आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी स्थिती 1

Posted On: 26 MAY 2020 7:38PM by PIB Mumbai

 

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

संसर्गाचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी प्रादुर्भाव रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात आणि श्वसनमार्गाची स्वच्छता आणि वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाची प्रभावी स्वच्छता आवश्यक आहे. या संकटावर मात करण्यासाठी कोविडला साजेशी वर्तणूक सुनिश्चित करण्याची गरज आहे. यामध्ये मास्क / चेहऱ्यांच्या आच्छादनाचा नियमित वापर आणि वृद्ध आणि असुरक्षित लोकांच्या संरक्षणासाठी कार्य करणे देखील समाविष्ट आहे. नोवेल कोरोना विषाणू विरोधात जगात सध्या असलेली सामाजिक लस म्हणजे शारीरिक अंतर नियमांचे पालन करणे.

भारताने आपली चाचणी क्षमता लक्षणीयरीत्या वाढविली असून आता तो उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. भारत आता दररोज अंदाजे 1.1 लाख नमुन्यांची चाचणी करीत आहे. प्रयोगशाळा, सुधारणा, आरटी-पीसीआर मशीन (वास्तविक वेळ -पॉलिमर चेन रिअक्शन मशीन) आणि मनुष्यबळ वाढवून ही क्षमता वाढविण्यात आली आहे. कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या तपासण्यासाठी आजमितीस भारताकडे एकूण 612 प्रयोगशाळा आहेत; त्यातील आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे 430 तर खाजगी क्षेत्राद्वारे 182 प्रयोगशाळा चालविल्या जातात. लक्षणे असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या चाचण्या करण्यासाठी आणि लक्षणे नसलेल्या स्थलांतरित मजुरांना गृह विलगिकरणात ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली राज्य/केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आली आहे. कोविड -19 चाचणीसाठी ट्रूनाट यंत्रे तैनात करण्याकरिता बहुतेक राज्ये / केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात (एनटीईपी) काम करीत आहेत. आरटी-पीसीआर-किट्स, व्हीटीएम, स्वॅब आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्सचे स्वदेशी उत्पादक ओळखले गेले आहेत आणि गेल्या काही महिन्यांत त्यांचे उत्पादन सुकर केले आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे आणि सध्या तो 41.61% आहे. कोविड -19 आजारातून आतापर्यंत एकूण 60,490 रुग्ण बरे झाले आहेत. देशात या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही 3.30% (15 एप्रिल रोजी) वरून सध्याच्या 2.87% घट होताना दिसून येत आहे. हे प्रमाण जागतिक स्तरावर कमीत कमी आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची जागतिक सरासरी सध्या 6.45% च्या आसपास आहे.

दर लाख लोकसंख्येच्यामागे या आजाराने मृत्यू होण्याच्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की जगात प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 4.4 मृत्यूचे प्रमाण आहे तर भारतात जगाच्या तुलनेत ते कमी म्हणजे 0.3 प्रति लाख आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे असलेले मृत्यूचे प्रमाण आणि मृत्यू दर याची तुलनेने कमी असलेली आकडेवारी ही वेळेवर रुग्ण चिकित्सा करून त्यांचे नैदानिक व्यवस्थापन दर्शविते.

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626969) Visitor Counter : 346