पंतप्रधान कार्यालय
भारतीय उद्योग परिसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
02 JUN 2020 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2020
नमस्कार, सर्व प्रथम, सीआयआयने यशस्वीरीत्या 125 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. हा 125 वर्षांचा प्रवास खूप मोठा आहे. बरेच पडाव आले असतील, बरेच चढ-उतार आले असतील, पण 125 वर्षे एखादी संघटना चालवणे ही स्वतःमध्ये एक मोठी गोष्ट आहे. यात काळानुरूप बदल झाले आहेत, व्यवस्था बदलली आहे, आणि पहिल्यांदा मी या 125 वर्षांच्या काळात सीआयआयला बळकटी प्रदान करण्यासाठी ज्या-ज्या लोकांनी योगदान दिले, तसे पहिले तर यापैकी बरेच जण आज हयात नाहीत अशा सगळ्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो. जे लोक आपल्यामध्ये नाहीत त्यांना मी आदरांजली वाहातो आणि भविष्यात जे याची धुरा सांभाळणार आहेत त्या सर्वांना मी अनेकानेक शुभेच्छा देखील देतो.
कोरोनाच्या या काळात, असे ऑनलाइन कार्यक्रम आता नवीन सामान्य पद्धत होत आहेत. पण माणसाची ही सर्वात मोठी शक्ती देखील आहे की तो प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतो. आजही जेव्हा एकीकडे या विषाणूशी लढण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असताना दुसरीकडे आपल्याला अर्थव्यवस्थेची काळजी देखील घेतली पाहिजे. एकीकडे आपल्याला देशवासीयांचे प्राण वाचवायचे आहेत आणि दुसरीकडे आपल्याला देशाची अर्थव्यवस्था स्थिर करायची आहे तिला गती द्यायची आहे. या परिस्थितीत तुम्ही विकासाच्या पुनर्प्राप्ती (गेटिंग ग्रोथ बॅक) बद्दल बोलण्यास सुरवात केली आहे आणि निश्चितपणे आपण सर्व भारतीय उद्योगातील लोक यासाठी अभिनंदनास पात्र आहात. विकासाच्या पुनर्प्राप्ती (गेटिंग ग्रोथ बॅक) पलीकडे जाऊन मी तर असे म्हणेन की, होय, आम्ही नक्कीच विकासाची पुनरप्राप्ती करू. तुमच्यातील काही लोक असा विचार करतील की या संकटाच्या काळात मी इतक्या आत्मविश्वासाने हे कसे म्हणू शकतो?
माझ्या आत्मविश्वासाची अनेक कारणे आहेत. मला भारताच्या क्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनावर विश्वास आहे. मला भारताच्या प्रतिभा आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे. मला भारताच्या नवोन्मेश आणि प्रज्ञेवर विश्वास आहे. मला भारतीय शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांवर विश्वास आहे. आणि मला तुम्हां सर्व उद्योग नेत्यांवर विश्वास आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय, होय! आम्ही नक्कीच विकासाची पुनर्प्राप्ती करू. भारताला त्याचा विकास नक्की परत मिळेल.
मित्रांनो, कोरोनाने आपला वेग कितीही कमी केला असला तरीदेखील परंतु आज देशातील सर्वात मोठे सत्य हेच आहे की, भारत लॉकडाउनला मागे टाकत अनलॉक फेज वनमध्ये दाखल झाला आहे. अनलॉक फेज वनमध्ये अर्थव्यवस्थेचा मोठा सुरु झाला आहे. 8 जून नंतर बरेच काही सुरु होईल. म्हणजेच विकासाच्या पुनर्प्राप्तीला सुरुवात झाली आहे.
