पंतप्रधान कार्यालय
वेसाक बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
07 MAY 2020 10:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
नमस्कार,
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा,आपणा सर्वाना आणि भगवान बुद्धांच्या जगभरातल्या अनुयायांना वेसाक उत्सवाच्या शुभेच्छा!
या पवित्र दिनी आपणा सर्वांची भेट घेण्याची आणि आपणा सर्वांकडून आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. 2015 आणि 2018 मध्ये दिल्लीत तर 2017 मध्ये कोलंबो इथे झालेल्या उत्सवात आपणा समवेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली.
मात्र या वेळी परिस्थिती अगदी वेगळी आहे. आपण सर्वजण थेट प्रत्यक्ष भेटू शकत नाही.
मित्रहो,भगवान बुद्धांनी म्हटले आहे-
मनो पुब्बं-गमा धम्मा,
मनोसेट्ठा मनोमया, म्हणजे,धम्माचे अस्तित्व मनात असते, मनच सर्वोच्च आहे, सर्व कृतीमागचा कर्ता आहे. मी आपणाशी मनाने जोडला गेलो असल्याने आपण थेट प्रत्यक्ष समोरासमोर भेटलो नसलो तरी उणीव भासत नाही. आपण सर्वांसमवेत प्रत्यक्ष सहभागी होता आले असते तर अधिकच आनंदाची बाब होती मात्र यासाठी सध्या परिस्थिती अनुकूल नाही.
त्यामुळे,दूर असूनही तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे आणि ते समाधान कारकही आहे.
मित्रहो,लॉक डाऊनच्या या कठीण परिस्थितीतही आभासी वेसाक बुद्ध पौर्णिमा दिन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाची प्रशंसा होत आहे.आपल्या कल्पक प्रयत्नांमुळे जगभरातले लाखो अनुयायी या कार्यक्रमात परस्परांशी जोडले जात आहेत.
लुम्बिनी,बोध गया, सारनाथ आणि कुशीनगर बरोबरच श्रीलंकेत अनुराधापुरा स्तूप आणि वास्कादुवा मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाची सांगड,अतिशय सुंदर !
अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे ऑनलाईन स्ट्रीमिंग हा अद्भुत अनुभव आहे.जागतिक कोरोना महामारी विरोधातल्या लढ्यातल्या जगभरातल्या आघाडीच्या योद्ध्यांसाठी हा कार्यक्रम प्रार्थना सप्ताह म्हणून साजरा करण्याचा संकल्प आपण केला आहे. या उपक्रमाबद्दल मी आपली प्रशंसा करतो.
अशा संघटीत प्रयत्नातूनच आपण मानवतेला या कठीण आव्हानातून बाहेर काढू शकू, लोकांचा त्रास कमी करू शकू.
मित्रहो,
प्रत्येक जीवनातल्या अडचणी दूर करण्याचा संदेश आणि निर्धाराने भारतीय संस्कृतीला नेहमीच मार्ग दाखवला आहे. भगवान बुद्धांनी भारताच्या या महान संस्कृती आणि परंपरेला अधिक समृद्ध केले. त्यांचा संदेश कोणत्याही एका परिस्थिती किंवा विषयापुरता मर्यादित नाही.
अनेक शतके, सिद्धार्थ जन्म, सिद्धार्थ गौतम झाल्यानंतर आणि पूर्वीच्या काळाचे हे चक्र अनेक परिस्थितीतून फिरवत अव्याहत सुरु आहे.
काळ बदलला,परिस्थिती बदलली, समाज व्यवस्था बदलली मात्र भगवान बुद्धांचा संदेश आपल्या जीवनात निरंतर प्रवाही राहिला. बुद्ध हे केवळ नाव नाही तर एक पवित्र विचार आहे, असा विचार जो प्रत्येक मानवी ह्रदयाचा हुंकार आहे मानवतेला मार्गदर्शन करत आहे. बुद्ध त्याग आणि तपस्या यांची सीमा आहेत.
