गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

शहरी वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी कोविड-19 च्या दृष्टीने राज्ये, केंद्रशासित प्रदेश, शहरे, मेट्रो रेल्वे कंपन्यांनी करावयाच्या उपाययोजना


गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने सूचना जारी केल्या

Posted On: 12 JUN 2020 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2020

 

गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने राज्ये, केंद्रशासित प्रदेश, शहरे आणि मेट्रो रेल कंपन्यांना जारी केलेल्या सूचनांमध्ये  तीन सूत्री  धोरण सुचविले आहे जे टप्प्याटप्प्याने [ अल्प (6 महिन्यांच्या आत), मध्यम ( 1 वर्षाच्या आत ) आणि दीर्घकालीन (1-3 वर्षे)]. स्वीकारता येईल. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज  मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी पाठवलेल्या सूचनेनुसार : -

  1. मोटारीशिवाय वाहतुकीला प्रोत्साहन आणि पुनरुज्जीवन (एनएमटी) - बहुतेक शहरी फेऱ्या पाच किलोमीटर अंतराच्या आत असल्यामुळे सध्याच्या कोविड 19 संकटात मोटारीशिवाय वाहतुकीने कमी खर्च, कमी मनुष्यबळ, सोपी आणि त्वरित अंमलबजावणी करता येईल आणि पर्यावरणाला अनुकूल, अशी अंमलबजावणी करण्याची योग्य संधी दिली आहे.
  2. प्रवाशांच्या वाढलेल्या आत्मविश्वासासह सार्वजनिक वाहतुक पुन्हा सुरु करणे - शहरी भागात सार्वजनिक वाहतूक हा कणा आहे, विशेषत: अल्प  / मध्यम उत्पन्न असलेल्या प्रवाशांसाठी ही सेवा त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक आहे. मात्र या टप्प्यावर अत्यावश्यक आहे की सार्वजनिक वाहतुकीच्या वापराद्वारे संसर्ग संक्रमित होण्यास आळा घालण्यासाठी योग्य स्वच्छता, प्रतिबंधात्मक आणि सामाजिक अंतर राखण्याच्या उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे.
  3. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा सक्रिय उपयोग- इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (आयटीएस), भीम, फोनपे, गूगल पे, पेटीएम इत्यादी सारख्या स्वदेशी रोकडरहित आणि स्पर्शरहित प्रणाली आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) सारखे तंत्रज्ञान सक्षम करून सार्वजनिक वाहतूक प्रणालीतील मानवी संवाद कमी करणे.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे, ज्याने आपल्या जीवनशैलीवर आणि आपल्या स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक परिवहन यंत्रणा अचानक प्रभावित केली आहे.