आज आपण हे सर्व करण्यास सक्षम आहोत कारण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना भारताने योग्य वेळी, योग्य ती पावले उचलली. जगातील सर्व देशांची तुलना केली तर आज आपल्याला कळेल की लॉकडाऊनचा किती व्यापक परिणाम भारतात झाला आहे. या लॉकडाउनमध्ये भारताने कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी केवळ भौतिक स्रोतच तयार केले नाहीत तर मनुष्यबळ देखील वाचविले आहे. अशा परिस्थितीत आता प्रश्न हा आहे की, पुढे काय? उद्योग नेते म्हणून हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येईल की सरकार आता काय करणार आहे? आत्मनिर्भर भारत अभियानाशी निगडीत देखील अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील; आणि हे खूप स्वाभाविक आहे.
मित्रांनो, कोरोनाविरूद्ध अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देणे हे आमच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. यासाठी जे निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे असे सर्व निर्णय सरकार घेत आहेत. आणि यासोबतच देशाला दीर्घकाळ मदत करणारे निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
मित्रांनो, गरीब कल्याण योजनेतून गरीबांना तातडीने फायदा होण्यास मदत झाली. या योजनेंतर्गत सुमारे 74 कोटी लाभार्थ्यांना शिधा देण्यात आला आहे. स्थलांतरित कामगारांना देखील मोफत शिधा दिला जात आहे. याशिवाय आतापर्यंत गरीब कुटुंबांना त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत दिली गेली आहे. स्त्रिया असो, दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, कामगार, प्रत्येकाला याचा फायदा झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान, सरकारने गरिबांना 8 कोटीहून अधिक गॅस सिलिंडर वितरित केले आहेत - तेही विनामूल्य. 50 लाख खाजगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात ईपीएफ रकमेच्या 24टक्के रकमेचे शासकीय योगदान प्राप्त झाले आहे, जे 800 कोटी रुपये आहे.
भारताला वेगवान विकासाच्या मार्गावर परत आणण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत उभारण्यासाठी 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हेतू, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नवोन्मेश. सरकारने नुकत्याच घेतलेल्या धाडसी निर्णयांमध्ये ते तुम्हाला दिसून येतील. या सर्व निर्णयांमुळे भविष्यासाठी बरीच क्षेत्रे सज्ज झाली आहेत. या कारणास्तव, आज भारत नवीन विकासाभिमुख भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो, आमच्यासाठी सुधारणा म्हणजे कोणतेही अनियत किंवा विखुरलेले निर्णय नसतात. आमच्यासाठी सुधारणा प्रणालीगत, नियोजित, एकात्मिक, परस्पर जोडल्या गेलेल्या आणि भविष्यकालीन प्रक्रिया आहेत
आमच्यासाठी सुधारणांचा अर्थ म्हणजे निर्णय घेण्याचे धैर्य असणे आणि त्यांना तार्किक निष्कर्षापर्यंत नेणे. आयबीसी असो, बँक विलीनीकरण असो, जीएसटी असो, फेस लेस आयकर मुल्यांकन असो, आम्ही सर्व प्रणाल्यांमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यावर, आणि खासगी उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर व्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे. याचमुळे सरकार अशा धोरणात्मक सुधारणा देखील करीत आहे ज्याची देशाने आशा सोडली होती. जर मला कृषी क्षेत्राविषयी बोलायचे असेल तर स्वातंत्र्यानंतर झालेल्या नियम व कायद्यांमुळे शेतकरी मध्यस्थांच्या तावडीत सापडले. शेतकरी आपला कृषी माल कुठे विकू शकतो, कुठे नाही यासंदर्भातील नियम खूप कठोर होते. दशकांपासून शेतकऱ्यांवर होणार अन्याय दूर करण्याची इच्छाशक्ती आमच्या सरकारने दाखीविली.
कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायद्यात सुधारणा केल्यावर आता त्यांना देखील अधिकार प्राप्त झाले आहेत. शेतकरी आता त्याला वाटेल तेव्हा आणि त्याची इच्छा असेल त्याला शेतीमाल विकू शकतो. आता शेतकरी देशातील कोणत्याही राज्यात आपला कृषीमाल विकू शकतो. तसेच, गोदामांमध्ये ठेवलेले धान्य किंवा कृषी उत्पादने आता इलेक्ट्रॉनिक व्यापारातून विकली जाऊ शकतात. आपण कल्पना करू शकता, कृषी-व्यवसायासाठी किती नवीन मार्ग खुले झाले आहेत. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या कामगारांचे कल्याण लक्षात घेऊन रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी कामगार सुधारणाही केल्या जात आहेत.