बुद्ध म्हणजे सेवा आणि समर्पण. बुद्ध म्हणजे दृढ इच्छा शक्ती सह सामाजिक परिवर्तनाचा परमोच्च बिंदू. बुद्ध म्हणजे स्वतः त्याग करून जगात आनंद पसरवण्यासाठी समर्पित. या वेळेला आपण आपल्या सभोवती इतरांची सेवा करणारे, रुग्णांवर उपचार करणारे, रुग्णालये स्वच्छ राखणारे, कायदा आणि सुव्यवस्था राखणारे अनेक जण आपण पाहत आहोत. हे सर्वजण अहोरात्र काम करत आहेत. भारतात, भारता बाहेर असणाऱ्या या सर्वांना सलाम.
मित्रहो,
जगभरात उलथापालथ होत असताना दुःख ,निराशा मोठ्या प्रमाणात दिसून येते, अशा वेळी भगवान बुद्ध यांची शिकवण अधिकच समर्पक ठरते.मानवाने कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. थकणे हा पर्यायच नाही. आज आपणही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अथक काम करत आहोत.
भगवान बुद्धांनी चार सत्य सांगितली ,दया, करूणा, सुख आणि दुःख दोन्हीतही अविचल राहणे, गुण दोषासह जसा आहे तसा स्वीकार करणे, ही सत्य, भारत भूमीची सदैव प्रेरणा राहिली आहेत.
भारत नि:स्वार्थ भावनेने,कोणताही भेदभाव न बाळगता, संकटाच्या या काळात देशात आणि जगातही संकटातल्या व्यक्तीसमवेत उभा आहे.
कोणताही नफा –तोटा न पाहता संकटाच्या या काळात इतरांना शक्य ती सर्व मदत करण्याची ही वेळ आहे.याच कारणामुळे, जगातल्या अनेक देशांनी, संकटाच्या या काळात भारताची आठवण काढली आणि भारतानेही ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.
भारत आज प्रत्येक भारतवासीयाचे जीवन वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच त्याच बरोबर जागतिक जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने निभावत आहे.
मित्रहो,
भगवान बुद्धांचे एक-एक वचन,एक-एक उपदेश मानवता सेवेसाठी भारताची कटिबद्धता दृढ करते. भारताचा बोध आणि आत्म बोध या दोन्हीचे बुद्ध प्रतिक आहेत.या आत्मबोधासह भारत मानवतेसाठी, संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी निरंतर काम करत आहे आणि राहील. भारताची प्रगती नेहमीच जगाच्या प्रगतीसाठी सहाय्यक राहील.
मित्रहो,
आपल्या यशाचे उद्दिष्ट आणि प्रमाण दोन्हीही काळानुसार बदलत राहिले आहे. मात्र आपण एक गोष्ट सदैव स्मरणात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपले काम नेहमीच सेवाभावाने व्हायला हवे. दुसऱ्या प्रती करूणा आणि सेवाभाव असेल तर या भावना आपल्याला इतक्या बळकट करतात की मोठ्यात मोठ्या संकटावरआपण मात करू शकतो.
सुप्प बुद्धं पबुज्झन्ति,
सदा गोतम सावका
म्हणजे जे अहोरात्र मानवतेच्या सेवेत मग्न आहेत तेच बुद्धांचे खरे अनुयायी आहेत.हाच भाव आपले जीवन प्रकाशमान करत राहो, गतिमान करत राहो.या सदिच्छेसह आपणा सर्वांचे खूप-खूप आभार. या कठीण परिस्थितीत आपण आपली ,आपल्या कुटुंबाची ज्या देशात आहात तिथली काळजी घ्या, आपले संरक्षण करा आणि शक्य तितकी दुसऱ्यालाही मदत करा.
सर्वांचे आरोग्य उत्तम राहो, या सदिच्छेसह इथे भाषण थांबवतो.
धन्यवाद !
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621975)
Visitor Counter : 273
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam