माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 12 मिनिटांपर्यंत वाढवण्यासाठी सल्लामसलत सुरु: प्रकाश जावडेकर


कम्युनिटी रेडिओवरील बातम्यांचा प्रस्ताव विचाराधीन; कम्युनिटी रेडिओची संख्या लवकरच वाढवण्याची योजना: जावडेकर

Posted On: 22 MAY 2020 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

 

कम्युनिटी रेडिओला दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले. सर्व कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या श्रोत्यांशी त्यांनी एकाच वेळी संवाद साधला, त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 7.00 आणि 7.30 च्या दरम्यान दोन समान टप्प्यात याचे प्रसारण झाले.

जावडेकर म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75% खर्च मंत्रालयाकडून केला जातो जो एकूण खर्चाचा मोठा हिस्सा असतो परंतु दैनंदिन कामकाजाचा खर्च केंद्राद्वारे उचलला जातो. सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळण्याची गरज भासू नये आणि कम्युनिटी केंद्रांवरून अधिकाधिक स्थानिक जाहिराती प्रसिद्ध होतील.

कम्युनिटी रेडिओ हा मुळातच एक समुदाय आहे असे आपल्या संवादाच्या प्रारंभी मंत्री म्हणाले. ही केंद्रे म्हणजे परिवर्तनाचे पाईक आहेत आणि ही केंद्रे दररोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात आणि लवकरच अशा केंद्रांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन मंत्रालय पुढे येईल असे त्यांनी सांगितले.

लोकांना कोरोना विषाणू विरूद्धचा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन करतानाच मंत्री म्हणाले की आपण जशी इतर आजारांवर मात केली तशीच यावरही करू. तथापि, त्यांनी हे स्पष्ट केले की आता आपल्याला नवीन जीवनशैलीचा अंगीकार करावा लागेल ज्यात शक्यतो घरी राहणे,  वारंवार हात धुणे, चेहऱ्यावर मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर नियमांचे पालन करणे या चार गोष्टी अंतर्भूत असतील.

सुरक्षित अंतर आणि आर्थिक घडामोडींविषयीच्या आव्हानांवरील पेचप्रसंगावर बोलताना “जान भी जहां भी” या मंत्राचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि सांगितले की प्रतिबंधात्मक क्षेत्रात निर्बंध सुरू असतानाच ग्रीन झोनमध्ये आर्थिक क्रिया सुरू केल्या आहेत.

बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी भाष्य केले. एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले. बनावट बातम्यांचा धोका ओळखून त्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. त्या बातम्या आकाशवाणीलाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल असा सल्लाही त्यांनी दिला.  ते म्हणाले की, मंत्रालयाने पत्र सूचना कार्यालयांतर्गत एक सत्यता पडताळणी विभाग अर्थात फॅक्ट चेक सेल तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात.

केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की हे एक सर्वसमावेशक पॅकेज आहे ज्यात शेती आणि उद्योगासह विविध क्षेत्रातील सुधारणांचा समावेश आहे आणि आयात कमी करून निर्यातीत वाढ करण्याचा या पॅकेजचा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले की, हे पॅकेज चांगले असून लोक त्याबद्दल आनंदी आहेत.

Official Photo of HMIB.jpeg

पार्श्वभूमी:

  • कम्युनिटी रेडिओ हा आकाशवाणी आणि खासगी रेडिओ प्रसारण (एफएम) सह रेडिओ प्रसारणातील तिसरा वर्ग आहे. ते कमी शक्तीचे एफएम रेडिओ केंद्र असून स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करते तसेच ते समुदायाच्या मालकीचे असून समुदायाच्या फायद्यासाठी 10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे व्यवस्थापनही समुदायाकडून केले जाते.
  • 2002 साली कम्युनिटी रेडिओसाठी पहिले धोरण अधिसूचित झाल्यानंतर भारतात कम्युनिटी रेडिओची सुरुवात झाली. या धोरणामुळे केवळ शैक्षणिक संस्थांना कम्युनिटी रेडिओ स्थापित करण्यास परवानगी मिळाली. 2006 मध्ये हे धोरण व्यापक करण्यात आले आणि तेव्हा स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) आणि इतर नफारहित संस्थांनादेखील भारतात कम्युनिटी रेडिओ स्थापित करण्याची परवानगी मिळाली. आज भारतात 290 कम्युनिटी रेडिओ केंद्र कार्यरत आहेत. जेथे इतर माध्यमांची उपस्थिती अगदी मर्यादित आहे अशा ठिकाणच्या अंदाजे 90 दशलक्ष लोकांपर्यंत या कम्युनिटी रेडिओ केंद्रांची व्याप्ती आहे. या कम्युनिटी रेडिओ केंद्रांद्वारे केलेले प्रसारण स्थानिक आणि बोली भाषेमध्ये असते म्हणून त्याचा समुदायावर अधिक प्रभाव पडतो. 
  • संस्थात्मक तपशील पुढीलप्रमाणे:-

अ.क्र.

संस्थेचा प्रकार

कम्युनिटी रेडिओची संख्या

1

शैक्षणिक संस्था

130

2

स्वयंसेवी संस्था

143

3

कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके)

17

 

एकूण

290

 

कम्युनिटी रेडिओला सहकार्य करण्यासाठी सरकारने “भारतातील कम्युनिटी रेडिओ चळवळीला समर्थन” नावाची 25 कोटी रुपयांची एक योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी चालू वर्षात 4.50 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 

* * *

R.Tidke/S.Thakur/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626189) Visitor Counter : 350