  1. पुराव्यांवरून दिसून येते की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत  90% नी घसरण झाली आहे.  पुढे असेही निदर्शनाला आले आहे की वायू प्रदूषणात 60% घट झाली  आहे. सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांचे पूर्वीच्या पातळीवरील प्रमाण पुन्हा प्रस्थापित करणे हे  शहरांसाठी एक मोठे आव्हान आहे, कारण लॉकडाउननंतरच्या परिस्थितीत लोक कदाचित सुरक्षित प्रवासासाठी अधिक पर्याय विशेषतः वैयक्तिक वाहनांचा वापर करण्याचा पर्याय स्वीकारतील.
  2. कार आणि इतर खासगी वाहनांचा वापर पुन्हा टाळण्यासाठी, जगभरातील अनेक शहरांनी ई-तिकीट, डिजिटल पेमेंटस आणि रस्ते बंद करून सायकलिंग आणि पादचाऱ्यांसाठी रस्त्यांची जागा पुन्हा उपलब्ध करून देणे,  बिगर मोटराइझ्ड वाहतूक (एनएमटी) प्राधान्य क्षेत्र  तयार करणे, पॉप-अप बाईक मार्गिका आणि पदपथ. सायकल चालवणे अधिक सुलभ करण्यासाठी पार्किंग आणि चार्जिंग उपकरणे आणि वित्तपुरवठा पर्याय प्रदान करण्याला  प्रोत्साहन दिले जात आहे.  कोविड -19 च्या दृष्टीने या शहरांद्वारे एनएमटीला प्रोत्साहन देण्यासाठी  अलीकडे हाती घेतलेले काही महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे आहेतः
    • न्यूयॉर्कने सायकल चालकांना पाठिंबा देण्यासाठी 40 मैल नवीन एनएमटी लेन वाढवली आहेत;
    • अमेरिकेतील ओकलँडने 10% रस्ते मोटार वाहनांसाठी बंद केले आहेत;
    • कोलंबियातील बोगोटाने  रात्रभरात  76 किमी सायकल मार्ग तयार केला आहे;
    • इटलीमधील मिलानमध्ये 22 मैल रस्त्यांचे सायकलिंग लेनमध्ये रूपांतर झाले आहे
    • ऑकलंड, न्यूझीलंडने ऑन-स्ट्रीट कार पार्किंग हटवले आहे आणि सध्याच्या बाईक आणि पदपथाच्या रुंदीकरणाच्या व्यतिरिक्त 17 किमी तात्पुरती बाईक लेन बांधली आहे. तसेच, शहराने पॉप अप बाईक लेनसाठी निधी उभारण्यासाठी एक कार्यक्रम विकसित केला आहे;
    • चीनमध्ये बाईक शेअरिंगला चालना मिळाल्यामुळे लॉकडाऊन दरम्यान देशभरातील फेऱ्यांमध्ये 150% वाढ झाली आहे; आणि
    • ब्रिटनमध्ये, स्थानिक व्यवसायांनी पादचाऱ्यांसाठी पदपथाची जागा वाढवली आहे, जेणेकरून रहिवाशांना दुकानाबाहेर रांगेत उभे राहताना सामाजिक अंतर पाळण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करता येईल.
  3. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने केलेल्या विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की देशात सुमारे 16-57 % शहरी प्रवासी पादचारी आहेत आणि सुमारे 30-40% प्रवासी शहराच्या आकारानुसार देशात सायकली वापरतात. याकडे संधी म्हणून पाहताना या कसोटीच्या काळात या पद्धतींना प्राधान्य वाढविल्यास प्रवाशांना आणखी एक खासगी वाहनाचा पर्याय मिळतो जो स्वच्छ, सुरक्षित आहे, जर तो इतर साधनांमध्ये एकत्रित केला असेल आणि सर्वांना  परवडणारा आहे. हे क्षेत्र राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण -2006 [NUTP-2006] च्या प्रमुख क्षेत्रापैकी एक आहे. यामुळे एनएमटी उद्योगातील मनुष्यबळासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
  4. भारतातील 18 मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे 700 कि.मी.जाळे कार्यरत असून देशभरातील 11 शहरांमध्ये दररोज 10 दशलक्ष प्रवासी वाहतूक करणारे 450 किमी चे बीआरटी नेटवर्क आहे. परंतु सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन केले जात असल्यामुळे त्यांची क्षमता कोरोना पूर्वीच्या काळाच्या तुलनेत 25-50 टक्के  इतकीच  वापरली जाईल. मागणी आणि पुरवठ्यातील अशा नाट्यमय आणि धाडसी बदलांसाठी या सार्वजनिक परिवहन प्रणालींना पर्यायी मार्गाची पूरक  आवश्यकता भासणार आहे
  5. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने तज्ज्ञ, उद्योग तज्ज्ञ, परिचालक, जागतिक बँक आणि देशातील आणि जगाच्या इतर भागातील अन्य प्रख्यात शहरी वाहतूक तज्ज्ञांशी अनेकदा चर्चा केली . चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये या सर्वानी स्पष्टपणे नमूद केले की, कोविड नंतरच्या काळात शहरी वाहतुकीच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल होईल. या कसोटीच्या काळात  सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करताना जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्यामुळे सर्व शक्यतां लक्षात घेता रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या वाढेल, ज्यामुळे केवळ प्रदूषणच वाढणार नाही तर वाहतुकीच्या इतर मार्गांसाठी जागा कमी उपलब्ध होईल, तसेच रस्ता सुरक्षेवर विपरित परिणाम आणि वायू प्रदूषणाची पातळी वाढून रस्त्यांवर गंभीर वाहतूक कोंडी होईल
  6. मात्र भारतात, जिथे वैयक्तिक वाहनांची मालकी अद्याप तुलनेने कमी आहे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्याकडे वाहतुकीचे मर्यदित पर्याय आहेत, या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह गतिशीलता पर्याय प्रदान करण्याला  शहरांचे प्राधान्य असेल, विशेषत: यापुढे सामाजिक अंतराच्या निकषामुळे क्षमतेच्या मर्यादेमुळे करणे कठीण आहे. सार्वजनिक वाहतूक, दोन्ही बस आणि मेट्रो या अनेक शहरांचा कणा आहेत आणि अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरु झाल्यामुळे शहरांना पर्यायी गतिशीलता पर्याय सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
  7. कोविड -19 ने आपल्याला वेगवेगळे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय चाचपण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची संधी दिली आहे, जी हरित , प्रदूषण रहित, सोयीस्कर आणि शाश्वत आहे. अशा प्रकारच्या धोरणांना प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान सर्व प्रकारे पैसे भरण्याची आणि प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून बिगर मोटराइझ्ड वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बाजारपेठांचा परिसर देखील हळूहळू पादचारी पथ बनवावा लागेल, जेणेकरून गर्दी कमी होईल  आणि लोकांना आनंददायक आणि सुरक्षित अनुभव मिळेल.

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631143) Visitor Counter : 533