गृह मंत्रालय

लॉकडाउन 4.0 -राज्ये / केंद्रशासित प्रदेश गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये लागू केलेले निर्बंध सौम्य करू शकत नाहीत, केवळ स्थानिक पातळीवरील मूल्यांकन आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ते कठोर बनवू शकतात: गृह मंत्रालय

Posted On: 18 MAY 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  मे 2020

केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) कोविड-19 ला आळा घालण्यासाठी लॉकडाउन निर्बंधासंदर्भात 17.05.2020 रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लॉकडाऊन 31.05.2020 पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे निर्बंधांमध्ये व्यापक प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

आजपासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आता 17.05.2020 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी विभागणी करावी. रेड / ऑरेंज झोनमध्ये प्रतिबंधित  आणि बफर झोनबाबत निर्णय स्थानिक पातळीवरील तांत्रिक माहिती आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे स्थानिक प्रशासन  घेईल.

प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणे कठोर निर्बंध कायम ठेवले जातील आणि फक्त आवश्यक व्यवहारांना परवानगी दिली जाईल. देशभरात प्रतिबंधीत सेवा-उपक्रमांना मनाई कायम राहील. इतर सर्व विशेषत: गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांतर्गत  प्रतिबंधित असलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त अन्य उपक्रमांना परवानगी असेल.

हे मुद्दे लक्षात घेउन गृह मंत्रालयाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा बजावले आहे कि  सुधारित मार्गदर्शक सूचनांअंतर्गत लॉकडाउन निर्बंध व्यापक प्रमाणात शिथिल केले असले तरी राज्ये / केंद्रशासित प्रदेश गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू निर्बंध सौम्य करू शकत नाहीत. परिस्थितीच्या वास्तविक विश्लेषणाच्या आधारे  आवश्यकता  भासल्यास ते अन्य  काही उपक्रमांना मनाई करू शकतात किंवा निर्बंध घालू शकतात.

तसेच हे देखील कळवण्यात आले आहे की राज्य  / केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवर झोनची विभागणी करताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले मापदंड  / मर्यादा विचारात घ्यायला हवेत. जनतेच्या सोयीसाठी स्थानिक पातळीवर केंद्र आणि संबंधित राज्यांच्या मार्गदर्शक सूचनांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेले अधिकृत निवेदन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1624988) Visitor Counter : 255