ज्या बिगर-धोरणात्मक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी नव्हती अशी क्षेत्रे देखील आता खुली करण्यात आली आहेत. तुम्हाला हे लक्षात आले असेल की, सबका साथ - सबका विकास - सबका विश्वास या मार्गावर चालत असताना आपण बर्याच वर्षांपासून ज्या निर्णयाची मागणी केली जात होती त्याबद्दल देखील निर्णय घेतले आहेत. मित्रांनो, कोळशाचा साठा असलेला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश, ज्याच्याकडे कोळशाचा मुबलक साठ आहे- ज्यांचाकडे तुमच्यासारखे धैर्यवान आणि साहसी उद्योजक आहे, परंतु तरीही त्या देशात कोळसा बाहेरून येतो, कोळसा आयात होतो, त्याचे कारण काय आहे? कधी सरकारमुळे तर कधी धोरणांमुळे अडथला निर्माण झाला. परंतु आता कोळसा क्षेत्राला या बंधनातून मुक्त करण्याचे काम सुरू झाले आहे.
कोळसा क्षेत्रात आता व्यावसायिक उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, खनिज खाणींमध्ये देखील आता खाणकाम आणि संशोधन एकाचवेळी करू शकतात. या क्षेत्राशी परिचित लोकांना या निर्णयाचे दूरगामी परिणाम माहित आहेत.
मित्रांनो, सरकार ज्या दिशेने वाटचाल करत आहे त्या दिशेने आमचे खाण क्षेत्र, उर्जा क्षेत्र, किंवा संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्र असो,उद्योगांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळतील आणि तरुणांसाठी नवीन संधीही खुल्या होतील. या सर्वांच्या पलीकडे जाऊन आता देशातील धोरणात्मक क्षेत्रात खासगी उद्योगांचा सहभाग हे देखील आता एक वास्तव बनू लागले आहे. तुम्हाला अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल किंवा अणुऊर्जा क्षेत्रात नवीन संधी शोधायच्या असतील, या सर्व शक्यता तुमच्यासाठी पूर्णपणे मोकळ्या आहेत.
मित्रांनो, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र आपल्या देशाच्या आर्थिक इंजिनसारखे आहे. देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, हे योगदान सुमारे 30 टक्के आहे. एमएसएमईची व्याख्या सुधारण्याची उद्योगांची दीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे एमएसएमईला चिंतामुक्त विकास करणे शक्य होईल आणि एमएसएमईची स्थिती कायम राखण्यासाठी इतर मार्ग अवलंबण्याची गरज नाही. देशातील एमएसएमईमध्ये काम करणाऱ्या कोट्यवधी साथीदारांना फायदा होण्यासाठी 200 कोटी रुपयांपर्यंतच्या सरकारी खरेदीमध्ये जागतिक निविदा रद्द केल्या आहेत. यामुळे आपल्या छोट्या उद्योगांना अधिक संधी मिळतील. एक प्रकारे, आत्मनिर्भर भारत पॅकेज हे एमएसएमई क्षेत्रातील इंजिनसाठी इंधन आहे.
