध्ये रस आहे.

 

* * *

S.Pophale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1631657) Visitor Counter : 221

Read this release in: English

Link mygov.in