मित्रांनो, या निर्णयाची प्रासंगिकता समजण्यासाठी, आजची जागतिक परिस्थिती पाहणे आणि समजणे फार महत्वाचे आहे. आज जगातील सर्व देशांना पूर्वीपेक्षा एकमेकांशी साथ अधिक हवी आहे. देशांमध्ये परस्परांची गरज अधिक वाढली आहे. परंतु हे चिंतन देखील सुरु आहे की, जुने विचार, जुन्या प्रथा आणि जुनी धोरणे प्रभावी कशी असतील. स्वाभाविकच आहे यावेळी नवीन पद्धतीने मंथन सुरू आहे. आणि अशा वेळी भारताकडून जगाच्या अपेक्षा, आणखी वाढल्या आहेत. आज जगाचा भारतावरील विश्वास वाढला आहे आणि नवीन आशाही पल्लवित झाल्या आहेत. आपण हे देखील पाहिले आहे की कोरोनाच्या या संकटात जेव्हा एका देशाला दुसर्या देशाला मदत करणे कठीण होते तेव्हा भारताने दीडशेहून अधिक देशांमध्ये वैद्यकीय साहित्य पाठवून त्यांना मदत केली आहे. मित्रांनो, विश्व विश्वासू, विश्वासार्ह जोडीदार शोधत आहे, भारतात क्षमता, सामर्थ्य, निपुणता आहे.
भारताप्रती संपूर्ण जगाचा जो विश्वास निर्माण झाला आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी, भारताच्या उद्योग जगताने पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. ही तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे, सीआयआयसारख्या संघटनांची जबाबदारी आहे की विश्वासू, गुणवत्ता, स्पर्धात्मकता ही भारताच्या विनिर्मानिशी संबंधित असेल. तुम्ही दोन पावले पुढे आलात तर सरकार चार पावले पुढे येऊन तुम्हाला पाठबळ देईल. देशाच्या पंतप्रधानाच्या नात्याने मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुमच्या सोबत उभा आहे. भारतीय उद्योग जगतासाठी ही एक योग्य संधी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा विकासाची पुनर्प्राप्ती करणे हे तितकेसे अवघड नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता तुमच्याकडे, भारतीय उद्योगांकडे एक स्पष्ट मार्ग आहे. आत्मनिर्भर भारताचा मार्ग. स्वावलंबी भारताचा मार्ग. आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण सामर्थ्यशाली बलवान बनू आणि जगाला देखील आपल्या सोबत घेऊ.
आत्मानिरभर भारत संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत पूर्णपणे एकरूप होऊन समर्थन देखील देईल. परंतु लक्षात ठेवा, स्वावलंबी भारत याचा अर्थ असा आहे की आम्ही धोरणात्मक क्षेत्रात कोणावरही अवलंबून राहणार नाही. हे भारतात मजबूत उद्योग निर्माण करण्याविषयी आहे. असे उद्योग जे जागतिक शक्ती बनू शकतात. हे रोजगार निर्मितीबद्दल आहे. हे आपल्या लोकांना सक्षम बनविणे आणि आपल्या देशाचे भविष्य परिभाषित करणारे समाधान तयार करण्याविषयी आहे. आता आपल्याला जागतिक पुरवठा साखळीत भारताची भागीदारी मजबूत करणारी एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल. या मोहिमेमध्ये सीआयआयसारख्या दिग्गजांनाही नव्या भूमिकेत पुढे यावे लागेल. आता तुम्हाला स्वदेशी प्रेरणेचे विजेते म्हणून पुढे यावे लागेल. आपल्याला देशांतर्गत उद्योगांची पुनरप्राप्ती सुलभ करावी लागेल, पुढील स्तराच्या विकासास मदत करावी लागेल, पाठिंबा द्यावा लागेल, आपल्याला बाजारपेठेला जागतिक स्तरावर वाढविण्यात मदत करावी लागेल.
मित्रांनो, आता देशामध्ये अशी उत्पादने तयार करा जी जगासाठी असतील. आपण देशाची आयात कशी कमी करू शकतो, कोणती नवीन उद्दिष्ट्ये निश्चित केली जाऊ शकतात? सर्व क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आम्हाला आमची उद्दीष्टे ठरवायची आहेत. मला आज हाच संदेश उद्योगांना द्यायचा आहे आणि देश आपल्याकडून हीच अपेक्षा ठेवतो.
मित्रांनो, भारतात उत्पादन करण्यासाठी, मेक इन इंडियाला रोजगाराचे प्रमुख माध्यम बनविण्यासाठी आपल्यासारख्या विविध उद्योगांच्या संघटनांशी चर्चा करून अनेक प्राधान्य क्षेत्र निवडली आहेत. यापैकी फर्निचर, एअर कंडिशनर, चामडे व पादत्राणे या तीनही क्षेत्रांमध्ये काम सुरू केले आहे. आम्ही आमच्या एअर कंडिशनरच्या मागणीच्या 30 टक्के पेक्षा जास्त आयात करतो. आम्हाला हे लवकरात लवकर कमी करावे लागेल. त्याचप्रमाणे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चामडे उत्पादक असूनही जागतिक निर्यातीत आमचा वाटा खूपच कमी आहे.
मित्रांनो, अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपण चांगली कामगिरी करू शकतो. मागील वर्षांमध्ये, वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या केवळ आपल्या सर्व सहकार्यांच्या मदतीने देशात तयार केल्या आहेत. देश आज मेट्रो कोचची निर्यात करीत आहे. त्याचप्रमाणे मोबाईल फोन उत्पादन, संरक्षण उत्पादन असो बर्याच क्षेत्रांमधील आयात कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि मी मोठ्या अभिमानाने म्हणेन की 3 महिन्यांच्या आत आपण वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे तयार केली आहेत- पीपीई ची शेकडो करोडोंचा उद्योग तुम्ही उभा केला आहे. आज भारत दिवसाला 3 लाख पीपीई किट्स बनवित आहे, ही आपल्या उद्योगाची ताकद आहे. आपल्याला ही क्षमता प्रत्येक क्षेत्रात वापरावी लागेल. माझे सगळ्या सीआयआयच्या मित्रांना हीच विनंती आहे की त्यांनी उद्योजकांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करावी तसेच शेतकर्यांच्या भागीदारीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आता गावांजवळील स्थानिक कृषी उत्पादनांच्या संकुलासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. सीआयआयच्या सर्व सदस्यांसाठी यात बऱ्याच संधी आहेत.
मित्रांनो, शेती असो, मत्स्यव्यवसाय असो, अन्न प्रक्रिया असो, पादत्राणे असो, औषधनिर्मिती असो, अशा अनेक क्षेत्रांमध्ये संधीची अनेक कवाडे तुमच्यासाठी खुली झाली आहेत. सरकारने शहरांमध्ये स्थलांतरितांसाठी निवास स्थान भाड्याने देण्याच्या योजनेची जी घोषणा केली आहे त्या योजनेत सक्रिय सहभागासाठी मी तुम्हां सर्व सहकार्यांना आमंत्रित करतो.
मित्रांनो, आमचे सरकार खासगी क्षेत्राला देशाच्या विकासाच्या यात्रेतील भागीदार मानते. आत्मनिर्भर भारत अभियानाशी संबंधित उद्योगातील प्रत्येक गरज पूर्ण करण्याची काळजी घेतली जाईल. मी तुमच्यासह सर्व भागधारकांशी सतत संवाद साधतो आणि हे सुरूच राहिल. मी तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचा सविस्तर अभ्यास करण्याची विनंती करतो. सर्वानुमत घ्या , संकल्पना विकसित करा, मोठा विचार करा. आपण एकत्रितपणे आणखी संरचनात्मक सुधारणा करू ज्या आपल्या देशाचा मार्ग बदलतील.
आपण एकत्रितपणे आत्मनिर्भर भारत उभारू. मित्रांनो, या, देशाला स्वावलंबी करण्याचा संकल्प करूया. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावूया. सरकार तुमच्या सोबत उभी आहे, तुम्ही देशाच्या लाक्ष्यासोबत उभे रहा. तुम्ही यशस्वी व्हाल, आपण यशस्वी होऊ तर देश नवीन उंचीवर पोहोचेल, आत्मनिर्भर होईल. पुन्हा एकदा सीआयआय ला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप आभार!!
G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628789)
Visitor Counter : 659
Read this release in:
Hindi
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam